संतोष गर्जे - सहारा अनाथालय ते बालग्राम


_SaharaAnathalay_3.jpgसंतोष गर्जे हा मराठवाड्यातील ‘बीड’ जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील पाटसरा गावाचा रहिवासी. तो त्याच्या वयाच्या एकोणिसाव्या वर्षापासून काही अनाथ मुलांचा सांभाळ करत आहे. तो 2004 सालापासून अनाथालय चालवत आहे. त्याचा ‘सहारा’ अनाथालय परिवार गेवराई या तालुक्याच्या गावापासून तीन किलोमीटर अंतरावर तीन एकरांच्या जागेवर उभा आहे. अनाथालयात पंच्याऐंशी मुले-मुली आहेत. संतोष आणि प्रीती हे तिशीचे दाम्पत्य त्या मुलांचा सांभाळ आई-वडिलांच्या नात्याने करत आहेत. त्यांना त्यांचे बारा सहकारी कार्यात सोबतीला असतात.

संतोषने हलाखीची परिस्थिती लहानपणापासून घरी अनुभवली आहे. आई-वडील ऊसतोडणीच्या कामासाठी सहा-सहा महिने चार जिल्हेपार असायचे. संतोष त्याच्या तीन बहिणींबरोबर घरी राहायचा. घर सांभाळायचा. ती भावंडे त्यांचा रोजचा खर्च गावातच लहान-मोठी कामे करून, मजुरी करत निभावून नेत. पालकांची कमाई सावकाराची आणि इतर देणी चुकवण्यातच बऱ्याचदा संपायची. संतोष सकाळी लवकर उठून स्वयंपाक करायचा. तो थोडा मोठा झाल्यावर, त्याची कसरत शेतात काम आणि महाविद्यालयात शिक्षण अशी चालायची. संतोषने आष्टी महाविद्यालयातून बारावीपर्यंत विज्ञान शाखेतून शिक्षण घेतले. तेवढ्यात त्याच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले. तिला पहिली मुलगी झाली, पण तो आनंद फार काळ टिकला नाही. बहीण दुसऱ्या वेळी सात महिन्यांची गर्भार असताना तिचा मृत्यू बाळंतपणात झाला. मृत्यूबद्दल त्यावेळी संशय उत्पन्न झाला. तो नैसर्गिक होता की नवऱ्याने पोटावर मारलेली लाथ काही अंशी त्याला कारणीभूत होती या चर्चेला काही अर्थ नाही असे संतोषचे म्हणणे. मुलीचे जाणे संतोषच्या वडीलांच्या जिव्हारी लागले आणि ते घर सोडून देवधर्म करण्यासाठी न सांगता कायमचे निघून गेले. ते कमी म्हणून की काय संतोषच्या मेव्हण्याने लगेच दुसरे लग्न केले. संतोषची साडेतीन वर्षाची भाची अनाथ झाली. संतोषवर, त्याच्या कुटुंबावर आभाळच कोसळले! वडिलांच्या परागंदा होण्याने नातेवाईकांनीही कुटुंबाकडे पाठ फिरवली. डगमगून जाण्यात अर्थ नाही हे संतोषने जाणले. तो औरंगाबादला गेला. त्याने तेथे पाच हजारांच्या पगारावर काम सुरू केले. मात्र छोट्या भाचीचा प्रश्न त्याच्या डोक्यात कायम होता. संतोषच्या मनावर सर्व घटनांचा खोलवर परिणाम झाला होता. संतोषला त्याच्या भाचीसारख्या इतर अनाथ मुलांसाठी काहीतरी करावे, त्यांना हक्काचे घर मिळवून द्यावे या विचाराने झपाटले.
_SaharaAnathalay_4.jpgसंतोषने स्वत:चा पैसा उभा करायचा म्हणून तालुका गाठला. ‘गेवराई’ हा बीड जिल्ह्यातील सगळ्यांत मागास तालुका. तेथे पारधी, बंजारा, भिल्ल, कैकाडी, वडारी समाजांचे लोक अधिक आहेत. जिल्ह्यात ऊसतोड कामगारांची संख्या बरीच आहे. बालविवाहाचे प्रमाणही अशिक्षितपणामुळे जास्त आहे. जिल्ह्यातील सगळ्यात मोठा ‘रेड लाईट’ विभागही त्याच भागात आहे. त्यामुळे अनाथ मुलांची संख्या तेथे अधिक आढळते. संतोषने नीतिनियम - त्यातून उद्भवणाऱ्या विविध समस्या यांच्या गदारोळात अडकलेल्या मुलांना जेवण आणि आसरा देण्याची जबाबदारी उचलली.

