मी नसताना... देहदान!


माणसाला जन्म एकदाच मिळतो; म्हणजे तो देह परत मिळत नसतो. तरीही माणूस मिळाल्या देहाचा योग्य तो उपयोग करत नाही. माणूस देवापेक्षा देहाचे लाड करतो. तो त्यावर अती प्रेम करतो. मात्र माणूस एका टप्प्यावर पोचला, की हतबल होतो! भा.रा. तांबे यांच्या कवितेची आठवण होते -

मी जाता राहील कार्य काय? | जन पळभर म्हणतील हाय हाय!
अशा जगास्तव काय कुढावे | मोही कुणाच्या का गुंतावे
हरिदूता का विन्मुख व्हावे  |  का जीरवू नये मातीत काय
पण नश्वरतेच्या त्याच जाणिवेने शेवटची ओळ बदलून मी म्हणेन -

का देऊ नये दान? काय माणसाने मृत्यूपूर्वी शरीरदान, अवयवदान करावे असे परोपरीने सांगितले जाऊनही माणसे मात्र जागी होत नाहीत याचे वाईट वाटते. मानवी प्रज्ञेमुळे संशोधन होते अन् संशोधनामुळे आविष्कार घडतात! अवयवरोपणामुळे किती जणांचे प्राण वाचतात! काहींना जग बघण्यास मिळते, काहींचा आजार बरा होतो. अशा अनेक प्रकारच्या संधी अवयवरोपणातून उपलब्ध होत आहेत. रक्तदान, किडनीदान असे काही गोष्टींचे दान मनुष्य जिवंत असतानाही करता येते; पण माणसाचे काही अवयव असे आहेत, की ते फक्त मरणानंतर दान दिले जाऊ शकतात. मेडिकल विद्यार्थ्यांना मनुष्यदेहाचा उपयोग ऑपरेशनकरता, अभ्यास-प्रॅक्टिकल प्रयोगासाठी करायचा असतो. त्यासाठी मानवी देहदान फारच महत्त्वाचे आहे. बेडूक किंवा गीनिपिग प्रयोगासाठी म्हणून वापरले जातात तेव्हा ते त्या त्या प्राण्याचे देहदानच असते, पण माणूस त्यांना पकडून ते त्यांच्याकडून करवून घेतो.

माझ्या वडिलांनी सांगितलेली माझ्या लहानपणीची एक गोष्ट आहे, एक गरीब माणूस होता, त्याच्याकडे जमिनीचा छोटा तुकडा होता. तो माणूस एवढीशी जमीन काय उत्पन्न देणार म्हणून नोकरी शोधत होता. पण तो काहीच शिकलेला नव्हता, त्यामुळे नोकरीही मिळेना. मग त्याने हमाली करण्याचे ठरवले, तो हमाली करू लागला. एके दिवशी, तो थोडा आजारी पडला, म्हणून देवळात गेला अन् देवाला म्हणाला, मी काय करू? अन् परत येऊन बाहेर देवळाच्या पायरीवर बसला. तो आजारी असल्यामुळे चादर खांद्यावर ओढून घेऊन बसला होता. नंतर कोणी भक्त तेथे आला. त्याला वाटले, की तो माणूस भिकारी आहे, म्हणून त्याने त्याच्या चादरीवर थोडे पैसे टाकले. मग मागून जो येईल तो थोडे पैसे त्याच्या चादरीत टाकत जात होता. तो माणूस आराम करून उठला, तेव्हा त्याने बघितले, की बरेच पैसे त्याच्या चादरीत पडलेले आहेत. मग त्याला वाटले, की हे बरे आहे की! काम कशाला करायचे? तो रोज तेथे येऊन बसू लागला. असे काही दिवस गेले. तेथे आणखी भिकारी येऊन बसू लागले, मग त्याची कमाई कमी होत होत काही दिवसांत त्याला उपाशी राहण्याची वेळ आली. तेव्हा तो परत देवाजवळ गेला अन् त्याला म्हणाला, माझ्या जवळ काहीच नाही.

