मुले-पालक यांच्यामधील दुवा - स्टेप अप


_Step_Up_2.jpgमुला-मुलींना शिक्षणापलीकडे घेऊन जाणारा, त्यांना जीवनाची जाणीव करून देणारा आगळावेगळा उपक्रम पुणे महापालिकेच्या एकवीस शाळांत सध्या चालू आहे. त्यापाठीमागे प्रेरणा आहे गौरी वेद यांच्या ‘स्टेप अप’ या ‘एनजीओ’ची आणि त्यांना पाठिंबा आहे महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथजी भिमाले यांचा. शाळांतील या परिवर्तनाचे साधन बनले आहेत विद्यार्थ्यांचे ‘लीडर ग्रूप’. ते गौरी वेद व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडले आहेत. कल्पना अशी, की शाळेतील स्वच्छता, शिस्त, अनुपस्थिती, विद्यार्थी-शिक्षक संवाद अशा सर्व समस्यांवर विद्यार्थ्यांच्या ‘लीडर्स ग्रूप’ने पुढाकार घेऊन कृती करावी अशी अपेक्षा त्या उपक्रमात आहे.

गौरी वेद म्हणाल्या, की “एकवीस शाळांमध्ये जो प्रयोग सुरू झाला त्याचा परिणाम समाधानकारक आहे. विद्यार्थ्यांनी प्रथम स्वच्छतेचे काम हाती घेतले. त्यामधून शाळांचे आवार वर्गखोल्या स्वच्छ झाल्या. ती स्वच्छता टिकावी म्हणून विद्यार्थ्यांनी भिंती रंगवण्याचा खटाटोप केला. त्यातून भिंतींवर सुरेख चित्रकला प्रकटली. विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी हे कला सौंदर्य होते याची प्रचितीही आली. ‘लीडरशिप ग्रूप’च्या उपक्रमाचे पुढे विस्तारत गेलेले हे परिणाम आहेत.”

मुळात ‘लीडर्स ग्रूप’ची कल्पना निर्माण झाली ते मुले-पालक-शिक्षक यांच्यात संवाद असावा-वाढावा यासाठी काम करता येईल या विचारातून. वाढत्या वयातील कुमार मुले-मुली त्या काळात त्यांच्यात होणाऱ्या शारीरिक बदलांनी भांबावून जातात. विकेंद्रित कुटुंबांमुळे आणि पालक दैनंदिन जीवनसंघर्षात अधिकाधिक अडकत चालले असल्याने मुला-मुलींना घरचे मार्गदर्शन जवळजवळ बंद झाले आहे. शाळेत शिक्षकांवरील कामाचा बोजा वाढतच असतो - शिक्षकवर्गही कोणाचे तरी पालक असतातच. अशा परिस्थितीत मुले योग्य मार्गदर्शनापासून वंचित राहतात. त्यांच्या सभोवती ज्या वयात संवादी कमाल वातावरण हवे त्या काळात ती संवादाला पारखी होतात. त्यातून त्यांच्यात विकृती निर्माण होतात. गौरी वेद तर म्हणाल्या, की “दिल्लीतील ‘निर्भया’ हे त्या विकृतीचे टोक होते, पण नंतर ध्यानात असे आले, की ती विकृती समाजात सर्वत्र बोकाळली आहे आणि कुमार वयातील मुले-मुली त्या अस्थिर वातावरणाची बळी ठरत आहेत. त्यामुळे पालक-विद्यार्थी-शिक्षक संवाद फार महत्त्वाचा ठरतो.”

गौरी वेद यांनी त्यांच्या समाजकार्याचे शिक्षण पुण्याच्या ‘भारती विद्यापीठा’तून घेतले. त्यांनी त्यानंतर एचआयव्ही-एड्सबाधित मुलांसाठी काम सुरू केले. त्यातून त्या मुंबईच्या ‘केईएम हॉस्पिटल’मधील त्या रोगाच्या तज्ज्ञ डॉ.गीता भावे यांच्या संपर्कात आल्या. भावे निवृत्त झाल्यावर, त्यांनी ‘संवेदन’ या संस्थेच्या माध्यमातून, मुंबई-पुणे येथे त्याच विषयात रोगोपचाराचे व पुनर्वसनाचे काम चालू ठेवले. गौरी पुण्यात ‘संवेदन’चे काम करू लागल्या. गौरी त्यामधून बरेच शिकल्या. आईबापांच्या वर्तनापासून बाळाचा जन्म, त्याची वाढ व त्याचे संगोपन ते त्याचे शालेय शिक्षण असे सर्व मुद्दे त्या प्रश्नाशी भिडले आहेत याची जाणीव त्यांना झाली. त्यांनी कुमारवयातील मुले-मुली यांच्यावर विशेष लक्ष देऊन, काम करण्यासाठी 2010 साली ‘स्टेपअप’ नावाची संस्था सुरू केली.