एका शेतकऱ्याने त्याच्या शेताचा काही भाग मुलांसाठी निवारा उभारण्याकरता दिला. संतोषने एका व्यापाऱ्याला गाठून पंचाहत्तर पत्रे उधारीवर मिळवले. त्याला उधारी हा सोपा मार्ग निधीसंकलनाच्या मोहिमेत मिळाला. त्याने खिळे, पट्टी, लाकडी बांबू हे साहित्यही उधारीवर आणले. निवारा तयार झाला, पण मुले कशी येणार? त्याचे वय वर्षें एकोणीस. कोणीही संतोषवर विश्वास ठेवण्यास तयार नव्हते आणि का ठेवावा? हा देखील प्रश्न होताच. संतोष वर्णन करतो, “पायात चप्पल नाही, अंगात नीटसे कपडे नाहीत आणि मी अनाथ मुलांना सांभाळीन असे म्हणत होतो. माझ्यावर कोण आणि कसा विश्वास ठेवणार? तरीही गेवराई तालुक्यातील वाडीवस्ती तांडा, केकतपांगरी, पोईतांडा, अंबूनाईकतांडा आणि ताकडगाव या गावांतून, वेगवेगळी कौटुंबिक परिस्थिती असणारी सात मुले मिळाली आणि एका प्रवासाला सुरुवात झाली! लेकरे आली होती. खाण्यासाठी जमून ठेवलेला दाणागोटा हा हा म्हणता संपला. आता काय? मग घरोघरी, दारोदारी, “गावोगावी जेथे जेथे जमेल तेथे तेथे दाळदाणा, कपडालत्ता, वह्यापुस्तके पसाखोंगा घेऊन यायचे अन् लेकरांना घालायचे असा कुत्तरओढीचा दिनक्रम चालू झाला. जवळ पैसा नाही, ज्ञान नाही, सर्वदूर अज्ञान... कल्पनाच न केलेली बरी...”

संतोषने गावोगावच्या पायपिटीसाठी मोफत प्रवास करण्याचे नवे तंत्र त्या काळात विकसित केले. तो मोटारसायकलवर पुढील गावी जाणाऱ्या माणसाला, ‘सोडा की जरा पुढच्या गावापर्यंत’ असे म्हणायचा. संतोष मोटारसायकलवाला जाईल त्या गावाला जायचा, ओळखी काढायचा, अनाथ मुले आणि मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा. हळुहळू यश मिळत गेले.

संतोषने मुलांना दर्जेदार साहित्यच देण्याचे ठरवल्याने त्याला अधिक खटपट करणे क्रमप्राप्त ठरले. त्याचा आग्रह त्याला स्वतःला जे मिळाले नाही ते त्या मुलांना मिळायला हवे असा असतो. त्याने लहान मुलांना गणवेश, टाय, बूट असे सारे काही देण्यासाठी आटापिटा केला आहे. त्याला नव्या उधाऱ्या, पैसे वेळेवर देता न आल्यामुळे तोंड फिरवणे, व्यापाऱ्यांची बोलणी खाणे हे सारे सहन करावे लागले. संतोष सांगतो, “काही वेळा, परिस्थितीला पर्याय नसतो. अनाथालयाचा कारभार समाजाच्या भरवशावरच चालत आला आहे. संतोषला मुलांसह राहताना शेतातील पत्र्याच्या घरात अनेक अनुभवांना सामोरे जावे लागले. ना वीज ना पाणी. एकदा, एका मुलाला विंचू चावला. त्याला दवाखान्यात भरती करावे लागले. एका रात्रीचे बिल बावीसशे रुपये झाले.” संतोषच्या खिशात एकशे अडतीस रुपये होते. त्याने एवढे पैसे आणायचे कोठून? कोण देईल? त्याने काशीनाथ राठोड या शेतकऱ्याचे घर गाठले आणि सात रुपये टक्क्याने व्याजाचे पैसे आणले.

