डॉ. प्रेमेन्द्र बोथरा - जंगल वसवणारा अवलिया


_Premen_Bothara_1.jpgकाही माणसे छंद म्हणून झाडे लावतात. काही बागा फुलवतात. हिंगोलीचे डॉ. प्रेमेन्द्र बोथरा यांनी जंगल वसवले आहे! डॉक्टर म्हणाले, ‘‘आमच्या गावात एक डोंगर आहे. तो उघडाबोडका काही वर्षांपूर्वीपर्यंत होता. आम्ही त्यावर झाडे लावून तेथे जंगल निर्माण केले.’’ तो डोंगर चौऱ्याऐंशी एकर पसरलेला आहे! डॉक्टर कळमनुरी तालुक्यातील पोतरा गावचे. त्यांनी लातूरला डॉक्टरकीचे शिक्षण घेतले. ते 1991 साली गावी परतले. त्यांनी हिंगोलीमध्ये प्रॅक्टिस करण्याचे ठरवले. दहा वर्षें स्थिरस्थावर होण्यात गेली. डॉक्टर घरच्या शेतीकडेही लक्ष देत. डॉक्टर म्हणाले, “आमच्या गावच्या डोंगराजवळ महादेवाचे मंदिर आहे. त्या शेजारचा डोंगर रूक्ष वाळवंटासारखा होता. त्यावर एकही झाड नव्हते. माझ्या मनात त्या डोंगरावर देवराई निर्माण करावी अशी कल्पना येई. लोक देवाच्या धाकाने देवराईच्या वाटेला जात नाहीत. त्यामुळे तसे जंगल जर देवाच्या सान्निध्यात असेल, तर त्याचे रक्षण होऊ शकेल असा माझा विचार होता.

“मी तसे प्रयत्न करण्याचे ठरवले. मी झाडांच्या बिया गोळा करू लागलो. त्यांचे सिडबॉल तयार केले. ती कल्पना गावातील मंडळींना सांगितली. तेदेखील सोबत आले. गावच्या शाळेतील पाचवी ते सातवी इयत्तांतील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांची साथ मिळाली. मी जवळपास दहा लाख बिया गोळा केल्या. आम्ही सिडबॉल तयार करून त्या डोंगरावर 2003 ते 2006 अशी तीन वर्षें सातत्याने टाकत-पेरत राहिलो. एकेका विद्यार्थ्याने हजारो बिया पेरल्या. निसर्ग त्याचे काम करत राहिला. बिया रूजल्या. कोंब फुटले आणि झाडे उगवली! त्या भकास डोंगरावर घनदाट जंगल उभे आहे!’’

डॉक्टर आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रयत्नांतून पोतरा गावाचा डोंगर हिरवागार झाला आहे. त्यावर लाखो झाडे उगवली आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्या डोंगरावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीवर थेट पडून वाहून जात असे, ते त्या झाडांमुळे जमिनीत मुरू लागले. पोतरा गावाच्या पाण्याची पातळी गेल्या काही वर्षांत लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. गावाला पूर्वीप्रमाणे पाण्याची अडचण भासत नाही. विहिरींना पाणी मुबलक आहे. डॉक्टर त्या जंगलाबद्दल अभिमानाने म्हणतात, की “ते महाराष्ट्रातील सर्वात मोठे ‘मॅन मेड’ जंगल आहे.’’ पोतरा गावचे जंगल मोठे, घनदाट झाले. तेथे वृक्ष आणि वनस्पती यांच्या नवनव्या जाती आढळू लागल्या. नवनवे पक्षी राहण्यास येऊ लागले. डॉक्टरांनी केलेल्या पाहणीनुसार त्या जंगलात पंचेचाळीस प्रकारच्या पक्ष्यांचा अधिवास निर्माण झाला आहे. डॉक्टरांचा निसर्गाशी असलेला बंध त्यांच्या प्रत्येक कामातून जाणवतो. ज्याप्रमाणे जंगलाचे इकोसिस्टिमचे जाळे असते तसे विविध धडपडीचे जाळे डॉक्टरांच्या कामातून जाणवते. डॉक्टरांनी त्यांच्या मालकीच्या आठ-दहा एकर जमिनीतील एक तुकडादेखील जंगलासारखा वाढू दिला आहे. त्यावरील निसर्ग मनमर्जीने पसरला आहे. तेथेदेखील विविध पक्ष्यांचा अधिवास आहे.

_Premen_Bothara_2.jpgडॉक्टरांचा झाडांप्रमाणे पक्ष्यांशीदेखील ‘कनेक्ट’ आहे. ते पक्षीनिरीक्षण करतात. त्यांनी फोटोग्राफीचा छंद जोपासला आहे. त्यांच्याकडे हिंगोली परिसरातील आणि तेथे येणारे स्थलांतरित अशा सर्व पक्ष्यांचे तब्बल साडेतीन हजार फोटो आहेत. डॉक्टर फुलपाखरांची बाग वसवण्यासाठी धडपडत आहेत. ते म्हणतात, ‘‘शासनाच्या या संबंधात सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये परदेशी झाडांचा वापर केला जातो. मात्र त्यासाठी देशी झाडे हवीत. फक्त तीस रूपयांत कारळाच्या चिक्कार बिया येतात. त्या नुसत्या जमिनीवर फेकल्या तरी लाखभर झाडे उवगतात. त्या झाडांवर फुलपाखरे मोठ्या प्रमाणात येतात.’’

