निसर्गमित्र वासुदेव वाढे


_Nisargmitra_VasudeGadak_1.jpgवासुदेव वाढे यांची जळगाव शहरात सर्पमित्र म्हणून ओळख आहे. वासुदेव बीएस्सी करत असताना ते लहान साप पकडत. तसे करत करत त्यांनी विषारी, बिनविषारी साप पकडले आणि त्यांना न मारता जंगलात सोडून देत. त्यांनी साप पकडण्याचे प्रशिक्षण सागर ढाके यांच्याकडे घेतले.

शहरात, ग्रामीण भागात कोठेही साप निघाला, की वासुदेव त्याला पकडण्यासाठी तयार असतात. ते सापाप्रमाणेच काही दुर्मीळ किंवा प्रवासी पक्षी-प्राणी यांचीदेखील काळजी घेतात. त्यांना दोन वेळा सर्पांनी दंश केला आहे, परंतु ते बचावले. मात्र त्यांनी सर्पमैत्रीचे कार्य सोडले नाही. वासुदेव यांनी त्यांच्या कुटुंबातील पत्नी, दोन मुली, एक मुलगा यांना देखील साप पकडण्याची आणि पक्ष्यांची काळजी घेण्याचे शिकवले आहे.

वासुदेव जळगावमधील ‘वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्थे’सोबत 2008 पासून कार्यरत आहेत. त्यांचे संस्थेसोबत वन्यजीवांची काळजी, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम, पर्यावरण शाळेतील ‘निर्माल्य संकलन अभियान’ यातही महत्त्वपूर्ण कार्य आहे. किंबहुना वासुदेव यांची सर्पमैत्री संस्थेबरोबरच्या कामात विस्तारत गेली व ते निसर्ग, पर्यावरण अशा व्यापक विषयांत रस घेऊ लागले.

वासुदेव हे मनुदेवी परिसरातील ग्रामीण भाग, सातपुडा परिसर या ठिकाणी आणि जळगावमधील स्थानिक रहिवासी व ग्रामीण शाळांतील विद्यार्थी यांच्याबरोबर वने आणि वन्यजीव संवर्धन यासंदर्भात नेहमी चर्चा करत असतात. त्यांचे प्रयत्न सातपुडा भागातील वाघांचे संरक्षण करण्यासाठी असतात. त्यांनी व्याघ्र दिनसारखी निमित्ते हेरून ग्रामस्थांशी संवाद साधून रॅलीद्वारे पर्यावरणविषयी जनजागृती केली आहे. खानदेशातील निसर्गमित्र ‘डोलारखेडा आणि चारठाणा हे अतिसंवेदनशील वनक्षेत्र आहे’ असे घोषित करावे यासाठी प्रयत्न करत आहेत. वासुदेव यांचाही त्यात समावेश आहे. वासुदेव वृक्षारोपण करणे, वृक्षतोड रोखणे अशी अनेक कार्ये करत असतात. जखमी पशू, पक्षी, सर्प, प्राणी इत्यादींची देखभाल करणे, जखमी असतील तर ऑपरेशन करणे यातदेखील ते पारंगत आहेत.

पक्ष्यांना (रेस्क्यु) वाचवल्यानंतर त्यांची देखभाल होईल इतकी जागा त्यांच्याकडे उपलब्ध आहे. परंतु सध्या ते पक्षी-प्राण्यांवरील उपचार जळगावजवळील महाबळ कॉलनीत शासकीय गुरांचा (पशुवैद्यकीय) दवाखाना व कुसुंबा गोशाळा या ठिकाणी करून घेत आहेत. कुसुंबा येथे रतनलाल सी बाफना यांनी निर्माण केलेली गोशाळा आहे. ती जळगावला लागून आहे. गोशाळेत पक्षी-प्राणी गाई, म्हशी, बैल आहेत. वासुदेव वाढे यांचे मूळगाव फैजपूर. त्यांनी भुसावळ येथील नाहटा कॉलेजमधून बीएस्सी पदवीचे शिक्षण घेतले. त्यांनी जळगावच्या हिंदुस्तान फेराइड्स कंपनी येथे काही काळ नोकरी केली. वाढे यांचे वय बावन्न आहे. सध्या ते रतनलाल सी. बाफना गोशाळेत इलेक्ट्रिशीयन म्हणून काम पाहतात.

वासुदेव वाढे, 9673970980

- धनश्री बोरसे

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.