अमित प्रभा वसंत - मनोयात्रींचा साथी


_AmitPrabhaVasant_ManoyatrincheSathi_4.jpgअमित प्रभा वसंत हा कोल्हापुरचा पस्तिशीतील युवक रस्त्यावर बेवारसपणे फिरणाऱ्या मनोरुग्णांना त्यांच्या घरी पोचवण्याचे किंवा त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम करतो. अमित प्रभा यांनी त्यांच्या जगण्याचे ध्येय तेच ठरवले आहे. ते तशा मनोयात्रींचा अविरत शोध घेत असतात. अमित म्हणतात, की “रस्त्यावर आलेल्या त्या मनोरूग्णांना भाषेची काय, कसलीच अडचण नसते. त्यांचा निवारा, संपत्ती यांबद्दलचा संघर्ष संपलेला असतो. म्हणून मी तशा शोषित आणि घरदार सोडून रस्त्यावर आलेल्या मनोरुग्णांना 'मनोयात्री' असे समजतो.”

अमित उच्चशिक्षित आहेत. त्यांनी शाळेमध्ये मुख्याध्यापक, सरकारी बँक अधिकारी अशा काही चांगल्या नोकऱ्या केल्या आहेत. त्यांना ते कॉलेजमध्ये शिकत असतानाच समाजातील दुर्बल घटकांसाठी संवेदना वाटे. त्यांची तीव्र भावना दुर्बल लोकांसाठी काही करावे अशी असायची. त्यांच्या नोकरी करू लागल्यावर लक्षात आले की नोकरी आणि समाजकार्य हे सोबत करणे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ सामाजिक काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या कामाची सुरुवात ही आजरा तालुक्यात असणाऱ्या धनगरवाड्यापासून केली. ते तेथील लहान मुलांना शिकवणे, त्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे, त्यांच्या शरीराची स्वच्छता करणे अशी कामे करत.

अमित यांच्या कामाला कलाटणी देणारा प्रसंग दहा वर्षांपूर्वी घडला. त्यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला, की एक महिला बेवारसपणे आजरा-गडहिंग्लज रस्त्यावर पडली आहे. ती महिला तेथे खूप दिवस पडून होती. तिच्या शरीरावर जखमा होत्या. अमित यांनी तेथे पोचून त्या महिलेची शुश्रूषा केली. तसेच, त्यांनी अनेक प्रयत्न करून त्या महिलेला कर्जत येथील ‘श्रद्धा मनोरुग्ण रुग्णालया’त दाखल केले. अमित यांना त्या रुग्णालयातून काही महिन्यांनंतर फोन आला, की ती महिला तिच्या पुरा या उत्तरप्रदेशमधील गावात अगदी बरी होऊन सुखरूप पोचली आहे. त्या महिलेचे नाव कलावती असे होते. ती पन्नास ते साठ या वयोगटातील होती. अमित यांना ती घटना घडल्यानंतर ते एका व्यक्तीचा जीव वाचवू शकले या गोष्टीचा खूप आनंद झाला. कलावतीमुळेच, अमित यांच्या मनात नवीन विचार निर्माण झाला. त्यांनी तेव्हापासून रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांवर उपचार करून त्यांना त्यांच्या घरी पाठवायचे किंवा त्यांचे पुनर्वसन करायचे हे काम आयुष्यभर करण्याचा निश्चय केला.

_AmitPrabhaVasant_ManoyatrincheSathi_3.jpgअमित सांगतात, “एका मनोरुग्णावर उपचार करून पाहिले, तो अगदी बरा झाला. मग आता, संपूर्ण आयुष्यच मनोयात्रींच्या पुनर्वसनासाठी काम करण्याचे ठरवले. अनेक मनोरुग्ण बेवारसपणे रस्त्यावरून फिरताना दिसायचे. त्यावेळी ते लोक कोठून आले असतील, त्यांची अशी अवस्था का झाली असेल, त्यांचे घर कोठे असेल, त्यांचे नातेवाईक कोण असतील असे सतत वाटायचे. त्यातून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागलो. त्यांना खाऊ-पिऊ दिले. त्यावेळी जाणवू लागले, की तशा व्यक्ती अगदी ठीक होऊ शकतात.” स्त्रिया मनोयात्री असतील तर अडचण तयार होते. त्यावेळी त्यांची स्वच्छता करणे, शुश्रूषा करणे यासाठी अमित यांच्या मैत्रिणी त्यांना मदत करतात असे त्यांनी सांगितले.

