डोळस गाव - कोळगाव (Kolgav)
“पलीकडे ओढ्यावर माझे गाव ते सुंदर
झाडाझुडपात आहे लपलेले माझे घर....”
शाळेत असताना खेड्यातील घराची ही कविता वाचताना, खेड्याबद्दल कुतूहल वाटायचे. एसटीने कधी प्रवास करताना मध्ये मध्ये खेडीगावे दिसायचीदेखील. मोजकी घरे, घरांशिवाय दुसर्या कोणत्या सुविधा नसलेले खेडे पाहून वाटायचे, त्या गावातील लोक तेथे कसे राहत असतील? त्यांना तेथे करमत कसे असेल? कर्मधर्मसंयोगाने, माझे पुढील आयुष्य हेच त्या बालपणीच्या प्रश्नांचे उत्तर झाले!
माझ्यासाठी ‘माझे माहेर पंढरी’ या फक्त गाण्यातील ओळी नाहीत; तर त्या माझ्या खर्या आयुष्याचा भाग आहेत. पंढरपूर हे माझे माहेर. ते तेव्हा काही मोठे शहर नव्हते, पण तालुक्याचे ठिकाण होते व मोठे तीर्थक्षेत्र! परंतु मला सासर मिळाले ते माळावरील एकदम दुर्लक्षित गाव. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामधील कोळगाव. महाराष्ट्राच्याच काय पण सोलापूर जिल्ह्याच्या कोणत्याही नकाशात ठिपक्याएवढीसुद्धा त्या कोळगावला जागा नसायची. अगदी इनमीन शंभर उंबर्यांचे गाव. गावची लोकसंख्या साधारण आठशेच्या आसपास. गावात पाण्याची एकच विहीर आणि एकच आड. विहिरीच्या पायर्या उतरून किंवा आडावरील रहाटाने पाणी शेंदून पाण्याच्या घागरी आणाव्या लागत.
कोळगावात जिल्हा परिषदेची शाळा होती. लक्ष्मीआई, मरीआई, जरीआई अशा लहानसहान मंदिरांत वर्ग भरत. मंगळवारी आणि शुक्रवारी बायका नैवेद्य घेऊन पूजेला आल्या, की शाळा थांबायची! गुरुजी आणि मुले बाजूला सरकत. बायका पूजा करून गेल्या, की मुले तो नैवेद्य खात व शाळा पुन्हा सुरू होई. पुढे, माध्यमिक शिक्षणासाठी तालुक्याच्या गावी म्हणजे करमाळ्याला जावे लागत असे. जाण्यासाठी वाहन कोणतेच नाही. मुलांना कपडे, अंथरूण-पांघरूण, शिधा या सर्वांची वळकटी करून डोक्यावर घेऊन सहा मैल चालत दुसर्या गावी जावे लागे. तेथून मिळेल त्या एसटीने करमाळ्याला जावे लागे. करमाळा हासुद्धा दुर्लक्षित, पाण्याचे दुर्भीक्ष्य असलेला प्रदेश. माझे सासरे म्हणायचे, “करमाळं आणि पाण्यावाचून जीव तरमळं”. फारसा कोणाला माहीत नसलेला तो तालुका. अलिकडच्या ‘सैराट’ सिनेमामुळे मात्र त्याला अमाप प्रसिद्धी मिळाली.
कोळगावमध्ये कोणाला डॉक्टरची गरज भासली तर बैलगाडीने एकवीस किलोमीटरचा प्रवास करून तालुक्याला जावे लागत असे. पुन्हा येताना बैलगाडीचा तेवढाच प्रवास म्हणजे डॉक्टरकडे अर्ध्या तासाचे काम असले तरी त्यासाठी प्रवास मात्र आठ तासांचा, तोही बैलगाडीतून. त्या गैरसोयींमुळे लहान मुलांना ना पोलिओ डोस, ना ट्रिपल, ना कोणत्या लसी मिळायच्या. एखाद्या स्त्रीला प्रसूती वेदना असह्य झाल्या आणि काही मोठा प्रॉब्लेम आला तर कोणातरी डॉक्टराला बोलावण्यास सायकलने तालुक्याला पाठवायचे आणि मग डॉक्टर त्यांची गाडी घेऊन यायचे. बाळंतपण म्हणजे बाईचा खरोखरच पुनर्जन्म होई.
