शंकरराव आपटे - लोकप्रिय खलनायक

प्रतिनिधी 31/05/2018

_ShankarravAapte_LokpriyKhalnayak_1.jpgशंकरराव आपटे हे महाराष्ट्रात गाजून गेलेल्या `बालमोहन` व `कलाविकास नाटक मंडळीं`त काम केलेले नट. यांची जन्मशताब्दीदेखील (2012) साली होऊन गेली. त्यानिमित्त बडोद्यात सुरेख कार्यक्रम झाला आणि शंकररावांच्या आठवणींना उजाळा मिळाला! ते त्यांचे घारे डोळे, चढलेली भुवई, खर्जातील भरदार आवाज आणि स्वतःचे नाटकाला वाहून देणे या गुणांमुळे नट आणि विशेष करून खलनायक म्हणून गाजले. 'देवमाणूस'मधील सुहास, 'घराबाहेर'मधील भय्यासाहेब या त्यांच्या ‘अमर’ भूमिका. त्यांच्या 'घराबाहेर' या नाटकाने मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊस नाट्यगृहात सव्वाशे सतत प्रयोगांचे रेकॉर्ड केले होते.

`बालमोहन`च्या रंगभूमीवर चर्चेतील खलनायक अशी कीर्ती शंकरराव आपटे यांनी संपादली. त्यांचा जन्म 5 जानेवारी 1912 रोजी झाला. त्यांचे वडील हरीभाऊ धरमतर येथे सरकारी पाणपोईत चाकरीस होते. आपटे यांचे इंग्रजी चौथीपर्यंत शिक्षण अलिबाग येथे झाले. त्याच सुमारास त्यांची आई गेली आणि त्यांच्या कुटुंबाची वाताहत झाली. वडीलांनी शंकररावांचा धाकटा भाऊ राम (पुढे जॅकी कूगन या नावाने प्रसिद्धीस आलेला) याला `बालमोहन संगीत मंडळी`त पाठवले. त्याच्यासोबत पालक म्हणून गेले. वडीलांनी शंकररावांना मुंबईला एका किराणा मालाच्या दुकानात नोकरीस पाठवले. मात्र शंकररावांना तेथे न करमल्याने त्यांनी जळगावचा रस्ता धरला. तेही `बालमोहन`मध्ये सामील झाले.

शंकररावांना रंगमंचावर जाण्याची संधी `बालमोहन`मध्ये लगेच मिळाली नाही. त्यांना तेथे पडतील ती कामे करावी लागली. शंकररावांना पहिले काम दोन वर्षांनी मिळाले ते स्त्रीभूमिकेचे. शंकररावांची आयुष्यातील पहिली आणि शेवटची स्त्री भूमिका! नंतर त्यांच्या कामाचा आलेख उंचावतच गेला. त्यांनी `स्वर्गावर स्वारी` नाटकात हिरण्यकश्यपू, `कर्दनकाळ`मध्ये हिमसागर, `माझा देश`मध्ये शिवाजीचे काम केले तरी त्यांना नाट्य आणि अभिनय यांची कल्पना फारशी नव्हती. पुढे, त्यांना `साष्टांग नमस्कार`मध्ये मल्लिनाथची भूमिका मिळाली. ते मल्लिनाथचा बदमाशपणा इतका सफाईने दाखवत, की प्रेक्षकांना त्यांना मारावेसे वाटे. शंकरराव यांनी `घराबाहेर` या नाटकातील भय्यासाहेब या भूमिकेत अनेकविध बारकावे दाखवत साकारली आणि त्यांचे नाव गाजू लागले. त्यांची `भ्रमाचा भोपळा`मधील नागनाथची भूमिका मात्र खास असे वैशिष्ट्य नसल्याने, ती मोठी असूनही प्रेक्षकांच्या लक्षात राहिली नाही.

