अनिताबाईंचे भाषादालन


_Anitabainche_Bhashadalan_1.jpgअनिता जावळे जिल्हा परिषद शाळेमध्ये काम गेली पंधरा वर्षें करतात. त्यांनी शिक्षणसेवक म्हणून मार्च 2002 पासून कामाची सुरुवात केली. अनिताची पहिली शाळा होती, लातूर तालुक्यातील वाडी वाघुली या गावची. तेथे जाण्यासाठी खासगी वाहनाशिवाय वाहतुकीची काही व्यवस्था नव्हती. म्हणून स्त्री कर्मचारी ती शाळा नाकारत. अनिताने हिंमतीने ते आव्हान स्वीकारले. बाकी सात सहकारी पुरुष होते. सोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून उत्तम काम करून दाखवले. अनिता यांनी पालकांशी, विद्यार्थ्यांशी यशस्वी संवाद साधला. त्याचे फळ म्हणून त्या धनगर वस्तीतील मुली दहावीपर्यंत पोचल्या! त्या पूर्वी पाचवी-सहावीतच शाळा सोडत.

अनिता यांची बदली तेथून झाली ती लातूर तालुक्यातील साखरा शाळेत. त्यानंतर पदवीधर शिक्षक म्हणून त्यांना माटेफळ या शाळेमध्ये बढतीवरील बदली देण्यात आली. अनिता सांगतात, “तेथे आल्यावर रडूच कोसळले! कारण तेथे सगळ्या गोष्टींची कमी होती. असे वाटले, काय म्हणून ही शाळा घेतली? पाचवीच्या वर्गात नऊ मुले होती, पण उपस्थित केवळ दोन-तीन. तेच बाकी वर्गाचे.’’ अनिता यांनी विद्यार्थी शाळेत यावेत म्हणून प्रयत्न सुरू केले. त्यांनी निरनिराळ्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना शाळेकडे वळवले. विद्यार्थ्यांच्या पालकांशी ओळख होण्यासाठी पाककृतीच्या स्पर्धा घेतल्या, गृहभेटी आखल्या. त्यांनी घेतलेला ‘मन की बात’ हा उपक्रम मोठा मजेदार आणि तितकाच महत्त्वाचाही होती. त्या ‘मन की बात’मध्ये विद्यार्थ्यांनी ‘कुण्णालाच’ न सांगितलेल्या गोष्टी सांगायच्या होत्या. मुलेही हुशार, त्यांनी आधी बाईंनाच त्यांची ‘मन की बात’ सांगायला लावली. अनिता यांनीही त्यांच्या लहानपणातील काही खोड्या सांगितल्या. त्या त्यांनी आईलाही कळू दिल्या नव्हत्या. हळुहळू, मुले बोलती होऊ लागली. अभिषेकने सांगितले, की त्याने त्याच्या वडिलांच्या खिशातून गुपचूप शंभर रुपये घेतले होते. खरे तर, ती चोरीच होती. पण त्याला तितके कळत नव्हते. परंतु कधी ना कधी वडील त्याबद्दल विचारतील, म्हणून घाबरून तो वडिलांशी फारसा बोलायचाच बंद झाला होता. अनिता यांनी त्याला नीट समजावले आणि ती गोष्ट वडिलांना स्वत: सांगायला लावली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या बाबांनी ते नीट ऐकून घेतले आणि अभिषेकच्या प्रामाणिकपणाबद्दल त्याला बक्षीसही दिले. वडिलांबद्दलची अनाठायी भीती त्या घटनेने कोठच्या कोठे पळून गेली. शाळेतील एका उपक्रमाने घरातला बाप-लेकाचा संवाद वाढला होता.

