आगाशिव लेणी (Aagashiv Cave)


_Aagashiv_Leni_1.jpgकराड शहराच्या नैर्ऋत्येस तेरा किलोमीटर अंतरावर आगाशिव नावाचा डोंगर आहे. त्या डोंगरात चौसष्ट लेणी खोदलेली आहेत. त्या डोंगरावर आगाशिव नावाचे शिवालय आहे. त्यावरूनच लेण्यांना आगाशिव लेणी असे म्हणतात. ती लेणी इसवी सनपूर्व 250 ते 200 या 450 वर्षांच्या कालखंडात टप्प्याटप्प्याने खोदली गेली असावीत. ती लेणी हा कराडचा सांस्कृतिक ठेवा बनून गेला आहे. कराड हे तालुक्याचे ठिकाण असून ते सातारा जिल्ह्यात आहे. आधुनिक कराड हे प्राचीन महाराष्ट्रातील प्रसिद्ध नगर होते. त्या नगराचा उल्लेख भारहूत, जुन्नर, कुडा व इतर लेण्यांतील शिलालेखांतून करहाटक, करहकट किंवा कारहाडक असा आढळतो.

लेणी पुणे-बंगळूर महामार्गाच्या पश्चिमेस आहेत. त्या लेणींचा विस्तार जखिणवाडी, आगाशिव व चचेगाव या तीन गावांमध्ये अाहे. ती तीन ओळींमध्ये आहेत. एकूण पाच चैत्यगृहे व उर्वरित विहार अशी रचना आहे. जखिणवाडीतील पहिल्या ओळीत तेवीस लेणी, दुसऱ्या ओळीत एकोणीस लेणी तर तिसऱ्या ओळीत बावीस लेणी आहेत. ती ओळ कोयना दरीसमोर येते. लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे, काही लेण्यांमध्ये बुद्धमूर्ती नसून 'दागोबा' म्हणजेच दंडगोलाकार पाषाण आहे. त्यास बुद्धप्रतीक मानले जाते. तसे स्तूप सहाव्या व सोळाव्या लेण्यांमध्येही पाहण्यास मिळतात. त्यातील लेणी क्रमांक तीन येथे संत चोखामेळा यांची  मूर्ती आहे म्हणून ती लेणी 'चोखामेळा गुंफा' म्हणून ओळखली जाते, तर लेणी क्रमांक चार ही लक्ष्मीची वाडी येथे आहेत. तेथे पूर्वी लक्ष्मीची मूर्ती होती. तेथील विहाराच्या मुख्य मंडपाच्या दोन्ही अंगांस प्रत्येकी दोन खोल्या खोदलेल्या आहेत. गुंफा क्रमांक पाचमधील चैत्य मंदिराचे अर्धवर्तुळाकृती छत अद्वितीय आहे. गुंफा क्रमांक सोळामध्ये स्तूपयुक्त उपासना मंदिर आहे. बासष्टाव्या विहार गुंफेच्या तीन अंगांना सतरा छोट्या खोल्या आहेत. संघमित्राने बौद्ध भिक्खू संघमला गौतम बुद्धाच्या सन्मानाप्रीत्यर्थ त्या लेणी अर्पण केल्या. त्यासंबंधीचा शिलालेख सत्तेचाळीसाव्या लेण्यामध्ये आढळतो. दुसऱ्या एका ठिकाणी, लेणे देय धम्मो दानम् – लेण्यांची धार्मिक देणगी असा उल्लेख आढळतो. संघमित्रा ही सम्राट अशोक याची कन्या होती. तिने बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार यांसाठी संपूर्ण आयुष्य व्यतीत केले.

