‘तेरवं’- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांचे नाटक!


‘तेरवं’ हा दीर्घांक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांच्या प्रत्यक्ष सहभागातून तयार झालेला आहे. त्याचे प्रयोग महाराष्ट्रात सुरू आहेत. मी त्यात काम करणाऱ्या तरुण विधवांना भेटले. त्या प्रत्येकीच्या चेहऱ्यात मला माझ्या गावातील लक्ष्मीचा चेहरा दिसत होता. माझ्या गावातील लक्ष्मीचा शिवा गेला तेव्हा त्याला तीन अपत्ये होती- छोटा मुलगा तर पाळण्यात होता आणि घरात आंधळी आई. शिवाने नैराश्याच्या भरात क्षणभरात आत्महत्या केली, पण तो साऱ्या जबाबदाऱ्या लक्ष्मीच्या गळ्यात टाकून मोकळा झाला... तीच भावना ‘तेरवं’मध्ये काम करणाऱ्या प्रत्येकीची दिसली.

‘तेरवं’ ही दीर्घांकाच्या रूपबंधात आलेली कलाकृती आहे. तो रंगमंचीय आविष्कार आहे, म्हणून त्याला नाटक म्हणता येईल; पण खरे तर, ती रंगमंचावर सुरू झालेली कृषी चळवळ आहे. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन केलेल्या ‘नाम फाउंडेशन’चे विदर्भातील काम श्याम पेठकर आणि हरीश इथापे बघतात. ‘नाम’चे ते संस्थापक सदस्य आहेत. ती मंडळी शेतकऱ्यांसाठी काम ‘नाम’च्या स्थापनेच्या आधीपासून करत आहेत. ‘नाम फाऊंडेशन’च्या वतीने विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना धनादेशाच्या स्वरूपात रकमा, शिलाई मशीन, शेळ्या यांचे वाटप करण्यात येते. इथापे आणि पेठकर यांचे ग्रामीण भागात फिरणे त्या निमित्ताने होते, त्यांच्या प्रत्येक भेटीत वेगवेगळ्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींशी संवाद साधला जातो. ते सांगतात, एकेकीची व्यथा ऐकून मन हेलावून जाते. चहुबाजूंनी संकटांनी वेढलेल्या त्या महिलांकडे बघून वाटते, कोठून येत असेल त्यांच्यात त्यांच्या पिल्लांसाठी जगण्याचे बळ? नवऱ्याने आत्महत्या केली, की सासरची मंडळी सुनेची, त्यांच्याच नातवंडांची जबाबदारी झटकतात. कधी कधी, माहेरची माणसेही जवळ करत नाहीत. समाजातील वाईट नजरा रोखलेल्या असतातच. त्या स्त्रिया एकट्या-एकाकी पडतात; पण त्यांनी त्यांची व्यथा किती दिवस उगाळत बसायची? आणि का? त्या महिलांना आलेल्या संकटाला स्वाभिमानाने तोंड देण्याचे धडे मिळण्यास हवेत. त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास फुंकणे अधिक महत्त्वाचे आहे.

हरीश इथापे यांनी ‘अॅग्रो थिएटर’ ही संकल्पना राबवली आहे. वर्ध्याजवळ रोठा नावाचे गाव आहे. इथापे यांची शेती तेथे आहे. ती मंडळी दिवाळीचा पाडवा, भाऊबीज इथापे यांच्या शेतावर शेतकरी विधवा भगिनींसह साजरी करतात. तेथे त्या महिलांशी एका दिवाळीला गप्पा मारताना, इथापे आणि पेठकर या दोघांनी त्यांना प्रश्न केला, ‘तुमचा नवरा आत्महत्या करण्याच्या आधी तुम्हाला भेटला असता, तर तुम्ही काय बोलल्या असत्या?’... किंवा आता तो दोन मिनिटेच भेटला तर काय बोलाल?...’ त्या बायका वेदनेचा धबधबाच वाहू लागावा इतक्या आवेगात बोलत राहिल्या. ते ‘तेरवं’ या नाटकाचे बीजारोपण होय.

