चित्रपती व्ही. शांताराम (V. Shantaram)


_Chitrapati_V_Shantaram_1.jpgशांताराम राजाराम वणकुद्रे ऊर्फ व्ही. शांताराम हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सुवर्णाक्षरांनी लिहिले गेलेले नाव. ते शांतारामबापू या नावाने ओळखले जात. त्यांनी त्यांचा खोल ठसा निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता अशा तिन्ही क्षेत्रांत उमटवला. त्यांनी दिग्दर्शक म्हणून अनेक नवीन संकल्पना पहिल्यांदा भारतीय चित्रपटसृष्टीत वापरल्या. ते भारतीय चित्रपटसृष्टीत जवळजवळ सहा दशके कार्यरत होते.

शांतारामबापूंचा जन्म 18 नोव्हेंबर 1901 रोजी कोल्हापूर येथील सुखवस्तू घरात झाला. त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली ती कोल्हापुरातील बाबुराव पेंटर यांच्या मालकीच्या `महाराष्ट्र फिल्म कंपनी'पासून. व्ही. शांताराम यांनी चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात अत्याधुनिक सोयी नसताना, तंत्र फारसे विकसित झालेले नसताना ‘प्रभात’च्या माध्यमातून चित्रपटनिर्मिती केली. त्यांनी ‘प्रभात’नंतर राजकमल स्टुडिओच्या माध्यमातून चित्रपटनिर्मिती सुरू ठेवली. त्यांचे ‘माणूस’ व ‘शेजारी’ हे चित्रपट अभिजात कलाकृती म्हणून गणले जातात. त्यांनी ‘शकुंतला’, ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आँखे बारह हाथ’ आदी चाळीसच्या वर मराठी, हिंदी चित्रपट निर्माण व दिग्दर्शित केले. त्यांनी 'इये मराठीचिये नगरी' हा रंगीत चित्रपट 1965 मध्ये तयार केला. त्यांनी बुद्धिमत्ता, नाविन्याचा शोध घेण्याची वृत्ती व शिस्तबद्ध काम या जोरावर शेकडो कलाकार व तंत्रज्ञ निर्माण केले. त्यांनी कंपनीत पडेल ते काम करता करता `सुरेखा हरण' या मूकपटात छोटीशी भूमिका 1921 साली केली. तेथून त्यांची घोडदौड सुरू झाली. त्यांनी चित्रपट निर्मितीचे मर्म आत्मसात केले. ते चित्रपटक्षेत्रात सतत व भराभर पुढे जात राहिले. त्यांनी `सावकारी पाश' या सामाजिक चित्रपटात (1925) एका तरुण शेतकर्या ची भूमिका केली. त्यांनी `नेताजी पालकर' हा पहिला मूकपट 1927 साली दिग्दर्शित केला. त्यांनी बाबुराव पेंटर यांच्याकडे नऊ वर्षें नोकरी केल्यानंतर दामले, फत्तेलाल, धायबर आणि कुलकर्णी यांच्या भागीदारीत कोल्हापुरात `प्रभात फिल्म्स'ची स्थापना केली. तेथे शांतारामबापूंना त्यांची कला विकसित करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळाले. त्यांनी तेथे `गोपाळ कृष्ण', `राणीसाहेबा', `खुनी खंजर', `उदयकाल' असे सरस चित्रपट दिले.

`प्रभात'चा पहिला मराठी बोलपट `अयोध्येचा राजा' 1932 साली प्रदर्शित झाला. त्यांनी 1933 साली `सैरंध्री' हा भारतातील पहिला रंगीत चित्रपट काढण्याचे धाडस केले. तो प्रयत्न चित्रपटाच्या प्रिंट्स नीट ‘डेव्हलप’ न झाल्यामुळे फसला. `प्रभात'ला खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. पण शांतारामबापू यांनी त्यातून डगमगून न जाता `अमृतमंथन'ची निर्मिती केली. तो चित्रपट तुफान यशस्वी ठरला. त्यानंतर त्यांनी 1937 साली निर्मिलेला `संत तुकाराम' हा बोलपट भारतीय चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरला. तो चित्रपट भारतात, विशेषत: महाराष्ट्रात धो धो चालला. त्याची कीर्ती साता समुद्रापार गेली. तो चित्रपट व्हेनिस चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला. तो  भारताबाहेर दाखवला गेलेला पहिला भारतीय बोलपट.

`प्रभात फिल्म्स'चा चारही मालकांनी कंपनीचा विस्तार करण्यासाठी पुण्यात जागा घेतली आणि तेथे भव्य अशा अत्याधुनिक `प्रभात स्टुडिओ'ची स्थापना केली. त्यामुळे `प्रभात'च्या चित्रपटनिर्मितीला आधुनिक रूप प्राप्त झाले. एकीकडे पौराणिक चित्रपट बनवत असतानाच शांतारामबापूंनी उत्तमोत्तम सामाजिक चित्रपटांची निर्मिती केली. जरठ विवाहावर टीका करणारा `कुंकू' (दुनिया ना माने), वेश्येच्या पुनर्वसनावर भाष्य करणारा `माणूस' (आदमी) आणि हिंदू-मुस्लिम दंग्यांच्या पार्श्वभूमीवर मैत्रीचा संदेश देणारा शेजारी (पडोसी) हे सामाजिक चित्रपट अफाट गाजले. ते मराठी व हिंदी, दोन्ही भाषांत होते.