गावात लाईट नव्हताच, पोस्टमनसुद्धा महिन्यातून एकदा यायचा. तो येई हेच भाग्याचे वाटे. माहेरवाशिणी चातकासारखी माहेरच्या पत्रांची वाट पाहत. टेलिग्राम असो वा साधे कार्ड, एकाच वेळी यायचे. माझे वडील वारल्याचे मला पंधरा दिवसांनंतर समजले!
जवळपासच्या सगळ्या गावांची अवस्था तशीच होती. पण कोळगावचे खरे वेगळेपण हे तेथील सरपंच व गावकरी यांच्यात होते. एम ए झालेला एक तरुण त्याच्या अपत्यहीन व वृद्ध काका-काकूंना सांभाळण्यासाठी पुण्यातील सरकारी नोकरी सोडून1969 साली कोळगावात आला. लगेच, 1972 साली मोठा दुष्काळ पडला. शेतात धान्य नाही, हातात पैसा नाही अशी गावकर्यांची परिस्थिती. तो तरुण रोजगार हमीची कामे सुरू करावीत म्हणून तहसील ऑफिसला अर्ज देण्यास गेला. तेथे क्लार्कच्या टेबलापाशी किती वेळ उभा राहिला तरी क्लार्कने एकदाही मान वर करून पाहिले नाही. “अहो, मी गावकर्यांना काम मिळावे म्हणून विनंती अर्ज घेऊन आलो आहे. गावात लोकांना खाण्यास अन्न नाही. भूकबळी जातील अशी परिस्थिती आहे. म्हणून मी तुमच्याशी बोलण्यासाठी बराच वेळ झाला, येथे उभा आहे.” त्यावर मानही वर न करता “आम्हाला काही तेवढीच कामे नाहीत. बाकीची कामे पुष्कळ आहेत”. असे म्हणून क्लार्क चहा पिण्यास उठले. “तुम्हाला वेळ नसेल तर मी दुसर्या कोणत्या अधिकार्याकडे जाऊ का?” असे विचारल्यावर “जा… जा… इंदिरा गांधींपर्यंत जा” असे म्हणत क्लार्क निघून गेले. तेव्हा तो तरुण हिरमुसला होऊन कोळगावी परत आला. त्याची लेखणी त्या रात्रीपासून सुरू झाली. प्रांत अधिकारी, तहसीलदार यांच्यापासून ते त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्यापर्यंत पत्रे पोचली आणि मग तहसील ऑफिस खडबडून जागे झाले. त्यानंतर कोळगावकडे धडाधड सगळ्यांच्या गाड्या येण्यास सुरुवात झाली. रोजगार हमीतून खडी फोडण्याचे काम आमच्यासकट जवळच्या गावांनाही मिळाले. जे काम प्रत्यक्ष जाऊन होत नव्हते ते लेखणीद्वारे झाले!
त्या तरुणाची सचोटी, गावाबद्दल आणि गावकर्यांबद्दल असणारी आस्था व कळकळ पाहून, गावातील ग्रामपंचायतीच्या ज्येष्ठ सदस्यांनी त्याची सरपंच म्हणून निवड बिनविरोध केली. ती गावच्या इतिहासातील पहिली बिनविरोध निवड. गावाचा तो निर्णय जसा ऐतिहासिक ठरला तसाच तेथून पुढे गावचा इतिहास घडत गेला. त्या तरुणाचे नाव दिनकर भगवंत डोळस. लोक त्यांना प्रेमाने दिनकरकाका म्हणत.
दिनकरकाकांनी गावकर्यांच्या मदतीने वेगवेगळे उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. ग्रामदैवत कोळेश्वराचे मंदिर, भवानीआईचे मंदिर, हरिजन चावडी, तालमीचा जीर्णोद्धार, गावची वेस, शाळेसाठी खोल्या अशी बरीचशी कामे श्रमदानाने घडवून आणली. त्या सर्व कामांसाठी श्रमदानाशिवाय पैसाही लागत होता. मग ते गावात महिन्याला सिनेमा दाखवण्यास आणू लागले. त्यावेळी सिनेमा म्हणजे काय ते बायाबापड्यांना माहीतसुद्धा नव्हते. आसपासच्या गावचे लोकही रात्री बैलगाड्यांतून सिनेमा पाहण्यास येऊ लागले. तिकिट दर फक्त एक रुपया. विनातिकिट कोणीही जात नसत. ते उत्पन्न गावसुधारणांच्या कामाला उपयोगी येऊ लागले. एसटीची सोय होण्यासाठी श्रमदानाने चार-पाच किलोमीटरचा रस्ता खडी टाकून तयार केला गेला. एसटीला उत्पन्न दिसावे व ती टिकून राहवी म्हणून गावातील किमान दहा माणसे काम नसतानाही रोज तालुक्याला जाऊ लागली. ज्यांच्याकडे एसटीसाठी पैसे नव्हते त्यांना सरपंच स्वतः तिकिटांचे पैसे पुरवू लागले. असे करत करत पुढे गावात बालवाडी, ग्रामपंचायत ऑफिस, बँक ऑफ इंडिया शाखा, पोस्ट सर्व काही सुरू झाले. पण त्यासाठी प्रयत्न दहा-अकरा वर्षें सतत चालू होते. दिनकरकाकांचा गावावरील विश्वास व गावाचा त्यांच्या सरपंचावरील विश्वास या आधारावर, अतिशय पारदर्शक कामांद्वारे, एका पैशाचाही भ्रष्टाचार होऊ न देता सारी प्रगती घडून येत होती. गावात वनीकरणही केले गेले.
