अमृता करवंदेचा लढा अनाथांसाठी


_AmrutaKarvandecha_LadhaAnathansathi_1.jpgसंघर्षाची परिसीमा काय असते? हे अमृता करवंदे या बावीस वर्षीय मुलीकडे बघून लक्षात येते. अमृताचा मी खूप शोध घेत होते. कोण आहे ही मुलगी जिच्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अनाथ मुलांसाठी १% आरक्षण घोषित करून ऐतिहासिक निर्णय घेतला! अमृताबद्दल अनेक कारणांनी उत्सुकता जागृत झाली. अनाथपणाच्या बोचऱ्या जखमा सोबत घेऊन जगताना फक्त स्वतःचा विचार न करता तिच्यासारख्या असंख्य अनाथ मुलामुलींचा विचार करणारी अमृता ही निश्चितच सर्वसामान्य मुलगी नाही. तिचा जीवन प्रवासच तिचा संघर्ष व्यक्त करतो.

अमृता केवळ पाच वर्षांची होती तेव्हा तिला तिच्या वडिलांनी गोव्यातील ‘मातृछाया’ संस्थेत सोडले. तिची कॅन्सरशी झुंजणारी आई आयुष्यातील शेवटचे क्षण मोजत होती. अमृताचे वडील कर्जबाजारी झाले होते. त्यांनी अमृताच्या छोट्या दोन वर्षांच्या भावाला, अमितलादेखील ‘मातृछाया’मध्ये सोडले. दोन्ही भावंडे आई-वडील, घरदार असून अनाथ झाली. त्यांचे ते वय काही उमजण्याचे नव्हते. आई-वडिलांचा आठवणारा चेहरादेखील कालांतराने पुसट झाला. अमृताचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण ‘मातृछाया’मध्ये राहून झाले. तिला ती अभ्यासात हुशार असल्यामुळे पुढील शिक्षणासाठी पुण्यातील सेवासदन संस्थेत पाठवले गेले. तेथे तिने दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. ती दहावीनंतर परत मातृछायामध्ये आली. मात्र तिला स्वतंत्र होण्याची, स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. नेमके काय करायचे याचा शोध तिचा तिला लागत नव्हता. अमृता अमितला अनाथ आश्रमाच्या सुरक्षित जगात सोडून एकटी पुण्याला आली. ‘मातृछाया’मध्ये येणाऱ्या आणि एक प्रकारे अमृताचे पालकत्व घेतलेल्या डॉ. अनिता तिळवे यांनी तिला पुण्याला जाण्यासाठी पैसे दिले.

अमृता पुण्याला आली. तिने पूर्ण रात्र पुणे रेल्वे स्टेशनवर काढली. तिला तिच्या डायरीत शाळेतील एका मैत्रिणीचा फोन नंबर सापडला. मैत्रीण तिला न्यायला आली. तिने पुढील काही दिवस मैत्रिणीकडे काढले. मैत्रिणीच्या वडिलांची चहाची टपरी होती. ती तेथे त्यांना मदत करून कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घेता येईल याचे नियोजन करत होती. तिचा प्रवेश पुण्याजवळ अहमदनगरला एका कॉलेजमध्ये होत होता. अमृता पुणे सोडून नगरला गेली. तिची शिक्षणासाठी कष्ट करण्याची तयारी होती. तिने नगरमध्येही कधी कोणाच्या घरची धुणी-भांडी केली तर कधी साफसफाई. तिने कधी मोबाईल सिमकार्ड विक्रीचे तर कधी दुकानात सेल्सगर्लचे काम केले. ती त्या सगळ्या कामातून कॉलेजच्या फीची सोय करत होती. तिला जेवढे कष्ट करावे लागत होते तेवढी तिची शिकण्याची जिद्द वाढत होती. अमृताला पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण होत असताना मार्ग सापडला. तिने स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचे ठरवले. त्यासाठी ती नगरहून नाशिकला गेली. वर्षभरातच ती परत पुण्याला आली. तिने पुण्यात छोटीमोठी कामे करूनच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला. अमृतासमोर तिचे ध्येय होते कलेक्टर बनण्याचे. सरकारी व्यवस्थेचा भाग बनूनच अनाथ मुलांच्या समस्यांवर काम करणे सोपे होईल हे तिच्या लक्षात आले होते.

