मोत्यांची शेतकरी - मयुरी खैरे


थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हा प्रकल्प गावोगावच्या कर्तबगार व्यक्तींचा सातत्याने शोध घेऊन ती माणसे समाजासमोर मांडत अाहे. त्या शोधाला परिसराचे बंधन नाही. त्यातूनच महाराष्ट्राबाहेरच्या व्यक्तींच्या नोंदी करणे शक्य झाले. अाजच्या ‘प्रज्ञा-प्रतिभा’ या सदरामध्ये महाराष्ट्राबाहेर जाऊन ‘मोत्यांची शेती’ यासारख्या वेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या मयुरी खैरे-अांबटकरच्या संघर्ष अाणि जिद्दीची कहाणी मांडत अाहोत.

_MotyanchiShetkari_MayuriKhaire_2.jpgमयुरी खैरे ही बुलढाण्याच्या मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली मुलगी. वय वर्षे केवळ पंचवीस! एमपीएससीची परिक्षा पास होऊन सरकारी नोकरी करावी अशी तिची इच्छा! मात्र तिच्या मनाचा अोढा तिला थेट शेतीकडे घेऊन गेला. तीदेखील साधीसुधी शेती नाही, मोत्यांची शेती! मयुरीने व्यवसायाची सुरूवात केली ती मध्यप्रदेशात. तिथे काही लक्ष रुपयांमध्ये उत्पन्न मिळवल्यानंतर तिने गुजरातमध्ये शेतीचा नवा प्रकल्प सुरू केला अाहे. मयुरी तिच्या व्यवसायामुळे चर्चेत अाली. देशभर विविध कॉन्फरन्समध्ये जाऊन भाषण देऊ लागली. इच्छुक मंडळींना ‘पर्ल फार्मिंग’चे धडे देऊ लागली. मात्र सांगूनही खरे वाटू नये असा भूतकाळ मयुरीने पाहिला अाहे. ही यशस्वी उद्योजक काही वर्षांपूर्वी अाजाराने इतकी खंगून गेली होती, की तिने अात्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र मयुरीने जिद्दीच्या जोरावर दुर्बल मन:स्थितीकडून अात्मविश्वासाने सळसळत्या उद्योजक तरूणीपर्यंतचा जो टप्पा गाठला, तिथपर्यंतचा प्रवास फार रोचक अाहे.

मयुरीचे अाईवडील नोकरदार. वडील लक्ष्मण खैरे बँकेत नोकरी करत, तर अाई ज्योती खैरे अारोग्य खात्यात कामाला. भाऊ अाशुतोष बारावीच्या अभ्यास गुंतला अाहे. मयुरीची शहरात जाऊन शिकून स्वत:च्या पायावर उभे राहण्याची फार इच्छा होती. ती तशी अौरंगाबादला महाविद्यालयीन शिक्षणासाठी 2008 साली गेली. मात्र तिथे तिला किडनीचा त्रास उद्भवला. अाईवडीलांनी अौरंगाबादला धाव घेतली. मोठमोठे डॉक्टर केले, मात्र कुणीच तिच्या अाजाराचे निदान करू शकले नाही. मयुरी अाणि तिचे कुटुंबिय अौषधे-तपासण्या-रिपोर्ट यांच्या जंजाळात सापडले. अखेर तिच्या पालकांनी तिला माघारी बुलढाण्याच्या घरी अाणले. त्यापुढची सहा वर्षे मयुरी अाणि तिच्या कुटुंबियांसाठी यातनामय होती. मयुरीने अाजारपणामुळे पाच वर्षे झोपून काढली. तिच्यावर अनेक अौषधोपचार झाले, मात्र गुण अाला नाही. मयुरी अभ्यासात हुशार होती. तिने बारावीची, तसेच पदवी परिक्षादेखील घरून दिली अाणि उत्तीर्ण झाली. पण तिच्या प्रकृतीत उतार नव्हता. तिला सगळ्याच शारीरीक गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागे. तिची अवस्था एवढी खराब होती की, तिला ती दुसऱ्या दिवशी जिवंत असेल याची शाश्वती नसे. मयुरीच्या उपचारासाठी कुटुंबियांना बऱ्याच खस्ता खाव्या लागल्या. मोठा खर्च झाला. ती बाब तिला सतत बोचत असे. हा पैसा लहान भावाच्या उपयोगाला येऊ शकेल अाणि कुटुंबियांमागचा त्रासही दूर होईल अशा अविचाराने मयुरीने झोपेच्या गोळ्या खाऊन अात्महत्येचा प्रयत्न केला. मात्र ती तिच्या अाईच्या तत्परतेमुळे वाचली. अाईवडील अाणखीनच जागरूक झाले. ते मयुरी झोपताना तिचे हात स्वत:च्या हाताला बांधून ठेवत किंवा तिच्या रात्रभर तिच्या उशाशी बसून राहत.

