दुरशेत – तरुणांनी जपलेल्या परंपरा! (Durshet)


_durshet_8.jpgरायगड जिल्ह्यातील पेण तालुक्याच्या उत्तरेला दोन-तीनशे घरांची वस्ती असलेले, बाळगंगा नदीच्या छोट्याशा तीरावर वसलेले इवलसे, टुमदार, सुंदर असे पेशवेकालीन खेडे म्हणजे दुरशेत गाव. तीन इटुकल्या टेकड्यांच्या पायथ्याशी आणि गर्द वनराईच्या कुशीत नागमोडी वळणा-वळणांचे दुरशेत हे छोटेसे गाव आहे. विशेष म्हणजे गावाच्या माथ्यावर असलेल्या त्या इटुकल्या टेकड्या वर्षभर सदाहरित राहून गावाला त्यांच्या शीतल सावलीने गोंजारत असतात. त्या टेकड्यांवरील वनराईत आंबा, फणस, काजू, बांबू, जांभूळ; तसेच, अनेक रानटी झाडांचे अस्तित्व आढळते.

गावाच्या प्रवेशद्वारापासून ते थेट गाववेशीच्या शेवटापर्यंत गावाच्या मध्यातून जाणारा सुनियोजित रस्ता हे गावाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. गावाचे सौंदर्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगेत असलेली कौलारू घरे आणि त्या घरांच्या समोर असणारी अंगणे अधिक सुशोभित करतात. गावाची भौगोलिक रचनाच अशी आहे, की सूर्यनारायण गावाच्या मस्तकावर असलेल्या टेकडीवरून जेव्हा सकाळच्या प्रहरी प्रगट होतो तेव्हा त्याची कोवळी किरणे गावाच्या वेशीला जणू सप्तधातूंच्या अलंकारांचा साज चढवल्याचा भास करून देतात.

पूर्वेला, टेकडीच्या पायथ्याशी गुलमोहरांच्या झाडीत नैसर्गिक तलाव आहे. त्या तलावाचे पाणी पावसाळ्यापर्यंत टिकून असते. त्या पाण्यावर गावातील गुराढोरांची तहान भागवली जाते. त्या तळ्याशेजारी पेशवेकालीन हौद आहे. तो हौदही बारमाही भरलेला असतो. तोच गावाच्या पोटात थंड पाण्याचे दोन घोट पाणीटंचाईच्या काळात ओतत असतो. एरवी पाणी पुरवठा नळातून होत असतो. हौदाच्या शेजारी एक भलेमोठे वडाचे झाड आहे. गावातील स्त्रिया वटपौर्णिमेला त्या वडाचे पूजन करतात.

जगत् जननी आई वाज्रादेवी आणि संकटी पावणारा, हाकेला धावणारा श्री स्वयंभू व्याघ्रेश्वर महाराज ही ग्रामदैवते आहेत. पूर्वी व्याघ्रेश्वराचे पेशवेकालीन मंदिर होते, पण ते मंदिर मोडकळीस आले. त्यामुळे गावकर्‍यांनी महाराजांचे भव्य मंदिर बांधले. मंदिराच्या शेजारी दगडी दीपमाळ आहे. गावातील बुजूर्ग त्या दीपमाळेचे महत्त्व असे सांगतात, की पूर्वी वीज नसल्याकारणाने रात्री गावाचे अस्तित्व जास्त लांबून जाणवत नसे. ती दगडी दीपमाळ गावाच्या वेशीपासून दूरवर असलेल्या वाटसरूला गाववेशीचा अंदाज रात्री येण्यासाठी गाववेशीवर बसवली आहे. व्याघ्रेश्वराची महापूजा वैशाख पौर्णिमेला (बौद्ध पौर्णिमेला) तेवढ्याच आत्मीयतेने साजरी केली जाते. त्या पूजेला पेशवेकालीन परंपरेचा वारसा लाभला आहे. त्या महापूजेला गावाबाहेर गेलेला गावकरी आवर्जून हजर राहतो.

_durshet_6.jpgमंदिराचा जीर्णोद्धार करत असताना ग्रामस्थांना शिवकालीन व पेशवेकालीन नाणी व देवदेवतांच्या मूर्ती सापडल्या आहेत. त्या घटनेवरून गावाचे ऐतिहासिक अस्तित्व स्पष्ट होते. जुन्या पिढीच्या म्हणण्यानुसार, दुरशेत गाव हे पेशव्यांनी ब्राम्हणांना इनाम म्हणून दिले होते. त्यामुळे गाव स्थापन झाल्यापासून गावात ब्राम्हणांची वस्ती आहे. गावात ब्राम्हणांबरोबरच आगरी, वाणी, न्हावी, कालण, आदिवासी या समाजांची वस्ती आहे. आगरी समाजाची वस्ती सर्वाधिक आहे. सर्व समाज गुण्यागोविंदाने एकत्र राहतात; एवढेच नाही, तर गावात साजर्‍या होणार्‍या सर्व सण-उत्सवांत मोठ्या आनंदाने सहभागी होतात. होळी, दसरा, गोपाळकाला हे सण त्याप्रमाणे संपूर्ण गावसहभागातून आणि गावाच्या एकत्वाच्या जाणिवेतून साजरे होतात. त्यासाठी होणारा खर्च गावातील प्रत्येक घरातून, वर्गणी गोळा करून केला जातो.

