विहीर आणि मोट


बहिणाबाई चौधरी यांची ‘मोट हाकलतो एक’ ही मोटेवरील व विहिरीशी संबंधित सुंदर कविता आहे. त्या कवितेत मोटेच्या साहित्यसाधनांचा नामोल्लेख येतो. बहिणाई म्हणतात -
 

वेहेरीत दोन मोटा
दोन्हीमधी पाणी एक
आडोयालो कना चाक
दोन्हीमधी गती एक
दोन्ही नाडा समदूर
दोन्हीमधी झीज एक
दोन्ही बैलांचे ओढणे
दोन्हीमधी ओढ एक
उतरणी चढणीचे
नाव दोन धाव एक
मोट हाकलतो एक
जीव पोसतो अनेक

मराठी साहित्यात काही सुंदर कविता विहिरीच्या, मोटेच्या संबंधात आलेल्या आहेत. बहिणाबार्इंच्या कवितेत बैल, आडोयला, कना, चाक, सोंदर, धाव आदींची सुंदर गुंफण आहे. संत सावता माळी यांच्या एका अभंगात विहीर, मोट, नाडा, पीक, पाणी आदींचा उल्लेख आलेला आहे. सावता माळी लिहितात-
 

कांदा मुळा भाजी |
अवघी विठाबाई माझी ||
लसूण मिरची कोथिंबीरी|
अवघा झाला माझा हरी ||
ऊस गाजर रताळू|
अवघा झालासे गोपाळू ||
मोट नाडा विहीर दोरी |
अवघी व्यापिली पंढरी ||
सावता म्हणे केला मळा |
विठ्ठल पायी गोविला गळा ||

संत सावता यांचा विहीर आणि मोट यांच्या साहाय्याने फुललेला मळा या अभंगात येतो.

विहीर दगडाच्या बांधकामातून साकारली जाई. विहिरीवर थारोळे मोठ्या उभ्या, आडव्या घडलेल्या दगडातून बनवण्यात येई. तो विहिरीचा अविभाज्य भाग होता. थारोळ्याला जोडून दगडात बांधलेला पाट विहिरीच्या वेणीसारखा शेतापर्यंत असे. विहिरीतील पाणी मोटेच्या साहाय्याने, बैलांच्या कष्टाने शेंदले जायचे. थारोळ्यात पाणी मोटेने यायचे. विहिरी होत्या, पण विद्युत नसल्याने मोटेने पाणी शेतीला दिले जायचे. पाणी तसेच, पाटाने पुढे उताराने धावायचे. विहिरीवर बैलांना चालण्यासाठी शेताच्या दिशेने उतरत नेलेला लांबसडक उंचवटा असायचा. त्याला ‘धाव’ असे संबोधले जायचे. आमच्या पोथरे गावात कै. गोपाळबाबा झिंजाडे यांची चार मोटेची विहीर प्रसिद्ध होती. ती विहीर आजही आहे. पण तेथे मोटा जाऊन विद्युत मोटारी (पंप) आल्या आहेत. यांत्रिकीकरणाच्या धबडग्यात थारोळे, पाट, नाडा, वडवान, सौदर, चाक, कणा, पायटा हे सारे हिरावून-हरवून गेले आहे. मोट भरलेली वर येताना कुईकुई करत यायची, त्यात आनंद असायचा. कारण त्यात माणसाचा, प्राण्याचा जिवंत स्पर्श असायचा. त्यामुळे त्यास संवेदना प्राप्त व्हायची. तो इंजिनाच्या धुराने, आवाजाने निघून गेला. कवी ना.घ. देशपांडे यांची, ‘शीळ’ कवितासंग्रहातील ‘मोटकरी’ ही कविता खूप सुंदर आहे. ना.घ. लिहतात -

ही मोट भरे भरभरा
चढे करकरा जी !
विहिरीत बघा वाकुनी
जरा धाकुनी जी !
पाण्यात लई भोवरे
फेस गरगरे जी !’

मोट जुन्या मराठी चित्रपटांमधूनदेखील कधी कधी दर्शन देते –

‘माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं|
गुलाब जाई जुई मोगरा फुलवितं |
दादाच्या मळ्यामंदी मोटचं मोठं पाणी |
पाजिते रान सारे, मायेची वहिनी ...|
हसत डुलत मोत्याचं पीक येतं |
गुलाब जाई जुई मोगरा फुलवितं |

दोन बैलांच्या मोटेला ‘धोंडगी मोट’ तर चार बैली मोटेला ‘चावरी मोट’ असे संबोधले जायचे. मोटा गावातील कारागीर कुशलतेने बनवत असत. खोल खड्डा खोदून, पुन्हा फोडलेल्या डबर, चिरे, कोपरे आदी दगडप्रकारांमध्ये विहीर बांधून काढली जायची. विहिरीला काही ठिकाणी पायर्‍या, सुंदर देवळी बनवलेल्या असायच्या. कोठेतरी विहिरीच्या एखाद्या दगडावर छिन्नी-हातोडीने मालकाचे नाव बांधकामाच्या सनसनावळींसह कोरले जायचे. कोठेतरी बैलजोडीचे चित्रही साकारले जायचे. काही विहिरींना महादेवाच्या पिंडीसारखे स्वरूप आहे. तशा विहिरी पुन्हा बांधून काढू शकणारे कारागीर दुर्मीळ आहेत. विहिरीला पाणी लागले म्हणजे ते पाणी पहिल्यांदा ग्रामदेवतेला अर्पण केले जायचे. त्या सार्‍या आठवणींच्या विहिरी आटून गेल्या आहेत.
तशा अनेक ऐतिहासिक विहिरी पर्यटकांना, अभ्यासकांना भुरळ पाडतात. तर त्यांपैकी सातारची बारा मोटेची विहीर, बीडची

