डोंबिवलीतील आदानप्रदान पुस्तक प्रदर्शन


_Dombivli_1.jpgडोंबिवलीतील ‘फ्रेंड्स लायब्ररी’ने सुरू केलेला आदानप्रदान ग्रंथप्रदर्शनाचा उपक्रम चांगले मूळ धरत आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या वर्षीं यंदा पन्नास हजार ग्रंथ पै यांच्याकडे जमा झाले व जवळजवळ तेवढ्याच साहित्यकृती लोकांनी बदल्यात उचलून नेल्या. डोंबिवलीत ‘अखिल भारतीय साहित्य संमेलन’ 2017 साली भरले होते. त्यावेळी डोंबिवली शहरात साहित्यिक वातावरण निर्माण व्हावे म्हणून काही उपक्रम राबवले गेले. त्यावेळी ‘फ्रेंड्स लायब्ररी’च्या पुंडलिक पै यांनी हा आगळावेगळा व वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम प्रथम राबवला! त्यांच्या असे वाचनात आले होते, की युरोपात जर्मनी, फ्रान्स, इटली, ग्रीस वगैरे देशांत पुस्तके आदानप्रदान प्रदर्शने भरवली जातात. त्या प्रदर्शनांमध्ये वेगवेगळ्या विषयांची पुस्तके नागरिकांकडून लायब्रऱ्यांकडे जमा होतात. तशी प्रदर्शने तेथे बागेत किंवा सार्वजनिक जागांत भरवली जातात. लोक आवडीप्रमाणे पुस्तके निवडून त्यातून घेऊन जातात. पै यांच्या मनात तसे प्रदर्शन डोंबिवलीत का भरवू नये असा विचार सुरू झाला व त्यांनी त्याला आदानप्रदान असे स्वरूप दिले. पुंडलिक पै हे असे व्यक्तिमत्त्व आहे, की ते मनात आलेली गोष्ट जिद्दीने पार पाडतात. मात्र त्यांनी या कार्यक्रमाचीही अंमलबजावणी सुरू करून ‘आदानप्रदान’ प्रदर्शन भरवण्याचे निश्चित केले तोपर्यंत साहित्य संमेलन पार पडून गेले होते! तरीदेखील त्यांनी डोंबिवलीत वाङ्मयीन वातावरण तयार झाले आहे, ते तसेच काही दिवस राहवे, त्याची सुरुवात त्यांच्या प्रदर्शनापासून व्हावी हे निश्चित केले.