_Aagashiv_Leni_2.jpgलेणी हीनयान पंथीयांची आहेत. ती बौद्ध भिक्षूंच्या वर्षावासासाठी खोदलेली असावीत. ती हीनयान पंथीयांची असल्यामुळे त्यामध्ये अलंकरण व मूर्तिशिल्पे यांचा जवळजवळ अभाव आहे. आगाशिवजवळ जखिणवाडी समूहातील क्रमांक सहाचे चैत्य लेणे वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते लेणे 10.5 मीटर फूट खोदलेले व चार मीटर रुंद आहे. मुख्य दालनात जाण्यासाठी दरवाज्यावर खिडकी असून ते अर्धवर्तुळाकार व गजपृष्ठाकार आहेत. त्यात स्तंभांचा अभाव दिसतो.

दरवाज्याच्या भिंतीलगत अर्धस्तंभ आहेत. त्यांच्या शीर्षावर उलटा घट व अमलकाची चौकट दिसून येते. त्यावर एका बाजूला सिंह व दुसऱ्या बाजूला धर्मचक्र आहे. जुन्नर येथील स्तूपाप्रमाणे येथील स्तूपाचे छत्र छताला भिडवण्यात आलेले आहे. तेथील एका चैत्य लेण्यात कुडा व कार्ले येथील चैत्यगृहाप्रमाणे दानी युगुलाचे शिल्प दिसून येते. ते बरेचसे झिजलेले आहे. ते शिल्प यक्ष दांपत्याचे असावे. पुरुषाने धोतरवजा अधोवस्त्र परिधान केलेले असून गळ्यात माळा व कानांत अलंकार आहेत. त्याच्या मस्तकावरील पागोटे कार्ले येथील दानी पुरुषाप्रमाणे आहे. स्त्रीमूर्तीच्या हातात करंडकासारखी वस्तू असून ती पुरुषाला अर्पण करताना दाखवण्यात आलेली आहे.

कराडच्या लेण्यातील दगड ठिसूळ निघाल्यामुळे त्यांची नासधूस मोठ्या प्रमाणावर झाली आहे. तेथील शिलालेखातील अक्षरे जुन्या वळणाची आहेत. प्रस्तर ठिसूळ निघाल्यामुळे आलेखांची झीज बरीच झालेली आहे; अक्षरे नीट वाचता येत नाहीत.

त्या परिसरातील हजारो लोक आगाशिव डोंगरावरील शंकराच्या(भैरोबाच्या) मंदिरात श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी जातात.

_Aagashiv_Leni_3.jpgडोंगरावरून कराड शहराचे (Karad) दृश्य सुंदर दिसते. चोखंदळ रसिक लोक तेथे फिरण्यासाठी जातात आणि लेण्यांचा आनंद घेतात. लोक अधिकतर एरवीही पावसाळ्यात तेथे जातात. शाळांच्या सहलींचेदेखील आयोजन तेथे केले जाते. लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी भूगर्भशास्त्रात प्रावीण्य मिळवलेले काही लोक कधी कधी येतात. या लेणी पांडवलेणी म्हणूनही प्रसिद्ध आहेत.

बरीच लेणी सुस्थितीत आहेत. कराडच्या लेण्यांचा विकास अजंठा-वेरूळ प्रमाणे केला, तर कराडच्या सांस्कृतिक वैभवात भर पडेल.

आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी नांदलापूर हे गाव आहे.

या गुंफांकडे जाण्यासाठी कराडपासून जवळच असलेल्या जखिणवाडी या गावातूनही तेथे जाता येते. कराड शहरापासून जखिणवाडी तीन किलोमीटरवर आहे. जखिणवाडी हायवेपर्यंत एसटी व डुगडूगी येते तेथून पाच मिनिटांवर गाव आहे. गावात मळाईदेवी मंदिरात राहता येते. सातारा ते आगाशिवमधील अंतर सत्तावन्न किलोमीटर आहे.

- नितेश शिंदे

(आधार – महाराष्ट्रातील लेणी पुस्तक – दाऊद दळवी आणि जखिणवाडी गावातील माहितगार व्यक्ती)

 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.