समर्पित शिक्षक व ध्येयाने झपाटलेले विद्यार्थी…


_SamarpitShikshak_DheyayneZapatleleVidyarthi_1.jpgसांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील कुलालवाडी (खंडनाळ) हे चारशे लोकसंख्येचे छोटे गाव. गावात द्विशिक्षकी शाळा. शाळेत एकच शिक्षक कार्यरत. अशा जिल्हा परिषद शाळेत शिकलेला गणेश टेंगले नुकताच अधिक गांभीर्याने परीक्षा उत्तीर्ण झाला. गणेश टेंगले व स्वागत पाटील हे जिल्हा परिषद शाळेत शिकलेले व या वर्षीच्या ‘युपीएससी’ परीक्षेत यश मिळवलेले विद्यार्थी. त्यांचा सत्कार सांगली जिल्हा परिषदेच्या सभागृहात झाला. यावेळी गणेश टेंगले यांना ऐकताना अभिमान वाटत होता. नामांकित शाळेत मुले घातली, की हमखास यश, अशी चुकीची कल्पना फोफावत असताना, यश मिळवण्यासाठी चकचकीत शाळा, दिमाखदार युनिफॉर्म या सर्वापेक्षा गरजेचे आहेत, समर्पित शिक्षक असे गणेश टेंगले याने ठणठणीतपणे सांगितले. तो म्हणाला, समर्पित शिक्षक व ध्येयाने झपाटलेले विद्यार्थी असा समसमा संयोग झाला तर सगळ्या अडचणी दूर होतात. त्यामुळेच पहिली ते चौथी एक शिक्षकी शाळेत शिकणारा गणेश टेंगले ‘युपीएससी’ उत्तीर्ण होतो. (एकशिक्षकी शाळा म्हणजे एकच शिक्षक पहिली ते चौथी चार वर्गाना शिकवतो) सत्कारावेळी बोलताना गणेशचे वाक्य खूपच बोलके होते... “प्रत्येक वर्गाला स्वतंत्र शिक्षक असतो. हे पाचवीत गेल्यावर मला समजले.”

गणेश टेंगले याने अभिमानाने त्याच्या शिक्षकांचा उल्लेख केला. गणेश व प्राथमिक शिक्षक असणारे त्यांचे थोरले बंधू, दोघे त्यावेळी बोलले. त्यांनी घेतलेल्या कष्टाची दोघांच्या बोलण्यातून जाणीव होत होती. त्यांच्या आईवडिलांना अक्षरओळख नाही (अशिक्षित म्हणणार नाही. कारण त्यांनी त्यांच्या मुलांना शिकण्यासाठी दिलेले स्वातंत्र्य व सहकार्य यांतून ते जीवनाच्या शाळेतील उच्चशिक्षित आहेत असेच म्हटले पाहिजे). सत्कार झाल्यावर फोटो घेतेवेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम देशमुख यांना गणेशने वडिलांची ओळख करून दिली. त्यावेळी तो म्हणाला, “भाऊ, माझे वडील तुमच्या कारखान्यात ऊसतोडीला येत होते.” हे सांगतानाही त्यांच्या नजरेत वडिलांबद्दल असणारा अभिमान जाणवत होता. ऊसतोड मजूर असणाऱ्या व्यक्तीचा मुलगा ‘युपीएससी’मध्ये धवल यश मिळवतो. गणेशच्या पहिली ते बारावीपर्यंत शिक्षणासाठी झालेला खर्च कदाचित आपल्यातील काही जणांच्या मुलांच्या केजी-सिनियर केजीसाठी केलेल्या खर्चापेक्षा कमी असेल.

गोरगरिबांच्या मुलांना मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षण जर मिळवायचे असेल तर सरकारी शाळा हाच एकमेव खात्रीचा उपाय आहे. गणेशने ‘युपीएससी’मध्ये मुलाखतीत ‘सरकारी जिल्हा परिषद शाळांत भौतिक सुविधा नाहीत. त्याचा तुमच्या शिक्षणावर परिणाम झाला नाही का?’ या प्रश्नावर दिलेले उत्तर शिक्षकाचे महत्त्व व जबाबदारी याची जाणीव करून देते. ‘सरकारी शाळेत भौतिक सुविधांबाबत कमीअधिकता असेल. पण त्या सर्व सुविधा व सामुग्री यापेक्षा शिक्षणात अधिक महत्त्वाचा घटक शाळेतील शिक्षक आहेत. शाळेतील शिक्षक चांगले असल्याने इतर कमतरतांचा परिणाम झाला नाही...’ खरेच, शिक्षक सचोटीचे झाले, की विद्यार्थी घडतातच, पण अलीकडे डिजिटल शिक्षण, तंत्रस्नेही शिक्षण, रचनावादी शिक्षण यांमध्ये शिक्षक पद्धतीत अडकत असून तंत्रनिर्माते होत आहेत. या तंत्राग्रहातही पद्धतवाद यापेक्षा अधिक मोठे कार्य शिक्षक ना तंत्र, ना मंत्र वापरता स्वतःच्या कौशल्यातून घडवू शकतात. मुळातच डिजिटल जगात, विद्यार्थी विविध उपकरणांच्या वापरात अडकले आहेत. घरातील संवाद कमी झाला आहे. अशा वेळी शिक्षक-विद्यार्थी आंतरक्रिया, संवाद घडवून विद्यार्थ्याना ध्येयाकडे प्रेरित करणारे शिक्षक व शिक्षणव्यवस्था खूप महत्त्वाची आहे. ती फक्त झगमगाटात व पैसे देऊनच मिळेल हा भ्रम सोडला पाहिजे. यंदा सांगली जिल्ह्यात दोघे ‘युपीएससी’ पास झाले. दोघेही पहिली ते चौथी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेले आहेत. मराठी माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या अभ्यासक्रमात दहावीपर्यंत शिकलेले आहेत. त्यामुळे पालकांनी शाळा व माध्यम यांबाबत विचार अधिक गांभीर्याने करायला हवा. खरे शिक्षण म्हणजे काय? ते फक्त शाळेत मिळते काय? याची उत्तरे शोधली पाहिजेत. गणेश टेंगले व स्वागत पाटील या दोघांनी पुन्हा एकदा गुणवत्ता फीच्या आकड्यावर नाही तर शिक्षकांचे अचूक मार्गदर्शन व विद्यार्थ्याचे प्रयत्न व चिकाटी यांवर अवलंबून असल्याचे सिद्ध केले आहे. दोघांचे मनापासून अभिनंदन.

- अमोल शिंदे

amol.mallewadi@gmail.com

लेखी अभिप्राय

अभिमानास्पद यश . दोघांचेही हार्दिक अभिनंदन फक्त system चा भाग होऊ न देता उत्तम काम कराव अशी सदिच्छा

अरुणा कापरे06/07/2018

मस्तच

संजय तिडके06/07/2018

बाजारी करनापेक्षा गुणवत्ता महत्वाची असते. ती घेणार्याच्या नजरेत असावी

बालासाहेब मोकि…07/07/2018

खुप छान.मनापासुन अभिनंदन.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

SUDHIR MENE08/07/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.