गावातील भांडणे, तक्रारी, कौटुंबिक वाद हे सर्व गावच्या वेशीच्या आत सोडवले जात. कोणी कधी पोलिस स्टेशनची पायरी चढले नाही. राजकारण, पक्ष, पाटर्या यांचा गावाला स्पर्शही झाला नाही. गाव पूर्ण व्यसनमुक्त झाले. कोळगावात दर महिन्याला ग्रामसभा होत असे. त्यातून एकमताने गावाचा विकास होत गेला. बघता बघता, त्याचे आदर्श गाव म्हणून तालुक्यात नाव झाले. वर्तमानपत्रांतून, आकाशवाणीवर गावच्या बातम्या प्रसारित होऊ लागल्या. गाव एवढेसे पण त्याची कीर्ती मात्र मोठी झाली. दिनकरकाकांनी ग्रामस्थांच्या मदतीने कोळगावला नकाशावर स्थान मिळवून दिले.
गावात पाणवठा एकच होता आणि मारुतीचे मंदिर होते. हरिजनांना तेथे प्रवेश नव्हता. दिनकरकाकांनी गावकर्यांचे उद्बोधन करून दोन्ही ठिकाणे सर्वांसाठी खुली केली. गावाची एकजूट वाखाणण्यासारखी होती. मी लग्न होऊन त्या गावी आल्यानंतरची एक घटना. गावाच्या थोड्याशा बाहेरच्या बाजूला हरिजनांच्या झोपड्या होत्या. गावात वीज नव्हती. घरोघर रॉकेलची चिमणी वा कंदील. एका हरिजन झोपडीत रात्री चिमणीचा भडका उडून झोपडीने पेट घेतला. आरडाओरड ऐकून सारी माणसे धावून गेली, पण तोपर्यंत झोपडी पूर्ण पेटली होती.
उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे आगीचा भडका वाढत गेला. गावातील विहिरीचे पाणी घागरीने नेऊन आग विझवली. सगळे गाव अग्निशामक दल झाले होते. इतर वेळी ज्यांना अस्पृश्य समजले जाई, ज्यांच्या घरी कोणी पाऊल ठेवत नसे - त्यांना शिवत नसे अशा हरिजनांच्या झोपड्यांत घुसून सारे गावकरी एकेकाला बाहेर काढत होते. बर्याच झोपड्या व लोक वाचवण्यात यश आले होते, पण आग लागलेल्या झोपडीतील दोन माणसे गेली. सारे गाव हळहळले. गावातील कोणी वारले तर आख्ख्या गावात कोणाच्याही घरची चूल पेटत नाही आणि अशा दुःखी घरात तर दहा दिवस सगळ्यांचे जेवण हे शेजारी व नातेवाईकच पुरवतात.
‘माणूसपण’ म्हणजे नेमके काय ते जाणणारे ते गाव. गावात मुसलमानांची तीन-चार घरे. पण त्यांचा उरूस म्हणजे आख्या गावाची मोठी जत्रा असते. सगळे गावकरी मिळून संदलची मिरवणूक काढतात, कलगीतुर्यासारखे कार्यक्रम रंगतात, कुस्त्यांचे फड भरतात, बाहेरगावचे मल्ल कुस्त्या खेळण्यास येतात. सारे गाव गजबजून गेलेले असते.