मग मात्र संतोषने गावात राहण्याचे, तेथे भाड्याने जागा घेण्याचे ठरवले. चार खोल्यांची जागा महिना दीड हजार रुपये भाड्याने मिळाली. संतोष सांगतो, भाडे दर महिन्याला वेळेवर देणे शक्य होई असे नाही. मालक घालून-पाडून बोलायचे. गेवराई शहरातच शिवाजीनगर भागात पुन्हा जागा बघितली. तेथे त्यांनी सहा वर्षें काढली. पैशांची नड असेच. अखेर, मालकाने एके दिवशी, रात्री सामानासह सर्वांना घराबाहेर काढले! ती रात्र त्यांनी सगळ्यांनी मंदिरात काढली.

_SaharaAnathalay_1.jpgसंतोषने अमरावतीचे डॉक्टर अविनाश सावजी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी त्यांचे मुंबईतील मित्र रमेशभाई कचोलिया यांना परिस्थिती सांगितली आणि त्यांनी संतोषच्या बँक खात्यात एक लाख रुपयांची मदत पाठवली. कमालीच्या अवघड वळणावर मिळालेला तो मदतीचा हात संतोषला हुरूप देण्यास पुरेसा ठरला! औरंगाबाद येथील तीन उद्योजकांनी तीन एकर जागा गेवराईजवळ घेऊन दिली. औरंगाबाद येथीलच रणजीत ककड यांनी तीन हजार चौरस फुटांची रेडिमेड बिल्डिंग बांधून दिली. मग डॉ.विकास आमटे यांनी ‘स्वरानंदवन’ या सांस्कृतिक कार्यक्रमातून इमारतीच्या अंतर्गत बांधकामासाठी अधिक मदत केली. त्यांनी त्यासाठी औरंगाबादला ‘सहारा’ अनाथालयाच्या मदतीकरता म्हणून संगीताचा विशेष कार्यक्रम आयोजित केला. त्या निधीतून ‘सहारा’अनाथालयाची इमारत पूर्ण स्वरूपात उभी राहिली.

संतोषने ‘आई जनहित बहुउद्देशीय सेवाभावी संस्था’ या नावाने संस्थेची नोंदणी 2007 साली केली. त्यांनी 2004 पासून सरकारी मदत मिळवण्यासाठी खटपट चालवली असून, अनुदानाचा प्रस्ताव सरकार दरबारी धूळ खात पडून आहे. संतोषला ‘सहारा’ अनाथालयाचा वाढता पसारा सांभाळता सांभाळता अनेकदा खचून जाण्यास होते. मात्र तशा वेळी त्या मुलांपैकीच अनेकांचे हात त्याचे डोळे पुसण्यास पुढे येतात.

‘सहारा’ अनाथालयात मुलांच्या अंगी कृतिशीलता बाणवली जाते. मुलेच अनाथालयातील बरीचशी कामे सांभाळतात. संतोषची पत्नी प्रीती गेली सहा वर्षें त्याला साथ देत आहे. संतोषची ओळख यवतमाळमधील प्रीती थूल या तरुणीशी झाली. प्रीती सधन घरातील आहे. तिने वकिलीचे शिक्षण घेतले आहे. संतोषला त्याच्या कामात तिच्या शिक्षणाचाही उपयोग होतो. त्या दोघांची ओळख आणि लग्न हा प्रवासही काही सहजासहजी घडला नाही. प्रीतीचे वडील ‘महावितरण’मध्ये अधिकारी आहेत, तर भाऊ बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरीला, तिची बहीण डॉक्टर आहे. आई-वडिलांना प्रीती समजावण्याच्या भानगडीत न पडता ‘सहारा अनाथालय’ दाखवण्यास घेऊन गेली. त्यांना अनेक मुलांचे पितृत्व निभावणारा ‘हा मुलगा’ त्यांच्या मुलीचा चांगला सांभाळ करील हे पटले आणि त्यांचा होकार लग्नाला मिळाला. संतोष आणि प्रीती यांचा संसार पहिल्या दिवसापासून असा मुला-बाळांनी भरलेला आहे. संतोष सांगतो, “माझ्या तीन मुलांची लग्न झाली आहेत, मला सुना-नातवंडे असा परिवार आहे.” तो तिशीत आजोबा आहे! असे आवर्जून सांगतो. गमतीचा भाग अलाहिदा, संतोषची संवेदनशीलता विलक्षण आहे. तो म्हणतो, “कायद्यानुसार वयाच्या अठरा वर्षांपर्यंत मुलांना अनाथालयात ठेवता येते. पण समाजातील कुटुंबांमध्ये थोडेच असे चित्र दिसते? आयुष्यभर सगळे एकत्रच राहतात की! त्यामुळे मला माझी मुले-बाळे जोडलेलीच आहेत. ती माझ्याबरोबर आयुष्यभर राहणार, काम करणार!”