मयुरीच्या प्रकृतीत 2013 साली चांगली सुधारणा झाली. तिच्या मनात अायुष्यातील शिकण्याची, नवनव्या गोष्टी पाहण्याची महत्त्वाची वर्षे निघून गेल्याची खंत होती. त्या काळात तिचे सारे मित्रमैत्रिणी, भवतालचे जग पुढे निघून गेले अाणि ती मागे राहून गेली अशी भावना तिला सतत नाउमेद करत होती. मयुरीला अाजारपणात वाचनातून विरंगुळा लाभे. तिला वाचनातून भेटल्या सिंधुताई सपकाळ. स्वत: बेघर असताना इतरांना छत मिळावे याची चिंता करणाऱ्या सिंधुताईंची कहाणी मयुरीला भावली. जोडीला प्रकाश अामटे पुस्तकातून भेटले. तिने त्या व्यक्तीमत्त्वांकडून प्रेरणा घेत नव्या उमेदीने पुढे जायचे ठरवले. ती अाईवडीलांची परवानगी घेऊन पुण्यात अाली. तिच्या वडीलांना तिच्या तब्येतीची फार काळजी वाटत होती. त्यांचा अाग्रह होता की, तिने बुलढाण्यात राहून शिकावे, मात्र मयुरीला एमपीएससीची परिक्षा देऊन सरकारी नोकरी मिळवण्याचा विचार योग्य वाटत होता. त्या निर्णयामागे कुटुंबाला तिचा अभिमान वाटेल असे काहीतरी करण्याची भावना होती.

_MotyanchiShetkari_MayuriKhaire_3.jpgमयुरीचा अभ्यास सुरू झाला. तिला नवे मित्र मिळाले. मात्र अजूनही काहीतरी कमी असल्याचे तिला सतत वाटत राहिले. मयुरीला समाजभिमुख काम करण्याची निकड वाटू लागली. तिने मित्रांसोबत ‘ऊर्मी’ नावाची सामाजिक संस्था स्थापन केली. मयुरीने ‘डिजिटल लिटरसी'चा मुद्दा घेऊन काम करण्यास सुरूवात केली. त्या कामादरम्यान तिची सिंधुताई सपकाळ यांच्याशी ओळख झाली. त्यांनी तिला मानसकन्या मानले अाहे. मयुरी पुण्यात असताना शनिवार-रविवार त्यांच्या अाश्रमात जात असे. पुढे तिला प्रकाश अामटे यांनाही भेटण्याची संधी मिळाली. ‘ऊर्मी’चे काम दीड वर्षे चालून थांबले. मात्र त्या काळात अभ्यास, मित्र, सिंधुताई यांचा सहवास या गोष्टींनी मयुरीला अाश्वस्त केले. तिचा हरवलेला अात्मविश्वास तिला हळुहळू पुन्हा गवसला. मात्र तरीही काहीतरी कमी असल्याची रूखरूख तिच्या मनातून जात नव्हती.

