अंध भावेश भाटिया यांची सकारात्मक दृष्टी! (Bhavesh Bhatia)


_BhaveshBhatiya_1.jpgभावेश भाटिया यांचा महाबळेश्वर येथे मेणबत्तीचा कारखाना आहे. त्या कारखान्याचे वेगळेपण म्हणजे कारखान्याचे मालक उद्योजक भावेश भाटिया स्वतः अंध असून त्यांच्या कारखान्यात केवळ अंध व्यक्ती काम करतात. मी प्रत्यक्ष महाबळेश्वरला भेट देऊन ते काम पाहण्याचे ठरवले. योगायोगाने माझा मित्र अशोक सप्रे यांचा फोन आला. “श्रीकांत, मी आणि सुधा (अशोकची पत्नी) महाबळेश्वरला भावेश भाटिया यांना भेटायला चाललोय. गाडीत जागा आहे. तू येशील का?” आता गंमत बघा, आम्ही ‘कृ.ब.तळवलकर ट्रस्ट’तर्फे देण्यात येणाऱ्या ‘अनुकरणीय उद्योजक’ पुरस्कारासाठी (2018) भावेशजी यांचा विचार करत आहोत हे अशोकला माहीत नव्हते. चांगल्या कामाचे योग असे जुळून येतात. मी, अशोक, सुधा आणि ‘तळवलकर ट्रस्ट’चे सहविश्वस्त चारूदत्त आलेगावकर असे चौघेजण दुसऱ्याच दिवशी महाबळेश्वरला भावेशजी यांच्या ‘सनराईज कॅण्डल्स’ या मेणबत्तीच्या कारखान्यात जाऊन धडकलो. अशोकने तो भावेशजींकडे का येणार आहे याची त्यांना आधीच कल्पना दिली होती. आम्ही मात्र आगंतुक होतो. अशोक उत्तम मॅकेनिकल इंजिनीयर आहे. तो दृष्टिहिनांसाठी काही उपकरणे बनवतो. त्याने दृष्टीहिनांसाठी भूमितीतील चौकोन, त्रिकोण, वर्तुळ या आकृती काढता येतील आणि अनुभवता येतील असे उपकरण बनवले आहे. अंध व्यक्ती त्या उपकरणाच्या सहाय्याने विविध आकृती व चित्रे काढू शकतील आणि त्यांचे आकलन करून घेऊ शकतील. अशोकच्या त्या उपकरणास “लुईस ब्रेल टच ऑफ जीनियस फॉर इनोव्हेशन” हा अमेरिकन पुरस्कार मिळाला आहे. अशोक सध्या दृष्टीहिनांसाठी हाताने वापरता येईल असा वैयक्तिक प्रिंटर बनवण्याच्या मागे आहे. तो प्रिंटर कोणाही दृष्टीहिनास सहज परवडू शकेल अशा किंमतीत त्याला बनवायचा आहे. त्याची भावेश भाटिया यांच्याबरोबर प्रिंटरच्या वापरासाठी आणि प्रमोशनसाठी चर्चा चालू आहे. तिचा भाग म्हणून अशोक महाबळेश्वरला निघाला होता.

भावेश यांचा कारखाना महाबळेश्वरपासून सहा किलोमीटरवर निसर्गरम्य परिसरात आहे. आम्ही पोचल्यावर, भावेशजींच्या पत्नी नीता यांनी भावेशजींना आम्ही आल्याची वर्दी दिली. आतून सहा फूट उंच, मध्यमवर्गीय, डोळ्यांना काळा गॉगल लावलेले असे रुबाबदार भावेश भाटिया आले. “आईये, आईये, अशोकजी कैसे हो आप? आपको मिलकर बहोत बहोत अच्छा लगा” असे म्हणून त्यानी अशोकला जणू काही खूप वर्षांची ओळख असल्यासारखी मिठी मारली. स्पर्श ही दृष्टीहिनांसाठी त्या व्यक्तीची ओळख असते. त्यामुळे नव्याने ओळख करताना मिठी आवश्यक असते. त्यांची व्यक्तीविषयी प्रेम, जिव्हाळा व्यक्त करण्याची आणि ओळख करून घेण्याची ती पद्धत. अशोकने त्याची स्वतःची, माझी आणि चारूची भावेश यांच्याशी ओळख करून दिली. आमच्या दोघांचेही रीतसर मिठी मारून स्वागत झाले.

