माधव बर्वे – विषयवार वृक्षबागांचा अधिकारी माणूस


_Madhav_Barve_4.jpgनाशिक जिल्ह्याच्या निफाड, कोठुरे हा भाग पाण्याने संपन्न आहे. गव्हाची, ऊसाची किंवा द्राक्षाची शेते सर्वत्र पाहून महाराष्ट्रातील दुष्काळाचे विचार मनातून निघून जातात.

निफाड तालुक्यात कोठुरे या गावी माधवराव बर्वे हे ब्याऐंशी वर्षांचे (2018 साली) तरुण, उत्साही, संशोधक वृत्तीचे शेतकरी राहतात. ते गेल्या पंचावन्न वर्षांपासून शेतीचे जणू व्रत परिपालन करत आहेत. ते सायकलीवरून शेतात जातात. बर्वे हे आध्यात्मिक वृत्तीचे, साधी राहणी असलेले, पण ज्ञानी, अनुभवसंपन्न असे प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी रसायनशास्त्रात पदवी मिळवली, मात्र चांगली नोकरी मिळत असूनही त्यांनी घरच्या शेतीत काम करण्याचे ठरवले. ते शेतीत नवनवे प्रयोग करत आले आहेत. ते सेंद्रीय शेतीविषयी परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी फिरत असतात. ते मुख्यत्वेकरून वृक्षलागवडीच्या निमित्ताने निरनिराळ्या राज्यांत भटकंती करतात. त्यांचे ते काम त्यांना महाराष्ट्राबाहेरही प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळवून देते.

बर्वे यांचे कोठुरे गाव गोदातीराजवळ वसलेले आहे. बर्वे यांच्या पूर्वजांनीच तीनशे वर्षांपूर्वी कोठुरे गाव वसवले. त्यांचे पूर्वज मल्हार दादोजी हे शाहू महाराजांची मर्जी संपादन करून नेवरे या रत्नागिरी जिल्ह्यातील गावातून बाळाजी विश्वनाथांच्या सहकार्याने कोठुरे येथे येऊन स्थायिक झाले. गावात गोदातीरावरील जुने बाणेश्वर शिव पंचायतन मंदिर, तेथील परिसर, नदीकाठचे क्षेत्र, तेथील उपसा सिंचन प्रकल्प इत्यादी गोष्टी पाहण्याजोग्या आहेत. गावात जुन्या काळातील गढीवरील वाड्याच्या पुसत चाललेल्या खुणा पाहता येतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आजोळ तेथे असल्याचा उल्लेख बर्वे यांनी केला. मल्हार दादोजी बर्वे यांनी तीनशे वर्षांपूर्वी कोकणातील सत्तर कुटुंबे स्वतःसोबत कोठुरे गावी आणली होती. त्या पूर्वी तेथे मुस्लिम बहुसंख्येने होते, पण बर्वे यांच्या आगमनानंतर ते इतर ठिकाणी स्थलांतरित झाले.

माधव बर्वे साठ वर्षांपासून शेती व्यवसाय करत आहेत. ते शेती 1960 सालापर्यंत पारंपरिक पद्धतीने करत होते. ती शेती पूर्णपणे अनुभवावर आधारित होती. शेतीत वापरण्याकरता शेणखत, सोनखत, पेंडीचे खत, हिरवळीचे खत, मासळीचे खत इत्यादी खतांचे प्रकार होते, तर गोमुत्र, ताक, तंबाखूचे पाणी, कडू लिंबाचा रस इत्यादी प्रकारची कीटकनाशके होती. परिस्थिती 1960 नंतर बदलली. पिकाला ‘एनपीके’ व मायक्रो nutrients लागतात हे समजले. त्या ‘एनपीके’चे फॉर्म्युले तयार झाले. त्यात हायब्रीड सीडची भर पडली. माधव बर्वे स्वतः सायन्सचे विद्यार्थी असल्यामुळे त्यांनी तो बदल स्वीकारला. त्यांची शेती पुढील दहा वर्षें त्या पद्धतीने चालू होती. शेतीत पाणी, रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर चालू होता. पण 1970 नंतर उत्पादनात घट जाणवू लागली. बर्वे त्याविषयी मूलभूत विचार करू लागले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की उत्पादनात घट रासायनिक खतांमुळे होत आहे.