त्या काळात मयुरीच्या वाचनात मोत्यांची शेती या विषयावरील लेख अाला अाणि तिची झोप उडाली. तोपर्यंत मयुरीचा शेतीशी कसलाच संबंध नव्हता. तिच्यासाठी मोत्यांची शेती ही कल्पना नवी होती. मात्र तिचे मन त्या विषयाचा ध्यास सोडायला तयार होईना. एमपीएससी ऐवजी ही शेती करावी असे तिचे मन सांगू लागले. (अाजही मयुरीला ते अाकर्षण कशापोटी निर्माण झाले ते सांगता येत नाही!) तिने घर गाठले अाणि ही कल्पना अाईवडीलांना सांगितली. अाईवडील थोडे चिंतीत झाले. त्यांच्याकडे शेतीसाठी जमिन नव्हती. मयुरीने म्हटले की, ‘‘अाजारपणाने माझ्याकडून बऱ्याच गोष्टी हिरावून घेतल्या. अाता मला थोडे माझ्या कलाने जगू द्या.’’ अाईवडीलांनी होकार दिला. मयुरीने माहिती काढली. ‘पर्ल फार्मिंग’चे प्रशिक्षण CIFA (Central institute of fresh water Aquaculture) या भुवनेश्वर येथील संस्थेत दिले जाते असे कळले. मयुरी अाणि तिचे वडील भुवनेश्वरला पोचले. मात्र मयुरीचे कमी वय अाणि मर्यादीत जागा अाड अाल्या. तिला त्या कोर्सला प्रवेश नाकारण्यात अाला. पण मयुरीला तिथे भेटले हरी यादव. तिला कळले की, त्यांची उत्तर प्रदेशमध्ये मोत्यांची शेती अाहे. यादव यांना महाराष्ट्रातून एवढ्या दूर अालेल्या त्या मुलीचे कौतुक वाटले. त्यांनी मयुरीला धीर दिला. त्यांनी तिला त्या शेतीचे तंत्र शिकवण्याचे स्वत:हून मान्य केले. मयुरी अाणि तिचे वडील भुवनेश्वरवरून थेट मुगलसराय येथे गेले. मयुरीने तेथे तीन दिवस राहून मोत्यांच्या शेतीची माहिती घेतली. मयुरी माघारी पुण्यात अाली तोपर्यंत मोत्यांची शेती करण्याचा तिचा विचार पक्का झाला होता. मात्र शेतजमिनीची अडचण होती. तेव्हा तिचे बोलणे इंदोरमध्ये राहणाऱ्या शुभमसोबत झाले. तिची मोत्यांच्या शेतीची कल्पना ऐकून शुभम म्हणाला, ‘‘अामची इथे जमिन अाहे. तुला काही करायचे असेल तर तू इथे करू शकतेस. कधी येशील?’’ मयुरी दुसऱ्याच दिवशी मध्यप्रदेशात इंदौरला पोचली. शुभम हा तिचा फोन-फ्रेंड! तिने त्याला कधी पाहिले नव्हते. मात्र मोत्यांच्या विचाराने मयुरी झपाटून गेली होती. शुभमचे घराणे पाटीदार समाजाचे. त्यांच्या स्त्रीया ‘घुंघट’ घेतल्याशिवाय बाहेर पडत नाहीत. मात्र त्यांनी बाहेरून अालेल्या त्या नवख्या मुलीची मदत केली. त्यांनी मयुरीला त्यांच्या शेतात हवा तो व्यवसाय करण्याची मुभा दिली. जवळून वाहणारी नर्मदा नदी मयुरीच्या व्यवसायाला पुरक होती. ते शेत शुभमचे काका हुकुमचंद पाटीदार यांचे! मयुरीने त्यांना भागीदार म्हणून सोबत घेतले, स्वत:चे दीड लाख रूपये गुंतवले अाणि व्यवसाय सुरू केला. मयुरी अाजारपणातून उठून फार दिवस झालेले नव्हते. तिला नर्मदेतून शिंपले अाणावे लागत. तिला ते वजन उचलून अाणताना त्रास होऊ नये याकरता पाटीदार कुटुंबाने बरीच काळजी घेतली.

