चांदोरी गावाचे ऐतिहासिक महत्त्व


चांदोरी हे गाव नाशिकपासून नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर पंचवीस किलोमीटरवर आहे. गावात शिरताना गावचा बाजार लागतो. मात्र, ती गजबज टर्ले-जगताप वाड्यापासून पुन्हा शांत होते. टर्ले-जगताप वाडा आता नाही, परंतु ते ठिकाण लोकांच्या मनी पक्के बसले आहे. किंबहुना चांदोरी प्रसिद्ध आहे ते ऐतिहासिक वाड्यांमुळे. गावाला तसा इतिहासही आहे. गावात नव्या इमारती दिसतात, पण त्या जुन्या घरांसमोर खुज्या वाटतात. महादेव भट हिंगणे हे पेशव्यांचे नाशिक येथील क्षेत्रोपाध्ये होते. पेशवे बाळाजी विश्वनाथ हे मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान यांनी महादेव भट हिंगणे यांना 1718 मध्ये दिल्लीस नेले. पेशवे दिल्लीहून परत आले तेव्हा त्यांनी भरवशाचा माणूस म्हणून महादेव भट हिंगणे यांची वकील म्हणून दिल्लीच्या वकिलातीवर नेमणूक केली. तेव्हापासून नाशिकचे हिंगणे राजकारणात मान्यता पावले. दिल्ली व मराठी माणूस यांचे नाते अतूट आहे. त्या संबंधांचा ऐतिहासिक मागोवा घेतला तर मराठी वकिलातीचे महादेव भट यांच्या रूपाने पहिले पाऊल पडले होते. त्यांना पेशव्यांचे पहिले कारभारी असेही म्हटले जाते. पेशव्यांनी महादेव भट यांच्या एकनिष्ठ कारभारावर खूश होऊन त्यांना मौजे चांदोरी, खेरवाडी, नागपूर व धागूर ही गावे इनाम म्हणून 1730 मध्ये दिली. पेशवाईत सरदार महादेवभट हिंगणे, देवराम महादेव हिंगणे व बापूजी हिंगणे यांची कामगिरी वैशिष्ट्यपूर्ण आहे. बापू हिंगणे हे पानिपतच्या लढाईत नानासाहेब पेशव्यांबरोबर होते.

गणेश हिंगणे यांनी छपन्न खोल्यांचा प्रशस्त वाडा चांदोरीत 1762 मध्ये बांधला. हिंगणे यांचे काही वाडे झाशी येथे व नाशिकमधील भद्रकालीतही आहेत. हिंगणे यांच्याकडे दहा हजार एकर भूभागाची जहागिरी 1953 पर्यंत होती. ब्रिटिशांनी सरदार राजेबहादूर, सरदार विंचूरकर व सरदार हिंगणे यांचीच सरदारकी नाशिक जिल्ह्यात मंजूर केली होती. चांदोरी परिसरात जमीन व महसुल यांची मालकी ही हिंगणे यांच्याकडेच होती. त्यांच्या पराक्रमांची साक्ष देणारा चांदोरीतील हिंगणे वाडा तो इतिहास उलगडून सांगतो. हिंगणे वाड्यातील अनेक वस्तू रशिया-ब्रिटनमधील वस्तूसंग्रहालयात आहेत.

चांदोरीतील हिंगण्यांचा वाडा, मठकरी वाडा, हिंगमिरे वाडा पाहण्यासारखे आहेत. त्याखेरीज टर्ले वाडा जमीनदोस्त झाला आहे. टर्ले म्हणजे मूळचे जगताप. त्यांच्याबाबत आख्यायिका अशी सांगितली जाते, की जगतापांच्या घरी मूल जगत नसल्याने त्यांनी वंश जगावा म्हणून खेडभैरव (तालुका इगतपुरी) येथे बकऱ्याचा बळी देऊ असा नवस केला होता. तेव्हापासून टर्ले-जगतापांच्या सर्व पिढ्या तो नवस फेडण्याची परंपरा पाळतात. गावातून वाहणाऱ्या गोदावरीचे पात्र चंद्रकोरीसारखे असल्याने गावाला चंद्रावती असे नाव पडले अन्‌ पुढे झाले चांदोरी म्हणे!

गावातील बुद्धविहार, लाकडात नक्षीकाम असलेली चावडी वैशिष्ट्यपूर्ण आहे. बाबासाहेब आंबेडकर त्या इमारतीत येऊन गेल्याचे ग्रामस्थ सांगतात. मठकरी वाड्यातील दक्षिणाभिमुख राममंदिर व तेथील रामजन्मोत्सव महाराष्ट्रात आगळेवेगळे आहेत. राम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या मूर्ती कायम अधांतरी (चौपाळ्यावर) असतात. वाड्यातील शंकराची पिंड स्वयंभू आहे. पूर्व-पश्चितम पिंडी हा त्या मंदिराचा विशेष आहे. रामाने मृगवेध त्या मंदिरातूनच घेतला; तसेच, रामाचे पाऊल तेथे उमटल्याचा दाखला अशा पुराण कथा मंदिराशी जोडल्या गेल्या आहेत. रामनवमीला तेथे मोठी मिरवणूक असते. मंदिरात काचेवर रंगवलेली दशावताराची जुनी चित्रे आहेत. मठकरी वाड्यातील ऑस्ट्रियन बनावटीच्या तीनशे वर्षापूर्वींच्या काचेच्या हंड्या दुर्मीळ आहेत.

