बल्लाळेश्वर गणपतीचे पाली


_BallaleshwarGanpatiche_Pali_1.jpgपाली हे गाव मुंबई-गोवा हायवेवर नागोठण्यापासून आतमध्ये दहा किलोमीटरवर आहे. तेथे खोपोलीमार्गेही जाता येते. ते सुधागड तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. गावात मामलेदार कायार्लय, न्यायालय, बी.डी.ओ. ऑफिस आणि सर्व प्रकारची सरकारी कार्यालये आहेत. गावात अष्टविनायक गणपतींपैकी बल्लाळेश्वर गणेशाचे दगडी देवालय आहे. तेथे भाविकांची गर्दी असते.

पालीपासून सात किलोमीटर अंतरावर सुधागड नावाचा किल्ला आहे. सुधागड हे तालुक्याचे नाव आहे. गडावर भोराई देवीचे देऊळ व शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांपैकी एक पंतसचिव यांचा वाडा होता. वास्तविक ते पंतसचिव पुण्याजवळील भोर येथे राहत. (आजही त्यांचा राजवाडा देश स्वतंत्र होईपर्यंत ताब्यात होता). किल्ल्याजवळून एक वाट घाटमाथ्यावर (लोणावळ्याला) जाते व तेथून पुणे येथे जाता येते. गाव संस्थानाच्या ताब्यात असल्यामुळे इंग्रजी आमदानीतील अनेक सुधारणा तेथे पोचल्या नाहीत. ब्रिटिशांची हद्द नागोठण्यापासून होती. गावाची रचना लांबट उभी असून गावामध्ये समांतर असे दोन-तीन रस्ते आहेत. गावाची सुरुवात देऊळ वाड्यापासून होते.

पाली गाव ‘सरसगड’ किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. पूर्वी तो टेहळणी किल्ला होता, शत्रू येताना लांबून दिसत असे. गावाला अंबा नदीने वळसा घातलेला आहे. गणेश देवालय यांच्या वाटेत वडाचा/पिंपळाचा पार आहे. गावातील जुनेजाणते लोक त्या पारावर बसून तरुणांना अनुभवाच्या चार गोष्टी सांगत. पु.ल. देशपांडे यांची आदर्श खेडेगावाची कल्पना तशीच आहे. गावात व देवस्थानाभोवती प्रचंड व्यापारी पेठ निर्माण झाली आहे.

माझे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण गावीच झाले. शाळा 1940 च्या सुमारास सुरू झाली. गावाची लोकसंख्या पाच हजारांच्या आत होती. गावाचा मुख्य व्यवसाय भातशेती होता. सर्वसामान्य लोकांची परिस्थिती सारखीच (गरिबीची) असे; मग तो कोणत्याही जातीचा असो. गावातील गरजा भागवण्यासाठी बारा बलुतेदार असत. मग त्यात माठ, विटा देण्यासाठी कुंभाराची आळी होती. घर बांधण्यासाठी सुतार/गवंडी लोक होते. शेतीच्या अवजारांसाठी लोहाराचा भाता होता. सोन्याचे दागिने घडवणारे सोनार, तांब्यापितळ्यांची भांडी बनवण्यासाठी तांबट आळी होती. तेथे ठोक्याची उत्तम भांडी (पाणी तापवण्याचे बंबसुद्धा) बनत असत. त्यांची सारखी ठोक ठोक चाले.

गावात ब्राह्मण लोकांच्या दोन-तीन आळ्या होत्या. लोक जागृत होते. गावामधील वाचनालयाची शताब्दी झालेली आहे. माझ्या आजोबांचे स्टेशनरी व काष्ठाषौधींचे दुकान होते. वडील शेती करत व दुकानामध्ये बसत. पुढे, कुळकायदा झाला. बरीच शेती जी कुळांकडे होती, ती गेली. मग वडिलांनी उतारवयात बँकेत नोकरी केली.

गावातील लोक एकमेकांना धरून असतात. कोणत्याही संकटप्रसंगी आळीतील लोक कोणाकडेही धावून येत. एक प्रकारची आपुलकी वाटत असे. लोक कोणाकडे लग्न वा शुभप्रसंग निघाला तर छते (कापडी) टांगण्यापासून सर्व कामांना मदत करत.