अमृताने नुकत्याच पी.एस.आय / एस.टी.आय/ ए.एस.ओ या एकत्रित परीक्षा दिल्या. त्यापैकी ओपन महिला (आरक्षित) पी.एस.आय. या परीक्षेचा कट ऑफ पस्तीस टक्के होता आणि अमृताला एकोणचाळीस टक्के मिळाले होते. म्हणजे कट ऑफ पेक्षा चार टक्के जास्त, पण अमृताकडे नॉनक्रिमी लेअर प्रमाणपत्र नसल्यामुळे तिला नापास म्हणून घोषित करण्यात आले. (ज्यांचे वार्षिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा कमी आहे त्यांची नॉनक्रिमी लेअर गटात गणना होते.) अमृताचे उत्पन्न वर्षाला एक लाख रुपयेसुद्धा भरत नव्हते. पण तिच्याकडे त्याचे कोणते प्रमाणपत्र नव्हते. किंबहुना तिच्याकडे कोणत्याच उत्पन्नाचा दाखला नव्हता. अनाथ आश्रमाकडून तिच्या जन्माबाबतची जी काही माहिती मिळाली तेवढीच तिच्या जवळ होती. परिणामी, तिला क्रिमी लेअर गटात टाकण्यात आले. तिच्यावर तो अन्यायच होता. ती पुण्याच्या कलेक्टरकडे दाद मागण्यास गेली, पण कलेक्टर महाशयांनी तिचे म्हणणेसुद्धा ऐकून घेतले नाही. ‘महिला बाल कल्याण’ अधिकाऱ्यांकडे गेली, तेथेही तशीच निराशा हाती लागली.

मात्र एव्हाना, अमृता एकटी राहिली नव्हती. तिच्याबरोबर लढणाऱ्या मित्रांचा ग्रूप तयार झाला होता. प्रवीण, राहुल, पूजा आणि कमलनारायण या तिच्या मित्रमंडळींनी अनाथ मुलांना घटनेत कोणकोणते अधिकार दिले आहेत त्याचा अभ्यास केला. त्यांच्या लक्षात आले, की अनाथ मुलांना आरक्षण मिळावे अशी मागणी त्यापूर्वी देखील अनेकदा झाली आहे, पण भारतात कोणत्याही राज्यात त्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. त्याच काळात अमृता आणि तिच्या मित्रमंडळींचीं महाराष्ट्राच्या मुखमंत्र्यांचे सल्लागार श्रीकांत भारतीय यांच्याशी भेट झाली. श्रीकांत भारतीय यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अमृताची भेट घडवून आणली. अनाथ मुले नॉनक्रिमी लेअर प्रमाणपत्र कोठून आणणार? जेथे त्यांना त्यांच्या आई-वडिलांचा आतापता नसतो तेथे ते जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला आणणार कसा? आणि हे दाखले नसतील तर ते स्पर्धा परीक्षा देऊ शकत नाहीत का? त्यांना सनदी नोकर कधीच बनता येणार नाही का? असे अनेक महत्त्वाचे मुद्दे अमृताने देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडले. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, घरातील वातावरणदेखील शिक्षणासाठी पोषक आहे अशा मुलांच्या बरोबरीने अनाथ मुलांना परीक्षेत उतरावे लागते. दोन भिन्न परिस्थितीतील विद्यार्थ्यांची बरोबरी कशी होऊ शकते? त्यांना समान पातळीवर कसे बसवले जाऊ शकते? याबाबत अमृताने देवेंद्र फडणवीस यांना जाणीव करून दिली. त्या भेटीनंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांनी अनाथ मुलासाठी एक टक्का आरक्षण घोषित केले. अमृताला ज्या अडचणींना सामोरे जावे लागले त्यातून तिला मार्ग सापडत गेले. इतकी वर्षें या विषयाकडे गंभीरपणे लक्ष दिले गेले नव्हते.

अमृताला या काळात लाभलेल्या प्रसिद्धीमुळे अनेक कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर्स येऊ लागल्या. पण त्याकडे दुर्लक्ष करत अमृताने फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आहे. स्पर्धा परीक्षा पास होणे हे तिचे उद्दिष्ट आहे!

- मनस्विनी प्रभुणे–नायक, nayakmanaswini21@gmail.com

('लोकमत' ऑक्सिजन पुरवणीवरून उद्धृत)

लेखी अभिप्राय

संघर्षमय प्रवास ,अमृताच्या कर्तुत्वाला सलाम

मनोज जोशी कोपरगाव08/06/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.