जोतिबाची वाडी - शाकाहारी गाव


_JyotibachiWadi_1.jpgजोतिबाची वाडी हे गाव उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. सतराशे लोकसंख्या असलेले ते गाव तब्बल दोनशे वर्षांपासून शाकाहारी आहे! गावातील रहिवासी मांसाहार करत नाहीत.

जोतिबाची वाडी हे गाव भूम तालुक्यापासून सत्तावीस किलोमीटर अंतरावर वसले आहे. आत जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. गावात जोतिबा, महादेव, यमाई, चोपडाई, मारुती, विठ्ठल-रूक्मिणी अशी मंदिरे आहेत. गावचे ग्रामदैवत जोतीबा आहे. देवाच्या नावावरूनच गावाचे नाव जोतिबाची वाडी पडले असे गावातील लोक सांगतात. दररोज मंदिरात होत असलेल्या भजनात गावकरी सहभागी असतात. गावातील तंट्यांचे/मतभेदांचे विषय गावातच मिटवले जातात. कोणीही तक्रार नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेले नाही. गावात देशी दारूचे/बिअरचे दुकान नाही. गावातील सत्तर तरुण भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत. गावात जुन्या पद्धतीचा दगडी आड आहे. आडात बाराही महिने मुबलक पाणी असते. गावकरी त्याच आडाचे पाणी पिण्यासाठी वापरतात. आडाचे पाणी दुष्काळात कधीही आटले गेलेले नाही.

जोतिबाचे मंदिर बालाघाट डोंगररांगांच्या कुशीत वसले आहे. त्याच मंदिरामुळे गावकऱ्यांनी शाकाहारी राहण्याची परंपरा पाळली आहे. त्यामागे एक कहाणी आहे. ती कहाणी आधुनिक काळाशी सुसंगत वाटत नसली, तरी त्यातून मिळणारा बोध हा परंपरा व नवता यांना जोडणारा सेतू आहे. जोतिबा मंदिर देवस्थान कोल्हापूरच्या जोतिबाचे ठाणे म्हणून ओळखले जाते. गावात मोठा उत्सव दसऱ्याला, चैत्र पौर्णिमेला व श्रावण महिन्यातील तिसऱ्या रविवारी भरतो. चैत्र पौर्णिमेला सर्वात मोठी यात्रा भरते. यात्रेचे महात्म्य कायम राखण्यासाठी धार्मिक नियमांचे पालन काटेकोरपणे करण्यात येते. यात्रेला राज्यातील अहमदनगर, उस्मानाबाद, बीड या ठिकाणांहून लाखो भाविक येतात. जोतिबास पुरणपोळीचा नैवैद्य दाखवला जातो. देवास मांसाहार चालत नाही, म्हणून गावकरीही मांसाहार करत नाहीत. शाकाहारी राहण्याची ही परंपरा किती वर्षांपासून चालू आहे, याविषयी तेथील नागरिक अण्णासाहेब पवार व शिक्षक शिवाजी बराटे यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, ''आम्ही वडिलांना व आजोबांना विचारले असता, जोतिबाचे मंदिर जागृत असल्यामुळे गावात कोणी कोंबडे व बकरे कापलेले नाही. जोतिबावर असलेली श्रद्धा अशी चालत आली आहे.'' शाकाहाराची परंपरा दोनशे वर्षांपासून सुरू आहे असे तर्काने सांगितले जाते पण त्याचा कोणी गवगवा करत नाहीत. जोतिबाची वाडी हे निजाम राजवटीतील गाव. परंतु येथील जोतिबाच्या जागृत मंदिराच्या भयाने रझाकारांनी त्या गावाला त्रास कधीही दिला नाही. गावात काही जण माळकरी आहेत. ऊर्वरित जे काही लोक आहेत, त्यांपैकी मांसाहार करणारे दोन टक्के निघतील. त्यांना मटण खाण्याची इच्छा झाल्यास ते परगावी नातेवाइकांकडे किंवा शहरातील हॉटेलमध्ये जाऊन मांसाहार करतात. मात्र ते लोक गावात प्रवेशतात आंघोळ करूनच!. पुणे - मुंबई येथे स्थायिक झालेले गावातील लोकही गावी आल्यावर मांसाहार करत नाहीत.