शंकरराव आचार्य अत्रे यांच्या `लग्नाची बेडी` नाटकातील तिमिर या खलनायकाची भूमिका करत. त्यांची ती भूमिका प्रेक्षकांना भावली. त्यांच्यानंतरही अनेकांनी ती भूमिका केली, पण त्या नटांना शंकररावांएवढे लोकप्रियतेचे भाग्य लाभले नाही. नंतर काही वर्षांनी, शंकरराव रंगभूमीवर काम करत नव्हते आणि महाराष्ट्रात राहत नव्हते तरी 1958 मध्ये `संयुक्त महाराष्ट्र कलावंत नाट्यशाखे`तर्फे तिमिरच्या भूमिकेसाठी खास त्यांनाच बोलावण्यात आले होते! शंकरराव यांच्या `वंदे मातरम` या नाटकामधील पुढारी सदानंद आणि `मी उभा आहे`मधील पीतांबर वकील या भूमिका फारशा गाजल्या नाहीत. त्यांनी `पराचा कावळा` या नाटकात प्रथमच मुलुंडची विनोदी भूमिका केली होती.

कालांतराने, `बालमोहन संस्थे`च्या प्रमुख नटांनी संस्था सोडली आणि `कलाविकास`ची स्थापना केली. `कलाविकास`च्या `फुलपाखरे` नाटकात शंकरराव यांनी वृद्ध रावसाहेबांची भूमिका केली. त्यांनी `देवमाणूस`मध्ये सुहासची खलनायकी बाजाची भूमिका कुशलतेने रंगवली आणि प्रेक्षकांनीही त्यांना तितकीच मनःपूर्वक दाद दिली. शंकररावांनी `विजय` या नाटकात वृद्ध आणि करारी गंगानाथची भूमिका इतकी छान वठवली, की खुद्द नाटककार नागेश जोशी यांनी त्यांचे कौतुक केले. मात्र ते नाटक यशदायी ठरले नाही. शंकरराव यांनी `भावबंधना`त धनेश्वर आणि `सौभाग्यलक्ष्मी`मध्ये वृद्ध नोकर भगवानची भूमिका केली. `कलाविकास संस्था` 1950मध्ये बंद पडली. त्यांनी कुटुंबाची जबाबदारी आणि व्यावसायिक अनिश्चितता यांमुळे बडोद्याला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

शंकररावांनी उत्तर आयुष्यात नाट्य व्यवसायाला रामराम केला असला तरी `नाटक` या विषयाने त्यांना सोडले नाही. त्यांना बडोद्यात आल्यावर स्थानिक नाट्यप्रेमींनी पुन्हा ते नाटकात खेचले. ते त्यात रमले आणि आणि स्थानिक नाट्यसंस्थांना त्यांच्या अनुभवाच्या शिदोरीच्या जोरावर त्यांनी मार्गदर्शन केले. मुलांना नाट्यशिक्षण दिले. तालमी घेतल्या, प्रसंगी, स्वतःही भूमिका केल्या आणि अशा तऱ्हेने तेथील नाट्यक्षेत्र गाजवले.

बडोद्यातील सुरुवातीचा काळ त्यांना त्यांच्या भूमिका आणि मराठी रंगभूमी यांची फार आठवण येई. पण त्यांनी स्वतःला सावरले. `बडोदेकर`ही त्यांना गुणी नट म्हणून ओळखत होतेच. त्यांनी तेथील वास्तव्यात पन्नास नाटकांचे दिग्दर्शन केले. शिवाय, वेगवेगळ्या भूमिका केल्या. बडोदे येथील वाङ्मय परिषदेच्या एका अधिवेशनाचे अध्यक्ष ग. दि. माडगूळकर होते.

अधिवेशनानिमित्त शंकररावांनी दिनकर पाटील यांचे `पैसे झाडाला लागतात` हे नाटक बसवले होते. त्यात त्यांनी म्हाताऱ्याची भूमिका केली होती. ते नाटक पाहिल्यावर माडगूळकर खूश होऊन शंकररावांना म्हणाले, की ``तुमचे आजचे काम दिनकर पाटलांनी पाहिले असते, तर त्यांना वाटले असते, की हे नाटक आपण या म्हाताऱ्यासाठी लिहिले आहे.`` त्यांना `हॅम्लेट` नाटक बसवायचे होते आणि जमल्यास त्यात `हॅम्लेट`च्या काकाची भूमिका करायची होती. मात्र ते स्वप्न अधुरे राहिले.  