गावात कोणाच्याही घरचे लग्नकार्य असेल तर सगळे मिळून ते पार पाडतात. गावातील सगळ्या बायका रात्री लग्नघरी एकत्र येऊन, हसतखेळत, गाणी म्हणत लग्नाचा स्वयंपाक करतात. गावातील पुरुष मंडळी वाढप्याचे काम करतात. सार्यांच्या मदतीने लग्नानिमित्त गावजेवण दिले जाते. गावातील तरुण पिढी शिक्षणासोबत शेतीसाठी झटत आहे.
गावात सलग तीन वर्षें संत एकनाथांचे भावार्थ रामायण लावले होते. रोज पहाटे रामफेरी निघायची. टाळ, मृदंग, वीणा यांच्या साथीने रामाची गाणी म्हणत, रामाचा फोटो घेऊन रामभक्त गावामध्ये फेरी मारायचे, ती रामफेरी. गावातील स्त्रिया रोज पहाटे उठून रामफेरीच्या स्वागतासाठी घरापुढे सडा-रांगोळी करत. आरतीचे ताट घेऊन ओवाळत. अगदी कसे प्रसन्न वातावरण तयार होई! गाव स्वच्छ व शोभिवंत दिसे. रामायणाचे रात्री मारुतीच्या मंदिरात वाचन होई. गावातील लोक चौदा दिवस वनवासाला म्हणून एखाद्या तीर्थक्षेत्राला पायी चालत जाऊन येत. ते आल्यावर रात्रभर ‘लक्ष्मणशक्ती’चा सोहळा चाले. रामायण वाचताना लक्ष्मण शुद्धीवर आला, की सार्या गावात जल्लोष होई. गावजेवण होत असे. असा सगळा आनंदोत्सव! गावात रामायण चालू असेपर्यंत मांसाहार वर्ज्य असे.
हुरड्याच्या दिवसांत सकाळ-संध्याकाळ शेतात शेकोट्या पेटतात. पाहुण्यारावळ्यांच्या हुरडा पाटर्या होतात. गावात एरवीसुद्धा कोणाच्या घरी जेवणे चालू असताना गेलात तर ‘जेवता का?’ असे न विचारता ताटाजवळ दुसरे ताट तयार होते व ‘बसा जेवायला’ असा आग्रह होतो. औपचारिकपणा कोठेही नसतो. गावातील कोठलीही माहेरवाशीण आली तर सारेजण तिची आपुलकीने खुशाली विचारतात. ती सासरी जाताना सगळ्या बायका तिला निरोप देण्यास जमतात. कोणाचीही लेक ही गावाचीच लेक असते. एखाद्याच्या मुलीला सासरी त्रास होत असेल तर गावातील चार प्रतिष्ठित माणसे जमून तिच्या सासरच्या लोकांची मुलीच्या वतीने माफी मागतात, त्यांची विनवणी करतात आणि तिचा प्रश्न सोडवून तिचा संसार सुखी करण्याचा प्रयत्न करतात.
सगळा गाव एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी असतो. ‘वसुधैव कुटुंबकम्’ तसे आमचे कोळगाव म्हणजे एक कुटुंबच. काकांनी असा सगळ्याच दृष्टीने गावाचा कायापालट केला. स्वच्छ, निर्मळ, प्रामाणिक व सदाचारी वर्तन, गावासाठीची तळमळ यामुळे गाव त्यांना विसरू शकत नाही हे खरे, पण ती गावाची एकजूट मात्र आता आटपाट नगरातील कहाणी झाली असे खेदाने म्हणावेसे वाटते. कारण आमच्यासारख्या सगळ्या लहान लहान गावांतूनही राजकारणाने पाय रोवले आहेत. गावात दुफळी होऊ लागली. एकमेकांशी नातेसंबंध असणार्या घरांमध्येही दुरावा निर्माण होऊ लागला. गावाला दृष्टच लागली म्हणायची! तरी इतर गावांपेक्षा आमच्या गावची परिस्थिती बरीचबरी आहे. संस्काराने घडलेली माणसे काही गेली, काही परगावी गेली, बोटावर मोजण्याइतकी मुले इंजिनीयर, डॉक्टर झाली आहेत. काहींनी सद्यस्थितीला स्वीकारले. गावात नळाला पाणी येते. गावात सिमेंटचे पक्के रस्ते झाले पण माणसांची मने टणक झालेली दिसतात.
दिनकरराव डोळस (सरपंच) यांचे निधन 1989 ला झाल्यानंतर गावातील तात्यामामा डौले, तात्याभाऊ शिंदे, बाबुदादा लिंबूरकर, सैनाबापू पवार या सर्वांनी दहा वर्षे ग्रामपंचायत सांभाळली. पुन्हा एकदा गावाला सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐक्याच्या व भरभराटीच्या शिखरावर पोचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन विचार करावा ही अपेक्षा आहे. आम्ही त्यासाठी प्रयत्न करत असतो. आम्ही गावात वाचनालय सुरू केले आहे. पण वाचनास पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. रोजची वर्तमानपत्रे मात्र वाचली जातात.