_Step_Up_4.jpgतो ट्रस्ट आहे. त्यांनी मुख्यतः मराठी व उर्दू माध्यमातील गरीब वस्तीतील शाळांमध्ये मुलांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. हाच वयोगट का याचे उत्तर देताना गौरी म्हणतात, की “देशातील एकवीस टक्के लोकसंख्या त्या वयोगटातील आहे. त्या वयातील दहा टक्क्यांहून अधिक मुला-मुलींना त्यांचे प्रश्न कोणाशी बोलावे याची माहिती नसते - किंबहुना, तसे नातेवाईक, मित्र वा शिक्षक त्यांना नसतातच. त्यामुळे ती तेवढ्यापुरती पोरकीच असतात. देशातील त्या वयोगटांतील पंचवीस टक्के मुलांना नैराश्य वगैरे सारख्या मानसिक व्याधींनी ग्रासलेले असते आणि वाचकांचा विश्वास बसणार नाही, परंतु त्रेपन्न टक्के मुला-मुलींना लैंगिक छळाला तोंड द्यावे लागते. विकृती तेथे जन्म घेते व त्यामधून ‘निर्भया’ घडतात.”

गौरी सांगतात, “बालपण आणि तरुणपण यांच्यामधील असते ती किशोरावस्था. मुलांना या वयात दाढी-मिशा येणे, स्नायू बळकट होणे, आवाज फुटणे, वीर्यपतन होणे असे बदल शरीरात जाणवू लागतात, तर मुलींची मासिक पाळी सुरू होते, त्यांच्या चेहऱ्यावर फोड (पिंपल्स) येतात, शरीराला गोलाई येते, स्तनांची वाढ होते. त्याबरोबर, मनातील विचार-भावना यांमध्येही बदल होतो. चिडचिड होणे, पटकन रडू येणे, आरशात सतत बघावेसे वाटणे, मित्र-मैत्रिणी घरच्यांपेक्षा जास्त जवळचे वाटणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याबद्दल आकर्षण वाटण्यास लागणे- ते फक्त भिन्नलिंगी व्यक्तींबद्दलच असते असे नाही. बाईक हवीशी वाटते, मोबाईल जवळचा वाटतो. ‘सैराट’मधील आर्ची जेव्हा मोटारसायकलवरून येते आणि ‘मराठी समजत नाही तर इंग्रजीतून सांगू का’ यामधून तो बेधडकपणा व्यक्त होतो. उगाच नाही, तरुण-तरुणींना तो सिनेमा आणि ते हीरो-हीरॉइन इतके जवळचे वाटले!”

गौरी यांचे म्हणणे असे, की “मुला-मुलींच्या अशा अवस्थेत पालक-शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्यांनी मुला-मुलींना बदलत्या जगाची ओळख करून द्यायला हवी आणि त्याचे माध्यम एकच. ते म्हणजे संवाद. पण तोच खुंटला आहे. म्हणून गौरी यांच्या ‘स्टेप अप‘संस्थेचे सतरा कौन्सीलर प्रत्येकी एका शाळेत जाऊन, तेथे संवादी वातावरण प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असतात. त्या कौन्सिलरची ती वर्षभराची जबाबदारी असते. मी कौन्सीलर मुलांशी बोलते, शिक्षकांशी बोलते, वस्तीत जाऊन पालकांच्या बैठका घेते. गौरी सांगतात, की कौन्सिलर्सचा अनुभव चांगला असतो. त्यांना शिक्षक-पालक-मुले यांच्याकडून पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळतो. त्यातून विद्यार्थ्यांचे छोटे-मोठे प्रश्न सुटल्याची उदाहरणे आहेत.

