ब्राह्मणांना शिव्या घाला आणि पुरोगामी व्हा!


_BramhananaShivyaGhala_AaniPurogamiVha_1.jpgबहुजन परिवर्तन यात्रेचा कार्यक्रम रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला होता. ती यात्रा बहुजनांमध्ये त्यांच्या हक्कांबाबत प्रबोधन घडवण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. दौरा राज्यव्यापी आहे. त्याचा रत्नागिरी यात्रा हा भाग होता. यात्रेचे आगमन रत्नागिरी येथे झाल्यानंतर सभा आयोजित करण्यात आली. सभेमध्ये बहुजन नेते वामन मेश्राम यांनी जे विचार मांडले, त्याबाबत काही चर्चा होणे आवश्यक आहे. ते म्हणाले, की  “ब्रिटिशांची सत्ता संपून भारतीय जनतेला जे स्वातंत्र्य मिळाले ते काही खरे स्वातंत्र्य नाही. कारण ब्रिटिश गेले आणि सत्ता ब्राह्मण समाजाने ताब्यात घेतली. पक्ष कोणताही सत्तेत असला, तरी सत्तास्थानी ब्राह्मणच असतात. त्यामुळे जनता त्यांना मतदानाच्या मार्गाने सत्तेवरून दूर करू शकत नाही. त्यासाठी बहुजन समाजामध्ये मतपरिवर्तन करून, त्यांची एकजूट घडवून आणली पाहिजे आणि त्यायोगे सत्तास्थाने ताब्यात घेण्याची चळवळ निर्माण केली गेली पाहिजे." त्यांच्या भाषणाचा तसा आशय होता. त्यांनी ब्राह्मण समाजाच्या विरूद्ध भाष्य केले. मात्र ते सत्ता ताब्यात असलेल्या अन्य जातींच्या विरूद्ध बोलले नाहीत. ब्राह्मणेतर समाजाचे संघटन ब्राह्मणांपासून सत्ता हिसकावून घेण्यासाठी गेली दीडशे वर्षें केले जात आहे. वामन मेश्राम हे त्या चळवळीतील तिसऱ्या किंवा चौथ्या पिढीतील असतील.

भारतात आजवरील अनुभव लक्षात घेतला तर, एकाच जातीच्या मतांवर कोणीही निवडून येऊ शकत नाही. तसेच, ब्राह्मण समाज संख्येने कमी आहे. ब्राह्मण समाजाला त्यांच्या संख्याबळाच्या जोरावर सत्ता ताब्यात घेणे शक्य नाही. तेव्हा सत्ता ब्राह्मणांना लोकशाही मार्गाने मिळत आली असेल, तर त्यात अन्य जातींची मदत असणे स्वाभाविक आहे. त्याशिवाय सत्तास्थाने ब्राह्मण समाज कशी काय मिळवतो? ब्राह्मणेतरांची संख्या ही देशात सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तरीही सर्व पक्ष ब्राह्मणांच्या ताब्यात आणि त्यायोगे सत्तास्थाने ब्राह्मणांकडे हे ब्राह्मणेतरांच्या मदतीशिवाय घडत नाही. त्याचा अर्थ, ब्राह्मणांनी अन्य जातींचा विश्वास संपादन केला आहे.

