शिक्षणपद्धत ही जीवनदृष्टी – नयी तालीम


_Nai_Talim_1.png‘नयी तालीम’ हे सर्वोदयी व अहिंसक समाजनिर्मितीसाठी साधन आहे अशी महात्मा गांधी यांची भूमिका होती. गांधी यांनी ती पद्धत प्रथम दक्षिण आफ्रिकेत असताना तेथील आश्रमातील मुलांच्या शिक्षणासाठी वापरली. त्यातून त्यांचे चिंतन विकसित झाले. काँग्रेस प्रांतिक सरकारे भारतात 1937 साली स्थापन झाली. तेव्हा गांधी यांनी बुनियादी शिक्षणाची सविस्तर मांडणी वर्धा येथील शिक्षण संमेलनात केली. विदेशात उच्च पदवी घेतलेले व रविंद्रनाथ टागोर यांच्यासोबत काम केलेले आर्यनायकम पतिपत्नी यांनी शाळेची जबाबदारी घेतली. त्यानुसार वर्धा येथे आणि भारतात बिहार, ओरिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, काश्मीर या राज्यांत शाळा सुरू झाल्या. ‘नयी तालीम’ पद्धतीच्या शाळा 1956 साली एकोणतीस राज्यांत अठ्ठेचाळीस हजार होत्या आणि त्यात पन्नास लाख मुले शिकत होती. गांधी यांच्या शिक्षणविचाराचा प्रसार इतक्या मोठ्या प्रमाणावर झाला होता. शासनाने मात्र, गांधी यांची ती शिक्षणपद्धत स्वीकारली नाही. शासनाने तो शिक्षणविचार सोडून दिला. त्यामुळे शाळा बंद पडत गेल्या. भारतात केवळ त्या प्रकारच्या पाचशे शाळा सुरू आहेत.

गांधी यांनी ‘नयी तालीम’ची प्रमुख चार तत्त्वे मांडली. 1. प्राथमिक शिक्षण हे सात ते चौदा वयोगटाचे असेल, 2. शिकवण्यासाठी निवडलेला हस्तोद्योग हा परिसरातील लोकांच्या मुख्य व्यवसायातील असावा, 3. सर्व विषयांचे शिक्षण निवडलेल्या हस्तोद्योगाशी अनुबंध साधून दिले जावे, 4. असे दिले जाणारे शिक्षण उत्पादक व स्वावलंबी असावे. गांधी यांनी शिक्षण हे मातृभाषेतून दिले जावे अशी आग्रही मांडणीदेखील केली. शाळेत इतिहास, भूगोल, गणित, भाषा, चित्रकला, संगीत, स्वास्थ्य, समाजशास्त्र हे विषय होते, पण ते सर्व विषय उद्योगांच्या आधारे शिकवले जात. चित्रकला, संगीत व लोकनृत्य हेही विषय होते. त्यांनी प्राथमिक शिक्षणात सफाई, आरोग्य व आहारशास्त्र यांचा समावेश केला. गांधी सफाईकामाकडे ‘जीवनाकडे बघण्याची सौंदर्यदृष्टी निर्माण करणारी कृती’ अशा नजरेने बघत. मुलांनी स्वत: सफाई केल्यामुळे त्यांच्या मनात तशी कामे करणार्‍यांविषयी तिरस्काराची भावना निर्माण न होता, समभाव निर्माण होईल. त्याचप्रमाणे, आहारशास्त्र शिकल्यानेही स्वयंपाक केवळ महिलांचे काम वाटणार नाही; त्यातील विज्ञानही मुलांना कळत जाईल असा त्यांचा विचार होता. गांधी यांना ‘नयी तालीम’ म्हणजे मुलांना व्यवसायशिक्षण इतका संकुचित अर्थ अभिप्रेत नाही तर त्या उद्योगाच्या माध्यमातून मुलांना शिक्षण दिले जावे असे अपेक्षित होते. गांधी यांना वस्त्रोद्योग शिकवताना टकळी, धागा यांतील भूमिती, कापसाच्या निर्मितीतील विज्ञान, वस्त्रनिर्मितीच्या अर्थकारणातील शास्त्र व गणित, वस्त्र निर्माण करणार्‍या गरिबांच्या जीवनाचा परिचय करून देणारा भूगोल असे अनेक विषय शिकवावेत असे अपेक्षित होते. गांधी यांची दृष्टी त्या शिक्षणातून उच्च-नीच भाव नसलेला, शहर व खेडी यांत फरक नसलेला, बुद्धीचे काम व श्रमाचे काम यांत फारकत न करणारा समाज निर्माण होईल अशी होती. त्यांचा आग्रह इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयांचा मुलांच्या वास्तवाशी संबंध जोडला गेला पाहिजे असा होता.

