कोल्हारची भगवती - नवे शक्तिस्थळ


_Bhagwati_Devi_2.jpgकोल्हार-भगवतिपूर हे अहमदनगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यातील गाव. नगर-मनमाड राज्यमार्गावरील मध्यवर्ती ठिकाण. ते प्रवरा नदीच्या तीरावर वसले आहे. प्रवरा नदीच्या डाव्या तीरावर कोल्हार बुद्रुक व उजव्या तीरावर कोल्हार खुर्द हे गाव आहे. कोल्हार-भगवतिपूरची लोकसंख्या मोठी आहे. ती आसपासच्या छोट्या-मोठ्या खेड्यांसाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे.

कोल्हार-भगवतिपूर हे गाव ‘आध्यात्मिक केंद्र’ म्हणूनसुद्धा सर्वदूर माहीत आहे. कोल्हारचे ग्रामदैवत भगवती हे आहे. ते ग्रामदैवत नवा लौकिक प्राप्त करून राहिले आहे. लोक त्यास शक्तिस्थळ म्हणून समजतात. त्याचे कारण, कोल्हार-भगवतिपूर या एकाच ठिकाणी तुळजाभवानी, अंबाबाई, रेणुका आणि अर्धें पीठ सप्तशृंगी या साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन एकच होते असा समज गेल्या काही वर्षांत झपाट्याने पसरत गेला आहे. समाजातील भाविकतेचे प्रमाण गेल्या चार-पाच दशकांत वाढत असल्याने ते सहज घडत गेले आहे. त्यामुळे भाविकांची संख्या वर्षानुवर्षें वाढत चालली आहे.

भगवतीचे मंदिर पुरातन आहे. ते पूर्वाभिमुख आहे. मंदिराचे जुने बांधकाम हेमाडपंथी पद्धतीचे होते. मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यात जमिनीच्या समतलापासून चाळीस-पंचेचाळीस फूट खोलवर खोदकाम होऊनही मंदिराचा पाया दृष्टीस पडला नाही. तसेच, मंदिरनिर्मिती संदर्भातील शिलालेखसदृश्य अन्य पुरावा सापडला नाही. श्री भगवतीदेवी मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने एक कोटी रुपये खर्चून भगवतीचे जुने मंदिर पाडून त्या ठिकाणी सुंदर व मनमोहक असे भव्यदिव्य मंदिर बांधण्याचे कार्य पूर्ण झाले आहे. भक्तांसाठी भक्तनिवास आणि पार्किंगदेखील उपलब्ध आहे. जीर्णोद्धार समितीला ग्रामस्थ आणि भाविक यांनी आर्थिक मदत केली.

भगवती या ग्रामदेवतेविषयी आख्यायिका आहे. कोल्हार गावात लोटांगणबाबा नावाचे गृहस्थ राहत होते. ते सप्तशृंगिमातेच्या दर्शनाला कोल्हार-भगवतिपुरातून वणीच्या गडावर दरवर्षी लोटांगण घालत जात. त्यांना पुढे, वयोमानानुसार देवीचे दर्शन वणीला लोटांगण घालत जाऊन घेणे अशक्य झाले. तेव्हा सप्तशृंगी गडावरील अंबामातेने त्यांना दृष्टांत दिला, की तीच दरवर्षी पौष पोर्णिमा ते माघ पौर्णिमा या काळात कोल्हार गावी येऊन मुक्काम करील! त्या कहाणीप्रमाणे दरवर्षी पौष शुद्ध पौर्णिमा ते माघ शुद्ध पौर्णिमा असा महिनाभर तेथे महोत्सव साजरा केला जातो. महिनाभर यात्रोत्सव चालणारे भारतातील ते एकमेव तीर्थक्षेत्र आहे असे सांगितले जाते. ‘यात्रोत्सव काळात’ तुळजापुरची भवानी, माहुरची रेणुका, कोल्हापुरची अंबा यांदेखील वणीच्या सप्तशृंगीची साथ देण्यासाठी तेथे वास्तव्य करतात असेही मानले जाते. त्यामुळे भगवतीच्या कोल्हारभूमीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

_Bhagwati_Devi_1.jpgमंदिरासंबंधी पुराणकथा प्रचलीत आहे. प्रवरा परिसर म्हणजे दंडकारण्याचा भाग. राम वनवासात असताना, त्यांनी त्या भूमीवर पूजेसाठी वाळूची पिंड तयार केली. त्या ठिकाणी त्यांना महादेव प्रसन्न झाले. त्याच ठिकाणी मंदिर बांधण्यात आले आहे म्हणे. त्या मंदिरास कोल्हाळेश्वर नाव पडले. कोल्हाळेश्वरावरून गावास ‘कोल्हार’ असे नाव पडले असावे. कोल्हाळेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे.

भगवती मंदिर आणि परिसर येथे नवरात्रात नेत्रदीपक रोषणाई केली जाते. नऊ दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम मंदिरात संपन्न होतात. त्यामुळे गावाला नवचैतन्य प्राप्त होते. उत्सवकाळात आणि इतर वेळीही पूजा साहित्य, बांगड्यांची दुकाने, खेळणी, मिठाईची दुकाने मंदिरासमोरील प्रांगणात असतात.

कोल्हाळेश्वर गावात महादेव, दत्त, मारुती, श्रीराम, विठ्ठल, गणपती इत्यादी देवतांची मंदिरे आहेत. तसेच, मस्जिद व चर्चदेखील आहे. गावचा बाजार शुक्रवारी असतो. सर्वधर्मीय सण गावात साजरे केले जातात. गावची लोकसंख्या चाळीस हजारच्या आसपास आहे. कॉ. गोविंद पानसरे यांचा जन्म या गावात झाला. गावात पावसाचे प्रमाण मध्यम आहे. गावात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय आहे. तेथून जवळ मुळा धरण आहे. गावापर्यंत पोचण्यासाठी एस.टी.ची व्यवस्था आहे. आजुबाजूच्या चार-पाच किलोमीटर परिसरात प्रवरानगर, लोणी, सात्रळ, सोनगाव, बाभळेश्वर, गळनिब, फत्याबाद ही गावे आहेत.

- साईप्रसाद कुंभकर्ण, kumbhakarnsai@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.