शांतारामबापूंनी प्रभात फिल्म कंपनी 1942 साली सोडली. त्यांनी स्वत:च्या `राजकमल कला मंदिर' या संस्थेची स्थापना मुंबईत येऊन केली. त्यांनी `राजकमल'च्या माध्यमातूनही दर्जेदार चित्रपटांची मालिका सुरू ठेवली. `राजकमल'चे 1946 साली `डॉ. कोटणीस की अमर कहानी', 1951 सालचा होनाजी बाळांचा `अमर भूपाळी', उत्तम नृत्ये असलेला 1955 सालचा रंगीत `झनक झनक पायल बाजे', कैद्यांना प्रेमाने वागवण्याचा संदेश देणारा 1957 चा `दो आँखे बारह हाथ' आणि एका कवीच्या मनोराज्याचा वेध घेणारा 1959 चा `नवरंग' हे चित्रपट विशेष उल्लेखनीय ठरले. त्यांनी स्वत: `डॉ. कोटणीस...' आणि `दो आँखे...' या चित्रपटांमध्ये नायकाची भूमिका केली होती. `पिंजरा' या चित्रपटाने (1972) मराठी चित्रपटांच्या लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मागे टाकले. `पिंजरा' मराठीतील पहिला संपूर्ण रंगीत चित्रपट होता.

शांतारामबापूंना चित्रपट माध्यमाची भाषा अवगत झाली होती, ती स्वयं अध्ययनाने. त्यांची माध्यमावर जबरदस्त पकड निर्माण झाली होती. प्रसिद्ध निर्माता-निर्देशक-नट चार्ली चॅप्लीन यांनी शांतारामबापू यांच्या दिग्दर्शनाचे कौतुक केले होते. शांतारामबापूंना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या आचार्य प्र. के. अत्रे यांनी शांतारामबापूंना `चित्रपती' ही पदवी दिली. शांतारामबापूंना चित्रपट माध्यमातील व्यक्तींना दिला जाणारा भारतातील सर्वोच्च असा `दादासाहेब फाळके पुरस्कार' 1985 साली प्रदान करण्यात आला, तर भारत सरकारने त्यांना `पद्मविभूषण' पुरस्कार देऊन 1992 साली सन्मानित केले.

शांतारामबापूंचे चित्रपट विषयाची निवड, त्याचा आशय, कॅमेऱ्याचे तंत्र, संकलन या सर्व बाबतीत काळाच्या पुढे असत. त्यांनी चित्रपट हे कलेचे आणि मनोरंजनाचे माध्यम तर आहेच, पण त्यातून समाजाला योग्य तो संदेशही प्रभावीपणे देता येतो हे यथार्थ जाणले होते.

शांतारामबापू अतिशय कडक शिस्तीचे होते. त्यांचा वचक कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यावर असे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमध्ये `राणी साहेबा' हा 1931 साली निर्माण झालेला चित्रपट हा भारतातील पहिला बोलपट होय. त्यांनी त्याच वर्षीच्या `चंद्रसेना'मध्ये पहिल्यांदा `ट्रॉली'चा वापर केला. ते `टेलिफोटो' लेन्स वापरून दृश्य घेणारे पहिले दिग्दर्शक. भारतीय चित्रपटात पहिल्यांदा अॅनिमेशनचा वापर केला तोही शांतारामबापूंनी (जंबुकाका). `बॅक लिट' प्रोजेक्शनचा वापर करणारे ते पहिले दिग्दर्शक (अमर ज्योती) होत.

त्यांचे ‘शांतारामा’ हे आत्मवृत्त मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये 1986 साली प्रकाशित झाले. किरण शांताराम या त्यांच्या पुत्राने संजित नार्वेकर यांच्या लेखन सहकार्याने `व्ही शांताराम : द लिगसी ऑफ रॉयल लोटस' हे त्यांचे चरित्रही प्रकाशित केले आहे. शांतारामबापूंनी तीन विवाह केले. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव विमल, दुसरी जयश्री आणि तिसरी संध्या. जयश्रीला किरण हा मुलगा आणि राजश्री ही मुलगी, तर संध्या यांना प्रभातकुमार हा मुलगा आणि मधुरा पंडित जसराज ही मुलगी अशी अपत्ये आहेत.

त्या महान दिग्दर्शकाचे निधन 30 ऑक्टोबर 1990 साली वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी मुंबईत झाले.

- नितेश शिंदे

info@thinkmaharashtra.com

( हा व्ही. शांताराम यांच्यावरील लेख नसून त्यांच्या कार्याची  ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ने घेतलेली नोंद आहे. 'थिंक महाराष्ट्र' लवकरच विस्तृत लेख प्रसिद्ध करेल. वाचकांना व्ही. शांताराम यांच्यावर लेख लिहायचा असल्यास  'थिंक महाराष्ट्र'ला संपर्क साधावा.)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.