सातभाई


‘सातभाई’ हे एखाद्या पडेल हिंदी चित्रपटाचे नाव नाही तर ते एका पक्ष्याचे नाव आहे. इंग्रजीत त्याला कॉमन बॅबलर असे म्हणतात. सातभाईंना इंग्रजीत ‘सेव्हन सिस्टर्स’ असेही नाव आहे.

हिंदी सिनेमाच्या सुरुवातीच्या काळात चित्रपटाची कथा दोन भावांवर आधारलेली असे. पुढे ‘राम और शाम’, ‘सीता और गीता’ अशा जुळे भाऊ वा बहिणींच्या चित्रपटांची लाट आली. तर ‘अमर, अकबर, अँथनी’च्या जोरदार यशानंतर तीन भावांच्या कथेच्या फ़ॉर्म्युल्याची चलती सुरु झाली. त्यानंतर एकदम ‘सत्ते पे सत्ता’ हा सात भावांवर आधारित चित्रपट निघाला. मात्र तो अपेक्षेप्रमाणे चालला तर नाहीच, पण चांगला आपटला. त्यामुळे एक गोष्ट चांगली झाली. हिंदी चित्रपटातील भावांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आले.

सातभाई हा पक्षी शहरात भरवस्तीत सहसा आढळत नसला तरी शहराच्या सीमेवरील माळरानावर आणि रानावनांत कायम दिसतो. सातभाई जमिनीवरील पालापाचोळा उसकटून त्यातील कीटक खातो. तो जमिनीपासून थोड्या उंचीवर अगदी जिवावर आल्यासारखे उडतो. सातभाई पक्षी नेहमी थव्याने हिंडतात. त्यांच्या थव्याची संख्या सात ते बारापर्यंत असते. थव्यांची संख्या नेहमी सातच असते असे नाही, परंतु बहुतेक वेळा तेवढी असते. म्हणून त्याचे नाव पडले सातभाई.

थव्यातील पक्ष्यांची संख्या हा स्वतंत्रपणे अभ्यासाचा विषय आहे. पक्षी चरत असताना त्यांचे लक्ष खाण्यात असल्यामुळे ते थोडे बेसावध असतात. त्याचवेळी त्यांच्यावर शिकारी प्राण्यांकडून हल्ला होण्याची शक्यता असते. म्हणूनच पक्ष्यांना आजुबाजूला लक्ष ठेवणे आणि चरणे ह्या दोन गोष्टींची कसरत करावी लागते. थव्यामुळे लक्ष ठेवण्याची कामगिरी विभागली जाते आणि पक्षी चरण्यासाठी अधिक वेळ देऊ शकतात. म्हणून थव्याने चरणे ही काही पक्ष्यांच्या दृष्टीने आवश्यक बाब ठरते. अर्थात थव्यातील पक्ष्यांची संख्या विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त झाली तर पक्षी बेसावधही राहतात आणि शिकारीला बळी पडतात. म्हणूनच थव्याने चरणाऱ्या पक्ष्यांच्या थव्याची संख्या प्रत्येक प्रजातीनुसार बदलत असते. सातभाईच्या दृष्टीने सात ही संख्या जास्त योग्य ठरत असावी. म्हणून त्यांचा थवा सातजणांचा असतो.

सातभाई पक्षी उडताना आणि चरताना प्रचंड कालवा करतात. त्यामुळे सातभाईपेक्षा ‘सेव्हन सिस्टर्स’ हे नाव वस्तुस्थितीला धरून अधिक योग्य आहे असे वाटते आणि ज्या कोणी इंग्रज माणसाने हे नाव त्यांना दिले त्याच्या विनोद बुद्धीला दाद द्यावीशी वाटते.

- उमेश करंबेळकर

(‘राजहंस’ ऑक्टोबर 2015 वरून उद्धृत)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.