पश्चिमी क्षत्रपांची नाणी! – पुस्तकाची कहाणी


_PashhimiKshatrapanchiNani_PustakParikshan_1.jpg‘पश्चिमी क्षत्रपांची नाणी’ या पुस्तकाच्या निर्मितीतील मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठापर्यंतचा प्रवास हा एखाद्या फिरस्तीपेक्षा कमी नव्हता! तीनशेपन्नास वर्षांतील क्षत्रपांच्या राज्याचा तो प्रवास करणे फार रंजक होते, त्यांनी माळवा-गुजरात पासून जरी राज्यास सुरुवात केली असली तरी त्यांनी त्यांची सत्ता महाराष्ट्रातही वाढवली. त्यांच्या त्या इतिहासाचे पुरावे शोधून संकलित करणे हे फार स्फूर्तिदायक होते. त्या प्रवासात क्षत्रपांचे विविध पैलू नजरेस पडले. क्षत्रप हे आगंतुक होते, बाहेरदेशांतून भारतात आलेले होते. त्यांनी त्यांची सत्ता जवळ जवळ तीनशेपन्नास वर्षें सलग गाजवली आणि त्यांच्यासमोर सातवाहनांसारखा बलाढ्य शत्रू होता. तो इतिहास अभ्यासताना सर्वात जास्त मदतगार ठरली ती क्षत्रपांच्या राज्याचे प्रतिनिधित्व करणारी त्यांची नाणी. त्याच नाण्यांचे महत्त्व सांगणारे छोटेखानी पुस्तक आहे ‘पश्चिमी क्षत्रपांची नाणी’.

मी दहावीत असताना पुस्तक लिहिण्याचा विचार सुरू केला. तो बहुतेकांना मुळातच मूर्खपणा वाटला आणि काहींना आश्चर्य! मी नववीत होतो तेव्हा मला नाणी संग्रहाचा वेडा छंद लागला. तो छंद वेडा आहे हे संग्रह सुरू केल्यानंतर कळले, पण त्यात मिळणारा आनंद हा शब्दांत सांगणे कठीण. संग्रह वाढत होता; पण जे करतोय त्याचे ज्ञान नाही, त्याचा अभ्यास नाही, मग काय उपयोग? विचार केला, की छंद हा जर शेवटपर्यंत फक्त छंद राहिला तर त्यात मजा नाही. त्या विषयाचा अभ्यास असावा. मग पुस्तकांचा शोध सुरू केला, पुस्तकांच्या शोधात भटकू लागलो. जेथील माहिती मिळाली मग तेथे जाऊ लागलो, शेवटी, काही पुस्तके मिळाली, पण फक्त काही! बोटावर मोजण्याइतकी पुस्तके हाती लागली, त्यात मराठी पुस्तके तर नव्हतीच, म्हणायचे. वाईट वाटले! प्रश्न पडला, मराठीत अभ्यासविषयांवर इतकी कमी पुस्तके का? बाहेर देशांतील अभ्यासक भारतात येऊन येथील इतिहासावर भाष्य करू शकतात, मग भारतीय/मराठी लोक ते काम का नाही करत? पुस्तके वाचू लागलो आणि माझा कल नाणकशास्त्राकडे वळत गेला, नाणकशास्त्र हा फार कठीण आणि फार खोल विषय आहे.

मी आणखी पुस्तकांच्या शोधात भटकू लागलो, अजून कोठे काय नाण्यांबद्दल वाचण्यास मिळेल ते शोधू लागलो. पुस्तकांच्या शोधात मला लवकर चांगले आणि वाईट असे दोन्ही अनुभव आले. फक्त पुस्तकांसाठी काही वेळा माझ्याकडील दुर्मीळ वस्तू मला द्याव्या लागल्या आणि त्याच्या बदल्यात मिळाली ती पुस्तकाची झेरॉक्स! आज, मी पुस्तक उपलब्ध करू शकतो, पण ती वस्तू नाही याची खंत आहेच!

मी क्षत्रपांबरोबर सातवाहनांबद्दलही वाचू लागलो. त्यात क्षत्रपांच्या नहपान राजाचा पुन्हा पुन्हा व प्रामुख्याने उल्लेख येत होता. माझ्या हातात क्षत्रपांचे पहिले नाणे आले ते नहपानाचेच, त्या नाण्यांवरील नहपानाचा चेहरा पाहून अंगात स्फूर्ती संचारल्यासारखे वाटले. मी त्याचे मोठे डोळे, बाकदार नाक आणि त्याचा तो डौल पाहून त्याच्याकडे आकर्षित झालो आणि क्षत्रपांची नाणी व इतिहास अभ्यासला पाहिजे असे वाटू लागले. मी माझ्या स्वतःसाठी अभ्यास सुरू केला. मला त्या नाण्यांबद्दलची काही इंग्रजी पुस्तके मिळाली, ती मी बारकाईने अभ्यासली. माझा त्यातील रस आणखी वाढत गेला. क्षत्रपांची नाणी वाचण्यासाठी महत्त्वाची होती ती, त्या नाण्यांवर असणारी ब्राह्मी लिपी. मग मी स्वतः ब्राह्मी लिपी शिकणे सुरू केले. शाळेचा अभ्यास सुरू होताच.

