गायत्री आहेर - शिक्षणासाठी कायपण!


-gaytri-with-studentsनांदगाव तालुक्यातील अनकवाडे शाळेतील पहिली-दुसरीचे विद्यार्थी त्यांची ओळख इंग्रजीतून करून देतात. त्या लहानशा गावाने आणि तेथील विद्यार्थ्यांनी 2018 मध्ये वृक्षदिंडी, ग्रंथदिंडीही अनुभवली! त्यांच्यासाठी शाळा म्हणजे आनंदाचे झाड झाले आहे. त्या सर्व बदलाचे कारण आहेत, त्यांच्या शिक्षक- गायत्री आहेर. गायत्री आहेर यांनी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करत असताना विद्यार्थ्यांचे आयुष्य ‘घडवण्या’चा प्रयत्न चालवला आहे.

गायत्री इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव शाळेत शिक्षणसेवक म्हणून रुजू झाल्या. त्यांना अध्यापनाची गोडी ‘नॅशनल प्रोग्रॅम फॉर एज्युकेशन ऑफ गर्ल्स एनहान्समेंट अॅाण्ड लर्निग’ या योजनेत काम करता करता लागली. गायत्री तेथेच रुजू झाल्या (20 जून 2007). तेथे आदिवासी वस्ती असल्याने गायत्री यांना भाषेची अडचण आली, पण त्यांनी त्यातून मार्ग सहशिक्षकांच्या मदतीने काढला. त्यांची शासनाच्या अनेक योजनांसाठी काम करता करता तेथील बायामाणसांशी गट्टी जमली. गायत्री यांनी त्या बायकांना शिक्षणाचे, जगण्याचे महत्त्व सांगण्यासाठी आडगावात ‘जागर स्त्रीशक्तीचा’ हा कार्यक्रम सुरू केला. पोलिस, सरकारी अधिकारी अशा क्षेत्रांतील विविध स्त्रिया त्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. तेथील आयाबायांना बाईचे कार्यक्षेत्र चूल आणि मूल यांपलीकडे आहे, हे हळूहळू पटू लागले. त्या त्यांच्या लेकीबाळींना आग्रहाने शाळेत धाडू लागल्या. त्यांनी तेथील मुलींनाही कलाकुसरीच्या वस्तू शिकवून मग त्यांचे मोठे प्रदर्शन भरवले.
गायत्री यांची बदली अजंग (मालेगाव तालुका) येथे 2013 मध्ये झाली. शाळेमध्ये येणारी मुले, विशेषत: फिरस्त्या कुटुंबांतील, गावाबाहेरची होती. स्थानिकांनी शाळेला तितकेसे स्वीकारले नव्हते. गायत्री आणि सहकारी यांनी स्थानिकांकडून विश्वास संपादन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शाळा डिजिटल केली तरीही मुले येईनात. बहुतांश लोकांचा ओढा इंग्रजी माध्यमाकडे होता. शाळेने इंग्रजीवर काम सुरू केले. गायत्री यांचा त्यात पुढाकार होता. मराठी शाळेतील विद्यार्थीही त्या विषयात काही कमी नाहीत ते दाखवून देण्याचा त्या मागे हेतू होता. गायत्री यांनी शैक्षणिक खेळांचा आधार इंग्रजीची भीती घालवण्यासाठी घेतला. त्यासाठी समाजमाध्यमे, इंटरनेट पालथे घातले. मुलांची भाषेची भीती खेळांच्या माध्यमातून धूम पळाली आणि त्यातून अवतरला, ‘इंग्लिशविंग्लिश’ हा अनोखा कार्यक्रम! इंग्रजीतून नाटक, कविता, गाणी सादर करणारी ती सारी त्यांच्याच गावातील शाळेतील विद्यार्थी मंडळी आहेत, हे पाहून गावाचा शाळेवर विश्वास बसला. पटसंख्येत वाढ झाली.

-stri-shakti-त्यानंतर गायत्री आणि त्यांचे सहकारी यांनी शिष्यवृत्ती परीक्षेचे आव्हान स्वीकारले. गायत्री यांनी पाचवीच्या वर्गाला शिकवताना संपूर्ण लक्ष शिष्यवृत्ती परीक्षेवर केंद्रित केले. तो पूरक अभ्यास असतो. तो करण्यास मुलांना कंटाळा येऊ न देता लावणे, ही कसोटीच होती. गायत्रीलाही त्यातील गणिते काही वेळा सुटत नसत. त्या त्यांची उत्तर शोधायच्या. विद्यार्थ्यांआधी त्यांचाच अभ्यास असा चालायचा. त्या धडपडीला फळ आले आणि त्यांचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता यादीत चक्क आले! गावामधील शाळेबद्दलचा विश्वास अभिमानात रूपांतरित झाला.