शेतकरी मर्दांच्या आत्महत्यांच्या करूण कहाण्या आतापर्यंत ऐकवल्या गेल्या आहेत. आता, या भगिनींच्या जगण्याच्या, संघर्षाच्या मर्दानी कथा लोकांपर्यंत पोचाव्यात हा नाटकामागील विचार आहे. हरीश इथापे आणि श्याम पेठकर यांना वाटले, की या विधवा महिलांच्या एकूण जगण्यावर बेतलेल्या नाटकात त्यांनीच कामे का करू नये? म्हणून मग ज्यांना शक्य आहे, घरून परवानगी मिळते अशा महिलांचे नाट्य प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. ते महिनाभर चालले. थिएटर नेहमीच आत्मविश्वास देत असते. त्या महिलांनाही तो मिळाला. मग त्या महिलांनी पेठकर यांच्या मागे लकडा लावला, ‘भाऊ, नाटक कधी लिहिता?’ त्यातून हे नाटक लिहिले गेले. ‘अॅग्रो थिएटर’च्या माध्यमातून ते रंगमंचावर आले आहे. नाटकाचा प्रयोग चंद्रपूरला राज्य नाट्य स्पर्धेत सादर झाला. नाटकानंतर त्या महिलांना भेटण्यास गर्दी झाली होती. सतत उपेक्षा, शोषण, अवहेलना, आत्मवंचना वाट्याला आलेल्या त्या महिलांच्या चेहऱ्यावर आत्मप्रतिष्ठेची भावना पहिल्यांदा दिसली! त्यांना त्यांच्या जगण्याच्या संघर्षाकडे किमान नाटकाच्या माध्यमातून समाजाचे लक्ष गेल्याचे समाधान होते. महिलांनी त्या हौशी असूनही व्यावसायिक सफाईने या समूहनाट्यात काम केले आहे.

‘तेरवं’साठीसुद्धा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या बावीस विधवांना - एकल महिलांना (विधवा हा शब्दप्रयोग टाळला जातो. आम्ही विधवा नाहीत, एकल महिला आहोत असे त्या महिलांचे म्हणणे आहे) नाट्यप्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले. त्यांतील काही महिलांना घेत मग ‘तेरवं’चा सराव सुरू झाला. नाटकाच्या तालमी शिबिर पद्धतीने घेतल्या जातात. कलावंत निवासी असतात. तालीम बारा एकर पसरलेल्या शेतात लेव्हल्स टाकून, जमिनीवर स्टेज आखून सुरू होते. मग त्या तालमींचे शेड्युल लागले तेव्हा त्या आल्या. घरच्यांचा विरोध झाला. “नाटकंबी करा लागली का आता?” असा बोचरा सवाल त्या महिलांना घरून-बाहेरून करण्यात आला; पण त्या तालमीत रमल्या, इतक्या की विदर्भात त्यांच्या पितरांना जेवू घालण्याचा सण म्हणून अक्षय तृतीयेला खास महत्त्व आहे. त्यासाठीही त्या बायका घरी गेल्या नाहीत! दसरा;  तितकेच काय पण, दिवाळीतदेखील त्या महिला त्यांच्या घरी गेल्या नाहीत. त्यांनी ‘अॅग्रो थिएटर’च्या सदस्यांसोबत तेथेच दिवाळी मनवली. ती दिवाळी त्यांच्यासाठी अभिनव होती. त्यांना दबलेला मोकळा श्वास तेथे घेता येत होता.

‘तेरवं’ हे समूहनाट्य आहे. त्यात महिलांनीच पुरुषपात्रेही केली आहेत. कारण, त्या महिलांनी त्यांच्या पतींच्या आत्महत्यांनंतर आयुष्यातही पुरुषांच्या भूमिका निभावल्या आहेत, निभावत आहेत. त्या महिलांची अवस्था जात्यात भरडल्या जाणाऱ्या दाण्यांसारखी आहे, म्हणून जात्यावरील ओव्यांच्या माध्यमातून त्यांच्या व्यथा उजागर करण्यात आल्या आहेत. बायका त्यांच्या व्यथावेदनांना पूर्वीच्या काळी दळता-कांडताना ओव्यांमधूनच वाट मोकळी करून द्यायच्या, ना! त्यातूनच त्यांचे कॅथर्सिस व्हायचे. ओव्या श्याम पेठकरांसह भय्या पेठकर यांनीही लिहिल्या आहेत. लयबद्ध नाट्याची परिणामकारकता संगीतबद्ध ओव्यांनी आणखी वाढली आहे. नागपूरचे संगीतकार वीरेंद्र लाटणकर यांनी ओव्यांना सुरेल आणि समर्पक चाली दिलेल्या आहेत. नाटकाची सुरुवात

आम्ही तेरवं मांडलं
बाई आम्ही तेरवं मांडलं
आसवायचं दानं आम्ही
खलबत्त्यात कांडलं ||
महादेवानं केली शेती
पार्वतीच त्याची सोबती
जमिनीच्या वाह्यतीत बाई
हलाहलच सांडलं ।। धृ.
गडी आमचा महादेव
झाला रंक बाई रावाचा
मामला घामाच्या भावाचा
शिवार पायानं लवंडलं। || धृ.

