पांढरा हत्ती आणि काळेही


_Pandhara_Hatti_1.jpgनुकसानीत जाणारे (आणि गेलेले) सरकारी उपक्रम; ज्यापासून काही फायदा होत नाही, उलट, खर्चच अधिक होतो. अशा वस्तूंना ‘पांढरा हत्ती’ असे म्हटले जाते. हिंदुस्थानात 1583-1619 या काळात आलेल्या प्रवाशांनी जी प्रवासवृत्ते लिहून ठेवली; त्यांतील पहिले प्रवासवृत्त राल्फ फिच याचे आहे. त्याने हिंदुस्तानातील प्रवास संपल्यावर ब्रह्मदेशाला भेट दिली. त्याच्या प्रवास वर्णनात तेथील पांढऱ्या हत्तींचा उल्लेख आहे. त्याने तेथील पेगू या शहराच्या राजाकडे पाच पांढरे हत्ती होते असे लिहून ठेवले आहे. त्या हत्तींना त्याकाळी मोठा सन्मान असे. पेगूचा राजा हा असे हत्ती बाळगणारा एकमेव राजा होता आणि दुसऱ्या कोणा राजाला तसा एखादा पांढरा हत्ती मिळाला तर तो त्याने पेगूच्या राजाला सुपूर्द करावा असा अलिखित नियम होता. तसे झाले नाही तर दोन राज्यांत युद्ध होत असे!

त्या पांढऱ्या हत्तींची निगराणी वैभवशाली पद्धतीने राखली जात असे. हत्ती ज्या जागेत ठेवले जात असत त्या जागेच्या भिंती सोन्या-रूप्याने मढवलेल्या असत. हत्ती अंघोळीसाठी बाहेर नेला जाई, तेव्हा त्याच्या डोक्यावर रेशमी कापडाची आणि जरीने मढवलेली छत्र-चामरे असत. आठ-दहा माणसे त्याच्या पुढे वाद्यांचा गजर करत चालत असत. हत्ती स्नान करून परतल्यावर त्याचे पाय चांदीच्या घंगाळात पाणी ठेवून धुतले जात असत (फिच पृष्ठ 31). पेगूच्या राजाकडे नवा पांढरा हत्ती आला, की शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी राजाला देणगी (कर) द्यावी आणि नंतर त्याचे दर्शन केव्हाही घ्यावे असा नियम होता. त्यामुळे पांढऱ्या हत्तीपासून राजाला उत्पन्नही भरपूर होत असे.

पांढरा हत्ती खरोखरच पांढरा असतो का? तपास करता असे दिसते, की त्याची त्वचा मऊ व तांबूस असते. पांढरा रंग अगदी नाममात्र असतो. भारतात इंद्राच्या हत्तीला ऐरावत म्हणतात, तो शुभ्र असतो असा संकेत असल्याचे समजते. थायलंडमध्ये तशा हत्तीला शुभ या अर्थाने पांढरा असे म्हटले जाते. इतर अनेक प्रतीकांना पुन्हा एकदा महत्त्व येत असताना, त्या लाटेत पांढरा हत्ती मात्र कोरडा राहत आहे असे वाटते.

_Pandhara_Hatti_4.jpgपांढरा हत्ती म्हणजे खायला काळ आणि भुईला भार असा आणि तेवढाच अर्थ रूढ का व्हावा? तो शुभ भावनेचे प्रतीक म्हणून रुजला का नाही?

वरील नोंदी केल्या आणि काही तासांतच ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्रात मथुरा शहरानजीक बारा हजार चौरस फूट एवढ्या जागेवर हत्तींसाठी एक परिपूर्ण इस्पितळ सुरू झाल्याचे वृत्त वाचले. त्या इस्पितळात क्ष किरण, अल्ट्रासोनोग्राफी, हायड्रोथेरेपी, बधिरीकरण अशा सर्व प्रकारच्या उपचारांच्या सोयी आहेत. बावीस हत्तींवर उपचार तेथे एका वेळी होऊ शकतात. हत्तींना रात्रभर राहण्याची वेळ आली, तर त्यांच्या निरीक्षणासाठी सीसीटीव्ही व्यवस्थासुद्धा आहे.

हत्तींसाठी अशा प्रकारचे ते पहिले परिपूर्ण असे इस्पितळ आहे. काझीरंगा (आसाम) येथे एक दवाखाना (फक्त हत्तींसाठी असलेला) आहे आणि केरळमध्ये थ्रिसूर येथे आणखी एक दवाखाना सुरू करण्याची योजना आहे. नवलाची बाब म्हणजे हत्तींसाठीच्या पहिल्या रुग्णालयाची बातमी बहारीनच्या वृत्तपत्रात फोटोसकट प्रसिद्धही झाली आहे. या साऱ्या सोहोळ्यात एक गोष्ट न सांगितल्यामुळे स्पष्ट आहे, की हे रुग्णालय रोजच्या काळ्या-मातकट हत्तींसाठी आहे. ‘टाइम्स’मध्ये आलेली दुसरी गोष्ट म्हणजे लोकांचा अल्प प्रतिसाद – इस्पितळाच्या उद्घाटनाच्या वेळी पंचवीस माणसे उपस्थित होती. म्हणजे पांढऱ्याच काय पण काळ्या हत्तींबाबतही उत्सुकता संपली आहे का?

- मुकुंद वझे, vazemukund@yahoo.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.