_Madhav_Barve_2.jpgबर्वे यांनी प्रथम पारंपरिक शेतीचा व नंतर रासायनिक खतांचा अनुभव घेतल्यानंतर सेंद्रीय शेती करण्यास सुरुवात केली. सध्या ते पाच एकरांवर ऊस उत्पादन व पंधरा एकर जमिनीवर गव्हाचे  उत्पादन घेतात. त्यांनी शेतात बांबूची लागवड केली असून तेथे निरनिराळ्या प्रकारची आंब्याची पंचवीस झाडे आहेत. ते म्हणाले, की ‘आम्ही शेतातील एकही आंबा विकत नाही.’ त्यांना आनंद परिचित मंडळींनी आंबे खाऊन समाधान व्यक्त करण्यात वाटतो.

बर्वे म्हणतात, की त्यांना त्यांच्या अनुभवातून अनेक गोष्टी शिकण्यास मिळाल्या. झाडांचा उच्छ्वास हा प्राण्यांचा श्वास व प्राण्यांचा उच्छ्वास हा वनस्पतींचा श्वास आहे. प्राण्यांनी उत्सर्जित केलेले मल पदार्थ, त्यांचे मृतदेह हे वनस्पतींचे अन्न. वनस्पतींचे देहोत्सर्ग हे प्राण्यांचे अन्न. ती देवाणघेवाणीची नैसर्गिक प्रक्रिया व्यवस्थित चालली तर अन्नचक्रात अडथळा निर्माण होणार नाही आणि कोणत्याही शेतीस रासायनिक खतांची गरज भासणार नाही. त्यात एकदल, द्विदल हा फेरपालट कटाक्षाने पाळायचा. ऊस, बाजरी ,ज्वारी, गहू ,भात इत्यादी एकदल पिकांना नायट्रोजनची गरज जास्त असते. द्विदल पिकांच्या मुळाशी असलेले बॅक्टेरिया हवेतील नायट्रोजन शोषून त्याच्या गाठी बनवतात. कोणत्याही पिकाचा शेष भाग शेतात तसाच राहू द्यायचा. कारण ते अन्न सूक्ष्म जिवाणूंचे असते. शेताभोवती वेगवेगळ्या प्रकारची झाडे वाढू द्यावीत. त्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे मित्रकीटक राहतात. ते पिकांवरील कीटकांना खातात. त्यामुळे आपोआप कीड नियंत्रित होते. पाणी पिक मागेल तेव्हाच द्यायचे. शेताचे चार भाग करून त्यावर रोटेशन पद्धतीने पिके घ्यायची, म्हणजे जमिनीची हानी होत नाही. सोयाबीनच्या पिकानंतर गहू अगर काही पिके घेऊ नयेत.

