बंड्या साने- पौर्णिमा उपाध्याय – मेळघाटातील लढवय्या दांपत्य


_Bandya_Pournima_2.jpgपौर्णिमा ती थेट मायानगरी, मुंबईतील. तिचे घर मुंबई शेजारच्या डोंबिवलीतील. वडिलांचे वजन-मापे विकण्याचे दुकान. घरी माफक सुबत्ता. तिने लग्न केले मेळघाटच्या बंड्या साने यांच्याशी. पौर्णिमा उपाध्याय आणि बंड्या साने. दोन टोकांवरचे दोन मनस्वी ध्रुव, पण समान ध्येयाने एकत्र आले. मेळघाटातील शोषित-पीडित आदिवासींनीच जणू त्यांना हाक दिली. तिला प्रतिसाद म्हणून ती दोघे एकमेकांच्या साथीने आख्खे आयुष्य पणाला लावून एक झाली. त्यांनी मेळघाटातील आदिवासींना लढण्यास आणि उन्नत होण्यास शिकवले...

ती तशी सुंदर, नाकी-डोळी नीटस. कोणीही सहज भाळून जाईल अशी. अभ्यासात हुशार, आईवडिलांना वाटायचे, ती खूप शिकेल... तो नागपुरातील. अंगापिंडाने धिप्पाड. दिसण्यास जेमतेम. घरी अठराविश्वे दारिद्र्य. बापाने गरिबीला कंटाळून बुट्टीबोरी हे छोटेसे गाव सोडून नागपुरात जरीपटका भागातील नजूल कॉलनीत बस्तान बसवले. तेथे बाप आणि आईसुद्धा काम करायची.

ती आणि तो... पंचवीस वर्षांपूर्वी ती दोघेही मेळघाटातील कुपोषित आडवाटा तुडवण्यासाठी निघून आली. दोघांनी अर्धीअधिक उमर मागे टाकली आहे. दोघेही मेळघाटातील पाड्यापाड्यांवर जाऊन थकल्याभागल्या आदिवासींची दुःखे वाटून घेत आहेत. त्यांच्या तेथे असण्याने मेळघाटाचे दुःख संपले असे नाही. मात्र, आदिवासींच्या डोळ्यांतील अश्रू पुसणारे दोघांचे चार हात त्या जंगलात अव्याहतपणे राबत आहेत.
पौर्णिमा उपाध्याय हिला मेळघाटात दीदी म्हणून ओळखतात, दिदीचा जन्म मुंबईतील, 1973 सालातील. वडील लखनौचे. ते लखनौच्या जेलमध्ये कारागृह खात्यात नोकरी करायचे. पण त्यांना नोकरी सोडावी लागली. त्यांनी मुंबईत येऊन वजन-मापांचे दुकान सुरू केले.

पौर्णिमा बारावी पास होता होता, तिच्या वडिलांना कॅन्सर डिटेक्ट होऊन ते कुटुंबाला सोडून देवाघरी गेले. वडिलांचे निधन झाल्यामुळे वजनमापे दुकानाचे लायसन्स रद्द झाले. पण तिने लढा दिला. लायसन्स रद्द नव्हे, तर ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. तेवढेच नव्हे भावाला आणखी एक नवीन लायसन्स मिळवून दिले आणि घरगाडा रुळावर आला.

तिने शिकता शिकता, थेट ‘निर्मला निकेतन’चे समाजकार्य महाविद्यालय गाठले. तेथून बीएसडब्ल्यूची डिग्री घेतली. तिच्या चकरा बाबा आमटे, प्रकाश आमटे, अभय बंग, मेंढा लेखा, मेळघाटात रवींद्र कोल्हे, निरुपमा देशपांडे यांच्याकडे सुरू झाल्या. पण समाजकार्याला खरी गती आली, ती मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलनापासून. तिने रंजल्यां-गांजल्यांसाठी काम करण्याचे पक्के ठरवले आणि तिने गाडी धरली ती सरळ मेळघाटात उतरण्यासाठी...