गायत्री यांची बदली त्या शाळेतील काम आकाराला येत असतानाच झाली, ती नांदगाव तालुक्यातील अनकवाडे शाळेत. त्याआधीच्या दोन्ही शाळा मोठ्या होत्या, पण अनकवाडेची शाळा लहान आहे. त्यांना त्या द्विशिक्षकी शाळेमध्ये अध्यापनासोबतच इतरही प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. शिवाय, तेथे गायत्री यांच्याकडे पहिली-दुसरी-तिसरी असे जोडवर्ग आहेत. गायत्री म्हणतात, “येथे शिकवणे ही माझी खरी परीक्षा होती. अजूनही आहे. मी शाळेत रुजू झाल्यावर आठ दिवसांतच उपशिक्षणाधिकारी आले होते. त्यांनी पाहिले, की तिसरीच्या एकाही मुलाला त्याचे नावदेखील नीट लिहिता येत नाही.’’ गायत्रीची चूक त्यात नव्हती. कारण त्या आठ दिवसांपूर्वीच तेथे बदली होऊन आल्या होत्या, पण तरी ती गोष्ट त्यांच्या मनाला लागली. गायत्री त्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळवून द्यायचेच हे मनाशी पक्के करून कामाची आखणी करू लागल्या. त्यांनी स्वत: खपून आकर्षक शैक्षणिक साहित्य बनवले. मुलांना वर्गात बसण्यापेक्षा खेळण्यास आवडायचे. त्यामुळे शाळेत उपस्थिती कमी असे. मग त्यांनी वर्गच पटांगणावर आणला. सकाळच्या परिपाठात भरपूर वेळ घेतला. त्यामध्ये गोष्टी, गाणी, सोपे खेळ घेण्यास सुरुवात केली. ती शाळा महिनाभर मैदानातच भरायची. मुलांना शाळेची गोडी परिपाठातील विविध खेळांमुळे लागली. त्यांना घरी नुसते उंडगत राहण्यापेक्षा शाळेत येऊन हे वेगळे खेळ खेळणे आवडू लागले. विद्यार्थ्यांना शिस्त, नीटनेटकेपणा शिकवण्यासाठी स्मार्ट बॉय, स्मार्ट गर्ल असे किताब दिले गेले. दररोज एका स्मार्ट बॉय नि गर्ल यांना चॉकलेट, पेन्सिल अशी बक्षीसे मिळू लागली. मग विद्यार्थी बक्षीस आणि कौतुक, दोन्हींच्या ओढीने शाळेत आपोआप नीटनेटकेपणाने येऊ लागले.

-shala-patanganमाइंड मॅप म्हणजे एक शब्द लिहून त्या संबंधातील इतर शब्द विद्यार्थ्यांकडून गोळा करणे- गायत्री यांनी परिपाठात त्या पद्धतीचाही उपयोग केला. त्यामुळे विद्यार्थी बोलू लागले, त्यांची मते मांडू लागले. गायत्री यांनी त्यासोबत भाषापेटीचाही वापर सुरू केला. विद्यार्थ्यांच्या भाषेत आणि पर्यायाने इतर विषयांच्या अभ्यासातही सुधारणा दिसू लागली. विद्यार्थ्यांना त्यांच्याही शाळेत इतर शाळांसारखे काही कार्यक्रम व्हावेत असे वाटायचे. त्यामुळेच वृक्षदिंडी, ग्रंथदिंडी शाळेतून 2018 मध्ये निघाली. शाळा म्हणजे कोंडवाडा नव्हे तर आनंदशाळा आहे हे मुलांना त्या कार्यक्रमांनी पटले. परिणाम म्हणून पटसंख्या बेचाळीसवरून बासष्टवर गेली. गावामध्ये पाण्याची कमतरता आहे, त्यामुळेच गायत्री आहेर आणि त्यांचे विद्यार्थी पाण्याच्या रिकाम्या बाटल्या झाडाला बांधून त्यापासून सिंचनाचा वेगळा प्रकल्प साकारत आहेत.

गायत्री आहेर – 7841988112

- स्वाती केतकर- पंडित 9730498960
swati.pandit@expressindia.com
('लोकसत्ता'वरून उद्धृत, संपादित-संस्कारीत)
 

लेखी अभिप्राय

धन्यवाद सर आपल्या थिंक महाराष्ट्र डॉट कॉम या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपण माझ्यासारख्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे काम समाजापुढे आणण्याचा प्रयत्न करत आहात. ग्रामीण भागातील शाळेत काम करत असताना शिक्षकाला चाकोरीबाहेर जाऊन विद्यार्थी शाळेत आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. प्राथमिक गरजा देखील पूर्ण न होऊ शकणाऱ्या परिस्थितीतुन आलेली ही मुले शाळेत आणणे ,टिकवणे आणि शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकांचे कसब पणाला लागते. त्याच बरोबर इतरही अनेक अशैक्षणिक कामांचा त्रास,सरकारी कागदांचा पसारा शिक्षकांच्या मागे असतो. अशावेळी आपल्या सारख्या व्यक्तींचे प्रोत्साहन पूरक शब्द खूप काही करण्याचं बळ देऊन जातात. धन्यवाद स्वाती ताई, धन्यवाद नितेश शिंदे सर.

गायत्री दिनकर आहेर18/04/2019

Beautiful...

Dr Nagesh Tekale19/04/2019

या खऱ्या सावित्रीच्या लेकी.

नुसतं फुले शाहु आंबेडकर म्हणत राजकीय कीचड बनवणाऱ्यांपेक्षा हजारपट चांगल्या.

Chandrakant joshi19/04/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.