कारखान्यात काही दृष्टिहीन काही मोल्डच्या सहाय्याने मेणबत्त्या बनवत होते. सभोवताली अनेक रंगांच्या, अनेक प्रकारच्या सुगंधी मेणबत्त्यांचे प्रदर्शन लावलेले होते. भावेशजी यांनी आम्हाला एका दृष्टिहीन कर्मचाऱ्याच्या ताब्यात दिले. त्याने डोळस माणसाप्रमाणे आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मेणबत्त्यांची माहिती दिली. गंमत जाणवली, की त्या मेणबत्ती मॉलची मांडणी अशी केली आहे, की अंध व्यक्ती विनाअडथळा सहज संचार करू शकेल! आमचा माहितगार अंध असूनदेखील त्याला जे दाखवायचे तेथे तेथे उभा राहून ती ती वस्तू दाखवत होता. जणू काही त्याला तो जे दाखवतोय ते दिसत होते! तो प्रत्येक प्रकारच्या मेणबत्तीची माहिती देत होता. तो कोठेही अडखळला नाही की त्याने चुकीचे काही दाखवले नाही. अक्षरशः हजारो प्रकारच्या मेणबत्त्या, त्यांचे सुगंध! त्यांचे रंग! मन हरखून जात होते. साध्या मेणबत्तीतून किती आकार, किती रंग आणि किती सुगंध निर्माण करावेत आणि तेदेखील ज्यांना दृष्टी नाही अशा व्यक्तींनी! आश्चर्य होते. एका दालनात नरेंद्र मोदी, अमिताभ आणि इतर... असे पूर्णाकृती पुतळे केलेले होते. प्रदर्शन बघून झाले. भावेश यांच्या सुविद्य पत्नी नीताताई यांची भेट झाली. ‘सनराईज कॅण्डल्स’च्या उभारणीत भावेश यांच्या त्या सहचरीचा वाटा सिंहाचा आहे. नीता स्वत: डोळस आहेत. कदाचित, सत्तर ते ऐंशी अंध कर्मचारी असलेल्या त्या कारखान्यात त्यांचे दोन डोळे काय ते बघू शकतात! नीता सगळ्या संस्थेचे व्यवस्थापन आणि अकौंटस बघतात. भावेशजी मार्केटिंग. आमचा कारखाना बघून झाला.

भावेश यांच्याशी चर्चा करायची होती. ऑफिसमध्ये बसलो. भावेश यांची लाईफ स्टोरी ऐकण्याची उत्सुकता होती. भावेश मूळ चंद्रपूरचे, कच्छी गुजराथी. भावेश जन्मतः डोळ्यांचा कमकुवतपणा घेऊन आले. कमजोरी पुढे, शालेय वयात वाढत जाऊन त्यांना पूर्ण अंधत्व आले. घरची परिस्थिती गरिबीची. वडील नोकरीनिमित्त महाबळेश्वर येथे शिफ्ट झाले एका इस्टेटचे व्यवस्थापक म्हणून. पगार अपुरा. पण राहण्यास आउटहाउस मिळाले. भावेश यांची आई त्यांची प्रेरणास्रोत बनली. तिने भावेश यांच्या मनावर बिंबवले, की “भावेश, तू हे जग बघू शकत नाहीस, तर असे काही तरी कर की जेणेकरून जग तुझ्याकडे बघत राहील!” आई स्वतः फारशी शिकलेली नव्हती, पण तिने भावेश शिकतील यासाठी कंबर कसली. तिच्या प्रयत्नांनी भावेश यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. पण ते पाहण्यास आई नव्हती. आई कॅन्सरचे निमित्त होऊन अकाली गेली. भावेश यांनी मेणबत्ती बनवण्याचे आणि मसाज देण्याचे शिक्षण रीतसर घेतले. त्याने महाबळेश्वरला तारांकित हॉटेलांमध्ये जाऊन ग्राहकांना मसाज करणे सुरू केले, पण मन रमेना. त्यांच्या डोक्यात वेगवेगळ्या मेणबत्त्या साद घालत होत्या. त्यांनी मसाजच्या पैशांतून साठलेल्या पाच हजारांची गुंतवणूक करून, काही साचे आणि कच्चे मेण खरेदी करून प्रयोग सुरू केले.

