नाकी नऊ येणे


'नाकी नऊ येणे' ह्या वाक्प्रचाराचे अर्थ शब्दकोशात अतिशय दमणे, कंटाळणे, श्रमाने थकणे असे दिलेले आहेत; तसेच, मरणाच्या दारी असणे, नऊ इंद्रियांची शक्ती नाकात येणे असाही अर्थ दिलेला आहे.

वा.गो. आपटे लिखित ‘मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी’ या पुस्तकात, ‘नाकी नऊ येणे’ यातील नऊ म्हणजे मानवी शरीराची नऊ द्वारे- दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या, एक तोंड, एक गुद व एक मूत्रद्वार ही या सगळ्यांच्या शक्ती एका केंद्रात म्हणजे नाकात उतरणे. त्यावरून फार त्रास होणे, मोठी दगदग करावी लागणे, या अर्थाने नाकी नऊ येणे हा वाक्प्रचार रूढ झाला' असे नमूद केले आहे.

मला ती व्युत्पत्ती तितकीशी पटत नाही. त्याचे कारण त्या नऊ दारांमधे नाकपुड्यांची संख्या दोन आहे. उर्वरित दारांची संख्या सात होते. त्यामुळे नाकी सात आले, असा वाक्प्रचार रूढ व्हायला हवा होता. वास्तविक, त्यांचा अर्थ शरीरातील मल बाहेर टाकला जाणारी नऊ द्वारे एवढाच मर्यादित आहे. त्यांचा इंद्रिये म्हणून उल्लेख नाही.

मानवी शरीराची पंच ज्ञानेंद्रिये व पंच कर्मेंद्रिये आयुर्वेदात वर्णलेली आहेत. कान, नाक, डोळे, जीभ व त्वचा ही अधिष्ठाने पंच ज्ञानेंद्रियांची आहेत; तर हात, पाय, वाणी, शिस्न आणि गुद ही पाच कर्मेंद्रिये आहेत. (‘संख्या संकेत कोश’ - श्री.शा. हणमंते)

माणूस जेव्हा मरणासन्न होतो तेव्हा त्याच्या त्या दहाही इंद्रियांची शक्ती क्षीण होते, त्याचे हात-पाय निश्‍चल असतात, बोलता येत नाही, ऐकू येत नाही, डोळे थिजलेले असतात, स्पर्श-चव कळत नसते, मलावर ताबा नसतो. फक्त त्याचा श्‍वास मंद गतीने चालत असतो. जणू काही इतर सर्व इंद्रियांची शक्ती नाकाच्या ठायी एकवटलेली असते. तो जेव्हा शेवटचा श्‍वास सोडतो, तेव्हा ती शक्ती शरीराबाहेर पडते व माणूस मृत होतो असे समजले जाते. म्हणूनच, पूर्वीच्या काळी, जेव्हा स्टेथोस्कोपसारखे उपकरण नव्हते तेव्हा, माणूस मेला की नाही हे कळण्यासाठी त्याच्या नाकाजवळ सूत धरत. श्‍वासोच्छ्वास चालू असेल तर सूत हलत असे. सूत स्थिर राहिले तर श्‍वास थांबला, म्हणजे पर्यायाने माणूस संपला असे समजले जाई. मरणासन्न अवस्थेत नाकाला किती महत्त्व असते हे त्यावरून समजते.

‘नाकी नऊ येणे’ या वाक्प्रचारातील नऊ ही नवद्वारे नसून नाकाव्यतिरिक्त उरलेली चार ज्ञानेंद्रिये व पाच कर्मेंद्रिये आहेत; म्हणून त्यांची संख्या नऊच आहे हे स्पष्ट होते आणि ती नाकीच का येतात त्याचेही उत्तर मिळते.

- उमेश करंबेळकर

(‘राजहंस ग्रंथवेध’ डिसेंबर 2018 मधून साभार)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.