_Madhav_Barve_3.jpgवृक्षलागवड हा माधव बर्वे यांच्या जिव्हाळ्याचा विषय! गोदानदीच्या काठी शिव पंचायतन मंदिराच्या जवळपासच्या पट्ट्यात चिंचेची शेकडो झाडे त्यांच्या पूर्वजांनी लावली. तोच वारसा ते पुढे चालवत आहेत. त्यांनी आतापर्यंत विक्रम बोके यांचा पुण्याजवळचा डोंगर, सेण्ट्रल जेल (नाशिक रोड) या ठिकाणी वृक्षलागवड केली आहे. त्यांनी केलेली कामे पाहून त्यांना स्कूल ऑफ आर्टिलिअरी (देवळाली) या ठिकाणी वृक्षलागवडीसाठी बोलावण्यात आले. त्यांची त्यातून मिलिटरी विभागाशी ओळख  झाली आणि त्यानंतर देशातील इतर राज्यांतून म्हणजे आर्मी हेडक्वार्टर्स (नवी दिल्ली), आर्मी कंटोनमेंट (जबलपूर, चंदीगड), आर्मी हेडक्वार्टर्स (बंगलोर) व सीख रेजिमेंट व पंजाब रेजिमेंट (रामगड, रांची, झारखंड) अशा ठिकाणांहून बोलावणी येऊ लागली. त्यांनी पुण्याजवळील राजगुरुनगर येथे जे. कृष्णमूर्ती यांच्या ‘सह्याद्री हायस्कूल’च्या परिसरात वृक्षलागवड केली आहे. तसेच, गुजरात सीमेवरील बावीस गावांत चिंचेची साडेतीन हजार झाडे व तेथील प्रत्येक झोपडीसाठी बदामाचे एक झाड अशी वृक्षलागवड केली आहे. त्यांची एकट्याची वृक्षलागवडीची संख्या एक लाखाच्या पुढे गेली आहे. त्यांनी लावलेल्या झाडांत अर्जुन, करंजी, चिंच, शेवगा, हदगा, शिकेकाई, सावरी, बांबू अशा सर्व प्रकारच्या झाडांचा समावेश आहे.

बर्वे यांचा वने लागवड करण्यात विशेष हातखंडा आहे. त्यांनी नक्षत्रवन पाडेगाव-फलटण (राहुरी कृषी विद्यापीठ) येथे उभे केले आहे. नक्षत्रवन संकल्पना हा बर्वे यांचा प्रियतम विषय आहे. त्यानुसार वर्तुळाकार पद्धतीने लागवड केली जाते. सत्तावीस झाडे प्रत्येक वर्तुळात असतात. तशी तीन वर्तुळे एकात एक आखावी लागतात. पहिले वर्तुळ 29.4 मीटर, दुसरे पंचवीस व तिसरे एकवीस मीटर त्रिज्येचे असते. प्रत्येक नक्षत्रासाठी एक अशी एकूण सत्तावीस झाडे लावलेली असतात. त्या वनाची रचना करण्यास एक एकर जागा लागते. त्या वननिर्मितीमध्ये पाच ते सहा वर्षांचा काळ जातो. त्या सर्व झाडांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. त्यांनी तयार केलेले नक्षत्रवन कोठुरे गावाजवळ, आर्टिलरी स्कूल नाशिकजवळ व सिन्नर येथे पाहण्यास मिळेल. औषधी वनस्पतींची लागवड, वेदांतील वनाबाबतचे विचार, पर्यावरण व त्याचे महत्त्व, नक्षत्रवन संकल्पना, सरस्वतीवन, लक्ष्मीवन, नवग्रहवन, राशिवन, पंचवटी वन, अशोकवन, वृंदावन हे बर्वे यांच्या आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्या संबंधी वनांची कामे मिलिटरी परिसरामध्ये, वनखात्यात आणि इतर ठिकाणी केली आहेत.

चरकवन हे सर्वात मोठे वन चरक संहितेमध्ये उल्लेखलेले आहे. त्या वनात एकूण पाचशे वनस्पती लावाव्या लागतात. त्यासाठी दहा एकर जागा लागते. प्रत्येक वनाचा एक उद्देश असतो. उदाहरणार्थ, शैक्षणिक संस्थेजवळ सरस्वतीवन अथवा श्री गणेशाच्या मंदिराजवळ गणेशवन. बर्वे यांनी त्यांच्या स्वतःच्या शेतात mixed fruit garden तयार केले आहे. ती त्यांची स्वत:ची कल्पना. त्या पद्धतीच्या बागेला तीन हजार सहाशे चौरस फूट जागा लागते. त्यांनी त्यांना गेल्या तेरा वर्षांपासून शेतात कीटकांचा किंवा रोगराईचा त्रास झालेला नाही असे सांगितले.