दूरदर्शनवर संभाजी महाराजांच्या मालिकेमध्ये शिवाजीमहाराज व संभाजी महाराज यांच्यामध्ये मतभेद झाले व संभाजी महाराज शृंगारपुराला गेल्याचे दाखवले आहे. (अष्टप्रधानांमध्ये संभाजी महाराजांच्या विरोधी कट कारस्थाने चालू होती.) त्यावेळी चिडून जाऊन संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या बंडखोर मुलाची एकांतात भेट घेतली. ते ठिकाण पालीजवळ आहे. त्या गावाचे नाव ‘मुळी पाच्छापूर’ असे ठेवले गेले. पुढे, संभाजी महाराज गादीवर बसले. त्यांच्या विरूद्ध कट कारस्थान करणाऱ्या अष्टप्रधान मंडळांतील ‘सुरनिस’ व दुसऱ्या मंत्र्यांना संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी तुडवून मारले, ते ठिकाणही पालीच्या जवळ आहे. तेथे त्यांच्या समाधी आहेत.

पालीतील बरीच तरुण मंडळी शिक्षणाकरता व पुढे, नोकरी-व्यवसायाकरता गावाबाहेर पडली आहेत, पण अजूनही गावाच्या ओढीने गणेशजन्म/होळीच्या सणाला येतात. मीही गेली पन्नास वर्षें नोकरीनिमित्ताने गावापासून दूर आहे. तरी वर्षांतून दोन-तीन वेळा गावाला जातो. पूर्वी आईवडिलांच्या ओढीने जात असे. आता, गावाच्या ओढीने जातो. तेथे गेले, की मन प्रसन्न होते. गाव समृद्ध झाले आहे. गावात पूर्वीपासून पाण्याचे दुर्भीक्ष्य असे. आता चोवीस तास पाणी आहे, वीज आहे. सर्व सुखसोयी आहेत. बरीच जुनी घरे जाऊन नवीन ब्लॉकपद्धत आली आहे. काळाप्रमाणे गाव बदलले आहे.

पण जेथे देवाने अवतार घेतला/जन्म घेतला तेथेच आपण जन्मलो ही केवढी भाग्याची गोष्ट. गावगाड्यामधील अनेक लोक जे पूर्वी गरीब होते ते सधन झाले आहेत.

गावात दादासाहेब लिमये नावाचे काँग्रेसचे नेते होते. त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पंचायत राज्य/लोकाभिमुख राज्य ही सकल्पना राबवली. ते 1962 मध्ये प्रथम रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यांच्या संस्थेच्या सुधागड तालुक्यात वीस-पंचवीस शाळा असून, पाली येथे कला/विज्ञान/वाणिज्य महाविद्यालय आहे. त्यांनी गावात अनेक सुधारणा केल्या. त्यांना एकशेदोन वर्षें आयुष्य लाभले. गावातर्फे त्यांचा शंभर वर्षें पूर्ण झाल्यावर सत्कार करण्यात आला होता. त्याला ते हजर राहिले. त्यांच्या अनुभवाचे बोल त्यांनी सांगितले. अशा उज्ज्वल परंपरा असलेल्या छोट्या गावाबद्दल आपुलकी व जिज्ञासा वाटली नाही तर नवल!

-  प्रभाकर शंकर भिडे

लेखी अभिप्राय

Very nice information Kaka we are proud of you !!!

Smita Ghaisas03/07/2018

अतिशय सुंदर,

पद्माकर फाटक द…04/07/2018

नमस्कार प्रभाकर,
तुम्ही उत्तम लिखाण केले आहे। वाचताना पालीला गेलो होतो असे वाटले। सर्व माहिती सुटसूटित आहे।
धन्यवाद
नन्दू योगी

N R Yogi04/07/2018

अप्रतिम लिहिलं आहेस. तुमचं घर असल्यामुळे जाणं होतं.आम्ही क्वचित गेलो तर.. पण आठवणी मात्र सदैव येत असतात.आज पुन्हा एकदा सारं बालपण डोळ्यासमोर उभं राहिलं. खूप छान वाटलं.

मी सुधा योगी.आ…04/07/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.