संतोष आणि प्रीती एका बालग्रामची संकल्पना यशस्वीपणे उभारण्यासाठी झटत असतात. संतोष म्हणतो, “डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या शब्दांत सांगायचे तर सामाजिक उद्योजकता महत्त्वाची आहे. त्यांचे ते शब्द माझ्या डोक्यात ठाण मांडून आहेत आणि त्यासाठी मी आणि माझे सहकारी प्रयत्नशील राहणार आहोत. आम्ही संस्था स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने पावले टाकत आहोत.”

आनंद नाडकर्णी यांना संतोषची धडपड आठवते. ते ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’शी बोलताना म्हणाले, की संतोष औरंगाबाच्या ‘वेध’ला आला होता. त्यानंतर तो ठाणे ‘वेध’मध्येही आला. दोन्ही वेळी त्याला सर्वप्रथम मदत मिळवून देण्यात ‘वेध’चा वाटा होता. त्याने ‘वेध’च्या व्याख्यानात मदतीचे आवाहन केल्यावर प्रत्येकाने, अगदी लहान मुलांनीदेखील त्याला मदत केली. त्यावेळी साडेचार लाख रुपये जमा केल्याचे नाडकर्णी यांना आठवते.

_SaharaAnathalay_2.jpgसंतोष-प्रिती यांचे प्रयत्न ‘सहारा’ परिवारातील मुलांच्या शिक्षणाचा फायदा घेऊन स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करण्याचे आहेत. त्यांना त्यांचे सहकारी परमेश्वर, अर्जुन, बाळासाहेब, मंदा मावशी, पूजा मावशी, मोरे मावशी यांची मदत आहे. पुष्पा गोजे मावशी संस्थेत जेवण बनवण्याचे काम गेली आठ वर्षें करतात. संतोष सांगतो, सहारा’मधील वस्तू पाहिल्या, की एकेक आठवणी जाग्या होतात. वाटीपासून टेबलापर्यंत बऱ्याच वस्तू गोळा केल्या आहेत. प्रत्येक वस्तूमागे एकेक कथा आहे. खूप प्रयास आहेत. तेव्हाची हलाखीची स्थिती आठवते. कधी कधी, चार चार दिवस जेवायला मिळायचे नाही. आम्ही सर्वजण एका वर्षी तर वरण-भात आणि खिचडीवर तब्बल सतरा दिवस होतो.”

जनसंपर्क हा संतोष, प्रीती आणि सहकारी यांच्या जगण्याचा मुख्य धागा झाल्यामुळे मुलेही अनौपचारिक संवाद चांगला साधू शकतात. प्रीती वयाने फार मोठी नाही. पण ती आई, ताई, मैत्रीण या सगळ्या जबाबदाऱ्या उत्साहाने आणि परिपक्वतेने पार पाडत आहे. परिवारातील मोठ्या होऊ पाहणाऱ्या मुली तिला हक्काने प्रश्न विचारतात. प्रीती म्हणते, “बऱ्याचदा मी बुचकळ्यातच पडते. काय उत्तर द्यायचे ते पटकन समजत नाही. मग मी तशा वेळी, माझ्या आईने मला काय सांगितले होते ते आठवते आणि त्यांना समजावून सांगते. कधी पुस्तके वाचते. इंटरनेटवरून माहिती मिळवते आणि योग्य उत्तरे देते.”

