वाराणशीचे वझे होते कोण?


_Varanashiche_Vaze_1.jpgवाराणशी म्हणजे भारताची धार्मिक राजधानी. वाराणशी नगरी जुन्या काळापासून आहे; तर ती होती कशी आणि आज कशी आहे? त्यातून महाराष्ट्रापासून ती इतकी दूर, तेव्हा काशी व मराठी लोक यांचा संबंध कधीपासून होता व कोणत्या स्वरूपात होता या उत्सुकतांचे समाधान करणारे पुस्तक सुमारे पंच्याहत्तर वर्षांपूर्वी पुण्यात प्रकाशित झाले होते. त्याचे नाव ‘माझा चित्रपट व काशीचा संपूर्ण इतिहास’, लेखक- पं.भाऊशास्त्री वझे, ब्रह्मघाट, काशी.

पुस्तकाच्या नावाने कुतूहल निर्माण होते, की एखाद्या शहराचा इतिहास व लेखकाची स्वतःची हकिगत एकत्र का छापली जावी? आणि छापली गेली तरी वाचकांनी ती का वाचावी? त्याचे स्पष्टीकरण पुस्तकाच्या लेखकाने प्रस्तावनेत दिले आहे. “ज्या श्रीक्षेत्र काशीच्या कुशीत माझ्या तीन पिढ्यांचे संगोपन झाले व ज्या काशीत मी जन्मलो, वाढलो व शिकलो आणि जगात नावारूपाला आलो त्या काशीचा इतिहास लिहून जर तो माझ्या चरित्राला जोडला नाही तर माझे चरित्र सजीव व पूर्ण कसे होणार? असे वाटून मी काशीचा इतिहास लिहिण्याचे ठरवले.”

पण हे भाऊशास्त्री वझे होते कोण? वाराणशी हे भारतीय हिंदू माणसांच्या कल्पनाविश्वात जीवनयात्रेचे अंतिम ठिकाण समजले जाई. तो काळ जवळजवळ दोनशे वर्षांपूर्वीचा. त्या काळात 1845 साली भाऊशास्त्री वझे यांचे आजोबा; पेशवे काळातील श्रीमंत परशुरामपंत प्रतिनिधी यांच्या धाकट्या पत्नी रमाबाई या त्यांच्या पतीशी न पटल्यामुळे महिना दोनशे रुपये एवढे घेऊन काशीस राहण्यास गेल्या होत्या, त्यांच्याबरोबर वाराणशीत दाखल झाले (पृष्ठ 1). वझे कुटुंब वाराणशीत 1845 पासून गेले आणि पुस्तक प्रकाशित 1940 साली झाले. तेव्हा भाऊशास्त्री यांचा मुलगा हाही वाराणशीत प्रवचने करत होता. म्हणजे लेखकाच्या तोपर्यंत चार पिढ्या वाराणशीत गेल्या आहेत. भाऊशास्त्री यांनी महाराष्ट्रीय लोकांचे वाराणशीत काम केवढे मोठे होते त्याचे तपशील दिले आहेत, त्यामुळे अचंबित व्हायला होते. मराठी मंडळींनी काशीतील पहिले उत्तम नाट्यगृह विश्वेश्वर थिएटर बांधण्यासाठी पुढाकार घेतला. कृष्णाजी आबाजी गुरुजी यांनी काशीत कालिदास नावाचे राष्ट्रीय बाण्याचे पत्र काढले. त्यातील एका लेखामुळे - काळे व गोरे - त्यांच्यावर खटला झाला. तो लढवण्यासाठी लोकमान्य टिळक यांनी दादासाहेब करंदीकर यांना पाठवले. अहिल्याबाई होळकर यांनी 1777 मध्ये विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यावेळेस संस्कृत भाषेत लिहिलेला शिलालेख भाऊशास्त्री यांनी पुस्तकात उद्धृत केला आहे.

भाऊशास्त्री यांनी वाराणशीचा इतिहास तेवीस प्रकरणांत दिला आहे. त्यात पहिल्या दोन-तीन प्रकरणांत पुराणवाङ्मयातील काशी, बौद्ध काळातील काशी, काशीचे भौगोलिक स्थान, मुसलमानकालीन काशी अशी विभागणी केली आहे. त्यात नवल वाटावे अशी काही विधाने येतात :

  • हनुमान घाट व केदार घाट यांच्यामध्ये जे स्मशान आहे तेच जुने स्मशान अशी समजूत आहे, पण ती चुकीची आहे. संपूर्ण काशीलाच स्मशान हे नाव आहे.
  • राजा तोरडमल्ल याने अकबराची परवानगी घेऊन उध्वस्त झालेले विश्वेश्वराचे मंदिर 1585 मध्ये बांधले. मंदिर बांधण्यासाठी लागणारा पैसा सरकारी खजिन्यातून द्यावा हा अकबराचा हुकुमनामा उपलब्ध आहे (Indian Antiquery, January 1912). मंदिरास एकंदर खर्च पंचेचाळीस हजार दिनार आला.
  • रणजितसिंहाने विश्वेश्वराच्या कळसावर सोने 1839 मध्ये चढवले (हा रणजितसिंह इंग्रजांचा जानी दोस्त होता).