शंकररावांना उल्हास व धाकटा आनंद हे दोन मुलगे. उल्हास बीई (सिव्हिल) होऊन मुंबई महानगरपालिकेत नोकरीला लागले व तेथेच कार्यपालक इंजिनीयर या पदावरून निवृत्त झाले. आनंद बी.कॉम. झाले व तेही मुंबईला रिझर्व्ह बँकेत नोकरीस लागले. दोघांची लग्ने झाली. मोठया उल्हास आणि अनुराधा यांचा मुलगा अजित एसएससीला ठाणे जिल्ह्यात पहिला आला आणि मुंबईच्या आयआयटीतून पदवीधर होऊन नोकरीस लागला. तर आनंद आणि अल्पना यांना अनिरुद्ध आणि अश्विनी आपटे-बोडस ही मुले. शंकरराव सपत्‍नीक अधुनमधून मुलांकडे जाऊन राहत. शंकरराव वयाची पंचाहत्तरी ओलांडल्यावर थकल्यामुळे ते बडोदे सोडून डोंबिवलीस मुलांकडे राहण्यास गेले. पण योगायोग असा, की ते काही निमित्ताने बडोद्यास गेले आणि तेथेच हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांनी जगाचा निरोप घेतला. ती घटना मोठी विलक्षण होती, असे आपटे कुटुंबीयांना वाटते. त्यांची दोन छायाचित्रे पुण्याच्या भरतनाट्य संशोधन मंदिरात लावण्यात आली आहेत.   

शंकररावांच्या या कार्याची दखल बडोदेकरांनी वेळोवेळी घेतली. एकावन्नाव्या, एकसष्टाव्या व पंचाहत्तराव्या वाढदिवशी कै. वसंतराव भोंडे यांनी लेख लिहिले. पुढे, त्यांची जन्मशताब्दीही मोठ्या थाटाने साजरी केली. त्यासाठी शंकररावांचे पुत्र, सून, नातू, तसेच पणतू ही सगळी मंडळी हजर होती. बडोदेकरांनी त्या कार्यक्रमासाठी पैसे उभे करण्याचे कठीण काम केले आणि नंतर आपटे कुटंबीयांना कळवले. तत्प्रसंगी काढण्यात आलेल्या स्मरणिकेत आपटे कुटुंबीयांनी शंकरराव आणि त्यांच्या पत्नी सरलाबाई यांच्यावर लिहिलेल्या लेखांचा समावेश आहे.

मुख्य म्हणजे आपटे यांचा बारा वर्षाचा पणतू अनिश अजित आपटे याने दिनांक 9 सप्टेंबर 2012 रोजी बडोद्यातील ‘महात्मा गांधीनगर गृहा’त ‘स्वर्गावर स्वारी'चा नाट्यप्रवेश सादर केला. कौतुकाची गोष्ट अशी, की सातवीतल्या त्या बारा वर्षाच्या लहान मुलाने पणजोबांच्या नाटकांची सीडी अनेक वेळा पाहून, पाठांतर करून, तसाच वेश करून स्टेजवर मोठ्या धिटाईने नाटकाचा एक प्रवेश केला; तसेच, नांदीही म्हटली. त्याखेरीज स्थानिक कलावंतांनी 'छूमंतर', 'देवमाणूस' आणि 'बेईमान' या नाटकांचे काही अंक सादर केले. ते कार्यक्रम सादर करण्याची तयारी चार महिन्यांपासून चालू होती. बडोद्यातील नाट्यप्रेमींनी मोठ्या आत्मीयतेने शंकररावांची जन्मशताब्दी साजरी केली, याचे विशेष कौतुक वाटते. लोक साधारणपणे दूर गेलेल्या माणसाला विसरतात आणि त्यांच्य-त्यांच्या उद्योगात रममाण होतात; जन्मशताब्दी कार्यक्रमाचा घाट घातला त्याअर्थी शंकराराव आपटे यांच्यावर सर्व नाट्यप्रेमीं बडोदेकरांचे किती लोभ आणि प्रेम होते, ते लक्षात येते.

(साभार संदर्भ – हिरव्या चादरीवर – वा. य. गाडगीळ)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.