चांदोरी चिरेबंदी वाड्यांसाठी ओळखले जाते. तसेच, ते महाराष्ट्रात फक्त चांदोरी (व त्र्यंबकेश्वबर) येथेच इंद्राच्या एकमेव मंदिरासारख्या वैशिष्ट्यपूर्ण मं‌दिरांसाठीही ओळखले जाते. मठकरी वाड्यातील राममंदिराजवळ 1852 मध्ये बांधलेले दत्तमंदिर आहे. वाड्यामागील उजव्या सोंडेच्या गणेशाचे मंदिरही जागरूत समजले जाते. सरदार हिंगणे यांच्या वाड्यातील देवी ही कोल्हापूरच्या देवीचे अधिष्ठान मानले जाते. गोदेच्या कुशीत बुडालेली मंदिरे हे चांदोरीचे वैशिष्ट्य आहे. पाण्यात राहूनही ती हेमाडपंती मंदिरे सुस्थितीत आहेत. शंकराची ती बारा मंदिरे आहेत. त्यामुळे त्यांना बारा ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती मानली जातात. पंचमुखी महादेवाचे दुर्मीळ मंदिर हेही विशेष होय. ती मंदिरे अहिल्याबाई होळकर यांनी बांधल्याचे म्हटले जाते. नदिपात्रात अनेक मूर्ती बेवारसरीत्या पडलेल्या पाहण्यास मिळतात. त्या मूर्तींचे संकलन करून गावात वस्तुसंग्रहालय उभारल्यास तो ऐतिहासिक वारसा जपला जाऊ शकतो. नदीकाठावरील खंडेरायाचे मंदिर प्रतिजेजुरी समजली जाते. जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतल्यानंतर तेथील मंदिरात आल्यावरच नवस फेडला जातो अशी प्रथा असल्याने तेथे नेहमी वर्दळ असते. खंडोबा, भैरवनाथ व सप्तशृंगी या देवतांच्या गावातून निघणाऱ्या रथयात्राही पाहण्यासारख्या असतात. गावात बोहाड्याची परंपरा होती, मात्र ती कालांतराने बंद पडली. प्रसिद्ध नारायण महाराजांची संजीवन समाधी नदीकिनारी आहे. चांदोरीत अनेक संत-महात्मे येऊन गेल्याचे ग्रामस्थ सांगतात. गावातील वाड्यासारखे दिसणारे विठ्ठल मंदिरही वैशिष्ट्यपूर्ण आहे. तेथे विठ्ठल-रूक्मिणी व राईबाई यांची मूर्ती पाहण्यास मिळते. तेथील भिंतीवर चित्र असून त्या मंदिराची देखभाल भन्नसाळी कुटुंब करते.

ऐतिहासिक पार्श्वभूमी अन् दिल्लीपर्यंत पराक्रम गाजवणाऱ्या माणसांची तेजस्वी चांदोरीची ओळख लोककलावंत माधवराव गायकवाड यांच्याशिवाय अपुरी ठरेल. माधवराव गायकवाडांचे नाव आजही तमाशा क्षेत्रात आदराने आणि गुरूस्थानी घेतले जाते. एकदा दादासाहेब फाळके आपल्या मॉरिस गाडीतून माधवराव गायकवाडांना त्यांनी चित्रपटात काम करावे म्हणून चांदोरीत आले होते. माधवरावांनी मात्र तमाशाच आपली जान आणि शान असल्याचे सांगत फाळकेंना नकार दिला होता. त्यांनी लोककलावंत म्हणून केलेली कामगिरी अजरामर ठरली. त्यांचा 1987 मध्ये मृत्यू झाला. त्यांचा मुलगा प्रताप गायकवाड वडिलांची परंपरा ‘तमाशा कलावंत’ म्हणून पुढे नेत आहे. चांदोरी नावामागील एक वलय म्हणजे मल्हारराव होळकरांच्या चांदवड टांकसाळीत चांदीचा रुपया तयार होत असे. त्याला ‘चांदोरी रुपया’ म्हटले जायचे. त्याचा चांदोरीशी थेट काही संबंध नसला तरी पराक्रम आणि कामगिरीने लखलखणाऱ्या चांदोरीची भुरळ अनेकांवर पडत असते हे मात्र नक्की!

- रमेश पडवळ

लेखी अभिप्राय

रमेश पडवळ ह्यांनी चांदोरी गावाचा ऐतिहासिक परामर्श अतिशय समतोलपणे घेतला आहे.त्यांच्या सुंदर लेखाला थोडी भौगोलिक जोड द्यायची तर हे गाव गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे.पावसाळ्यात गोदावरीला मोठा पूर आला तर आख्खं गाव जलमय झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
-आणखी एक संदर्भ म्हणजे रेव्हरंड ना.वा.टिळक ह्यांच्या डोक्यात धर्मांतर करून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचे घोळत होते.तेव्हा काय करावं..कसं करावं हे घोळत असताना ते लक्ष्मीबाईंना घेऊन नाशिकहून चांदोरी येथे नातलगांकडे आले,काही दिवस राहिले.मनाचा पक्का निश्चय झाल्यावर कोणालाही न सांगता इथून जवळ असलेल्या रेल्वेस्टेशनवर जाऊन टिळकांनी पॅसेंजरनं मुंबई गाठली आणि तिथे चर्चमधे बाप्तिस्मा घेतला.
(हा वृतांत लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्रे या आत्मचरित्रात सविस्तर वाचायला मिळतो.)

विजय काचरे 26/09/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.