प्रगतिपथावर पुढे असणारे – कात्रज


_Katraj_2.jpgछत्रपती शिवाजी महाराजांनी लालमहालात शाहिस्तेखानाची बोटे कापल्यानंतर मागे लागलेल्या मोघल सैन्याला चकवा देण्यासाठी कात्रज घाटात शे-दीडशे बैलांच्या शिंगांना बांधलेले पलिते पेटवून दिले. त्या पलित्यांच्या धावत्या ज्वाला पाहून पुण्यातील मोघल सैन्याला ते मशाली घेऊन पळून जाणारे मावळेच वाटले! ते सैन्य त्या बैलांच्या दिशेने धावले. मोगलांना शिवाजी महाराज त्यांच्या मावळ्यांसह अशा रीतीने चकवा देत दुसऱ्या मार्गाने सुखरूपपणे सिंहगडावर पोचले. शत्रूला अनपेक्षित धक्का देऊन थक्क करणे व भानावर येईपर्यंत स्थिर विजय मिळवणे म्हणजेच 'कात्रजचा घाट' दाखवणे ही म्हण जगभर प्रसिद्ध झाली, ती इतिहासातील त्या प्रसंगामुळेच! ते हे कात्रज गाव!

पूर्वी गोसाव्यांचे, साधुमहात्म्यांचे वास्तव्य असलेल्या त्या गावात नानासाहेब पेशव्यांच्या काळात बदलास सुरुवात झाली. आताचे 'पुणे' म्हणजे तेव्हाचे 'पुनवडी' मध्ये पाण्याची व्यवस्था करण्यासाठी म्हणून पेशव्यांनी डोंगरदऱ्यांत वसलेल्या कात्रज गावाची निवड करून, गावात दोन मोठ्या तलावांची निर्मिती केली. आधुनिक युगातील जलशुद्धीकरण यंत्रणाही कमी पडेल इतकी उत्तम यंत्रणा त्याकाळी कात्रज तलावांमध्ये राबवली गेली होती. डोंगरदऱ्यांतून वाहत येणारे गाळयुक्त पाणी थेट तलावात जाऊ नये याकरता, तलावाच्या चारही बाजूंने दगडी चर बांधण्यात आला. तलावात पाणी येण्यासाठी एक लहान जागा ठेवून त्यावर झडपा बसवण्यात आल्या. जेव्हा तलावात गाळयुक्त पाणी येईल तेव्हा त्या झडपा बंद केल्या जात व ते पाणी ओढ्यामार्फत पुढे सोडून दिले जाई. स्वच्छ पाणी झडपा उघडून तलावात नंतर सामावून घेतले जाई. तलाव पूर्ण भरल्यानंतर झडपा पुन्हा बंद केल्या जात. तलावातील पाणी पुढे गुप्त भुयारामार्फत पुण्यातील सर्व पेठांमध्ये पोचवले जात असे. पर्वती, सारसबाग, शनिवारवाडा व इतर पेठांमध्ये जिवंत असलेले पाण्याचे झरे पाहण्यास आजही मिळतात.