‘स्टेप अप फाउंडेशन’ गेल्या आठ वर्षांत एकशेएकोणचाळीस महापालिका शाळांपर्यंत पोचू शकले. त्यांचे कौन्सिलर सुमारे दहा हजार मुलांशी त्या काळात व्यक्तिगत पातळीवर संपर्क साधू शकले आहेत.

गौरी पुढे म्हणाल्या, की “गेल्या पाच-सहा वर्षांच्या अनुभवातूनच ‘लिडर्स ग्रूप’ची कल्पना निर्माण झाली. कारण शिक्षक-पालक-मुले यांच्यामध्ये संवाद व्हावा-वाढावा यासाठी अनुकूल वातावरण शाळांतून व घरोघरीही तयार असणे महत्त्वाचे आहे. ते मुलेच निर्माण करू शकतात. त्यांना जर अशा कामासाठी प्रवृत्त करायचे, तर त्यांच्यातील विविध गुण हेरले पाहिजेत. त्यांना वाव मिळाला पाहिजे. या नव्या उपक्रमास वर्ष होत आहे. आमची त्याच्या उपयुक्ततेबद्दल खात्री पटली आहे. शाळा व पालक यांचेही सहकार्य मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे महापालिकेच्या शिक्षण खात्यासही तो उपक्रम परिवर्तनाच्या दृष्टीने प्रभावी वाटत आहे. त्यामुळे उपक्रमाची व्याप्ती पुढील वर्षी विस्तारण्याची, त्यासाठी अंदाजपत्रकीय तरतूद होण्याची शक्यता दिसते.

_Step_Up_3.jpg‘स्टेप अप’ला त्यांच्या या कार्याबद्दल यावर्षीच दोन पुरस्कार लाभले आहेत. एक आहे कोल्हापूरच्या ‘मंथन फाउंडेशन’चा व दुसरा मुंबईच्या ‘सुनिर्मल फाउंडेशन’चा.

‘स्टेप अप’चा ‘वुई लीड’ हा वर्षभराचा उपक्रम आहे. तो शाळा शाळांतूनच पसरावा असे त्यांचे प्रयत्न आहेत. त्याचबरोबर त्या संस्थेतर्फे ‘वुई वेक’ नावाचा दहा दिवसांचा प्रशिक्षणक्रम चालतो. खरेतर, ती कार्यशाळाच आहे. कुमारवयातील मुलगे वा किशोरी अवस्थेतील मुली या काळात विचित्र वागतात. त्यांना नैराश्य येते. अशा वेळी मुला-मुलींना सावरत व जीवनात पुनर्स्थापित करण्यासाठी या दहा दिवसांच्या ‘जागे व्हा’ या कार्यक्रमाचा उपयोग होऊ शकतो. तेथे कौन्सेलर आणि मुलगा वा मुलगी यांच्यामध्ये वास्तव नाते निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

‘स्टेप अप’ची मोहीम व तिला मिळणारा सामाजिक प्रतिसाद समाजातील कौटुंबिक अस्थिर वातावरणाची जाणीव करून देतो. समाजात अल्पवयीन मुलामुलींवर अत्याचार होतात वा त्यांच्याकडून गुन्हे होतात तेव्हा समाज हळहळतो-काही वेळा तीव्र संताप व्यक्त करतो, परंतु त्यावर उपाययोजना शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत, त्यांच्याकडे मात्र समाजाचे दुर्लक्ष होते. ‘स्टेप अप’ हा असाच एक प्रयत्न आहे. गौरी या स्वतः तीस-पस्तीस वयोगटातील विवाहित युवती आहेत. त्यांना या सामाजिक प्रश्नाची तीव्रता जाणवली आहे. ती त्यांच्या बोलण्यातून जाणवते. त्यांनी या प्रश्नावरील जागृती वाढावी म्हणून ‘युट्युब’वरदेखील काही कार्यक्रम सादर केले आहेत.

संपर्क - 9823723451/9970358352 gaurisvaid@gmail.com  वेबसाईट- www.stepup-foundation.org
पत्ता- प्लॉट नंबर 54, बी-4, दुसरा मजला, मृत्युंजय अपार्टमेंट, आयडियल कॉलोनी, पुणे 411 029

- नितेश शिंदे, info@thinkmaharashtra.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.