अमित हे कोल्हापूर जिल्ह्याच्या आजरा तालुक्यातील पेरनोळी या गावात राहतात. लोक त्यांना रस्त्यावर कोणी मनोयात्री दिसले तर जिल्ह्यातून कोठूनही आणि कोणत्याही वेळी फोन करून कळवतात. मग अमित हे मनोयात्रीकडे जातात. त्याचे केस कापणे, त्याची स्वच्छता करणे, त्याला खाऊ-पिऊ देऊन वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करणे असे उद्योग सुरू करतात. विशेष म्हणजे रस्त्यावर बेवारस फिरणारे मनोरुग्ण अमित यांच्या आपलेपणामुळे बरे होतात आणि त्यानंतर अमित त्यांना सुखरूप घरी पोचवण्याचे कामही करतात.

मी अमित यांना पहिल्यांदा बागेत भेटले होते. तेथे एक मांजर होती. त्या मांजराच्या अंगावर अनेक च्युइंगम चिकटले होते आणि ते मांजर अस्वस्थ होऊन ते काढण्याचा प्रयत्न करत होते. अमित यांनी त्या मांजराला पटकन जवळ घेतले आणि कात्रीने हळुवारपणे त्याचे केस कापले (अमितकडे तो करत असलेल्या कामासाठी लागणाऱ्या साधनांचे किट असतेच). आश्चर्याची गोष्ट म्हणजे मांजर केस कापेपर्यंत शांतपणे सहकार्य करत होते. जणू काय अमित यांच्या कामाबद्दल मांजराला पूर्वकल्पना होती! अमित यांनी फक्त माणसांवर नव्हे तर पक्षी, गाय, घोडे, कुत्रे, मांजर अशा प्राण्यांवर देखील उपचार केले आहेत.

_AmitPrabhaVasant_ManoyatrincheSathi_1.jpgअमित यांना पुनर्वसनाच्या कामात कर्जत येथील ‘श्रद्धा पुनर्वसन केंद्रा’तील डॉक्टर भरत वाटवानी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. त्यांनी गेल्या चार वर्षांपासून दीडशेपेक्षा जास्त मनोयात्रींवर उपचार केले आहेत, तर बावन्न मनोयात्रींवर उपचार करून त्यांना त्यांच्या घरी पाठवले आहे. ते रुग्ण राजस्थान, केरळ, नेपाळ, बिहार, कर्नाटक, तेलंगणा अशा विविध राज्यांतील आहेत. वाटवानी डॉक्टरांना या वर्षीचा मॅगेसेसे पुरस्कार मिळाला आहे.

सत्ता, संपत्ती, नात्यातील ताणतणाव या सर्व गुंतागुंतीत दुर्बल माणूस टिकू शकत नाही. त्याला नाईलाजाने घर सोडावे लागते. असफल सामाजिक-कौटुंबिक संघर्षातून मनोरुग्णता येते, वैद्यकीय उपचार करण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसते. मग असे लोक त्यांची घरे सोडतात. त्यातून मनोयात्री रस्त्यावर येतात. त्यांना प्रेम, आपलेपणा यांची गरज असते. पण समाज त्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या वाळीत टाकतो.

