वेलिंग्टन फाउंटन - मुंबईचा सौंदर्यपूर्ण वारसा


मुंबईच्या ‘रिगल’ चौकातील सुंदर कारंजे दिसते का?

_Welington_Fountain_1.jpgमुंबईच्या वेलिंग्टन फाउंटनला ‘युनेस्को’चा 2017 सालचा विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर झाला. मुंबई फोर्टभोवतालची तटबंदी 1686-1743 च्या दरम्यान बांधली गेली होती. ब्रिटिशांनी भारताची सत्ता 1818 मध्ये हाती घेतली. ती तटबंदी गव्हर्नर सर बार्टल फ्रियर या प्रशासकाने पाडून फ्लोरा फाउंटन परिसरात स्वच्छता, आरोग्य व्यवस्था, रस्त्यांचे रुंदीकरण इत्यादी कामे हाती घेतली. त्यानेच मुंबईच्या आधुनिक विस्ताराचा पाया घातला. बार्टल फ्रियर याची कारकीर्द पाच वर्षांची (1862-1867) होती. तो करारी प्रशासक म्हणून प्रसिद्धी पावला. त्याने दक्षिण मुंबईत सार्वजनिक इमारतींच्या उभारणीसोबत शहरसौंदर्य, करमणूक व इतर क्षेत्रांतील गरजा यांतून काही महत्त्वपूर्ण वास्तू उभारल्या. त्या जडणघडणीत चौकातील वाहतूक बेटे, पुतळे, उद्याने, खुली मैदाने, टाउन हॉल, सिनेमा व नाट्यगृहे, फाउंटन/पाणपोई अशा सोयींचा समावेश आहे. वेलिंग्टन फाउंटन हेही शहराच्या जडणघडणीचा भाग म्हणूनच बांधण्यात आले. रुईया कॉलेजच्या इतिहास विभागाने ‘मुंबई मेट्रोपोलिटन रिजन हेरिटेज काँझर्व्हेशन सोसायटी’ला 2007 मध्ये अहवाल सादर केला. त्यात ब्रिटिशकालीन फाउंटन व पाणपोया यांची संख्या जवळपास पन्नासपर्यंत असल्याची नोंद आहे. त्या यादीनुसार व्यक्तींच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मारकांची संख्या सहा आहे. वेलिंग्टन फाउंटन हे त्यांपैकी एक स्मारक होय!

ब्रिटिश काळातील सार्वजनिक इमारती व्हिक्टोरियन गॉथिक व निओ क्लासिकल शैलीत बांधल्या गेल्या. ब्रिटिश आर्किटेक्ट्संनी त्या इमारतींच्या बांधकामशैलीत नवनवीन प्रयोग केले. नवीन आराखड्यानुसार फोर्ट परिसरात भव्य इमारतींसोबत मोठ्या आकारातील चौक निर्माण करण्यात आले. त्यांपैकी सर्वांत मोठा वेलिंग्टन चौक (पंडित श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव दिले गेले आहे) असावा! तो परिसर रिगल सिनेमापासून सुरू होतो. त्या चौकातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम), नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (कावसजी जहांगीर हॉल) या इमारती आर्किटेक्ट जॉर्ज विटेट याने व लायन गेटकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावरील महाराष्ट्र पोलिस मुख्यालयाची इमारत (रॉयल ऑल्फ्रेड सेलर्स होम) एफ.डब्ल्यू. स्टीव्हन्स या आर्किटेक्टने आरेखित केली आहे. महात्मा गांधी रोडवरून कुलाब्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पश्चिमेस ‘मॅजेस्टिक हाउस’ची शानदार इमारत व पूर्वेस नावाप्रमाणे दिसणारे ‘रिगल’ सिनेमागृह उभे राहिले. एखाद्या उत्कृष्ट सिनेमागृहाची अंतर्बाह्य रचना व एकूण दर्जा कसा असावा, ते त्या इमारतीच्या रचनेत पाहण्यास मिळते! पुढे एल्फिन्स्टन कॉलेज, जहांगीर आर्ट गॅलरी, डेव्हिड ससून लायब्ररी, वॅटसन हॉटेल इत्यादी, कलासौंदर्याने नटलेल्या काही इमारती उभ्या राहिल्या.