गावाच्या पश्चिमेला कोळेश्वराचे जुने मंदिर आहे. त्यावरून त्या गावाला कोळगाव हे नाव पडले असे पूर्वीपासून लोक सांगतात. गावाच्या पूर्वेला सीनामाईने वळसा घातलेला आहे. ती सीनानदी म्हणजे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र यांची सीमा असेच म्हणावे लागेल. सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांची हद्द दाखवणारी जलवाहिनी सीना. तिचे पात्र फार मोठे भीमेइतके नाही. ‘सतत वाहते उदंड पाणी, कुणी न वळवुन नेई रानी’ अशी परिस्थिती होती. पण आता त्याच सीनेवर सीना-कोळगाव धरण झाले आहे. शेतीच्या माध्यमातून गावाचा बऱ्यापैकी विकास झाला आहे. गावाला शेतशिवार जास्त नाही. त्यामुळे खूप श्रीमंतीचा डामडौल नाही किंवा अगदी बिकट परिस्थितीही नाही. तेथील माणसे ‘ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान’ या न्यायाने वागत आली आहे. सीना नदी ही मराठवाड्याची बॉर्डर आहे. तेथून तीन किलोमीटर अंतरावर हिवरे येथे नागनाथाचे हेमाडपंथी मोठे मंदिर आहे. बारव आहे. तेथे पाणी असते. मंदिराच्या एका बाजूला चौकोनी विहीर होती, ती बुजली आहे. पुराणकथेनुसार त्या विहिरीवर हत्तींची मोट चालत असे.
- मंदाकिनी डोळस sheetal_dolas@yahoo.com
कोळगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर
लेखी अभिप्राय
भावनिक आणि कार्यतत्पर लेख... प्रोत्साहित करणारा लेख... एक उपशिक्षक... शाळा परंदवडी ता.मावळ जि.पुणे
लेखनातील प्रत्येक शब्दांनी जन्मभूमीत जगलेल्या प्रसंगाची आठवण जागी झाली,खूप च छान ,
आत्ताच्या पिढीला विचार करायला लावणारा लेख. प्रेरणादायी लेखन, अखंड प्रवास डोळ्यांसमोर उभा राहिल्यासारखा वाटला. म्हणजे सगळ्यांच्या स्वप्नातलं आदर्श गाव त्या काळी अस्तित्वात होतं!
- संयुक्ता
जुन्या आठवणींची वावटळ उठवणारा लेख ...जुन्या आणि नव्या काळाची वास्तविकता दर्शवणारा लेख.....पुन्हा एकदा आजोळी फिरून आल्यासारखे वाटले. कै.दिनकर डोळस यांच्या त्यागाला व कर्तृत्वाला सलामा
जुन्या आठवणींची वावठळ उठवणारा लेख .......
हृदयस्पर्शी लेखन.अतिशय मनाला भावलेले विचार.परिस्थितीवर मात करून ध्येयवेडया तरूणाची कार्यतत्परता वाखण्याजोगी.सरपंच झाल्यावरदेखिल पदाची हवा डोक्यात न जाऊ देता फक्त गावाला प्रगतीपथावर आणलं.सलाम त्यांच्याकार्यकर्तृत्वाला आणि लेखकांच्या लेखनशैलीला.
अप्रतिम लेख ...
bhut kalatil aathavani jagya zalya Khup chan.. Shree Ram
गावातील कोणाला जरी विचारलं तु कोनाचा तर ते सांगत मी त्यां पार्टी चा ह्या पार्टी चा वडिलांची नाव सांगत नाही त गाव कस एक होनार आता लेख खूपच छान आहे
खूप छान
आमच्या गावाची माहीती गावगाथा या लेखाच्या माध्यमातून प्रसारीत होत आहे....
मंदाकिनी (काकू) चे डोळस गाव- कोळगाव ग्रामस्थांच्या वतीने आभार......
अप्रतिम लेख आहे. लेख वाचताना असे वाटत होती, की लेखामध्ये जगतोय त्या परिस्थितीमध्ये झोकून गेलो आहे. खरेच ग्रेट... याचा नक्कीच शालेय पाठ्य पुस्तकात समावेश व्हावा.
Add new comment