वेगवेगळ्या आकारांच्या मेणबत्त्या बनवायच्या, वेगवेगळे सुगंध बनवून त्यात मिक्स करायचे आणि महाबळेश्वरमध्ये हातगाडीवर मेणबत्त्या विकायच्या हा अशा प्रकारचा त्यांचा उद्योग सुरू झाला. विक्री होत होती, पण समाधान मिळत नव्हते. एके दिवशी एक मुलगी मेणबत्त्या खरेदी करण्यास आली. तिने त्यांना मदत करायला सुरुवात केली. भावेश सुखावत होते. त्या मुलीने दहा-बारा दिवस बरोबर काम केल्यावर एकदम लग्नासाठी साद घातली. भावेश यांना आश्चर्य करण्याची पाळी आली. श्रीमंत घरातील एकुलती एक मुलगी म्हणते, की मी तुला जीवनाची साथ द्यायला तयार आहे. एखाद्या सिनेमात शोभेल अशी स्टोरी. नायक-नायिकेने लग्न करण्याचे ठरवले. घरचा विरोध पत्करून नीता भावेश भाटिया यांच्या कायमच्या सहचरी बनल्या. एकास दोघे झाले होते, पण जबाबदारी वाढली होती. दिवसभर ज्या भांड्यात मेण वितळवून मेणबत्त्या बनवायच्या त्याच भांड्यात स्वयंपाक करायचा असा संसार सुरू झाला. भावेश जिभेवर साखर घेऊन जन्माला आले आहेत, त्यामुळे महाबळेश्वरला येणारे प्रवासी ग्राहक बनून व्यवसाय वाढत गेला. जम जसजसा बसू लागला तसतसे इतर दृष्टिहीन व्यक्तींना सामावून घेतले जाऊ लागले. त्यांनी कित्येक दृष्टिहीनांना भीक मागण्यापासून परावृत्त केले; कष्ट करून स्वत:च्या पायावर उभे राहण्यास उद्युक्त केले.

‘इन्फोसिस’मधील एक तरूण अधिकारी सपत्नीक महाबळेश्वरला आला होता. भावेश यांची त्याच्याशी थोडी सलगी झाली. त्यांनी नवविवाहितांना गिफ्ट म्हणून सुगंधी मेणबत्ती दिली. त्या अधिकाऱ्याचा फोन दोन दिवसांत आला, “भावेश, मी इन्फोसिसच्या परिसरात तुमच्यासाठी Stall बुक केला आहे. तुम्ही तुमच्या मेणबत्त्या घेऊन या. पुढचे मी बघून घेतो.” भावेश आणि नीता हिंजवडीला गेले. तेरा लाखांच्या मेणबत्त्या त्या पहिल्या प्रदर्शनात विकल्या गेल्या. भाटिया यांना मार्केटिंगची किल्ली सापडल्यागत परिस्थिती झाली. भाटिया दाम्पत्याने मार्केटिंगचा सपाटाच लावला. त्यांनी वेगवेगळ्या तारांकित हॉटेलांमध्ये, मॉलमध्ये, कंपन्यांमध्ये स्टॉल लावून विक्रीचा धडाका लावला. कारखान्यात दृष्टिहीन कामगार तसेच विक्री करणारेदेखील दृष्टिहीन, अशी एक साखळी तयार झाली. उलाढाल वाढली.

कामगारांची कमाई केवळ स्वत:पुरती राहिली नाही तर ते त्यांचे कुटुंबीय पोसू शकतील इतकी वाढली. व्यवसाय वाढला तशी प्रसिद्धी मिळाली. एके दिवशी ती कीर्ती मुकेश अम्बानी यांच्यापर्यंत पोचली. ‘रिलायन्स उद्योगसमूहा’तर्फे भावेशजींचा सत्कार झाला आणि एकावन्न लाख रुपयांचा चेक मदतीपोटी मिळाला. भावेश यांनी चेक विनम्रपणे परत केला. “आम्हाला मदत देऊ नका, काम द्या. आम्ही तुमच्या उद्योगसमुहास मेणबत्त्या पुरवू शकतो.” देशातील बलाढ्य असा ‘रिलायन्स उद्योगसमूह’ कोट्यवधी रुपयांची खरेदी ‘सनलाईट कॅण्डल्स’कडून करतो. भावेश यांनी ग्राहक कायमचा जोडून घेतला!