बर्वे यांना असे वाटते, की शेतकऱ्याने त्याच्याकडील जमिनीच्या पस्तीस टक्के जमीन वृक्षलागवडीसाठी वापरणे आवश्यक आहे, पण सध्या ते प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा कमी आहे. कौटिलीय अर्थशास्त्रातील शेतीविषयक विचार हा त्यांच्या अभ्यासाचा आणखी एक विषय!

_Madhav_Barve_5.jpgनिफाड येथे सहकारी साखर कारखाना स्थापन झाला. ऊस आणि गहू या पिकांविषयी बर्वे यांना जास्त ओढ आहे. त्यांनी तीन वेळा त्या पिकांच्या गटात उच्चांकी टनेज करून दाखवले आहे. ते सलग सहा वर्षें शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन होते. त्यांच्या नेतृत्वामुळे तो संघ फायद्यात आला. विक्रमी विक्री झाल्यामुळे त्यांना एक मोटारसायकल बक्षीस मिळाली. ते सहा वर्षें पंचायत समितीमध्ये नॉन वोटिंग मेम्बर होते. त्यांनी त्या काळात कोठुरे गावासाठी बराच फंड मिळवला. ‘कोठुरे उपसिंचन’ ही संस्था काढून एक हजार एकराची योजना राबवली. ती संस्था सध्या कर्जमुक्त असून व्यवस्थित सुरू आहे. ते महाराष्ट्र ऑर्गनिक फार्मिंग फेडरेशन (मॉफ) साठी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी युनोच्या शेती विभागाला मॉफतर्फे भारतात भात, गहू, सोयाबीन, ऊस इत्यादी पिकांची ऑर्गनिक शेती कशा प्रकारे केली जाते याची माहिती पाठवण्याचे काम केले.

माधव बर्वे पत्नी मंगलासमवेत कोठुऱ्याला राहतात. त्यांचे चिरंजीव मनोहर वकिली करतात, नाशिकला असतात, पण त्यांनाही शेतीत रस आहे. त्यांनी चिकूची बाग विकसित केली आहे. त्यांची मुलगी आदिती जोशी पुण्याला असते.

माधव बर्वे हे वनखात्याच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये भाषणे देण्यासाठी जातात. महाराष्ट्रात तशी एकूण पाच ट्रेनिंग सेंटर्स शहापूर, जालना, पाल, चिखलदरा व चंद्रपूर या परिसरात आहेत. नवीन भरती झालेल्या कामगारांसाठी सहा महिन्यांचे ट्रेनिंग असते. बर्वे एन.एस.एस.च्या शिबिरांमध्ये व इतरत्र बोलावतील त्या ठिकाणी वृक्षलागवड, पर्यावरण, सेंद्रीय शेती, निरनिराळ्या वन संकल्पना इत्यादी विषयांवर भाषण देण्यासाठी जात असतात.

बर्वे यांना त्यांच्या कामासंबंधात शं.ल. किर्लोस्कर यशप्राप्ती हा आदर्श शेतकऱ्याचा पुरस्कार 2011 साली मिळाला. वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेकडून डॉ. वा.द. वर्तक वनमित्र पुरस्कार 2011 साली देण्यात आला. त्यांच्या ‘कृषिदूत’मधील उत्कृष्ट लिखाणाबद्दल 2013 सालचा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. बर्वे यांना नाशिक जिल्ह्यात विशेष काम करणाऱ्या शेतकऱ्याचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते बर्वे यांना सेंद्रिय शेतीबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

माधव बर्वे - 9403709324/ 8007607663
कोठुरे (नाशिक) फोन 0255024131

- पुरुषोत्तम कऱ्हाडे, purusho1508@hotmail.com

(दैनिक 'दिव्य मराठी'मधून उधृत. संस्कारीत-संपादीत)

Last Updated On 22nd Sep 2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.