संतोषला हे काम करताना गेल्या पंधरा वर्षांत दिवाळीला किंवा कोठल्याही सणाला घरी जाता आलेले नाही. संतोषच्या आईला ‘मातृत्व’ पुरस्कार ‘कर्तबगार मुलाची आई’ म्हणून मिळाला, त्या तेव्हा पहिल्यांदा गेवराईला आल्या होत्या.

संतोषच्या आयुष्यात पुस्तकांना मोठे महत्त्व आहे. त्यामुळे पुस्तक वाचनाचा संस्कार नकळत ‘सहारा’ कुटुंबातील मुलांवर होत आहे. ‘सहारा’तर्फे दरवर्षी पुस्तक दिंडी पुस्तके संकलित करण्यासाठी काढली जाते. मुलांना स्वावलंबन आणि कृतिशीलता यांचे धडे रोजच्या रोज गिरवावे लागतात. मुलांना रोजची छोटी-मोठी कामे वाटून दिली जातात. मुले कामे करतात. शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांचे रोजचे डबे भरणे हेसुद्धा मोठे आणि छान काम असते असे मुले सांगतात. मुलांचे प्रत्येक आठवड्याला गट पाडून त्यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातात. त्यातून दोन गोष्टी साध्य होतात असे संतोष सांगतो. प्रत्येक मुलावर श्रमप्रतिष्ठेचा आणि स्वावलंबनाचा संस्कार होतो. तसेच, कामामध्ये स्त्री-पुरुष असा भेदभाव नसतो हेही त्यांच्या मनावर बिंबवले जाते. ‘बालग्राम’ या माहितीपटाचे प्रकाशन डॉ.विश्वंभर चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. तो म्हणतो, “करिअर म्हणजेच यश हे समीकरण डोक्यातून काढून टाका. इतरांसाठीही काही करता येते याची अनुभूती घ्या. अशा कामातून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न ठेवा.” स्वानुभवातूनच असे सांगण्याचा हक्क संतोषने मिळवला आहे.

संतोष गर्जे आणि प्रीतीला आज पर्यंत सामाजिक कार्याबद्दल सत्तरच्यावर राज्यस्तरीय अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. संतोष गर्जे ‘मराठवाडा भूषण’ ठरलेला आहे.

‘आई - द ओरिजिन ऑफ लव्ह’ या ब्रीदवाक्याखाली सुरू झालेल्या ‘सहारा’ अनाथालय परिवाराचे आता ‘बालग्राम परिवार’ असे नामकरण करण्यात आले आहे. परिवारातील प्रत्येक लेकराला त्याच्या हक्काचे घर मिळाले आहे. त्याचबरोबर अनेक नाती मिळाली आहेत.

संतोष गर्जे  - 9763031020, santoshgrj414@gmail.com   

- अलका आगरकर रानडे
alakaranade@gmail.com

Last Updated On 18th Sep 2018

लेखी अभिप्राय

अचाट प्रयत्न!!कौतुकास्पद! त्रिवार वंदन!

अशोक28/08/2018

लेख खूप छान आहे ताई. खूप खूप आभारी आहोत

ओम kadpe 01/09/2018

खूप छान लेख॰
मी स्वत: बालग्रामशी जोड़ला गेलो आहे॰आणि तिथे जावून सर्व परिस्थिति माझ्या नजरेने पाहून आलो आहे॰

विजय जी चव्हाण01/09/2018

खूप सुंदर वर्णन केलंय संतोष सरांच्या धडपडीच, धन्यवाद अलका मॅडम

डॉ. जळबा01/09/2018

.खुप सुंदर

Akash22/09/2018

अनाथांचा नाथ.... भैय्या च्या धडपडी ला त्रिवार वंदन

Kailash Bondare22/01/2019

अलका मॅडम,खूप भैय्याच्या प्रवासाबद्दल लिहल्या बद्दल आपले खूप खूप आभार

Kailash Bondare22/01/2019

प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर एवढ्या खडतर परिस्थितीतून मार्ग काढत आपण अनाथांना ....सहारा .... दिला. आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे ...सलाम तुम्हाला व तुमच्या सहकारी टिमला.

BAPPASAHEB NAR…11/12/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.