कदंबमुकुल न्याय


आपल्या अस्सल देशी वृक्षांपैकी अत्यंत देखणा वृक्ष कोणता असेल, तर तो ‘कदंब’. तो सहजासहजी आढळत नाही- मात्र देशी वृक्षांचे जतन आणि संवर्धन यांचे महत्त्व गेल्या काही वर्षांत लक्षात आल्यामुळे कदंबाची लागवड जाणीवपूर्वक केली जात आहे. कदंब भारतीय संस्कृतीत घट्ट रुजला आहे. कृष्णाचे आणि कदंबाचे नाते मैत्रीचे आहे. म्हणून कदंबाला ‘हरिप्रिय’ किंवा ‘कृष्णसखा’ असे म्हणतात.

कृष्णाने गोपींचीवस्त्रे चोरून कदंब वृक्षावर ठेवली होती. 

कदंब चाळीस मीटर उंच वाढतो. त्याच्या फांद्या जमिनीला समांतर वाढतात. कदंबाला बहर पावसाळ्याच्या सुरुवातीला येतो. मलयनिल म्हणजे मलय पर्वतावरून येणार्‍या वार्‍यामुळे कदंबावर रोमांच उभे राहतात. ही कविकल्पना कालिदासांची. मेघदूतातील वृक्ष मेघाला हे सांगतो. (त्वत् संपर्कात पुलकितमिव प्रौढ पुष्पक कदम्बै:) ते रोमांच म्हणजे कदंबाची फुले! कदंबाची फुले शेंदरी रंगाची, छोट्या लाडवाच्या आकाराची आणि सुवासिक असतात. फुलांनी बहरलेला वृक्ष डोळ्यांचे पारणे फेडतो. कदंबाचे वैशिष्ट्य हे, की त्याच्या जवळजवळ सर्व फांद्यांना कळ्या एकाच वेळी येतात. त्यावरून ‘कदंबमुकुल न्याय’ तयार झाला. मुकुल म्हणजे कळी. एककालिक उत्पत्तीसाठी कदंबमुकुल न्याय वापरला जातो.

खरे म्हणजे, त्यासाठी ‘एकसमयावच्छेदेकरून’ असा एक भारदस्त शब्द आहे. ‘कदंबमुकुल न्याया’चे उदाहरण कोठले द्यायचे, याचा विचार करताना मला पक्ष्यांच्या संदर्भातील एक गोष्ट आठवली. पक्ष्यांच्या काही प्रजातींमध्ये मादी विणीच्या काळात घरट्यातील सर्व अंडी एका वेळी उबवण्यास बसते. त्यामुळे सर्व अंड्यांची उबवण एकाच वेळी होऊन सर्व अंड्यांतून पिले साधारण एका दिवशी बाहेर येतात. अशा पक्ष्यांच्या घरट्यात सारख्या वाढीची पिल्ले दिसतात. पण काही मोठ्या शिकारी पक्ष्यांमध्ये विणीच्या काळात मादी अंतरा-अंतराने अंडी घालते. परंतु पहिले अंडे घातल्यानंतर लगेच उबवण्यास बसते. त्यामुळे पहिले अंडे आधी उबून त्यातून पिलू बाहेर येते आणि नंतर बाकीच्या अंड्यांतून अंतरा अंतराने क्रमानुसार पिले बाहेर येतात. त्यामुळे अशा पक्ष्यांच्या घरट्यात भिन्न वाढीची पिले दिसतात. ह्या दोन प्रकारांसाठी मी एककालिक उबवण (synchronize hatching) आणि भिन्नकालिक उबवण (asynchronize hatching) असे शब्द वापरले.

पण ‘कदंबमुकुल न्याय’ माहीत झाल्यानंतर लक्षात आले, की एककालिक उबवणीचे वर्णन करताना ह्या प्रजातींमधे विणीच्या काळात अंडी ‘कदंबमुकुल न्याया’ने उबतात, असे म्हटल्यास चांगले दिसेल. अर्थात त्यासाठी ‘कदंबमुकुल न्याय’ माहीत असला पाहिजे!

-  उमेश करंबेळकर

(‘राजहंस ग्रंथवेध’ जानेवारी 2018 वरून उद्धृत)

लेखी अभिप्राय

Chan

Sandhya Joshi16/01/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.