मोत्यांची शेती नेमकी कशी असते हे विचारल्यावर मयुरी म्हणाली, ‘‘मोत्यांच्या शेतीसाठी फार मोठी जमिन लागत नाही. नदीतून शिंपले अाणल्यानंतर ते धुवून स्वच्छ केले जातात. त्यानंतर ते अाठ दिवस पाण्याने भरलेल्या टँकमध्ये ठेवले जातात. त्या पाण्याचे तापमान नदीच्या तापमानाइतके ठेवण्यात येते. शिंपले पाण्याला सरावले की त्यांच्यावर लहानशी शस्त्रक्रिया केली जाते. त्यामध्ये त्यांच्यात मोत्यांच्या बीजांचे रोपण केले जाते. बीज दोन पद्धतीचे असते. एक ‘डिझायनर पर्ल’ अाणि दुसरे ‘राऊंड पर्ल’. प्रक्रिया केलेले शिंपले काही दिवस वेगळ्या पाण्यात ठेवले जातात. त्यापैकी काही शिंपले मरण पावतात, तर काही त्या बीजांना स्वीकारतात. तशा शिंपल्यांना काढून मोठ्या टँकमध्ये ठेवले जाते. त्यानंतर पाण्यात शिंपल्यांसाठी खाद्य टाकणे, पाण्याचे तापमान ठराविक पातळीवर मर्यादीत ठेवणे, मरण पावलेले शिंपले दूर करणे अशी काळजी घ्यावी लागते. डिझायनर पर्ल तयार होण्याचा कालखंड अाठ ते दहा महिन्यांचा असतो. तर राऊंड पर्ल तयार होण्यासाठी किमान पंधरा महिने लागतात. तयार झालेले डिझायनर पर्ल ऐंशी रूपयांपासून साडेतीनशे रुपयांपर्यंत तर राऊंड पर्ल हजार रुपयांपासून पुढे विकले जातात. मोत्यांची प्रत चांगली असेल तर एक मोती वीस-बावीस हजार रुपयांपर्यंतदेखील विकला जातो. या शेतीसाठी गोड्या पाण्यातील शिंपले अावश्यक असतात. भारतात अद्याप खाऱ्या पाण्यातील शिंपल्यांची शेती केली जात नाही.’’

_MotyanchiShetkari_MayuriKhaire_4.jpgमयुरीने शिंपल्यांचा पहिला लॉट तयार केला. मात्र त्यातील सारे शिंपले मरण पावले. हुकुमचंद यांनी मयुरीला धीर दिला. तिने पुन्हा कंबर कसली. तिने यावेळेस अडीच हजार शिंपले तयार केले. त्यापैकी हजार शिंपले मरण पावले. दीड हजार तगले. मयुरीच्या शेतीची चर्चा अाजूबाजूच्या परिसरात होऊ लागली. मध्यप्रदेशातील स्तानिक वर्तमानपत्रांमध्ये मयुरीबाबत काही बातम्या छापून अाल्या. महाराष्ट्राची कन्या मध्यप्रदेशात येऊन शेती करते याचे त्यांनी खूप कौतुक केले. मयुरीने मोती कोठे विकायचे याबाबत विचार केला नव्हता. मात्र त्या बातम्या वाचून अनेक व्यापारी-दलाल मयुरीकडे स्वत: अाले. त्यांना मयुरीकडून मोती हवे होते. मयुरीच्या हाती जे पहिले ‘पिक’ अाले, त्यातून तिला सात ते अाठ लाख रूपये मिळाले. खर्च वजा होऊन साडेपाच लाख रुपयांचा निव्वळ फायदा! मध्यप्रदेशासह महाराष्ट्रातील वर्तमानपत्रे-मासिके यांतून मयुरीच्या शेतीबाबत लिहून येऊ लागले. त्या बातम्या वाचून गुजरातचे हेमंत पटेल यांनी मयुरीला संपर्क केला. मयुरीने पटेल यांच्यासोबत नवसारी येथे भागीदारीमध्ये ‘पर्ल फार्मिंग’चा प्रकल्प सुरू केला अाहे. मयुरीचे दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले. तिचा पती भावेश अांबटकर तिला भेटला तेसुद्धा ‘पर्ल फार्मिंग’मुळेच! मयुरीला त्या गोष्टीचा फार अानंद वाटतो.

मयुरीच्या यशाच्या कहाण्या छापून अाल्या अाणि उत्सुक व्यक्तींनी मार्गदर्शनासाठी तिच्याकडे धाव घेतली. मयुरीने ‘पर्ल फार्मिंग’च्या प्रशिक्षणाचा कोर्स डिझाईन केला. ती अाता गुजरात येथे तिच्या प्रकल्पावर प्रात्यक्षिकांस प्रशिक्षण देते.