डोंबिवली शहराला पु.भा. भावे, शं.ना. नवरे व इतर साहित्यिकांचे वास्तव्य लाभले व साहित्यिक नगरी म्हणून परंपरा तयार झाली होती. जुन्या शहरात अनेक घरी काचेच्या कपाटांत भरपूर वाचनीय पुस्तके असतात. पूर्वी अशी समजूत होती, की पुस्तके हे धन आहे ते साठवावे. पुस्तके ही सुशिक्षित, सुसंस्कृत माणसांची शान होती; ते खरेही होते. पण गेल्या दहा वर्षांमध्ये तांत्रिक साधनांनी माणसाला एका क्लिकवर माहितीचे महाजाल दाखवण्यास सुरुवात केली आहे. पुस्तकातील ज्ञानाच्या संदर्भावर स्वाभाविक मर्यादा आल्या आहेत. नवीन पिढीला स्पर्धात्मक जगात राहण्यासाठी नवनवीन गोष्टी व माहिती यांची आवश्यकता आहेच. त्यांतून पुस्तकांचा साचलेपणा जाणवतो. घराघरातील पुस्तकांची कपाटे अडगळीत जातात. त्या पुस्तकांचे करायचे काय? त्यासाठी काय करता येईल? पुस्तक आदानप्रदान कार्यक्रम हा त्यावर जालीम उपाय ठरू शकतो का? जुनी विविध विषयांची पुस्तके द्या- आलेली नवीन पुस्तके घेऊन जा अशी ती योजना. जेवढी पुस्तके द्याल तेवढीच नवी कोरी करकरीत वा जुनी आवडीची, अभिजात पुस्तके नेता येतील! पुस्तकांची अदलाबदली करा. पै यांनी जुनी पुस्तके घेणे प्रदर्शन सप्ताहा अगोदर एक महिना सुरू केले. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पै यांच्याकडे सुमारे पंचावन्न हजार पुस्तके जमा झाली. त्यांत अनेक दुर्मीळ पुस्तके मिळाली. त्यांची अन्य अनेक वाचक आतुरतेने वाट पाहत होते. मग ‘आदानप्रदान प्रदर्शना’चे रीतसर उद्घाटन डोंबिवलीचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले. भरपूर गर्दी झाली. अंदाजे पस्तीस हजार पुस्तके प्रदर्शनात बदलली गेली. आठ हजार लोकांनी ती पुस्तके बदलली. त्या अदलाबदलीमध्ये संयोजनातील नेटकेपणा व जलदगती होती. त्याकरता वेगळे सॉफ्टेवेअर निर्माण केले गेले. वाचकाने आदान म्हणून तीस-चाळीस पुस्तके आणली तर त्यांची नोंद वेळखाऊ झाली असती. मग पुस्तकांचे फोटो काढून ठेवले गेले. पावतीवर फक्त पुस्तकांचा आकडा नोंदला गेला. तेवढ्या संख्येची पुस्तके प्रदान म्हणून केव्हाही नेता येतात. प्रत्येक पुस्तकामागे दहा रुपये ‘हाताळणी खर्च’ घेण्यात येतो. वाचकाने अदान केलेल्या जुन्या पुस्तकाच्या बदल्यात त्याला आवडलेले कोणतेही पुस्तक (मग ते कोणत्याही किंमतीचे असो, जुने शंभर रुपयांचे पुस्तक देऊन नवीन तीन-चारशे रुपयांचे पुस्तकसुद्धा) घेऊ शकत होता. या योजनेप्रमाणे एकेका घराने चाळीस-पन्नास पुस्तके बदलून घेतली. एकंदरीत समाधानाचा व आनंदाचा सूर दिसला. आधीच्या वर्षीच्या उपक्रमातील उरलेली पुस्तके ठाणे जिल्ह्यातील विविध शाळांना भेट देण्यात आली.

हा झाला तांत्रिक व्यवहार! पण त्यासोबत वाङ्मयीन वातावरण निर्माण व्हावे, तसेच तरुणांना, भावी पिढीला नवीन गोष्टी कळाव्यात; म्हणून वेगवेगळ्या सांस्कृतिक व अॅकॅडॅमिक कार्यक्रमांची योजना राबवली गेली. त्यामुळे आदानप्रदान कार्यक्रमाची उंची वाढली. प्रदर्शनकाळात आठ दिवस रोज संध्याकाळी कार्यक्रमांची रचना करण्यात आली. विविध सांगीतिक/नाट्य कार्यक्रमाबरोबर माणसाची सांस्कृतिक संवेदना/जाण/समृद्धी वाढावी अशा कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. एकूण उपक्रमावर मागील वर्षी (2017) आठ लाख रुपयांपर्यंत खर्च झाला होता. या वर्षी उपक्रमासाठी कमिटी बनवली गेली. कार्यकर्त्यांची फळी तयार झाली. डोंबिवलीमध्ये आपुलकीने येणारे कार्यकर्ते थोड्याफार प्रमाणात उपलब्ध आहेत. शाळांच्या वार्षिक परीक्षा झाल्याबरोबर कार्यक्रमाचे (8 ते 15 एप्रिल 2018) यावेळी नियोजन केले गेले. पुस्तके येण्याची गती यावर्षी (2018) मागच्या वर्षापेक्षा (2017) कमी जाणवली, तरी कार्यक्रमकाळात भरपूर पुस्तके आली. कार्यक्रमाचे नियोजन व तो वेळेत सुरू करण्याची शिस्त पाळली गेली. राजकीय पक्ष व त्यांचे अनुयायी यांना कार्यक्रमातून दूर ठेवले गेले. विशेषत: हल्लीचे गढुळलेले राजकीय वातावरण अशा सांस्कृतिक कार्यक्रमात येऊ नये अशी काळजी घेण्यात आली.