_Katraj_3.jpgपांडवकालीन दोन शिवलिंगे असलेले महादेव मंदिर, जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिर यांसारखी ऐतिहासिक महत्त्व असलेली मंदिरे कात्रज गावात आहेत. एकात्मतेचा संदेश देणारे असे कात्रज गाव. भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठे असलेले ते गाव कालांतराने विभागणी होऊन कात्रज, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी अशा चार वाड्यांमध्ये विभागले गेले. गावाने शहरीकरण, औद्योगिकीकरण जवळ येत असतानाही शेतीला प्राधान्य दिले. मूळ कात्रज गाव शे-दोनशे उंबरठ्यांचे. ते हजारी केव्हाच पार करून गेले आहे. गावाने चांगलेवाईट बदल आत्मसात केले आहेत. समाजव्यवस्था, राहणीमान, उत्सवांचे आयोजन, सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम यांसाठी उत्तम उदाहरण म्हणून शहरात कात्रजचा उल्लेख केला जातो. कात्रजने रांगडी तसेच उच्चस्तरीय मल्लवी व अनेक नामांकित पैलवान राज्याला दिले आहेत. शहर पातळीवरील अनेक पुरस्कार, शासकीय व राजकीय पदे कात्रजकरांनी भूषवली आहेत. कात्रज छोटे-मोठे कारखाने, बांधकाम व्यवसाय, भारती विद्यापीठ, कात्रज दूध डेअरी, आंतरराष्ट्रीय राजीव गांधी प्राणी संग्रहालय, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग यांसारख्या प्रकल्पांमुळे बदलू लागले. कात्रजचा पुणे महानगरपालिकेत समावेश 1997साली करण्यात आला. गावातील विकासाला नंतर गती मिळाली. रस्ते, वीज व पाणी यांसारख्या मूलभूत समस्या 2002 ते 2012 या काळात प्रामुख्याने सोडवल्या गेल्या. गावाने राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून येऊन स्थायिक झालेल्या प्रत्येकाला सामावून घेतले आहे. त्यामुळे लोकसंख्या पन्नास हजारी पार जाऊन पोचली आहे. वसाहती ते उच्चभ्रू सोसायट्या अशी संमिश्र लोकवस्ती असणारे कात्रज गाव... तेथे शासकीय व नामांकित खाजगी शिक्षण संस्थांनी त्यांची पाळेमुळे घट्ट रोवली आहेत. आजूबाजूच्या परिसरातील अंदाजे दहा ते बारा हजार विद्यार्थी तेथे पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक पर्यंतचे शिक्षण घेत आहेत.

_Katraj_1.jpgनानासाहेब पेशवे तलावाचे करण्यात आलेले नुतनीकरण त्या तलावाच्या मधोमध कृत्रिम बेटावर साकारला गेलेला शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, आंतराष्ट्रीय दर्ज्याचे म्युझिकल फाउंटन, लहान मुलांसाठी 'फुलराणी' नावाची मनोरंजक सफर घडवणारी प्रवासी रेल्वेगाडी, महाराष्ट्रातील सर्वात मोठा दोनशेसदतीस फूट इतका उंच भारतीय तिरंगा ध्वज... किती आकर्षणे. कात्रज शहरातील हरित व सुंदर विभाग म्हणून ओळखले जाते, नागरिकांसाठी वाचनालये, विरंगुळा केंद्रे, उद्याने, क्रीडांगणे, स्वच्छतागृहे, उड्डाणपूल, भाजी मंडई, अद्ययावत तालीम, बहुउद्देशीय सांस्कृतिक केंद्रे, बायोगॅस प्रकल्प, सर्व धर्मीयांसाठी भव्य अद्ययावत स्मशानभूमी, कचरा व्यवस्थापन यांसारख्या अनेक प्रकल्पांमुळे कात्रजचा कायापालट झाला आहे. एका घोंगडीवर बसणारे गाव अलिकडच्या काळात राजकीय मतभेद व आपापसांतील हरवत गेलेला संवाद यांमुळे दुभंगले जात होते. परंतु ग्रामदेवतेचा मंदिर-जीर्णोद्धार व यात्रा यानिमित्ताने एकमेकांशी आपुलकीचा संवाद साधत, मतभेद दूर करत गावाच्या विकासासाठी एकत्र आले. गाव कात्रज घाटापासून तीन किलोमीटर आणि स्वारगेटच्या दिशेने सहा किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याचे दक्षिण प्रवेशद्वार म्हणूनही कात्रजची ओळख आहे.  

माजी सरपंच विठ्ठल गुजर, शांताराम बलकवडे, सुदाम बाबर, माजी नगरसेवक सुरेश कदम त्याचप्रमाणे गोविंद बाबर, भगवान जाधव, बबनराव लाटमे, सीताराम फाटे, सखाराम बहिरट, रामभाऊ पवार यांचे गावाच्या एकोप्यासाठी मोठे योगदान लाभले आहे.

- अमित फाटे
amit.phate.8170@gmail.com

लेखी अभिप्राय

Think big success big

Ákash Phate 12/06/2018

Very nice information

Mangesh Khapare 12/06/2018

आपल कात्रज सुंदर कात्रज

SANDIP Dharmad…12/06/2018

गावगाथा प्रसिद्ध करणे ही चांगली कल्पना आहे. यातून महाराष्ट्राची सांस्कृतिक आेळख हाेईल.

नंदकुमार माेरे

Nandkumar More29/06/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.