भूगोल झाला सोप्पा!


ढोकी येथील लातूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भूगोल म्हणजे डाव्या हाताचा खेळ आहे. भूगोलातील जिल्हे, तालुके -  त्यांची भौगोलिक स्थाने, नद्या, उगम, पर्वतरांगा या सगळ्या गोष्टी ते घडाघड सांगू शकतात. त्यांच्या त्या प्रगतीचे कारण आहेत, त्यांचे अभ्यासू शिक्षक किरण साकोळे. ते त्यांनी बी ए आणि डी एड ची पदवी मिळवल्यावर 15 जून 2007 रोजी उस्मानाबादमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेवर रुजू झाले. ते पाचवी ते सातवी या वर्गांना इंग्रजी शिकवत असत. त्यांनी दुसऱ्या बाजूला एम ए आणि बी एड पूर्ण केले. त्यांना डॉक्टर, व्हायचे होते. पण ते हुकले आणि त्यांच्या हाती स्टेथस्कोपच्या ऐवजी खडू-फळा आला. त्यानी तो घेऊन ‘अभ्यासाचा कंटाळा’ या आजारावर रामबाण उपचार केले आहेत आणि त्यांचे ‘ऑपरेशन शाळा’ व्यवस्थित पार पाडले जात आहे.

त्यांची लातूरजवळच्या ढोकी या गावात जून 2016 मध्ये बदली झाली. त्या लहानशा गावात इयत्ता चौथीपर्यंत शाळा होती. तीही द्विशिक्षकी. शाळेचा पट पंधरा होता. पहिलीला प्रवेशपात्र मुलांची संख्या अकरा होती, पण इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश शून्य. कारण लोकांना आसपासच्या ‘विंग्रजी’ शाळा अधिक विश्वासार्ह वाटत. मग साकोळे आणि मुख्याध्यापक, दोघेही गावात अक्षरश: फिरले, त्यांनी पालकांना 'आमच्याकडे मुले द्या, आम्ही त्यांचे सोने करून दाखवू' अशी विनंती केली, तेव्हा अकरापैकी चार मुलांचे प्रवेश झाले. त्यानंतर परगावाहून सालगड्यांची काही मुले आणि दुष्काळामुळे गावात परत आलेली दोन विद्यार्थी अशी मिळून पटसंख्या पंचवीस झाली. मग साकोळे आणि मुख्याध्यापक पवार यांनी काही प्रयत्न सुरू केले. शाळेमध्ये साऊंड सिस्टिम होती, पण ती किरकोळ अडचणीअभावी बंद पडली होती. साकोळे यांनी ती स्वखर्चाने सुरू करून घेतली. मग शाळेत माइकवरून मधल्या सुट्टीत संगीतमय पाढे सुरू झाले. राष्ट्रगीत, पसायदान, प्रार्थना, शाळेत दिल्या जाणाऱ्या सूचना सारे काही माइकवरून ऐकू येऊ लागले. त्याची मुलांना गंमत वाटली. शाळा जवळची वाटू लागली.

साकोळे यांनी एके दिवशी परिपाठात लातूर जिल्ह्यातील तालुक्यांची नावे विद्यार्थ्यांना विचारली. ती कोणालाच आली नाहीत. त्यावेळी किरण यांना पहिल्यांदा जाणीव झाली, की आधी त्या विद्यार्थ्यांना भूगोल शिकवण्यास हवा. भूगोल शिकवला की आपोआप भवताल समजतो. परिसराची समज येते. मुलांच्या मनात जिज्ञासा जागी होते. त्यांना एक छान खेळ सुचला. सरांनी प्रत्येक विद्यार्थ्याला तालुक्याचे एका नाव दिले. मैदानावर थोड्या अंतरावर गोल आखून त्या गोलात प्रत्येक मुलाला उभे केले. उदाहरणार्थ, कोणी झाला लातूर तालुका, कोणी रेणापूर, कोणी उदगीर इत्यादी. सर्वप्रथम, प्रत्येकाने त्याला ज्या तालुक्याचे नाव दिले आहे, ते नाव, टाळी वाजवून मोठ्याने सांगायचे. तसे प्रत्येकाचे नाव सांगून झाल्यावर प्रत्येक तालुक्याने बाकीच्या तालुक्यांकडे जाऊन, त्यांना टाळी देऊन त्या त्या तालुक्याचे नाव मोठ्याने म्हणायचे. अशा पद्धतीने प्रत्येकाला एकेक तालुका तर पाठ झाला; शिवाय, बाकीच्या मित्र-मैत्रिणींना कोणता तालुका आला आहे ते समजून घेताना आणखी तालुके पाठ झाले. मग तालुक्याचे स्थान आणि नाव अशी संगत लावली गेली. मुले लातूर जिल्ह्याच्या आकारानुसार उभी राहू लागली. नवा खेळ विद्यार्थ्यांना आवडला. तिसरी-चौथीच्या सर्व मुलांना सर्व तालुक्यांची नावे येऊ लागली. परिपाठातील खेळ मस्त रंगू लागला. तिसरी-चौथीच्या विद्यार्थ्यांचा खेळ रोज पाहून पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांनाही तालुक्यांची नावे पाठ झाली.

