रंगभूमीचे मामा - मधुकर तोरडमल


_RangbhumecheMama_MadhukarToradamal_1.jpgप्राध्यापक मधुकर तोरडमल म्हणजे मराठी रंगभूमीवर प्रसिद्ध मामा तोरडमल. त्यांचा जन्म 24 जुलै 1932 रोजी झाला. मधुकर तोरडमल यांच्या नाट्याभिनयाची सुरुवात ही त्यांच्या मुंबईतील शाळेपासून झाली. ते दहा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे काका मुंबईत सांताक्रुझ पोलिस ठाण्यात अधिकारी होते. काकांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी मुंबईत आणले. ‘शेठ आनंदीलाल पोद्दार’ ही त्यांची शाळा. त्यांनी शाळेत पहिल्या दिवशी ओळख करून देताना, त्यांना नाटकात काम करण्याचा छंद असल्याचे वर्गशिक्षक जयकरबार्इंना सांगितले. बार्इंनी गणेशोत्सवात एका नाटकाची जबाबदारी त्यांच्यावरच सोपवली. त्यांनी चिं.वि. जोशी लिखित ‘प्रतिज्ञापूर्ती’ हे नाटक बसवले. त्यांनी दिग्दर्शन आणि अभिनयही केला. पुढे, शाळेचे स्नेहसंमेलन आणि अन्य कार्यक्रम यांतून नाटक बसवण्याची जबाबदारी ओघानेच तोरडमल यांच्याकडे आली. त्यांनी ती यशस्वीपणे पारही पाडली.

तोरडमल यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ कुर्ला येथे ‘प्रीमियर ऑटोमोबाइल’ कंपनीत ‘लिपिक’ म्हणून काम केले. त्यानंतर ते इंग्रजीचे प्राध्यापक अहमदनगर येथील महाविद्यालयात झाले. त्यांचे इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांवर प्रभुत्व होते. त्यांनी त्या काळात ‘भोवरा’, ‘सैनिक नावाचा माणूस’ आदी नाटके केली. ते राज्य नाट्य स्पर्धेतही सहभागी झाले. त्यांनी ‘एक होता म्हातारा’ हे नाटक स्पर्धेत सादर केले होते. त्या नाटकात त्यांनी साकारलेल्या ‘बळीमामा’ या भूमिकेमुळे त्यांना ‘मामा’ हे नाव मिळाले. ते अवघ्या मराठी नाट्यसृष्टीचे ‘मामा’ झाले. त्यांना त्यांचे नाव राज्य नाट्य स्पर्धेतून झाल्यामुळे व्यावसायिक रंगभूमीकडून विचारणा होऊ लागली. ते प्राध्यापकाची नोकरी करून नाटक करत होते. तोरडमल नोकरी सोडून मुंबईत आले आणि त्यांनी तेथे रंगभूमी क्षेत्रात नावलौकिक मिळवला.

त्यांनी त्यांच्या उत्तर-आयुष्यातील आठवणी ‘उत्तरमामायण’ नामक पुस्तकात सांगितल्या आहेत. तोरडमल यांची स्वतःची ‘रसिकरंजन’ नावाची नाट्यसंस्था होती. तोरडमल यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शन केलेल्या ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकाचे पाच हजारांहून अधिक प्रयोग झाले आहेत. तोरडमल त्या नाटकात प्रोफेसर बारटक्क्यांची भूमिका करत. त्या नाटकावर टीका झाली, परंतु झाले भलतेच, लोकांनी त्यांचे नाटक इतके उचलून धरले, की त्याचे प्रयोग लोकांच्या मागणीने होऊ लागले. नाटकाला समीक्षकांच्या टीकेचा फायदाच झाला. त्या नाटकाचे पुण्याच्या ‘बालगंधर्व नाट्यगृहा’मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारी 1972 रोजी सकाळ, दुपार, रात्र असे तीन प्रयोग झाले. ती गोष्ट त्या काळात ‘आश्च र्य’ समजली गेली. सकाळच्या प्रयोगाला शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे, दुपारी ग. दि. माडगूळकर आणि रात्रीच्या प्रयोगाला वसंत देसाई ही दिग्गज मंडळी सहकुटुंब हजर होती. तोरडमल यांनी ‘गुड बाय डॉक्टर’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘चांदणे शिंपित जाशी’, ‘बेईमान’, अखेरचा सवाल’, ‘घरात फुलला पारिजात’, ‘चाफा बोलेना’, ‘म्हातारे अर्क बाईत गर्क’ अशी नाटके केली. त्यांनी ‘संगीत मत्स्यगंधा’ या नाटकात साकारलेला ‘भीष्म’ही गाजला. त्याशिवाय तोरडमल यांनी अभिनय अन्य नाटकांतूनही केला आहे. त्यांनी त्यांच्या ‘गुड बाय डॉक्टर’ या नाटकात एक विलक्षण व्यक्तिमत्त्व उभे केले, की त्यामुळे प्रेक्षकांच्या मनाचा थरकाप उडत असे, त्या नाटकाची कन्सेप्टच इतकी भन्नाट होती, की अनेकांना ती पचली नाही. विद्रूप चेहऱ्यामागील मन आणि त्या मनाची धारणा मराठी रंगभूमीला नवीन होती. त्यांनीच ‘गुड बाय डॉक्टर’ हे नाटक लिहिले होते. त्याचप्रमाणे, त्यांनी ‘भोवरा’ आणि ‘काळे बेट लाल बत्ती’ ही नाटके लिहिली. त्यांचे ‘तिसरी घंटा’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले होते. त्यांना विनोदी नाटकाच्या नावाने होणारा धांगडधिंगा मान्य नव्हता. ते कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जात.

मधुकर तोरडमल यांनी अगाथा ख्रिस्ती यांच्या पुस्तकांचा अनुवाद केला. त्यांनी शेक्सपीयर यांच्या पुस्तकांचे खूप वाचन केले होते. त्यांनी ‘आयुष्य पेलताना’ ही रूपांतरित कादंबरी लिहिली. त्यांनी काम केलेला कमलाकर तोरणे दिग्दर्शित ‘ज्योतिबाचा नवस’ हा पहिला चित्रपट. त्यानंतर त्यांनी ‘सिंहासन’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘राख’, ‘आपली माणसं’, ‘आत्मविश्वास’, ‘शाब्बास सूनबाई’ हे मराठी चित्रपटही केले. तोरडमल यांचे निधन 2 जुलै 2017 रोजी मुबंईत बांद्रे येथे झाले.

- सतीश चाफेकर
satishchaphekar5@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.