एक अभिमानास्पद गावपरंपरा अशी आहे, की गावात कोणाही जातिबांधवाच्या घरात मयत झाल्यास त्या मयताला अग्निडाग देण्यासाठी, त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जी लाकडे लागतात ती लाकडे त्याच्या घरातून न घेता गावात दवंडी पिटवून प्रत्येकाच्या घरातून एक-दोन लाकडे याप्रमाणे गोळा केली जातात.

गावाने शासनाच्या योजनांत आणि सामाजिक स्पर्धांत हिरिरीने भाग घेऊन तालुका व जिल्हा स्तरांवरचे; बळवंतराय मेहता आदर्श ग्राम पुरस्कार, महात्मा गांधी तंटा-मुक्ती पुरस्कार आदी बहुमान मिळवले आहेत. गावाच्या शेजारी असलेल्या बाळगंगा नदितीरावर गावसहभागातून, गावजोळीच्या (प्रत्येक घरातील एक सदस्य) माध्यमातून मातीचा बंधारा बांधून, पाण्याचा मुबलक साठा तयार करून ते पाणी उन्हाळी भाजीपाल्यासाठी वापरले जाते. शिवाय, त्या पाणीसाठ्यात असलेल्या मत्स्यजिवांचे रक्षण करून एका नियोजित दिवशी सार्वजनिक ‘गाव मासेमारी’ केली जाते.

गावाला शेती मोजकीच आहे. परंतु बहुतेक कुटुंबे शेतीवर उदरनिर्वाह करतात. गावची शेती पावसाळयात भातशेतीने तर उन्हाळ्यात वाल या पिकाने हिरवाईचा शालू परिधान करते. विशेष म्हणजे दुरशेत गाव वालासाठी पूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. तेथील वालाला वेगळीच चव आहे. व्यापारी लोक ‘दुरशेतचे वाल मिळतील’ अशी जाहिरात करतात, याचा गावातील लोकांना सार्थ अभिमान वाटतो. पावसाळ्याची चाहूल लागताच गावातील शेतकरी ग्रामदैवत व्याघ्रेश्वराला नैवेद्य अर्पण करून शेतावर भाताची पेरणी करतो. पेरणीनंतर रोपे लावणीयोग्य झाली, की गावजत्रा भरते. त्या जत्रेत गावातील सर्व ग्रामदेवतांना बोकड-कोंबडयाचा मानपान देऊन ते प्रसादरूपी मटण गावातील प्रत्येक घरी वाटले जाते. गावजत्रा झाल्याशिवाय गावातील शेतकरी राजा शेतात लावणीसाठी पाय ठेवत नाही.

_durshet_1.jpgगणपती, दसरा या दिवसांत फेर धरणारा बाल्या नाच ही त्या गावाची खास सांस्कृतिक ओळख आहे. तरुण पोरे पूर्वजांची ती ओळख जपण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. त्यांलाच दाद, साद आणि प्रतिसाद देण्यासाठी गावातील काही बुजूर्ग मंडळी तरुणांच्या खांद्याला खांदा लावून नृत्याचा ठेका धरतात. गावाची खरी श्रीमंती म्हणजे गावावर असलेली तरुणांची निष्ठा. गावातील तरुण त्याची नजर गावाच्या प्रत्येक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, क्रीडात्मक बाबींवर घारीसारखी बारकाईने ठेवून असतो. गावात साजर्‍या होणार्‍या प्रत्येक सण-उत्सवाचे नेतृत्व तरुणांच्या कल्पकतेने सजलेले असते. तो मनात सण-उत्सवांच्या झगमगाटातही सामाजिक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी गांभीर्याच्या सूत्राचा प्रयोग करत असतो. गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण! तो दुरशेत गावातही मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. गावात बहुतेक घरांत गणपतीबाप्पा विराजमान झालेला असतो. अशा वेळी गावातील मुले गणेशदर्शनासाठी प्रत्येकाच्या घरी मोठाले भांडे घेऊन एकत्र निघतात. भांडे याकरता, की ज्यांच्या ज्यांच्या घरून गणेशदर्शनाचा प्रसाद म्हणून जे करंज्या, लाडू, खीर, मोदक दिले जातील ते, कोणीही न खाता एकत्र साठवता यावे आणि सायंकाळी, गावाच्या आजूबाजूला-डोंगरमाथ्यावर ज्या ठाकर आणि आदिवासी बांधवांच्या वाड्या आहेत तेथे जाऊन, सर्वांना वाटून, सामाजिक बांधिलकीचे रेशीमबंध बांधले जावे! तसेच, गावातील तरुण गणपती उत्सवाच्या काळात गस्त घालणार्‍या पोलिस बांधवांपर्यंत मोदक व खीर पोचवण्याचे कामही करतात.

गावात प्राथमिक शाळा पहिली ते सातवीपर्यंत आहे. त्या शाळेतूनच शिक्षण घेऊन नोकरी-व्यवसायात मोठी झालेली गावातील तरुण मंडळी हल्ली शाळेवर कृतज्ञतेचा वर्षाव करत आहेत. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन, वर्गणी गोळा करून गावातील मराठी शाळेला डिजिटल शाळा बनवली आहे. तसेच, गावातील बहुतेक तरुण त्यांच्या वाढदिवसाचा आनंद कोणी शाळेतील विद्यार्थी मित्रांना क्रीडासाहित्य तर कोणी वह्या-पुस्तके-चटई, तर कोणी स्नेहभोजन देऊन साजरा करत असतात.

- शैलेश परशुराम गावंड, bhaugawande@gmail.com, pgavand3@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.