_Bandya_Pournima_1.jpgबंड्या साने...मूळ नाव बंडू संपतराव साने. मेळघाटाच्या जंगलात लोक त्याला बंड्या म्हणूनच ओळखतात. सगळे जग त्याला एकेरी नावाने हाका मारते याचे त्याला कधीच वाईट वाटत नाही, उलट, चुकून कधी कोणी त्याला बंडू म्हटले तर तो पटकन त्याला रिप्लाय देतो “अरे, बंडू काय बंड्याच म्हन ना..!” बंड्या नागपूरचा. त्याला सहा भावंडे. त्याचा बाप वस्तीत वॉचमन म्हणून काम करायचा, आई घरी राहून बांबूच्या दुरड्या, टोपल्या, सुपल्या असले बरेच काही बनवायची. बंड्याही शाळेत जायचा. थोडा मोठा झाल्यावर तो वस्तीतील पोरांची ट्यूशन घेऊ लागला. सगळे एकाच वयाचे. तेथे त्याला कोणी ‘सर’ म्हणायचे नाही. सगळे बंड्याच म्हणायचे. त्यालाही ते चालायचे. दरम्यान, बंडू साने याची चांगल्या मार्काने बी एस्सी पूर्ण झाली. त्याच कालावधीत त्याचा अनुभव शिक्षण मिशनशी संपर्क आला. त्या संस्थेतून 1991 मध्ये त्याचे मेळघाटला जाणे झाले. मेळघाटातील भीषण परिस्थिती त्याच्या मनात जोराचे हेलकावे देऊ लागली. त्याला वाटे, त्यानेही गरिबीत दिवस काढले, पण ही अशी गरिबी... जेथे लोकांना खायलाच मिळू नये आणि त्यातच तडफडून मृत्यू व्हावा! ती आकांताची गोष्ट, त्याला अस्वस्थ करू लागली आणि तो माणूस डोक्याला उपरणे गुंडाळून मेळघाटातील कोरकूंचे दुःख उपसण्यासाठी जंगलात हरवून गेला, तो आजपर्यंत...!

बंड्या आणि पौर्णिमा या दोघांनी ‘खोज’ ही संस्था स्थापन करून मेळघाटात काम सुरू ठेवले आहे. दोघांची एकमेकांशी ओळख झाली ती ‘अनुभव शिक्षण मिशन’मधून. अगदी, सुरुवातीला बंड्या, पौर्णिमा, प्रशांत, अरुणा आणि जयश्री असे पाच जण तयार झाले होते. पुढे प्रशांत,अरुणा आणि जयश्री हे त्यांच्या त्यांच्या मार्गाने निघून गेले, पण आदिवासींच्या प्रश्नांनी बंड्या आणि पौर्णिमा यांना काही घरी परतू दिले नाही...

_Bandya_Pournima_3.jpgबंड्या-पौर्णिमा सांगत होते, की पूर्वी वन खात्याचे अनन्वित अत्याचार होत. वन खात्याच्या स्वतःच्या कस्टडी होत्या. त्यात वन खात्याचे अधिकारी आदिवासींना डांबत. एकदा, जंगलात असलेल्या रायपूर नावाच्या कस्टडीत एका आदिवासीचा मृत्यू झाला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ती आत्महत्या भासवण्यासाठी त्याला खोटेखोटे फासावर लटकावले. बंड्या आणि पौर्णिमा या दोघांना त्यात संशय आला. त्यांनी सगळे प्रकरण न्यायालयासमोर मांडून ती आत्महत्या नव्हे, तर खून आहे हे सिद्ध केले. न्यायालयाने त्या वेळचे वन अधिकारी आणि कर्मचारी यांना शिक्षा ठोठावली. महत्त्वाचे म्हणजे, न्यायालयाने वन विभागाच्या कस्टडी बंद करून टाकल्या! आता वन विभागाला कोणाला ताब्यात घ्यायचे झाले, तर पोलिसांना कळवावे लागते आणि कस्टडीसाठी पोलिसांच्या ताब्यात द्यावे लागते. हे घडले पौर्णिमा आणि बंड्या यांच्यामुळे. वन विभागाच्या अत्याचाराची परिसीमा म्हणजे, घाणा गावातील घटना होय. त्या गावात काही गरीब आदिवासींनी वन विभागाच्या जमिनीवर पेरणी केली होती. वन विभागाने शेतकऱ्यांच्या जमिनीवर हत्ती घालून पीक तुडवण्याची ऑर्डर काढली. ती बातमी पौर्णिमा आणि बंड्या यांना कळली, त्यांनी थेट नागपूरचे हायकोर्ट गाठले. शनिवार-रविवार सुटी, त्यामुळे कोर्ट बंद होते. पण त्या दोघांनी रविवारी भल्या सकाळी न्यायाधीशांचे दरवाजे ठोठावले. त्यांना परिस्थिती सांगितली. सुटीच्या दिवशी न्यायाधीशांनी घरातून त्या कारवाईला स्थगिती दिली, तसा फोन त्यांनी कलेक्टरला केला. घाणा गावाच्या शिवारात आलेला हत्ती वन विभागाला त्याच्या मुसक्या आवळून परत न्यावा लागला! बिथरलेल्या प्रशासनाने त्यांना नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न केला. तशी कायदेशीर तयारीही झाली, तरीही बंड्या-पौर्णिमा शांत राहिले. पण प्रशासनाला लाख प्रयत्न करूनसुद्धा त्यांच्याविरूद्ध पुरावे सापडले नाहीत. परिणामी, प्रशासनाला शेवटी तो प्रयत्न सोडून द्यावा लागला.