मयुरी लग्नानंतर पतीसह नागपूर येथे राहण्यास अाली. अाता ती स्वत:च्या जमिनीवर एकट्याच्या मालकीची ‘पर्ल फार्मिंग’ करू पाहत अाहे. तिला देशभरच्या शेतीविषयक कार्यक्रम-कॉन्फरन्समध्ये भाषण देण्यासाठी निमंत्रणे येतात. पर्ल फार्मिंगची प्रशिक्षणे सुरू अाहेत. मात्र काही वर्षांपूर्वी तिने ज्या ‘उर्मी’ने सामाजिक कार्यात उतरण्याचा प्रयत्न केला, ती भावना अजूनही तिच्या मनात टिकून अाहे. तिला कॅन्सर रोगासाठी तयार केल्या जाणाऱ्या अौषधांमध्ये ज्या दुर्मिळ वनस्पती वापरल्या जातात त्यांची शेती करण्याची इच्छा अाहे. सध्या तशा वनस्पती भारताबाहेरून अायात केल्या जातात. त्या येथेच निर्माण झाल्या तर त्यामुळे अौषधांची किंमत अाणि उपलब्धी या पातळ्यांवर लोकांना फायदा होईल अशी तिची अपेक्षा अाहे. मयुरी सध्या त्या नव्या साहसासाठी तयार होत अाहे. ती म्हणते की, मी सध्या सुखी अाहे. जर ही वनस्पतींच्या शेतीची बाबत प्रत्यक्षात अाली तर मी समाधानी होईन.

मयुरीशी बोलताना तिचा अवखळपणा अाणि मोकळेपणा जाणवतो. ती त्या साऱ्या वाटचालीत तिच्या कुटुंबियांप्रती प्रचंड अादर अाणि कृतज्ञतेची भावना बाळगून अाहे. ती त्या साऱ्या प्रवासाचे श्रेय तिच्या कुटुंबाला, विशेष करून वडीलांना देते. तिच्या जेमतेम पंचवीस वर्षांच्या अायुष्यात बरीच उलथापालथ घडली. तिने प्रतिकूल परिस्थितीतून यशाच्या शिखराकडे घेतलेली झेप एखाद्या सिनेमाच्या कथेला शोभावी अशी अाहे. अगदी एखाद्या सुरवंटाचे फुलपाखरू व्हावे तसे…

मयुरी खैरे - 8818839333 / mayurikhaire920@gmail.com

- किरण क्षीरसागर
(पूर्वप्रसिद्धी - दैनिक दिव्य मराठी, मधुरिमा  पुरवणी, जुलै 2018)

लेखी अभिप्राय

Very nice, Interested inbthis Project

Rajesh Patil17/07/2018

Very much motivating article for women entrepreneur. Hats off to Mayuree

Anjali Jadhav18/07/2018

Innovative ideas

Keshav18/07/2018

मोतीची शेती माहिती व प्रशिक्षण महाराष्ट्रात कुठे मिळेल...कृपया माहिती द्यावी

गजानन26/01/2019

I am interested in perl farming.

Purushottam As…09/05/2019

मी ही बुलडाण्यात राहते आणि मला ही या व्यवसायाची माहिती हवी आहे.

Shiral Arakh06/06/2019

I have been researching through pearl farming for some time. I am interested in starting pearl farming along with my current job and eventually full time into pearl farming. Please find my contact number below and let me know if anyone is interested to join hands with me. Also let me know if any upcoming trainings can be arranged somewhere near Mumbai & Navi mumbai.
Contact – 9769781808,8433546434

vikram 16/07/2019

नमस्कार मयुरी ताई,
तुमची ऑनलाईन माहिती वाचून खूप आनंद झला.इतक्या लहान वयात आणि अगदी प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही जे विलक्षण कार्य केले आहे ते अगदीच अतुलनीय आहे.तुम्हाला खूप शुभेच्छा. सध्या मी पुणे येथे राहत आहे. मलाही अशी शेती करायची आहे तरी, कृपया या बद्दल प्रशिक्षण कुठे मिळेल हे सांगावे.
सौ. सुप्रिया शेलार.

सुप्रिया शेलार09/12/2019

mam it's so amazing..and you are really do the work which always motivating to women empowerment.

Nivedita Yedure12/12/2019

I want to do pearl farming training if anybody know about that please inform me.

Shilpa shirsat 13/12/2019

Mala mahiti havi aahe

Eshwar pawar 16/12/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.