अमित यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ काम करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी त्यांना अनेक संघर्षांना तोंड द्यावे लागले. अमितचे वडील हे शेती करतात. आई या गृहिणी आहेत. एक बहीण आहे, तिचे लग्न झाले आहे. अमित यांच्या वडिलांनी सामाजिक चळवळीत कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. सामाजिक चळवळीत काम करत असताना, त्यांना आलेला नकारात्मक अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यामुळे त्यांची इच्छा मुलानेपण तसेच आयुष्य जगू नये अशी होती. अमित हा त्यांचा एकुलता एक मुलगा आणि तो नोकरी सोडून समाजकार्य करणार म्हणतो, हा त्यांच्या घरच्यांसाठी धक्का होता. त्यामुळे अमित यांच्या निर्णयाला कुटुंबातून विरोध झाला. अमित यांच्या वडिलांनी त्यांच्या काही मित्रांना - कॉ. संपत देसाई, सुनील गुरव - एक दिवस घरी बोलावले व अमित यांचा न्यायनिवाडाच केला! अमित यांच्यासाठी ते अनपेक्षित होते. त्यांच्या वडिलांनी पर्याय ठेवला, घरी राहायचे असेल तर लग्न आणि नोकरी करावी लागेल; समाजकार्य करायचे असेल तर घर सोडावे लागेल. अमित यांचा निर्णय झाला होता. त्यांनी घर सोडले. अमित गेली चार वर्षें एकटे राहत आहेत. घर भाड्याचे आहे. दोन खोल्या आहेत. अमित एका खोलीत राहतात. दुसरी खोली मनोरुग्णांसाठी. जागेचे मासिक भाडे आठशे रुपये आहे. अमित स्वत:चे जेवण स्वत: बनवतात. त्यांचा चरितार्थ लोकांनी दिलेल्या पैशांतून आणि तांदूळ, पीठ यांसारख्या वस्तूंतून चालतो. “मी माझ्या मोठ्या पगाराच्या नोकरीत कधीच समाधानी नव्हतो, पण आज मनोयात्रींना बरे करून घरी पाठवण्यात मी खूप समाधानी आहे” असे अमित सांगतात. अमित यांचे वय छत्तीस आहे. ते म्हणाले, की त्या कामातून दूर होऊन वेगळे काही करण्याचा विचार चुकूनही मनात येत नाही.

_AmitPrabhaVasant_ManoyatrincheSathi_2.jpgअमित यांना युट्यूब, फेसबुक या माध्यमातून काही साथी मिळाले आहेत. ते वेगवेगळ्या जिल्ह्यांत मनोयात्रींसाठी मदतीचा हात पुढे करत आहेत. सतीश शांताराम हे अमित यांना पूर्णवेळ मदत करतात. त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. ते आजरा तालुक्यातील मासोली या गावचे आहेत. तसेच, अमित यांना कोल्हापूर, पुणे, मुंबई अशा काही ठिकाणी मदत करणारे मनोसाथी निर्माण झाले आहेत.

मनोरुग्णांवर उपचार केले तरी बऱ्याच वेळा त्यांच्या कुटुंबाशी संपर्क होतोच असे नाही. अमित यांना समाजातील मनोयात्रींचा प्रश्न सोडवण्यासाठी पुनर्वसन केंद्रांची निर्मिती करायची आहे. ते त्यासाठी अनेक मार्गांनी प्रयत्न करत आहेत. अमित यांनी 2014 साली ‘माणुसकी फाउंडेशन’ या नावाने संस्थेची नोंदणी केली आहे. आर्थिक मदतीची गरज लागते त्यावेळी अमित यांना सोशल मीडियासारख्या माध्यमांचा उपयोग होतो. अमित यांनी सांगितले, की “ज्यावेळी माझ्याकडे रुग्ण येतो त्याच वेळी मी मदतीचे आवाहन करतो. अनेक मित्र मोठ्या प्रमाणात मदत करतात. त्यामुळे आर्थिक अडचण कधी जाणवली नाही.’’

अमित यांचे काम खूप लोकांपर्यंत पोचत आहे, त्याला पुरस्कार मिळत आहेत. तशा बातम्या वर्तमानपत्रांत छापून येतात. त्याचा आनंद अमित यांच्या कुटुंबीयांना होतो. ते लोकांना तो त्यांचा मुलगा आहे असे अभिमानाने सांगत असतात. अमित म्हणतात, “पण अजूनही आईवडिलांना वाटते, की मी लग्न, नोकरी, मुलबाळ या समाजमान्य चौकटीतच जगावे. परंतु मला ते आता शक्य नाही. मला वाटते, की जन्म घेतलेल्या प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि अशा मानसिक रीत्या खचलेल्या लोकांना त्यांचा साथी बनून मला त्यांना जगण्यासाठी मदत करायची आहे. याला तुम्ही सगळे सामाजिक कार्य असे म्हणत असाल, पण मी हे माझ्या स्वार्थासाठी करतो. त्यातून माझी आंतरिक अस्वस्थता दूर होते.”

अमित प्रभा वसंत यांच्या कार्याची अधिक माहिती
Fecebook – amit prabha vasant
अमित प्रभा - 7757800567

- मिनाज लाटकर
minalatkar@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.