र.धों. कर्वे यांचे फ्रेंच भाषेतून अनुवाद


र.धों. कर्वे यांचा इंग्रजी व फ्रेंच भाषा वाङ्मय यांचा अभ्यास दांडगा होता. विशेषत: त्यांचे फ्रेंच भाषेवरील प्रभुत्व वादातीत असावे. ते ती भाषा शिकले ते गुप्तरोग, स्त्रीपुरुषसंबंध, संततिनियमन इत्यादी त्यांच्या आवडत्या विषयांच्या भाषेतील उपलब्ध साहित्याचा अभ्यास करण्याच्या हेतूने. त्यांनी 1913 साली ‘मासिक मनोरंजन’मध्ये एका फ्रेंच प्रहसनाचा अनुवाद प्रसिद्ध केला आणि पुढे तर, त्यांना गोडीही तशा कामात निर्माण झाली. त्यांना ‘समाजस्वास्थ्य’ मासिक सुरू केल्यावर मजकुराची आवश्यकता वाटू लागली पण लेखकांना मोबदला देणे परवडण्यासारखे नसल्याने, त्यांना स्वत:च अनुवाद-भाषांतर-रूपांतर करून मासिकाची पाने भरून काढावी लागली.

अशा वेळी स्त्री-पुरुषसंबंधपर, गुप्तरोगाविषयी आणि तशा प्रकारची अन्य शरीरविज्ञान व आरोग्य विषयक माहिती, फ्रेंच भाषेतील ग्रंथांमधून व नियतकालिंकामधून जी त्यांना उपलब्ध होत गेली तिचे मराठीकरण करून ती माहिती त्यांनी मराठी वाचकांना उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर, त्यांनी काही कथात्म साहित्याचे, कादंबरीचे अनुवादही केले. त्यांना त्यांच्या त्या प्रयत्नात प्रसिद्ध फ्रेंच कथाकार गि द मोपांसा यांच्या कथा उपयुक्त वाटल्या असाव्यात. त्यानुसार त्यांनी जमतील तशी काही कथांची मराठी रूपे सिद्ध केली व वेळोवेळी प्रसिद्ध केली. त्यांनी अशा रीतीने मोपांसा यांच्या जवळ जवळ एकतीस कथांना मराठी पेहराव चढवला. परंतु त्यांचे ते प्रयत्न केवळ ‘समाजस्वास्थ्य’मासिकात बंदिस्त राहिले. परिणामत: मराठीत एकत्रपणे ‘मोपांसा यांच्या कथा’ उपलब्ध होऊ शकल्या नाहीत व मोपांसा यांच्या कथांचे रूपांतरकार म्हणून प्रो.र.धों. कर्वे यांची प्रतिमा मराठी साहित्यविश्वात दृढ होऊ शकली नाही. स्वाभाविकच, प्रा. म.ना. अदवंत, डॉ. इंदुमती शेवडे, प्रा. म.द. हातकणंगलेकर, डॉ. सुधा जोशी, प्रा. के.ज. पुरोहित या, मराठी कथेच्या अभ्यासकांनी रघुनाथरावांच्या कार्याची नोंद घेतली नाही. ही वस्तुस्थिती आहे.

- अनंत देशमुख

(‘मोपांसाच्या कथा’ या अनंत देशमुख संपादित पुस्तकाच्या प्रस्तावनेमधून)

2. हेन्ही-रेने- अल्बर्ट-गि द मोपांसा (जन्म : 5 ऑगस्ट1850, मृत्यू : 6 जुलै 1893) याला अवघे त्रेचाळीस वर्षांचे आयुष्य लाभले. त्याचे मित्र एमिल झोला, इव्हान तुर्जेनीव्ह, एडमंड डी कॉर्नकोर्ट व हेन्री जेम्स हे साहित्यिक होते. लेखक म्हणून त्यांच्या वाढीला फ्लॉबेरचे उत्तेजन लाभले. त्याने तीनशे कथा, सहा कादंबऱ्या, तीन प्रवासवर्णने व एक काव्यसंग्रह इतके लेखन केले. त्याच्या कथांतून वेश्या आणि स्त्री-पुरुषसंबंधांचे चित्रण विशेषत्वाने येते. त्याचे कथालेखनाचे विशेष मानवी संबंधांची सूक्ष्म चित्रे रंगवणे, विविध जीवनक्षेत्रांतील स्त्री-पुरुषांचे भावविश्व चित्रित करणे, अल्पाक्षरी शैलीत ठसठशीत व्यक्तिचित्रे उभी करणे आणि साध्या प्रवाही भाषेत कथालेखन करणे हे दिसतात.
 

 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.