युरोपीय पाहुणे मुंबईत समुद्रमार्गाने येत. फोर्टमध्ये प्रवेश अपोलो गेटमधून (आजचे लायन गेट) होई. ‘ड्यूक ऑफ वेलिंग्टन’ आर्थर वेलस्ली यांनी 1801-1804 दरम्यान मुंबईला दोन वेळा भेट दिली. त्यांच्या शहर प्रवेशाचा मार्ग चैतन्यपूर्ण दिसावा व परिसराचे सौंदर्य खुलून दिसावे या दुहेरी हेतूने कारंज्यासाठी त्या जागेची निवड करण्यात आली. ब्रिटिश सैन्याने प्लासीची लढाई व 1857 चे युद्ध यांत दाखवलेल्या शौर्याचे प्रतीक म्हणून तेथे कारंजे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तेच वेलिंग्टन फाउंटन. लेफ्टनंट कर्नल जे.जे. स्कॉट या स्थापत्यकाराने त्यात पारंपरिक आकाराऐवजी नैसर्गिक घटकांचा उपयोग केला आहे. ते कारंजे निओ क्लासिकल शैलीतील आहे. ते ‘रॉयल इंजिनीयर्स’चे जनरल ऑगस्टस फूलर यांच्या पर्यवेक्षणाखाली, 1865 मध्ये बांधून पूर्ण करण्यात आले. तेव्हापासून त्या चौकाला ‘वेलिंग्टन फाउंटन’ अशी ओळख मिळाली. ते  फाउंटन जनतेने दिलेल्या देणग्यांतून उभारण्यात आले होते. त्यासाठी त्या वेळी बारा हजार रुपये खर्च आला होता.

_Welington_Fountain_2.jpgत्याचा आकार अपारंपरिक कारंज्याचा आहे. ते तीन भागांत विभागले आहे.  तळभाग हे जमिनीलगतचा अष्टकोनी दगडी कुंड. त्याचा व्यास सुमारे बारा मीटर असावा. कुंडाभोवतीच्या जागेत शोभिवंत वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. कुंडाच्या मधोमध (मध्य भाग) अष्टकोनी ताशीव दगडी स्तंभावर ‘ड्यूक ऑफ वेलिंग्टन’ची प्रतिमा व शौर्याचे दाखले कोरीव संगमरवरी दगडात एक सोडून एक असे पटलावर मांडले आहेत. तिसरा भाग शिखर शोभावे अशा दगडी स्तंभावर आहे. त्याच्या तिरकस आकारातील अष्टकोनी तबकडीचा तळभाग अलंकृत असून, तो उमलत्या फुलासारखा दिसतो. त्याच्या किनारपट्टीवर मत्स्य आकाराशी मिळतेजुळते कलात्मक नक्षिकाम केलेले आहे. फिकट करड्या रंगातील दगडी तबकडीच्या मधोमध ओतीव लोखंडी (कास्ट आयर्न) स्तंभदंडावर कारवी वनस्पतीच्या (अकँथस) काळसर रंगातील पानांच्या किनारी सोनेरी रंगाने सुशोभित केल्या आहेत. पितळी स्तंभदंडावरील सोनेरी रंगातील मोजक्या पानांचे रोपण व रेंगाळणाऱ्या पानांच्या आकर्षक रचनेतील कल्पकता प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. शिखर टोकावरून अलगद उसळणारे पाणी पानांवर थडकत तबकडीच्या किनारपट्टीवरील मोजक्या छिद्रांतून अष्टकोनी कुंडात जमा होते. स्थापत्यकाराने साध्या-सोप्या रचनतून अपेक्षित हेतू साध्य केला आहे. त्यातून रचनाकाराची कला-संवेदनशीलता दिसून येते. त्या रचनेमधील पारदर्शक पाण्याची तरलता पाहून मनात उत्कट आनंद लहरतो; त्या आनंदलहरींतील दृश्यानुभव माणसाचे आयुष्य निश्चितपणे वाढवत असावा!