_Anitabainche_Bhashadalan_2.jpgइम्रान नावाचा मुलगा दोन वर्षें फक्त शाळेच्या आवाराजवळ यायचा, पण वर्गात कधी येत नसे. त्याला बोलावले तर पळून जाई. घरचेही त्याच्यासमोर थकले होते. इम्रानने त्यांना तर धमकीच दिली होती, ‘साळंत पाटवलं तर फाशीच लाऊन घ्येतो.’ अनिता यांनी ठरवले, की त्याला शाळेत आणायचेच. त्याची आई अंगणवाडीत येत असे. तेथे त्यालाही घेऊन यायला सांगितले. अनिता यांनी इम्रान अंगणवाडीत आला तेव्हा त्याच्याशी काही न बोलता त्याला त्यांचा मोबाइल दाखवला. त्यावरील गाणी, कविता, चित्रे दाखवली. इम्रानला शाळा म्हणजे केवळ कठोर अभ्यास नव्हे तर अशीही गंमत असते हे हळुहळू पटू लागले. अनिता यांनी त्याच्या मनातील शाळेची भीती मोबाइलच्या माध्यमातून घालवली. इम्रान शाळेत रुळला. तो पहिल्यांदा केवळ अनिता यांच्या वर्गात बसण्याचा हट्ट धरी पण तो हळूहळू शाळेमध्ये रमला. विद्यार्थ्यांची अशी प्रगती पाहून पालकांना शाळेबद्दल आस्था वाटू लागली. ज्या शाळेत वर्गखोल्याही व्यवस्थित नव्हत्या. त्या शाळेच्या इमारतीची डागडुजी लोकांच्या सहकार्याने झाली. मैदानाच्या बाजूला खड्डे खणून झाडे लावली गेली. लोकसहभागातून शाळा डिजिटल करण्यात आली. अनिता यांनी माटेफळ शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी भाषादालन हा महत्त्वाचा उपक्रम घेतला. भाषाशिक्षणात अनुभव आणि अभिव्यक्ती या दोन्हींना फार महत्त्व असते. अनिता यांनी तो उपक्रम मुलांची अभिव्यक्ती सुधारावी या प्रेरणेने घेतला. भाषादालनामध्ये भाषा विषयावर अनेक प्रकारचे साहित्य आहे, पुस्तके आहेत, अक्षरांचे खेळ आहेत. विद्यार्थी भाषेचा तास असताना त्या दालनात येतात आणि शिकतात. मनसोक्त पुस्तके वाचतात. अनिता यांनी विद्यार्थ्यांना त्यातूनच लिहिण्यास शिकवले. विद्यार्थ्यांनी त्यांना आलेला अनुभव लिहून काढणे या एका साध्याशा स्वाध्यायातून विद्यार्थ्यांची लेखन मुशाफिरी सुरू झाली. विद्यार्थ्यांनी सुंदर कथा लिहिल्या. त्याची पुस्तकेही प्रकाशित झाली. पालकांचा त्यांच्या मुलांच्याच त्या कामगिरीवर विश्वास बसेना, महत्त्वाचे म्हणजे, विद्यार्थ्यांनी कोणाची कॉपी केली नव्हती!

_Anitabainche_Bhashadalan_3.jpgअनिता यांची पुन्हा बदली झाली, जिल्हा परिषद शाळा, बोरगाव काळे येथे. त्या शाळेमध्येसुद्धा भाषादालनाचा उपक्रम आहेच. परंतु महत्त्वाचे म्हणजे त्या भाषादालनामध्ये विद्यार्थ्यांनी स्वत: रंगवलेली चित्रे आहेत. शाळेतील इतर भिंतींवरही विद्यार्थ्यांनी चित्रे काढली आहेत. परंतु अनिता यांनी एक अट घातली होती, ती म्हणजे प्रत्येक चित्राची काही तरी गोष्ट हवी. त्यामुळे चित्रातील झाडे बोलतात, ढग हसतात. फुले नाचतात. पाने डोलतात... आणि शाळेच्या भिंती बोलू लागतात. विद्यार्थ्यांनी त्या सगळ्या अनुभवाचे सुंदर शब्दचित्रणही केले आहे. विद्यार्थी भाषादालनातील उपक्रमाअंतर्गत बातम्या लिहितात, लेखकांना भेटतात. वार्ताहरांना भेटतात. त्यांच्याशी गप्पा मारतात. त्यांच्या मुलाखती घेतात. अनिता यांनी तेथे भित्तिपत्रक म्हणून उपक्रम घेतला आहे. त्या एक विषय प्रत्येक महिन्याच्या भित्तिचित्रासाठी देतात. विद्यार्थी त्यावर कथा, कविता, संवाद, बातमी, स्फुट, चारोळी असे काहीही साहित्य देऊ शकतात. त्या उपक्रमालाही जोरदार प्रतिसाद लाभत आहे. अनिता महिन्यातून दोन शनिवारी खाऊचा उपक्रम घेतात. स्वयंपाकासारखे काम फक्त बाईचे नाही, हे विद्यार्थ्यांच्या मनात ठसवणे हा त्यामागील हेतू आहे. विद्यार्थीच त्याचा त्या दिवशी खाऊ तयार करतात. अगदी भाज्या चिरण्यापासून ते तो पदार्थ तयार करून वाढेपर्यंत सगळे मिळून करतात. त्यासाठी विद्यार्थ्यांचे छोटे गट केले जातात. अशा उपक्रमातून स्त्री-पुरुष समानतेचे धडे नकळत मिळतात अशी अनिता यांची धारणा आहे.

अनिता यांनी माटेफळ शाळेतील अनुभवांच्या आधारे ‘लखलखणारी शाळा’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यांची आणखी काही लहान मुलांसाठीची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

- स्वाती केतकर-पंडित, swati.pandit@expressindia.com

(लोकसत्ता, २४ ऑक्टोबर २०१८ वरून उद्धृत, संपादित व संस्कारित)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.