_Varanashiche_Vaze_2.jpgवाराणशी शहर पूर्णपणे इंग्रजांच्या ताब्यात 1794 पासून गेले. कोलकात्याचा बिशप रेजिनल हेबेरडीडी याने कोलकाता ते मुंबई प्रवास केला (1825). त्याच्या पत्नीने त्याचे प्रवासवृत्त त्याच्या मृत्युपश्चात, 1826 मध्ये प्रकाशित केले. भाऊशास्त्रींनी त्यांतील काही भाग (सहा पाने एवढा मजकूर) वाराणशीसंबंधातील म्हणून उद्धृत केला आहे आणि धर्मोपदेशाचे काम करणारे मिशनरी किती बारकाईने निरीक्षण करत असत त्याबद्दल कौतुकाचा सूर लावला आहे.

“माझ्या लहानपणी एक स्थानिक ‘महाराष्ट्रीय नाटक मंडळी’ होती. कंपनीतील लोक दिवसा आचाऱ्याचे काम करत, प्रेते उचलत व रात्री नाटक करत” (पृष्ठ 13).

वाराणशीचा ब्रिटिश काळातील इतिहास सांगताना राजा चेतनसिंह व वॉरन हेस्टिंग्ज यांची लढाई झाली त्याचा उल्लेख केला आहे. तसेच, मुस्लिम काळात (अकबराच्या काळात) राजा मानसिंग याने मान मंदिर (वेधशाळा) बांधली याचा उल्लेख येतो. या दोन्ही विधानांना साके दीन महोमेत या, इंग्रजीत पुस्तक लिहिणाऱ्या पहिल्या भारतीय माणसाच्या पुस्तकात (प्रकाशन 1794, आयर्लंड) दुजोरा मिळतो. त्यामुळे भाऊशास्त्री यांनी इतिहास लिहिताना आवश्यक ती मेहनत घेतली होती हे जाणवते आणि ते स्वाभाविक आहे.

इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, भाऊशास्त्री त्यांच्या वडिलांचा व्यवसाय पुढे करावा या हेतूने नित्यानंद पंडित पर्वतीय व लक्ष्मणशास्त्री द्रवीड यांच्याकडे न्याय, पूर्वमीमांसा, सांख्ययोग, कल्पतरू वगैरे शिकले. त्यांनी प्रवचनांतून केवळ पुराणकथा न सांगता, वेदांत विषय प्रवचनरूपाने मांडण्याची पद्धत स्वीकारली. त्यांची प्रवचने त्या पद्धतीमुळे बुद्धिवंतांतही लोकप्रिय झाली असे ते सांगतात.

“पुण्याच्या धर्तीवर आंग्रे यांच्या वाड्यात गणेशोत्सव सुरू झाला. सावळेरामबुवा सरनाईक हे पुण्याकडून येऊन त्यांनी ब्रह्मघाटी शिवगोविंदधाम नावाचे रामाचे देऊळ बांधले होते. त्याच देवळात मी पुष्कळ दिवस पुराण सांगत असे. त्या वेळेस लोकमान्य टिळक तेथेच उतरले होते. त्यांनी पुराण ऐकून मला शाबासकी दिल्याचे अजून आठवते.” (पृष्ठ १५- माझा चित्रपट). त्यावेळी टिळकांनी शाबासकी दिली ते कदाचित भाऊसाहेबांच्या वयाकडे बघून असे वाटण्याचा संभव आहे. त्यांची लोकमान्यांशी गाठ पुन्हा, 1915 साली (भाऊशास्त्रींचे वय सत्तावीस) पुण्यात गायकवाड वाड्यात पडली. गीतारहस्यासंबंधी बोलणे निघाल्यावर भाऊशास्त्री यांनी विचारले, “ज्ञान झाल्यानंतरही ज्ञानी पुरुषाला कर्म करण्याची आज्ञा गीतादेवी करते. आज्ञा या शब्दाचा अर्थ असा होतो, की तिचे पालन केले असता फळ मिळते; व मोडली तर दंड होतो. ज्ञानी पुरुषांनी गीतेची आज्ञा मोडून कर्म केले नाही तर त्यांना मोक्ष मिळणार नाही असे आपले मत आहे काय?”