शिक्षणतज्ज्ञ कृष्णकुमार म्हणतात, “गांधी भारतीय समाजातील दबलेल्या समाजघटकांनी विकसित केलेल्या आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित असलेल्या ज्ञानव्यवस्थांना शिक्षणात महत्त्वाचे स्थान देण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचा भर शिक्षकांच्या प्रशिक्षणावरही होता. ते प्रशिक्षणात संगीत, कला, सण, उत्सव यांचा समावेश शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण विकास व्हावा म्हणून असावा असे म्हणत.” ‘नयी तालीम’ शिक्षणातून परिसराशी जुळवून घेणारा माणूस निर्माण झाला असता. आजचे शहरी-ग्रामीण दुभंगलेपण निर्माण झाले नसते. बौद्धिक काम करणारा श्रेष्ठ आणि कष्ट करणारा कमी दर्ज्याचा व त्या आधारे दिला जाणारा पगार अशी विभागणी झाली आहे, ती टळली असती.

‘नयी तालीम’ची शाळा 1970च्या दशकात जेथे बंद पडली तेथेच वर्धा येथील आश्रमात ‘नयी तालीम’ शाळा 2005 पासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सर्वोदयी अभ्यासक कार्यकर्त्या सुषमा शर्मा या तेथे संचालक आहेत. तेथे विद्यार्थी संख्या दोनशेचाळीस आहे. त्या म्हणाल्या, की ‘प्रीती, मुक्ती आणि अभिव्यक्ती’ हे विद्यालयातील शिक्षक-विद्यार्थी संबंधांचे आधार आहेत. आम्ही इयत्ता सातवीपर्यंत बागकाम-शेती, स्वयंपाक, वस्त्रकला यांसारख्या कामांचा समावेश केला आहे. मुले भाषा, विज्ञान, गणित, भूगोल, सामाजिक शास्त्रे यांसारख्या विषयांच्या अध्ययनासह वस्त्रे विणतात. कला, संगीत यांवर विशेष भर आहे. सामाजिक विषयांवर सतत बोलले जाते व समाजदर्शनाच्या क्षेत्रभेटी केल्या जातात. इयत्ता सातवीपर्यंत विविध भाज्या व कापूस, मूग, तुरी, बाजरी, ज्वारी, मका यांची पावसाळी लागवड; तर मेथी, पालक, कोथिंबीर, शेपू यांसारख्या भाज्यांची हिवाळी लागवड व त्यांची देखभाल करण्यास शिकवले जाते. मुले ते काम करत असताना जमिनीचे मोजमाप, क्षेत्रफळ व परिमिती काढणे, बागेचा नकाशा स्केलनुसार काढणे, जमिनीवर भौमितिक आकृतींचा उपयोग करत बागेची रचना करणे इत्यादी गोष्टी शिकतात. मुलांना विविध ऋतूंमधील किमान-कमाल तापमान, आर्द्रता, विहिरीतील पाण्याची पातळी यांचे मोजमाप-नोंदी ठेवणे, आलेख काढणे हे सहज शिकता येते. गांडूळ खत, कंपोस्ट खत द्रवरूप झटपट खत तयार करणे, कीड नियंत्रणासाठी सेंद्रिय अर्क तयार करून फवारणी करणे, मित्र किडी, नुकसान करणाऱ्या किडी यांची तोंडओळख होणे, मधमाशा व कीटक यांचे निसर्गातील महत्त्वाचे स्थान समजून घेणे, अहिंसक पद्धतीने मध काढण्याच्या पद्धतींचा परिचय होणे, अळिम्बीची शेती करण्यास शिकवणे असे उपक्रम चालतात. प्रत्येक मुलास महिन्यातून एकदा स्वयंपाकगृहात काम करण्याची संधी मिळते. त्यातून त्याच्या मनावर पाकशास्त्र, आहारशास्त्र व स्वच्छतेचे शास्त्र यांचे धडे घेत असतानाच स्वावलंबन व लिंगसमभाव यांचे महत्त्व बिंबवले जाते. ज्ञानरचनावादात शिकवण्यापेक्षा शिकण्याची प्रक्रिया जास्त प्रभावी व टिकाऊ मानली गेली आहे. ‘नयी तालीम’ पद्धत ज्ञानरचनावादाशी जवळीक साधते. ती पद्धत विद्यार्थ्याचा सक्रिय सहभाग घेत, जीवनकौशल्ये विकसित करत त्यांचा आत्मविश्वास वाढवणारी आहे. शिक्षकांनी, पालकांनी वर्ध्याची शाळा बघायला हवी.