त्यावर उलट, देव म्हणाला, ‘तुझ्याकडे खूप काही आहे, की. अरे, तू लाखोपती आहेस.’ तो माणूस म्हणाला, ‘ते कसे काय?’ देव म्हणाला, ‘मी तुला सांगतो, बघ. म्हणजे तुला पटेल, तू तुझा एक हात मला देऊन टाक. मी तुला पाचशे रूपये देईन, चालेल ना!’ तो म्हणाला, ‘छे, हे काय देवा!’ मग देव म्हणाला, ‘ठीक आहे. मग तू तुझा एक डोळा दे, मी तुला एक हजार रूपये देईन.’ तो म्हणाला, ‘अजिबात नाही.’ असे करता करता त्याच्या देहाच्या अवयवांची किंमत एक लाख रूपये एवढी झाली अन् मग देव म्हणाला, ‘मी तुला काय म्हणालो होतो की तू लाखोपती आहेस म्हणून, तेव्हा तू नाही म्हणालास.’ तो माणूस मनात सर्व काही समजला, की त्याने त्याच्या देहाची किंमत कधीच जाणलेली नाही. देह अनमोल आहे! अन् तो त्याची जमीन कसू लागला व सुखी झाला.

रामकृष्ण परमहंस यांनी स्वामी विवेकानंद यांना मोक्ष, मुक्ती यांबाबत दिलेले उत्तर समर्पक आहे. एकदा स्वामी विवेकानंद त्यांच्या गुरूंना म्हणाले, की मला मोक्ष द्या, मुक्ती द्या. त्यावर रामकृष्ण स्मित करत त्यांना म्हणाले, ‘अरे, तू एवढा स्वार्थी आहेस!’ स्वामीजींना त्याचा अर्थ आधी नीट कळेना. मग गुरूंनी त्यांना त्यांच्याबरोबर निरनिराळ्या राज्यांत, देशांत फिरवले, तेव्हा त्यांना समजले, की देशवासीयांना आधी ज्ञान दिले पाहिजे. तसेच, कर्म म्हणजे काय तेही नीट सांगायला पाहिजे. म्हणून मग त्यांनी ज्ञानयोग, भक्तियोग व कर्मयोग ही तीन पुस्तके लिहिली; अन् तेव्हा त्यांना गुरूंच्या त्या सांगण्याचा अर्थ नीटपणे कळला. कर्मयोग सोपा नाही. मानवी कल्याणासाठी त्याचे महत्त्व खूप आहे.

देहदान म्हणजे कर्मयोगच आहे हे आता बऱ्याच जणांना नीट समजले आहे. त्यामुळे मरणानंतरचेही ध्येय दिसते. देहदान हा मानवतेचा उत्कृष्ट आविष्कार आहे. तो दानाचा एक महान प्रकार आहे, जो गरीबही सहज करू शकतो. तेथे प्रश्न फक्त तन, मनाचाच आहे. ‘जीवो जीवस्य जीवनम्’मध्ये इतर प्राणी माणसाच्या उपयोगी पडतात. माणूस त्या प्राण्यांची अन्नाकरता हत्या करत असतो. मग माणसाने मरणानंतर तरी त्या सुभाषिताचा उपयोग करावा! शिवाय, येथे माणूसच दुसऱ्या माणसाला उपयोगी पडत असतो, म्हणजे बंधुभगिनींसाठीच. माणूस हे ‘विश्वचि माझे घर’ असे म्हणतो, पण तेवढी प्रगल्भता माणसात येणे आवश्यक आहे. ‘जगा आणि जगू द्या’ याचा मथितार्थ काही प्रमाणात तसाच आहे. माणूस विकासाकडे प्रवास करतो. त्यात आर्थिक, भौतिक, बौद्धिक, शारीरिक अन् आंतरिक विकास हे सर्व समाविष्ट आहेत. देहदान किंवा कोठलेही दान हे आंतरिक विकासाचे सर्वोच्च रूप आहे. ‘सा विद्या या विमुक्तये’ याचा अर्थ साधारणपणे सर्व माणसांना कळतो, पण काहींना मुक्त कशापासून व्हायचे हे नेमके आकळत नाही. जगात एकूण अंधकार सहा आहेत. ते म्हणजे : 1. अज्ञान, 2. असत्य, 3. पारतंत्र्य, 4. स्वार्थ , 5. भीती, 6. रोग. तेच माणसाच्या मनाला, बुद्धीलाही नाडतात; त्याच्या आंतरिक विकासात अडथळा बनतात. मुक्ती त्यांच्यापासून हवी असते.