टिळकांनी उत्तर दिले : “आज्ञा नाही, विनंती म्हणा.”

भाऊशास्त्री : विनंती शंकराचार्यांना मान्य आहे. संन्यासमार्गी म्हणून शंकराचार्यांवर प्रच्छन्न टीका का केली?

टिळक :  वल्लभ, रामानुज, माध्व यांच्याप्रमाणेच मीही देशकालाला अनुसरून हा ग्रंथ लिहिला. यथार्थ तत्त्वज्ञान न होता आभासाने स्वतःला तत्त्वज्ञानी समजून निष्क्रिय झालेल्यांसाठी तो ग्रंथ आहे” (चित्रपट – 37).

_Varanashiche_Vaze_3.jpgभाऊशास्त्री यांनी पुणे, नागपूर, केडगाव येथे खूप प्रवचने केली. ते नारायण महाराज केडगावकर यांच्या आश्रमात 1916-1924 या काळात राहिले होते. केडगावकर महाराज यांचे चमत्कार व त्यांच्याबद्दलचे प्रवाद अनेकांनी ऐकले असतील. (आचार्य अत्रे यांचे ‘बुवा तेथे बाया’ हे केडगावकर महाराजांच्या कथित गैरकृत्यांवर आधारित होते असे अभ्यासक मानतात). मात्र भाऊशास्त्री आवर्जून सांगतात, की त्यांना त्या काळात कोठलेही चमत्कार दिसले नाहीत वा गैरकृत्यांची शंका आली नाही. ते महाराजांबरोबर 1916 मध्ये नेपाळला गेले. तेथे नियम होता, की नेमलेल्या ब्राह्मण पुजाऱ्यांखेरीज पशुपतिनाथाची पूजा कोणी करायची नाही, तो महाराजांनी पाळला.

भाऊशास्त्री यांना 1/3/1929 रोजी महामहोपाध्याय ही पदवी मिळाली. त्यांनी ती सात महिन्यांनंतर सोडली. शारदा बिल संमत झाले त्याच्या निषेधार्थ ती सोडण्याचा विचार पदवीदान समारंभाच्या वेळीच त्यांच्या मनात आला होता असे ते सांगतात.

भाऊशास्त्री कट्टर सनातनी होते. त्यामुळे त्यांचा विरोध अस्पृश्यतानिवारणाला होता. त्यांनी नागपुरात शारदा अॅक्टविरुद्ध चळवळ सुरू केली. हँडबिले काढली. लोकांच्या घरोघरी जाऊन व प्रवचनात सह्या घेतल्या. ते लष्करी शिक्षणाची आवड म्हणून 1930 साली मुंजे यांनी काढलेल्या ‘रायफल क्लब’मध्ये दाखल झाले. त्यांनी 1931 ते 1933 अशी तीन वर्षें शास्त्रोक्त पद्धतीने लक्ष्यवेध, शिकार व थोडे युद्धशास्त्र यांचे पद्धतशीर शिक्षण घेतले.

काँग्रेसने त्या पक्षाच्या कार्यक्रमातून अस्पृश्यतानिवारण वगळावे व फक्त राजकीय कार्यक्रम करावे या त्यांच्या मताच्या समर्थनार्थ ते दोन-तीनशे लोक घेऊन लाहोरला 1929 च्या डिसेंबरमध्ये गेले. तेथे त्यांना काँग्रेसच्या विरोधाला तोंड द्यावे लागले. “आम्ही घोड्यावरून जाणाऱ्या पंडित नेहरूंना काळी निशाणे दाखवली. तेव्हा नेहरू चिडले. त्यांच्या भक्तगणांनी आमच्या स्वयंसेवकांना तुडवले, निशाणे फाडून टाकली” (पृष्ठ 66).

त्यांचे Brihadkarny Varanasikar या नावाचे पुस्तक अच्युत ग्रंथमाला कार्यालय (काशी) यांनी 1917 साली प्रकाशित केले आहे. शंकराचार्यांचा काळ इसवी सन 788 ते 820 असा मानला जातो. त्याबाबत चर्चा करणाऱ्यांमध्ये लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती तेलंग, राजगोपाल शर्मा यांच्या बरोबरीने भाऊशास्त्री यांचा उल्लेख आहे (The debate of Shankaracharya – W.R. Antarkar, asiaticsociety.org.in).

(‘माझा चित्रपट व काशीचा संपूर्ण इतिहास’ हे पुस्तक इंटरनेट अर्काइव्हवर उपलब्ध आहे.)

- मुकुंद वझे, vazemukund@yahoo.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.