मी माझ्या ओळखीत असलेल्या त्या क्षेत्रातील तज्ञांना ‘तुम्ही यावर पुस्तक लिहा ना’ अशी विचारणा करू लागलो, पण कोणाकडून सकारात्मक प्रतिसाद येईना. एका तज्ञाने मला सांगितले, की “प्रत्येक संग्राहक हा अभ्यासक नसतो आणि तो होऊही शकत नाही", मला ती गोष्ट पटली. पण त्यावर प्रश्न असा होता, की प्रत्येकाने जर असा विचार केला तर मग आमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी शिकायचे कोठून? त्या घडीपर्यंत तरी पुस्तक लिहावे असा विचार माझ्या मनातही नव्हता. आई-वडिलांना त्यातील फार माहिती नव्हती. पण मी त्यांच्याशी त्या विषयाबद्दल फार बोलायचो आणि अजूनही बोलतो, मग तेच मला म्हणाले, ‘अरे, तू का लिहीत नाहीस मग पुस्तक?’ ते ऐकल्यानंतर तर बोलायलाच नको अशी माझी अवस्था झाली. ‘न्यूनगंड’ नावाचा प्रकार माझ्यात ठासून भरलेला होता. मी कोठलीही गोष्ट करण्याआधी त्यावर लोक काय म्हणतील हा विचार करायचो. इतके मोठे तज्ञ लोक आहेत, अभ्यासक आहेत, त्यांच्यासमोर मी काय? आणि मी जर पुस्तक लिहिले तर ते काय म्हणतील? मी तर अजून बारावी पासही झालेलो नाही! हे सर्व मोठे प्रश्न माझ्यासमोर होते. मी त्या विषयावर पुस्तक लिहिणे म्हणजे शिवधनुष्य उचलणेच होते! मी माझ्यासाठी नोट्स काढलेल्या होत्या, पण त्या लेखक म्हणून पुस्तकात मांडणे मला कठीण वाटत होते.

_Aashutosh_Patil_1.jpgमी मला नाणी अभ्यासताना आलेल्या अडचणी ध्यानी घेतल्या, त्यावरील उत्तरे पाहू लागलो. मी नाण्यांवरील चिन्हे ओळखताना आलेल्या अडचणींवर उपाय शोधू लागलो. मी सर्व चिन्हे नावानिशी कागदावर काढली. अडचण नाण्यांवरील राजांची नावे वाचण्याची होती. त्यासाठी मी प्रत्येक नाव ब्राह्मी ते देवनागरी लिप्यंतर करू लागलो, त्याचा पूर्ण ‘चार्ट’ तयार केला. नाणे कसे वाचावे, त्यासाठी मी चित्रे काढली. नाण्यांवरील कालोल्लेख वाचणेही फार अवघड गोष्ट. त्यासाठीही तक्ता तयार केला आणि ती कशी वाचावी हे सर्व लिहून काढले. मी तेवढे काम झाल्यानंतर ते काही तज्ञांना दाखवले. त्यांना ते आवडले. काहींनी त्याच्या झेरॉक्स काढून घेतल्या. मग वाटले, चला, मी काहीतरी चांगले करतोय! न्यूनगंड कमी झाला. माझे काम पुस्तक म्हणून नावारूपास येऊ शकते असे वाटू लागले! आणखी काम करत गेलो, लिखाण चांगल्या प्रकारे होऊ लागले होते. मला माझे पुस्तक प्राथमिक-नाणी संग्राहकांना उपयोगी होईल असे तयार होण्याच्या मार्गावर दिसत होते. मी संग्राहकाला नाणी अभ्यासताना काय अडचणी येतात ते जाणून होतो आणि मी ते सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे करत होतो. त्या लेखनास एक वर्षाचा कालावधी लोटला. पुस्तकाची कच्ची प्रत तयार झाली होती. लिहिलेले सर्व माझ्या ज्ञानाप्रमाणे अचूक होते, चुका असणार हे निश्चित होते. मी पुस्तकाची कच्ची प्रत अमितेश्वर झा यांना दाखवली. त्यांना काम आवडले पण त्यांनी मला पुस्तक अजून काही काळानंतर प्रकाशित करावे असा सल्ला दिला. नाणकशास्त्रासारख्या कठीण विषयात आणि त्यातल्या त्यात पश्चिमी क्षत्रप या विशिष्ट विषयात काम करून दहावी-अकरावीचा एखादा मुलगा पुस्तक सादर करेल तर त्यात वाचकांना विशेष तर वाटणारच होते! मग मी आणखी काही काळ त्यावर काम केले. मी झासरांनी सुचवलेल्या त्रुटी दूर केल्या. आता, लिखित संहिता ठीक वाटत होती, मग मी काही प्रकाशकांकडे पुस्तक प्रकाशनासाठीची विचारणा केली, पण बाकीच्यांना पुस्तक प्रकाशनाच्या येणाऱ्या अडचणी मला कधीच आल्या नाहीत, मी ऐकून होतो, की प्रकाशक नवीन लेखकांचे पुस्तक छापत नाहीत आणि अशा विशिष्ट विषयांचे तर नाहीच! पण मी औरंगाबादेतील काही प्रकाशकांना याकरता विचारणा केली, तर ते लगेच तयार झाले. पण माझी इच्छा होती, की  पुस्तक प्रत्येक अभ्यासक आणि संग्राहक यांच्यापर्यंत पोचावे आणि त्यासाठी मी पुण्यातील काही प्रकाशकांना मेल केले. जवळ जवळ सर्वांचे सकारात्मक प्रतिसाद आले. मी माझे पुस्तक पुण्यात एका प्रदर्शनावेळी ‘मर्व्हन टेक्नॉलॉजी’च्या मनोज केळकर यांना दाखवले, त्यांना ते आवडले. त्यांनीच ते प्रकाशित करण्याचे ठरवले. त्यानंतर पुस्तकातील बऱ्याचशा चुका दुरुस्त झाल्या. त्यात ‘टिळक विद्यापीठा’तील मंजिरी भालेराव यांची फार मदत लाभली. पुस्तकात चांगले फोटो टाकण्यात आले. पुस्तकाचे संपादन आणि प्रूफ रीडिंग करण्यात आले. पुस्तकाचे कव्हर निश्चित करण्यात आले आणि तशा सर्व प्रवासातून ‘पश्चिमी क्षत्रपांची नाणी’ हे छोटेखानी पुस्तक प्रकाशात आले! त्या सर्व गोष्टी जमवण्यात आणखी एक वर्षाचा कालावधी लोटला. बस्ती सोळंकी आणि पुणे कॉइन सोसायटी यांच्या सहकार्याने ‘पश्चिमी क्षत्रपांची नाणी’ हे पुस्तक ‘कॉईनेक्स, पुणे 2017’ या कार्यक्रमात 15 डिसेंबर 2015 या दिवशी प्रकाशित झाले!