समाज सुधारणेच्या ज्या चळवळी देशात गेली सुमारे दोनशे वर्षें सुरू आहेत, त्यात ब्राह्मण समाज आघाडीवर आहे. शिवाय, ब्राह्मणांनीच जातिनिर्मूलनाच्या चळवळी सुरू केल्या. त्यांनी जे काही पारंपरिक ब्राह्मण्य होते तेदेखील नाकारले. राम मोहन रॉय, विवेकानंद, दयानंद सरस्वती, महाराष्ट्रात गो. ग. आगरकर, विनोबा भावे, गांधीवादी कार्यकर्ते आप्पासाहेब पटवर्धन, बाबा फाटक, मधू लिमये, नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी अशा अनेक नेत्यांनी त्यांचे सारे आयुष्य, ते ब्राह्मण आहेत हे विसरून जातिनिर्मूलनाच्या चळवळीसाठी वेचले आहे. समाजवादी चळवळ ही मूळ जातिनिरपेक्ष समाज उभारणीसाठी देशात सुरू झालेली आहे. साम्यवादी चळवळीदेखील या देशात भाई डांगे, रणदिवे, इ.एम.एस. नंबुद्रीपाद, ज्योती बसू आदी ब्राह्मणांनीच उभ्या केल्या आहेत. त्यांना ते ब्राह्मण आहेत याचा विसर केव्हाच पडला होता! ब्राह्मणच स्वातंत्र्यलढ्यात आघाडीवर होते असे नव्हे, तर अनेक बहुजनदेखील त्यात होते. तेव्हा ब्राह्मण स्वातंत्र्यलढा आणि त्यानंतरच्या अनेक चळवळी यांच्यामध्ये; अगदी बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळींतदेखील सहभागी होते. पहिल्या प्रथम, बाळशास्त्री जांभेकर यांनी महाराष्ट्रात जातिनिर्मूलनाच्या विचारांची मांडणी केली आहे. नंतर, महात्मा फुले यांनी त्यांची व्यापक चळवळ सुरू केली होती. आंबेडकर यांना समाजातून जातिनिर्मूलन करायचे होते. म्हणून त्यांनी जातिव्यवस्थेचा अभ्यास केला आणि जाती नाहीशा कशा करता येतील याचा विचार ‘अॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ या ग्रंथातून मांडला. त्यांना जाती नाहीशा करायच्या होत्या. मात्र आज तर जातिव्यवस्था अधिक बळकट आणि अधिक कर्मठ कशी होईल हेच पद्धतशीरपणे पाहिले जात आहे!

सत्ता बहुजनांच्या नावाखाली भोगता येते असे समीकरण तयार करणारे सत्तेचे डावपेच बहुजनांना एकत्र आणून करतात. मायावती यांनी ‘तिलक, तराजू और तलवार! इनको मारो जुते चार’ अशी घोषणा दिली. तिलक म्हणजे ब्राह्मण, तराजू म्हणजे बनिया आणि तलवार म्हणजे क्षत्रिय यांना फटकारले पाहिजे अशी घोषणा दिली. नंतर त्यांनीच त्यांच्या समीकरणात महत्त्वाचे स्थान ब्राह्मणांना दिले! त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातही स्थान ब्राह्मणांना दिले. भारतीय समाजाचे वैशिष्ट्य असे आहे, की तो काळानुसार बदलत आला आहे. त्याने अनेक कुप्रथांचा त्याग केला आहे आणि त्याची वाटचाल आदानप्रदानातून होत आली आहे. जातिव्यवस्था पूर्वीइतकी कर्मठ राहिलेली नाही.

तीदेखील बदलत आली आहे. आता तर, सत्ता दलित समाज आणि इतर मागासवर्गीय यांच्याशिवाय सांभाळता येत नाही. मराठी समाजाने राखीव जागांची मागणी केली, तेव्हा समाजाच्या अनेक घटकांनी बराच गजहब केला. सत्तास्थाने त्या समाजाच्या हाती गेली कित्येक दशके होती, तरीदेखील मराठा समाज राखीव जागा मागण्याइतका मागास कसा राहिला असाही सवाल केला जात आहे.

ब्राह्मण समाजाच्या काही चुका आहेतच. तरीही तो समाज अन्य समाजांच्या विकासाच्या आड येत नाही. त्याचे कारण, समाज परिवर्तनाची देशातील चळवळ उभी करण्यासाठी त्याच समाजातून प्रागतिक विचारांचे आणि समर्पित वृत्तीचे ध्येयवादी कार्यकर्ते आघाडीवर होते आणि आहेत. तेव्हा ब्राह्मण समाजाला शिव्या घालत बसू नये. त्यामुळे समाजात अकारण दुही तयार होते. त्या ऐवजी, बहुजन नेत्यांनी त्यांच्या समाजाची हानी समाजातील गटबाजी आणि व्यक्तिकेंद्रित राजकारण यामुळे होत आहे याचा नीट अभ्यास करून, ते दोष दूर कसे करता येतील ते पाहवे.

- भालचंद्र दिवाडकर
arundiwadkar1@gmail.com

(दैनिक सागर, चिपळूण वरून उद्धृत)

Last Updated On 22nd Sep 2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.