खजिना विहीर; तसेच, लोणारची सासू सुनेची विहीर अशी नामावली सांगता येईल. त्या विहीरींची बांधकाम शैली किंवा वास्तू स्थापत्य कला पाहताना सर्वजण थक्क होऊन जातात. पूर्वीच्या काळी कसलेही तंत्रज्ञान प्रगत नसले तरीही पूर्वजांनी ते सारे निर्माण केले! त्याची पडझड झालेली पाहताना दुःखही होते. कोठे कोठे चांगल्या विहिरींची खूप पडझड झाली आहे. काही विहिरींमध्ये झाडे-झुडपे उगवली-वाढली आहेत. अनेक विहिरी बुजवून टाकल्या गेल्या आहेत. तो ऐतिहासिक कृषीक ठेवा जतन केला गेलेला नाही. शहरातील काही विहिरींचे रूपांतर कचराकुंडीत झालेले आहे.

करमाळ्यात असलेली शहाण्णव पायर्‍यांची विहीर; तसेच, सात विहीर पर्यटकांना आकर्षित करते. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा चित्रपट खूप गाजला आहे. ती विहीर त्या चित्रपटात दिसून येते. तसेच, करमाळा तालुक्यातील देवळाली गाव-शिवारातही प्रेक्षणीय विहीर आहे. त्या विहिरीतही सैराट चित्रपटातील गीत व संवाद चित्रित केला गेलेला आहे. चित्रपटाचे नायक आणि नायिका परशा व आर्ची यांच्या प्रेमाचे नाजूक क्षण त्या विहिरीमध्ये चित्रित केले आहेत.

आता, विहिरी खोदल्या जातात आणि त्या सिमेंट-खडी-वाळूच्या साहाय्याने बांधल्या जातात. विहिरी मशीनने खोदल्या जातात. सिमेंटच्या बांधकामाच्या विहिरीतून चिमण्या, पारवे, पोपट आदी पक्षी दूर निघून गेले आहेत. त्यामुळे जुन्या विहिरीची गोडी नव्या विहिरीला येणार नाही. पूर्वी विहिरींवर उन्हाळ्यात मुलांची गर्दी व्हायची. विहीर पाण्यात पोहायला शिकवायची. शिकाऊ मुलांच्या कमरेला वाळलेला मोठा भोपळा बांधला जायचा. मुले पांगारा झाडाच्या वाळलेल्या लाकडाचा ओंडका बांधूनही पाण्यात उतरायची. तो हलका ओंडका आणि भोपळा पोहणार्‍यास पाण्यात तरंगत ठेवायचा. हळूहळू तो भोपळा आणि ओंडका कमरेचा कायमचा निघून जायचा. कारण तरंगण्यासाठी त्याची गरज राहिलेली नसे. आता, उन्हाळ्यात प्यायला पाणी नसते. पोहण्यास मुले कोठे शिकणार? त्यासाठी स्विमिंग टँक बांधले जातात. विहिरी आणि त्यांचे गणगोत बारव, आड, बुडकी आदी नष्ट होत आहेत. ‘पुरातन विहीर जतन योजना’ अमलात आणली गेली  पाहिजे. अन्यथा एक दिवस विहीर फक्त पुस्तकांतील चित्रात पाहवी लागेल.

- हरिभाऊ हिरडे 8888148083, haribhauhirade@gmail.com

कठीण शब्दांचे अर्थ
०१. मोट -विहिरीतून पाणी शोधण्याचे चामड्याचे पुरातन साधन.
०२. धाव- बैलांना ये-जा करण्यासाठी असणारी जागा
०३. थारोळे -मोटेचे पाणी पहिल्यांदा जेथे पडते ती दगडातून बांधलेली जागा.
०४. पाट -शेतात पाणी जाण्यासाठी थारोळ्याला जोडून पुढे नेलेली दगडांनी बांधलेली छोटी अरूंद जलवाहिनी.
०५. चाक- विहिरीतील पाणी नेण्यासाठी वापरात आणले जाणारे छोटे लाकडी गोलाकार भरीव साधन.
०६. वडवाण- विहिरीवरच्या ज्या दोन लाकडांमध्ये चाक गुंतवले जाते त्या दोन उभ्या लाकडी मेढी .
०७. नाडा- पाणी शेंदण्यासाठी मोटेला  बांधलेला दोरखंड
०८. सोंदर - पाणी शेंदण्यासाठी मोटेला बांधलेली दुसरी एक दोरी.
०९. कणा - थारोळ्यालगतचे दुसरे दंडगोलाकार लाकडी चाक.
१०. पायटा - थारोळ्यालगतचे मोठे दोन लांब दगड, ज्यावर वडवान उभे असते.
 

 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.