पुस्तकात त्या राज्यकर्त्यांच्या माहिती असलेल्या बत्तीस राजांच्या नाण्यांची माहिती दिलेली आहे. त्या राज्यकर्त्यांनी त्यांच्या नाण्यांवर इसवी सन टाकण्याची पद्धत सुरू केली. नाण्यांवर ब्राम्ही व खरोष्टी लिपींतील लेख आढळतात. पुस्तकात त्या लेखांचे देवनागरी लिप्यंतर दिलेले आहे. तसेच, प्रत्येक नाण्याचा प्रकार, वजन आणि नाण्याच्या पुढील व मागील बाजूचे वर्णन अशी सविस्तर माहिती दिलेली आहे.

पुस्तकाने दिलेला अनुभव मला फार काही शिकवून गेला. मला तो माझ्या पुढील आयुष्यासाठी मदतीचा राहील! मला क्षत्रपांच्या नाण्यांचा इतिहास मांडताना फार आनंद झाला, अशासाठी की ते क्षत्रपांच्या नाण्यांवरील मराठीतील पहिले पुस्तक आहे. तेही माझ्या लेखणीतून अवतरले आणि ते अभ्यासकांना नाणी अभ्यासण्यासाठी मदत करत आहे, करत राहणार आहे. मला ती नाणी अभ्यासताना ज्या अडचणी आल्या त्या यानंतर कोणालाही येणार नाहीत याबद्दल मी अत्यंत आनंदी आहे. अर्थात त्यांना यापुढील प्रश्न पडतील, पण मी पाया तर रचला!

पश्चिमी क्षत्रपांनी इसवी सनाच्या पहिल्या ते चौथ्या शतकापर्यंत भारतात राज्य केले. क्षत्रप राज्यकर्त्यांची क्षहरात आणि कार्दमक अशी दोन घराणी होती.  

क्षत्रपांच्या नाण्यांविषयी सविस्तर आणि अद्ययावत माहिती देणारे हे मराठीतील पहिलेच पुस्तक आहे. हे पुस्तक पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना; तसेच, नाण्यांबद्दल शिकणाऱ्या, नाणी अभ्यासकांना महत्त्वपूर्ण ठरत आहे.

मी माझा क्षत्रपांपासून सुरू झालेला हा प्रवास असाच चालू राहील याची खात्री बाळगतो. मी याच प्रकारे नवनवीन माहिती वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी कटिबद्ध राहीन!

- आशुतोष पाटील

लेखी अभिप्राय

खुप छान लेख आहे. मी सुद्धा सातवाहन साम्राज्य यावर लिखाण करीत आहे. आणि शक म्हणजेच क्षत्रप या वरील हे पुस्तक माझ्या संग्रही आवर्जून असावे. मला हे पुस्तक कुठे मिळेल.

रोशन कदम 25/07/2018

congratulations my dear friend. I have not read this book but from above discription it seems that the book is very interesting. Again congratulations and keep it up

vivekanand barde26/07/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.