पुढे बंड्याने मेळघाटात अनेक आंदोलने केली, कुपोषणाची आकडेवारी सरकारसमोर मांडली. एकदा त्याने अमरावतीच्या कलेक्टर ऑफिसवर आंदोलन सुरू केले. त्याची मागणी कलेक्टरने समोर येऊन निवेदन घ्यावे, कुपोषणाचा मुद्दा गंभीर आहे, थोडे सिरिअस व्हावे, पण कलेक्टर बंड्याकडे दुर्लक्ष करून धरण पाहण्यास गेले तेव्हा बंड्या साने संतापला. तो त्याच्या शेकडो समर्थकांसह त्या वेळच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या अमरावतीतील घराकडे धावत सुटला. प्रशासनाची भंबेरी उडाली. पाहता-पाहता बंड्याने प्रतिभा पाटील यांचे घर घेरून टाकले. बातमी दिल्लीत धडकली आणि धरण पाहण्यास गेलेल्या कलेक्टरला गुमान माघारी फिरावे लागले. प्रतिभा पाटील यांच्या घरासमोर येऊन कलेक्टरला सन्मानाने निवेदन स्वीकारावे लागले. बंड्या सतत आंदोलने करत गेला आहे. पौर्णिमा कायम कोर्टाच्या केसेस लढवत आल्या आहेत. त्यांचा लढा त्यांचा लढा चालला आहे मेळघाटाच्या माणसांसाठी. त्यांचे परतवाड्यातील घर कागदांनी भरून गेले आहे. तेथे माणसांना राहण्यास जागा नाही, इतकी जागा कागदांनी व्यापली आहे. बंड्या आणि पौर्णिमा यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे मेळघाटात रस्ते आले, वीज आली, शाळा आल्या, अंगणवाडी सुरू झाल्या, बससुद्धा नियमित सुरू झाली. वाममार्ग सरकारी अधिकाऱ्यांच्या कधी डोक्यात आलाच, तर त्यांना प्रथम पौर्णिमा-बंड्या यांची आठवण होते, इतका धाक निर्माण केला आहे या दोघांनी तिकडे!

_Bandya_Pournima_4.jpgआदिवासींसाठी समरसून काम करणारी ती माणसे एकमेकांच्या प्रेमात कधी पडली असतील? लग्न कसे केले असेल? त्यावर त्या दोघांचे एकच उत्तर आले, सरळ साधे..! “आदिवासींसाठी काम पुढे चालूच ठेवायचे असेल तर आपण लग्न केले पाहिजे आणि अगदी असे सरळ सरळ ठरवून आम्ही लग्न केले आणि उभ्या आयुष्याचा संसार झाडामाडांच्या साक्षीने आदिवासींच्या दारातच केला.”

पौर्णिमा-बंड्या यांच्या संसारालाही सतरा-अठरा वर्षें होत आली आहेत, त्यांच्या संसारवेलीवर एक सुंदर कळीही उमलली आहे. तिला सोबत घेऊन त्यांचा कुपोषणमुक्तीचा आणि आदिवासी सेवेचा यज्ञ सुरू आहे. त्यांच्या ‘खोज’ संस्थेची दुमजली इमारत परतवाडा या शहरापासून मेळघाटच्या दिशेने काही अंतरावर आहे. त्या इमारतीला भल्या पहाटे जाग येते. झुंजूमंजू होण्याच्या आत गाड्या सुरू होतात आणि बंड्या- पौर्णिमा मेळघाटच्या दिशेने निघून जातात. नवे आव्हान पेलण्यासाठी...

बंड्या/ पौर्णिमा साने
केअर ऑफ – ‘खोज’, मु. पो. गौरखेडा (कुंभी), तालुका अचलापूर, जिल्हा अमरावती
9890359154, 7224227292, khojmelghat@gmail.com

- दत्ता कनवटे, dattakanwate@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.