त्या परिसरातील इमारती व शोभिवंत वास्तू यांसाठी मुंबई व ठाणे येथील स्थानिक खाणींतील दगड वापरला गेला आहे. विविध शैलींतील इमारतींच्या बाह्य भिंतींतून डोकावणाऱ्या नैसर्गिक रंगछटा व विभिन्न शैलींतील कमानी, घुमट व मनोऱ्यांचे आकार यांनी अवकाशाशी कलात्मक समन्वय साधल्याचे दिसून येते. म्हणूनच तो परिसर सर्वांना आकर्षित करतो. ब्रिटिशकालीन पुरातन मुंबई अनेक परिसरांत विभागण्यात आली आहे. त्यांपैकी सर्वांत सुंदर परिसराचा मान त्या एकमेव कलासंपन्न परिसराकडे जातो. त्याचा प्रत्यय तेथील एकूण पार्श्वभूमीशी एकरूप झालेल्या अनेक दृश्यांतून येतो.

_Welington_Fountain_3.jpgस्वातंत्र्यकाळातील ‘सुधारणा’ मात्र सौंदर्यात बाधा आणतात! छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळ भव्य पदपथावरील अस्वच्छ स्वच्छतागृह व ‘बेस्ट’ न दिसणारे स्टॉल्स आणि बसथांबे पाहून घ्यावे! वेलिंग्टन कारंजे 1865 मध्ये उभारण्यात आले. तेव्हापासून आजतागायत त्या चौकातील वाहतूक रचनेत अनेक वेळा बदल करण्यात आले. परंतु समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. उलट, त्या परिसरातील सौंदर्याचा अविभाज्य घटक बनून राहिलेल्या फाउंटनचे स्वतंत्र अस्तित्व व सौंदर्य तेथे ‘पे अँड पार्क’चा फलक लागल्यावर झाकोळून गेले आहे. देश-विदेशातील पर्यटकांना आधुनिक काळात आवश्यक असलेल्या सेवा-सुविधा व स्थानिक गरजांचे नियोजन करताना परिसराचे ऐतिहासिक महत्त्व व सौंदर्य अबाधित राहील हे पाहण्यास हवे. वास्तविक, दोन विरुद्ध टोकांतील व्यवस्थेचे नियोजन एकाच जागेत करणे अयोग्य आहे. मुंबईतील वाहतूक बेटांवरील वारसास्थळे अनेक वर्षांपासून शहरव्यवस्था आणि सौंदर्य यांचा अविभाज्य घटक बनून राहिली आहेत. तत्कालीन वास्तुरचनाकारांनी त्या परिसरातील जडणघडणीत तडजोडीचा पर्याय न स्वीकारता वास्तुकलासौंदर्याच्या निकषांवर इमारतींचे आरेखन केले होते. ते त्या त्या इमारतीच्या वैशिष्ट्यातून समजून येते. शहरसौंदर्याचे महत्त्व मुंबईतील वर्तमान गतिमान जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. ते माणसे व गाड्या यांच्या संख्येच्या तुलनात्मक प्रमाणातून दिसून येते!

वेलिंग्टन फाउंटन स्मारकाचे नूतनीकरण विकास दिलावरी यांच्या देखरेखीखाली झाले आहे. दिलावरी हे पुरातन वारसा संवर्धन वास्तुविशारद आहेत. वेलिंग्टन फाउंटन संवर्धनाचे काम मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ या कंपनीतर्फे करण्यात आले आहे; देखभालही त्यांच्यातर्फे केली जाते. आजवर, स्थानिक प्रशासनाला दक्षिण मुंबईतील रस्ते व चौक यांची नावे बदलण्यापलीकडे कोणतेही बदल करण्याची गरज भासली नाही. ब्रिटिशकालीन प्रशासकांनी भविष्याचा अचूक वेध घेऊन मुंबई घडवली. वर्तमान प्रशासनाची ‘स्मार्ट’ मुंबईची संकल्पना योग्य की अयोग्य हे काळच ठरवेल! त्या परिसरातील सर्व वास्तू त्या काळात जशा बांधल्या होत्या, त्या स्वरूपात शाश्वतपणे टिकून आहेत. पूर्वजांनी दिलेला वारसा योग्य रीतीने जपला गेला, तरच पुढील पिढी वर्तमान कला-सौंदर्यातून मिळणाऱ्या आनंदाचा हिस्सा बनून राहील!

- चंद्रशेखर बुरांडे, fifthwall123@gmail.com

(‘बाईट्स ऑफ इंडिया’वरून उद्धृत, संस्कारित)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.