चैत्र पौर्णिमा यात्रेनंतर सर्वात मोठा उत्सव श्रावण महिन्यातील तिसऱ्या रविवारी असतो. त्या दिवशी पंचक्रोशीसह हजारो भाविक जोतिबाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. श्रावण महिन्यात जोतिबाच्या वाडीलाच यात्रेचे स्वरूप आलेले असते. यात्रेत लेझीम पथक, त्यामागे पालखी असते. पूर्वीच्या काळी नृत्यांगणा हा प्रकार असायचा, पण आता तो पाहण्यास मिळत नाही. जोतिबा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. त्यासाठी अर्धा कोटीची लोकवर्गणी जमा झाली होती. मंदिर परिसर, मंदिराचे शिखर, सभामंडप आदी विकासकामे करण्यात आली आहेत.

जोतिबाची वाडी या अथवा जवळपासच्या गावात बाजार भरत नाही. त्यामुळे गावकरी सोळा किलोमीटरवर असलेल्या ईट या गावी शनिवारी जेव्हा बाजार भरतो, तेव्हा तेथे जातात. गावकऱ्यांची उपजीविका शेतीवर आहे. तसेच, पशुपालन हा जोड व्यवसायही मोठ्या प्रमाणावर केला जातो. प्रत्येक दिवशी तेथून पाच हजार लीटर दूध डेअरीत जमा केले जाते. गावात ‘ज्योतिर्लिंग व्यावसायिक दुध उत्पादक संस्था’ दूध डेअरी आहे. गावात वीस ते पंचवीस खवाभट्टी (मावा) आहेत. गावात खव्यापासून बनवला जाणारा पेढा हा प्रसिद्ध पदार्थ आहे.

जोतिबाच्या वाडीला जाण्यासाठी ईट येथून खासगी जीपगाड्या वगैरे अशी वाहने मिळतात. गावात व्यसनाचे प्रमाण न जाणवण्याइतके अल्पसे आहे. शिक्षणामुळे नोकरी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. गावात आठवीपर्यंत शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी पखरूड या तीन किलोमीटरवर असलेल्या गावी जातात. पंच्याण्णव टक्के समाज मराठा आहे. मातंग व गोसावी समाजांची चार घरे आहेत.

अण्णासाहेब पवार या तरुणाच्या मार्गदर्शनाखाली तब्बल साठ तरुण भारतीय सैन्यदलात भरती झाले आहेत. पवार गेल्या वीस वर्षांपासून गावात दरवर्षी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा भरवत असतात. त्यानिमित्ताने स्पर्धेकरता उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड, लातूर, सोलापूर, पुणे, बारामती या परिसरातील खेळाडू त्या छोट्याशा गावात येतात. स्पर्धेमुळे गुणवंत खेळाडूंना वाव मिळाला आहे. तो खेळ वर्षातून दोनदा दिवाळी व नागपंचमीला आयोजित केला जातो.

जवळच तीन किलोमीटरवर असलेल्या बेलेश्वर येथे पुरातन देवस्थान आहे. तसेच आठ किलोमीटरवर खर्डा येथे किल्ला आहे. पखरुड, गिरलगाव, घुलेवाडी ही गावे पाच-सहा किलोमीटर परिसरात आहेत. गावचे हवामान उष्ण आहे. निसर्गाची साथ मिळत नसली तरी तेथील शेतकरी समाधानी आहे.

- विकास पांढरे

vikaspandhare3@gmail.com

(साप्ताहिक विवेक, वेबसाईटवरून उद्धृत)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.