डॉक्टरांशी बोलताना आपण होमियोपथी डॉक्टरऐवजी वनस्पतीशास्त्राच्या प्राध्यापकासोबत बोलत असल्याचा भास होतो. त्यांना झाडा-वेलींची, शेतीची, पक्ष्यांची बक्कळ माहिती आहे. त्यांच्या जिभेवर त्या झाडापक्ष्यांची शास्त्रीय नावे हजर असतात. डॉक्टरांनी जंगलासाठी बिया गोळा करताना परिसरात आढळणाऱ्या पिवळा-लाल बहावा, भुईरिंगणी, रानतुळस, खैर, निलपुष्पी, चित्रक, पानतीळ, सफेद मुसळी, कडुनिंब अशा झाडांच्या बिया वेचण्याचे भान राखले. डॉक्टरांनी वीस वर्षें हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक प्रदेशाचे निसर्गाच्या अनुषंगाने अवलोकन केले आहे. त्यांच्याकडे त्याबद्दलचे शास्त्रीय डॉक्युमेण्टेशन उपलब्ध आहे.

डॉक्टर शेती प्रयोगशील पद्धतीने करतात. त्यांनी त्यांच्या शेतात पिकांना विद्राव्य खते देण्यासाठी छोटे आणि परिणामकारक यंत्र निव्वळ शंभर रुपयांत तयार केले आहे. एकटा माणूस हाताळू शकेल अशा त्या यंत्राद्वारे खतफवारणीचा खर्च सहा पटींनी कमी तर होतोच; सोबत बेफाम खत टाकल्यामुळे जमिनीवर होणारे दुष्परिणामदेखील आटोक्यात येतात असे डॉक्टर सांगतात. ते यंत्र सर्वसामान्य माणूस, शेती - तिचा कस आणि उत्पादन यांविषयीच्या त्यांच्या विचारमंथनाचा प्रॉडक्ट आहे असे ते म्हणतात.

_Premen_Bothara_3.jpgडॉक्टर म्हणतात, ‘‘मला असा वेगळा विचार करण्याचा किंवा निसर्गाशी जोडून राहण्याचा वारसा माझ्या वडिलांकडून मिळाला. ते स्वत: प्रयोगशील शेतकरी होते. त्यांनी त्यांच्या काळात गव्हाचे उत्पन्न एका एकरात पस्तीस क्विंटल घेतले होते! तो विक्रम होता.’’

डॉक्टर बोथरा यांनी इको क्लबची सुरूवात केली आहे. ते हिंगोली शहरातील एका शाळेच्या दोनशे विद्यार्थ्यांना घेऊन बसने पोतरा गावातील शेतात जात असत. तेथे दिवसभर निसर्गाचा अभ्यासवर्ग आणि कार्यशाळा चाले. ते विद्यार्थ्यांना तेथे शेती, पक्षीनिरीक्षण, सीडबॉल तयार करण्याचे प्रशिक्षण, वनस्पती-झाडे यांची माहिती अशा बऱ्याच गोष्टी उपलब्ध करून देत. शाळा मुलांच्या प्रवासाची जबाबदारी घेई, तर डॉक्टर स्वत: त्यांची न्याहारी, जेवण आणि परतताना खास ‘हॅण्डमेड आईसक्रीम’ असा खर्च करत. ती मुले माघारी आल्यानंतर त्यांचे अनुभव लिहून सादर करत. डॉक्टर त्यांतील सर्वोत्तम पाच अनुभव निवडून त्या मुलांचा शाळेत जाऊन सत्कार करत असत. त्यांचा तो उपक्रम 2010 ते 2012 असा तीन वर्षें चालला. डॉक्टर बोथरा बहुगुणी आणि बहुप्रयत्नी आहेत. ते पक्षी-वनस्पती यांच्याबद्दल विविध जिल्ह्यांमध्ये व्याख्याने देतात. त्यांचे अक्षर सुबक आणि देखणे आहे. ते चांगले कवीदेखील आहेत. त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांत हजारो कविता लिहिल्या आहेत. डॉक्टर त्यांच्या चार कवितांना परदेशातून चार लाख रुपयांचा पुरस्कार अवचितपणे मिळाल्याची कहाणी खुलवून सांगतात. डॉक्टरांना त्यांच्या कामाचा अभिमान जरूर वाटतो, मात्र ते त्या भावनेत अडकून पडलेले नाहीत. ते निसर्गाच्या नवनव्या वाटा शोधत सतत पुढे जात आहेत.

डॉ. प्रेमेन्द्र बोथरा 9422178321, botharapremen15@gmail.com

- किरण क्षीरसागर, kiran2kshirsagar@gmail.com 

लेखी अभिप्राय

Great.really inspiring.

Nileshkumar Popade18/11/2018

डॉ . साहेब तुम्हाला शतशः प्रणाम. तुमच्या सारख्या काम करणाऱ्या स्वयंसेवी लोकांनी येणाऱ्या पिढीला मोठा संदेश मिळाला आहे. Wishing you all the best.

Pranita01/12/2018

Thanks to both of you
To Dr . For creating such beautiful world for tree's & Bird s& Thanks to writer for shairing such inspiring story with us

Sarika02/12/2018

khup sundar , malaa bhet dyaayalaa nakki aavadel , jaagaa sarakari pan gaayraan aahekaa , tyaakaritaa shasanaachi parvaanagi laagte kaa?

mahesh kulkarni21/12/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.