दधिची नावाचे ऋषी फार पूर्वीच्या काळात होते. त्यांनी त्यांच्या हाडांचा उपयोग शस्त्रे बनवण्यासाठी करण्यात यावा ही इच्छा व्यक्त करून अंतिम श्वास घेतला होता. दुष्टांचा नाश हे त्यामागील उद्दिष्ट होते. त्यांनी त्यांच्या देहाचा सदुपयोग व्हावा म्हणून एक प्रकारे देहदानच केले होते! ते उदाहरण एकविसाव्या शतकातील माणसालाही प्रेरणा देणारे आहे. म्हणूनच, डोंबिवलीच्या देहदान स्वीकारणाऱ्या संस्थेने त्यांचे नाव ‘दधिची’ असे ठेवले आहे. त्या ऋषींची आठवण व त्यांच्या त्यागाची स्मृती या निमित्ताने गंधित राहील हा विचार त्यामागे आहे. डोबिवलीच्या दधिची संस्थेने देहदानाचे महान कार्य स्वीकारले आहे. त्या संस्थेचे अध्यक्ष विनायक जोशी आहेत, त्यांचे वय पंच्याहत्तर आहे, तरीही ते कार्यमग्न सतत असतात.

देहदान करण्याच्या बाबतीत विरोध भावनिक अडचण म्हणून होत असतो. पहिली अडचण म्हणजे परंपरा तोडण्याची, ते काहींच्या जिवावर येते. माणसांना चालीरीतींची सवय विळखा घालून एकविसाव्या शतकातही अशी बसलेली असते, की काहींच्या मनाला रुढीला विरोध करून नवी प्रथा सुरू करणे पटत नाही. आत्मा, मुक्ती अन् श्रद्धा या तिन्ही गोष्टींचा अभ्यास नीट केला तर त्यामुळे सर्व गोष्टींचा उलगडा लोकांना होईल. हिंदू धर्माने आधी अध्यात्म, मग विज्ञान हे प्रमाण मानले आहे. पण अध्यात्माने जसे चमत्कार घडतात तसे विज्ञानाने आविष्कार घडतात. त्यामुळे अध्यात्म व्यक्तिगत पातळीवर वापरावे व विज्ञान, सामाजिक पातळीवर उपयोजावे.

‘यश म्हणजे काय’ हे लेखिका शिल्पा खेर यांचे पुस्तक माझ्या वाचनात आले. त्यात दहा नामवंतांच्या मुलाखती तत्संबंधात घेतल्या आहेत. ‘पितांबरी’चे संचालक रविंद्र प्रभुदेसाई; तसेच, नितीन गडकरी यांच्याही मुलाखती त्यात समाविष्ट आहेत. त्या दोघांनीही आनंदात राहणे, माणसे जोडणे व त्यांना आनंद मिळवून देणे हेच यश मानले आहे. तेथेच माणसासमोरील अनेक प्रश्नांचे उत्तरही आहे. त्यामध्ये माझ्यासंदर्भापुरते सांगायचे तर देहदानामुळे ज्या व्यक्तीवर अवयवरोपण होऊन तिला नवीन जीवन लाभेल, नवी दृष्टी लाभेल. त्या व्यक्तीला किती आनंद होईल बरे? त्याचे सुख अवयवदात्या व्यक्तीलाच लाभणार ना!

दधिची संस्था 1987 साली कार्यरत झाली. संस्थेला तीस वर्षें झाली. तेवढ्या काळात तीन हजार सहाशे व्यक्तींनी त्यांच्या मार्फत देहदान केले आहे. मृत्यूनंतर सहा तासांत मृतदेह जवळच्या माहिती दिलेल्या ठिकाणी, म्हणजे मेडिकल कॉलेज किंवा हॉस्पिटल येथे पोचला पाहिजे. त्यांचा फॉर्म भरून झाल्यावर संबंधित व्यक्तीची अन् जवळचा नातेवाईक यांच्या सह्या आवश्यक आहेत. एवढ्या दोनच जबाबदाऱ्या देहदान करू इच्छिणाऱ्या व्यक्तीच्या व तिच्या कुटुंबीयांच्या असतात.

विनायक जोशी यांच्याप्रमाणेच पदाधिकारी सुरेश तांबे, श्रीराम आगाशे व बा.वा. भागवत हे देहदानाच्या प्रचारासाठी असेच अथक, अविरत कार्य करत आहेत.

दधिची संस्थेचा संपर्क - 9324324157

दधिची संस्थेशी संपर्क सायंकाळी 5:00 ते 6:30 दरम्यान साधता येईल.
डोंबिवलीची दधिची संस्था :- (फोन नं.0251-2490740/9969060945)

- नारायण पराडकर

nrparadkar9@gmail.com

लेखी अभिप्राय

Best article

Sand13/08/2018

खुपच सुंदर अप्रतीम ...

Ganesh Kurhade16/08/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.