त्यांच्या जीवनाचे सूत्र आहे “दया नको संधी द्या. त्यांनी ‘रिलायन्स उद्योगा’सारखे अनेक कॉर्पोरेट देशी-परदेशी ग्राहक जोडले आहेत. त्यांचा हा उद्योग वार्षिक पंचवीस कोटींची उलाढाल करतो. तेथे बनवलेल्या मेणबत्त्यांच्या गुणवत्तेत कसर ठेवली जात नाही. प्रत्येक मेणबत्ती धूरविरहित, ओघळविरहित आणि पर्यावरणमित्रता राखणारी असते. मेणबत्तीचे वेगवेगळे साचे आणि सुगंध तेथेच डिझाईन केले जातात. भावेश यांच्या मते, देशात मेणबत्त्यांचे दहा हजार कोटींचे मार्केट आहे. चीन, मलेशिया आदी देशांतून मेणबत्त्या आयात केल्या जातात. त्यांचा मानस सर्व मार्केट भारताकडे वळवण्याचा आहे. त्यांची तयारी अनेक अंध व्यावसायिकांची साखळी निर्माण करण्याची आहे. भावेश यांनी त्यांचे व्यवसाय मॉडेल अनेक ठिकाणी उभारून दिले आहे. त्यामुळे देशात अनेक ठिकाणी तसे कारखाने उभे राहिले आहेत आणि जवळजवळ दोन हजारांपेक्षा अधिक अंधांसाठी रोजगार निर्माण झाले आहेत. भावेश यांना अनेक व्यावसायिक पुरस्कार मिळालेले आहेतच, पण सर्वोच्च पुरस्कार त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला आहे. ते मेणबत्ती बनवण्याचे ट्रेनिंग’ हेलेन केलर आणि किडनी पेशंट असोसिएशन’ यांच्या मार्फत  करतात.

भावेश यांचे वाचन, श्रवण आणि स्मरणशक्ती अफाट आहे. ते एकदा भेटलेली व्यक्ती केवळ आवाजावरून ओळखतात. त्यांच्याशी बोलताना एक जाणवते, की माणूस आतून बोलतो. ते स्वत: उत्तम वक्ते आहेत. त्यांच्या सहज बोलण्यातदेखील शेरोशायरीची उधळण असते. समोरच्या व्यक्तीस प्रेरणा व ऊर्जा देण्याची प्रचंड ताकद त्यांच्या वाणीत आहे. ते देशात व परदेशात Motivational speaker म्हणून व्याख्याने देतात. भावेश हे उत्तम खेळाडू आहेत. त्यांना व्यायामाची मनापासून आवड आहे. ते त्यांच्या शरीरयष्टीतून जाणवतेदेखील. त्यांनी त्यांचे शरीर सुदृढ राखून दृष्टीची कमतरता भरून काढली आहे. त्यांच्या व्याख्यानातून ते तरुणांना व्यायामाचे आणि खेळण्याचे महत्त्व सांगतात. त्यांनी धावणे, गोळाफेक अशा अनेक प्रकारांत पदके मिळवली आहेत. Para-Olympic मध्ये सुवर्णपदके मिळवली आहेत.

आम्ही भावेश यांना 2018चा ‘अनुकरणीय उद्योजक’पुरस्कार स्वीकारण्याची विनंती केली. त्यांनी ती आनंदाने मान्य केली आणि त्यांनी सन्मान सपत्नीक 4 मार्च रोजी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात स्वीकारला. त्यांनी त्या प्रसंगी केलेले भाषण हे त्या कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू ठरले. त्यांनी सभागृह चाळीस मिनिटे हसतेखेळते तर ठेवलेच, अनेक प्रसंगी डोळ्यांत पाणी उभे केले. “जीवनात जे मिळाले त्याचा आनंदाने स्वीकार करा आणि प्रयत्नवादी व्हा” हा मौलिक सल्ला तरुणांना दिला.आमच्या एका मित्राची प्रतिक्रिया फार बोलकी आहे. “श्रीकांत, भावेशचे भाषण ऐकले. एक ठरवले की आपल्याला परमेश्वराने दिलेल्या या आयुष्यात तक्रार करण्यासारखे काहीही नाही. येथून पुढे तक्रार म्हणून करणार नाही!” वाचकहो, तुम्ही महाबळेश्वरला कधी गेलात तर बघण्यासारखा एक प्रेक्षणीय Point आहे, तो म्हणजे ‘सनलाईट कॅण्डल्स’.

- श्रीकांत कुलकर्णी
shrikantkulkarni5557@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.