डॉक्टर अभय बंग हे सेवाग्राम आश्रमात असलेल्या ‘नयी तालीम’चे विद्यार्थी होते. ती पद्धत त्यांच्याकडून समजून घेतली. ते म्हणाले, की ती पद्धत शेतकरी व मजूर कसे जगतात याचा विद्यार्थिदशेत अनुभव देणारी होती. दिवसभरात तीन तास उत्पादक काम करणे सक्तीचे होते. प्रत्येक विद्यार्थी सुतकताई, विणकाम, गोशाळेची स्वच्छता, शौचालय सफाई, स्वयंपाकगृहात काम, भांडी घासणे ही कामे करत असे. मुले आश्रमात आलेल्या परदेशी पाहुण्यांची मुलाखत घेत. खुद्द स्वातंत्र्यसैनिक येऊन स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास समजावून देत. आकाशातील तारे दाखवले जात, तर कधी आम्ही झाडावर चढून कवितेचे पुस्तक वाचत बसत असू. महात्मा गांधी यांचा दृष्टिकोन विद्यार्थी कालपेक्षा आज पुढे सरकला आहे का? असा होता. प्रात्यक्षिक परीक्षेत ‘स्वयंपाक करून दाखव’, ‘हा वाफा दिला तर त्यात नियोजन कसे कराल?’ असे प्रश्न विचारले जात... स्वयंपाकात भांडी घासण्यापर्यंत कामे करावी लागायची... जीवशास्त्राचे शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरात फिरण्यास नेत आणि झाडांविषयी प्रश्न विचारत. त्यावरून विद्यार्थ्यांचे आकलन तपासत... टॉलस्टॉय यांच्या ‘इव्हान द फूल’ या कथेत एक आंधळी म्हातारी ज्यांच्या हातावर कष्ट करून घट्टे पडले नाहीत त्यांना जेवणाच्या ताटावरून उठवते. मला वाटते, ती मूल्यव्यवस्था शिक्षणात आणण्यास हवी. मला ‘नयी तालीम’ला केवळ व्यावसायिक शिक्षण म्हणणे योग्य वाटत नाही, कारण मी शाळेत केवळ शेती शिकलो नाही तर शेतकर्‍याचा सन्मान करण्यास शिकलो. त्यामुळे ती जीवनदृष्टी आहे.”

देशभरात वेगवेगळ्या राज्यांत पर्यावरणपूरक व स्पर्धाविहीन शाळा वाढत आहेत. त्या शाळा ‘नयी तालीम’चा दृष्टिकोन स्वीकारत आहेत. शिक्षणात श्रमाला महत्त्व, परिसराशी शिक्षण जोडणे, मानवी मूल्यांना प्रतिष्ठा हे अभ्यासक्रमात प्रतिबिंबित होत आहे असे ‘नयी तालीम समिती’चे राष्ट्रीय अध्यक्ष सुगन बरंठ यांनी सांगितले. आम्ही त्याकडे एक शाळा म्हणून बघत नसून सर्वोदयी समाजरचना निर्मितीचे साधन म्हणून पाहतो.

शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी वर्धा येथे राहून ‘नयी तालीम : गांधीप्रणित शिक्षणविषयक प्रयोगांचा इतिहास’ (डायमंड प्रकाशन) हे साडेतीनशे पानांचे पुस्तक मराठीत लिहिले आहे.

संकेतस्थळ -
http://www.naitalimsamiti.org/
http://www.lokbharti.org
http://puvidham.in/puvidham-learning-centre/

- हेरंब कुलकर्णी, herambkulkarni1971@gmail.com

(सप्तरंग पुरवणी, ‘सकाळ’वरून उद्धृत, संस्कारित व संपादित)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.