तालुके झाल्यावर लातूरमधील नद्यांचा नंबर होता. जिल्ह्यात सात नद्या आहेत. सात मुली सात नद्या झाल्या. प्रत्येकीने एकेका नदीचे नाव, उगम, ती कोठे कोठे वाहते हे पाठ करायचे होते. प्रत्येक मुलगी मैदानावर आखलेल्या जिल्ह्याच्या नकाशावरून स्वतः असलेल्या नदीचे नाव सांगत - चालत जाई. तालुके वाटेत उभे असत. ज्या ज्या तालुक्यांमधून किंवा तालुक्यांजवळून ती नदी वाहते त्याप्रमाणे मुलगी त्या त्या विद्यार्थ्यांजवळून जात जात स्वतःची माहिती सांगत असे. तो खेळही विद्यार्थ्यांमध्ये प्रिय ठरला. विद्यार्थ्यांना रट्टे मारून तालुक्यांची, नद्यांची नावे जी पाठ झाली नसती ते पाठांतर खेळाने अगदी लीलया जमवले; शिवाय, मुलांत औत्सुक्य निर्माण झाले.

महाराष्ट्र आणि त्यातील तालुके, प्रत्येक ठिकाणाचे नाव, वैशिष्ट्ये, भौगोलिक स्थान हेसुद्धा तशाच पद्धतीने विद्यार्थ्यांच्या त्या खेळात समाविष्ट झाले.

साकोळे यांनी लोकसहभागातून शाळा रंगवून घेतली आहे. शाळेच्या भिंतींवर मोठमोठे नकाशे काढले. मुलांना रेल्वेचे आकर्षण असते. सरांनी त्याचा वापर करून नवीन खेळ काढला. जिल्ह्यातील प्रमुख लोहमार्ग मैदानात आखले. मुलांच्या दोन झुकझुक गाड्या केल्या. त्या कुर्डुवाडी-लातूर रोड आणि परळी-हैदराबाद या मार्गावरून कशा धावतात त्याचे प्रात्यक्षिक केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यातील प्रमुख लोहमार्ग कोठले, तेथून गाड्या कशा जातात-येतात - त्यांचे अपघात का आणि कसे होत नाहीत, अशा सगळ्या कुतूहलपूर्ण प्रश्नांची उत्तरे मिळाली. उपक्रमांचे सादरीकरण गावापुढे वेळोवेळी केल्याने गावकऱ्यांनाही शाळेच्या प्रयत्नांविषयी खात्री वाटू लागली. दुसरीतील सुनीलला अक्षर – अंकओळखही नव्हती. त्याचे पालक ऊसतोड कामगार. वाईट म्हणजे सुनीलला त्याला इतर पोरांच्या तुलनेत काही येत नाही हे समजत असे. त्यामुळे तो त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊन बोलेनासाच झाला. साकोळे यांनी त्याच्याशी हळूहळू संवाद साधत त्याला अभ्यासाकडे वळवले. ते त्याला नोटा, काड्या, पाने यांच्या साहाय्याने गणित शिकवत, अक्षरे गिरवून घेत. आता, सुनील शाळेतील हुशार विद्यार्थी बनला आहे. त्याचे वाचन सुधारले. हस्ताक्षर तर सुंदरच आहे. तशीच गोष्ट अक्षयची. गावातील सालगड्याचा तो मुलगा - शाळा फार बुडवायचा. कारण ‘मास्तरांच्या माराची भीती.’ अक्षयला उचलून वर्गात आणावे लागे. पण तो ‘गुर्जी’ मारणार नाहीत हे पटल्यावर नियमित झाला. त्याची आई सुया, पिना, बांगड्या यांचा व्यवसाय करत असे. त्यामुळे अक्षयला व्यवहारज्ञान चांगले होते. त्यामुळेच, त्याचे गणित नोटांच्या मदतीने सुधारले. त्याचे अक्षर अक्षरवळणाचा वापर करून सुधारले. आता तो मुलगा संगणक चालवतो, परिपाठसभा धीटपणे घेतो. साडेचार वर्षांची धिटुकली शरयू इतर पोरांसोबत शाळेत येऊन बसू लागली आणि आश्चर्य म्हणजे मुलांचा भूगोलाचा खेळ पाहून पाहून तीही तालुके, जिल्हे पटापट सांगू लागली आहे. ज्या गावात शाळेचा पट एवढा जेमतेम दहा-अकरा होता तो आता चौपट म्हणजे एकेचाळीस झाला आहे. गावकरी स्वत: तेथे येऊन प्रवेशासाठी विचारणा करत आहेत. शिक्षक म्हणून किरण साकोळे यांच्यासाठी ती खूपच मोठी गोष्ट आहे, अगदी त्यांच्या हुकलेल्या डॉक्टरकीपेक्षाही!

किरण साकोळे- 9422911928

- स्वाती केतकर - पंडित 9730498960, swati.pandit@expressindia.com

(लोकसत्तावरून उद्धृत)
 

 

लेखी अभिप्राय

लेख फारच सुंदर आहे मुलांना आपल्या परीसरातलील,तालुक्यातील, जिल्ह्यातील माहिती या वयात समजली पाहिजे तुमचा उपक्रम छान आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना आभ्यासाची गोडी निर्माण होते धन्यवाद

निकम सिताराम र…11/04/2019

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हे खरे ठरले सर,तुमचे अभिनंंदन आणि भूगोल कसा शिकवावा हे समजले हा लेख थिंंक महाराष्ट्रने ऊपलब्ध केला त्यांंचे धन्यवाद

Rajani Barage11/04/2019

किरण सर खरेच तळा गाळा तील मुलांना गुणवत्ता रुपी प्रकाश किरण दाखवतायत

माने शोभा 11/04/2019

रचनावादी activityes

Smita kami lead11/04/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.