या ओव्यांनी होते. ‘तेरवं’चे वैशिष्ट्य हेच, की त्यात केवळ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांच्या व्यथांचे, दुःखाचे प्रदर्शन नाही; तर त्यातून बाहेर पडण्याची, त्यांच्या बलबुत्यावर उभे राहण्याची, त्यांच्यातील अंगभूत शक्ती समाजाला दाखवून देण्याची ठिणगी आहे. म्हणूनच, त्या नाटकाच्या कथानकात तेराव्याचे एक मंडळ स्थापन करण्यात आले आहे. महिला मंगळागौरीला, काजळतीजेला एकमेकींकडे जात गाणी म्हणतात; तसेच, विधवांचे तेराव्याचे मंडळ! महिला कोणा शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या तेरवीला जातात; त्याच्या पत्नीमध्ये आत्मभान फुंकतात! त्या नवविधवेला एकटीने आयुष्याचा झगडा देण्यासाठी बळ यावे म्हणून मग बाकी बायका त्यांच्या वाट्याला आलेल्या शोषणाच्या कथा सांगतात. ‘तेरवं’ची भाषा अर्थातच स्थानिक बोलभाषा वऱ्हाडी आहे.

‘तेरवं’मधील त्या साऱ्या मुलींच्या भूमिका बघून अवाक् होण्यास होते. त्यांच्यात निर्माण झालेल्या आत्मविश्वासाला, आत्मबळाला सलाम करावासा वाटतो. त्या साऱ्या जणी तो सारा बदल हरीशसरांमुळे झाल्याची प्रांजळ कबुली देतात. ‘तेरवं’ हा त्या महिलांच्या हक्कासाठीचा रंगमंचीय लढा आहे. त्या मंडळींना ते नाटक महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांत पोचवायचे आहे. इथापे आणि पेठकर त्यासाठी काम करत आहेत.

नव्याण्णव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे उद्घाटन करताना नाटककार महेश एलकुंचवार यांनी नाट्यकर्मी आणि नाट्यधर्मी यांतील फरक समजावून सांगताना, हबीब तन्वीरपासून सुरुवात केली. त्यांनी ‘प्रसिद्धी, पैसा... कशाचीही हाव तर दूरच, पण कोणी लक्ष देते का, काय म्हणते, याचाही विचार न करता जी मंडळी नाटक हे साधन म्हणून व्यक्त होत राहतात ती नाट्यधर्मी’ असे सांगितले अन् श्याम पेठकर व हरीश इथापे यांचे नाव त्या मार्गाचे वर्तमानातील महत्त्वाचे नाट्यधर्मी म्हणून घेतले!

महिलांच्या चळवळीचे हे नाट्यविधान आहे. त्या महिलाच नाटकाच्या भाषेत सशक्तपणे बोलल्या आहेत. त्यामुळे त्या नाटकाचे प्रयोग राज्यभर अन् राज्याच्या बाहेर दिल्लीपर्यंत करण्याचा हरीश इथापे, श्याम पेठकर यांचा मानस आहे. तो पूर्ण व्हावा कारण या महिलांच्या जगण्याचा संघर्ष त्यांच्या आयुष्याचे निर्णय करणाऱ्या सुरक्षित, शहरी समाजापर्यंत पोचला पाहिजे!

 
‘तेरवं’ची श्रेयनामावली -
निर्मिती : अध्ययन भारती, वर्धा
लेखक - श्याम पेठकर
दिग्दर्शक - हरीश इथापे
संगीत- वीरेंद्र लाटणकर
सहभागी कलावंत-
 
नाटकात वर्धा, यवतमाळ, अमरावती या भागांतील पाच विधवा आणि त्याच परिवारातील दोन मुलींचा समावेश आहे. तर या संस्थेतील सहा जणींनी सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. कविता ढोबळे, वैशाली येडे, मंदा अलोणे, शिवानी सरदार, माला काळे, सविता जडाय, अश्विनी नेहारे, संहिता इथापे, अवंती लाटणकर, प्रतीक्षा गुडधे, श्वेता क्षीरसागर, उर्वशी डेकाटे, गोरल पोहाणे अशा एकूण तेरा पात्रांनी काम केले आहे.

-भाग्यश्री पेठकर 8600044367, Pethkar.bhagyashree3@gmail.com

 

 

लेखी अभिप्राय

हे नाटक पाहिलंय मी. अप्रतिम. अश्रू आणि क्रोध थांबवता येत नाही. फक्त थोडे ताणले आहे असे वाटले. पण असो. अप्रतिम प्रयास. सलाम!

Lakhansingh Katre04/04/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.