तंत्रज्ञान या विषयातील तज्ज्ञ अतुल कहाते हे ‘तंत्रज्ञानांतील ओव्हरलोड’ या विषयावर बोलण्यासाठी आले होते. त्यांनी तंत्रज्ञानातील फायदे आणि तोटे समर्पकपणे समजावून सांगितले. प्रसिद्ध वक्त्या धनश्री लेले यांना सावरकरांच्या माहीत नसलेल्या कविता-अभंग-ओव्या-गाणी यांविषयी बोलण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. सर्वांना आश्चर्यकारक वाटणारा विषय म्हणजे ‘बँकिंग-बुडित कर्जांना जबाबदार कोण?’ प्रत्येकाच्या मनात त्याचे पैसे/धन बँकेत कितपत सुरक्षित आहे याविषयी शंका असते. त्याविषयी कार्यक्रमासाठी बँकिंगतज्ज्ञांना बोलावण्यात आले होते. अशा सर्वसामान्य लोकांच्या जिव्हाळ्याच्या विषयासंबंधी माहिती/चर्चा ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. संध्याकाळच्या कार्यक्रमाचे शीर्षक होते – ‘साहित्यानंद -2018’ त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमस्थळी येत व पुस्तकांच्या आदानप्रदानासाठी झुंबड उडे. बऱ्याच जणांच्या मनी प्रश्न असा असतो, की या अशा कार्यक्रमाचा फायदा किंवा हेतू काय? वाचनाचा प्रसार/प्रचार, उत्तमोत्तम पुस्तकांचा समृद्ध संग्रह हा जुना व माहीत असलेला (पण सद्य परिस्थितीत आकर्षक नसलेला) उद्देश आहेच. पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, की पुढील जग ज्ञानी, तज्ज्ञ, तांत्रिक बाबींत समृद्ध असणाऱ्यांचे आहे. नुसते विद्वान असून उपयोगी नाही, तर ती विद्वत्ता जीवनात किती सुख निर्माण करते त्याकरता नवीन ज्ञान, विशेषत: तंत्रज्ञान किती उपयोगी पडते त्याला महत्त्व असणार आहे. हे सर्व ज्ञान/तंत्रज्ञान/वैज्ञानिक शोध यासाठी पुस्तके हीच जीवनात चिरंतन आनंद/सुख निर्माण करणारी साधने असणार आहेत. त्यासाठी योग्य वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न अशा उपक्रमांतून असू शकतो. पूर्वी लढाईमध्ये प्रदेश जिंकण्यासाठी शस्त्रे लागत. आता ती शस्त्रे/अस्त्रे कालबाह्य झाली आहेत. नवनवीन विषयशाखांची, तंत्रज्ञानाची/तंत्राची ओळख करून देण्याचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न अशा उपक्रमांतून होऊ शकतात.

अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक/संशोधक ‘इलान मस्क’ हा पन्नास वर्षांनी मानवाच्या गरजा काय असतील त्यांचा विचार करतो; त्याकरता पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून उत्तम इलेक्ट्रिक कारची निर्मिती करतो. त्यांची दीड लाखांवर निर्मिती करून अमेरिकेत विक्री करतो, अब्जाधीश होतो, ऊर्जा - मानवी वस्तीस लागणारी जागा निर्माण करण्यासाठी नासाबरोबर करार करतो. अशा अर्थपूर्ण भविष्याचा मार्ग अशा ज्ञानार्जनातून जातो. ते जाणून घेण्याचा व वाचनातून मिळणारा उच्च प्रतीचा आनंद प्राप्त करण्याकरता असा प्रयत्न योग्य ठरेल!

'फ्रेंड्स लायब्ररी' - 97698 46807

- प्रभाकर भिडे

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.