नाट्यशिक्षक सतीश आळेकर


_NatyaShikshak_SatishAlkar_1.jpgसतीश आळेकर हे ज्येष्ठ रंगकर्मी आहेत. आळेकर यांच्या रंगभूमीवरील कार्याचा गौरव म्हणून त्यांना 2017 या वर्षीचा 'तन्वीर सन्मान' देण्यात आला. त्यांचा परिचय नाटककार, दिग्दर्शक आणि ‘थिएटर अॅकेडमी’चे संस्थापक सदस्य असा आहे. त्या सर्वांना कवेत घेईल आणि तरी वैशिष्ट्याने वर चार अंगुळे उरेल असे त्यांचे कार्य म्हणजे पुणे विद्यापीठाच्या ‘ललित कला केंद्रा’चे प्रमुख म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी. त्याचा यथोचित उल्लेख अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने ‘तन्वीर पुरस्कार’ समारंभात केला. आळेकर यांनी अभिनयही केला; किंबहुना, त्यांचा यशस्वी चरित्र अभिनेते म्हणून निर्देश ‘व्हेंटिलेटर’नंतर होऊ लागला आहे. काही नाटके आणि अलिकडील मोजके चित्रपट यांत त्यांच्या भूमिका असल्या तरी 'अभिनेते' म्हणून त्यांच्या नावाचा दबदबा मात्र नव्हता. आळेकर यांनी मराठी प्रायोगिक रंगभूमीवर 'ब्लॅक कॉमेडी'चे स्वतंत्र युग निर्माण केले. त्यांची ‘महानिर्वाण’, ‘महापूर’, ‘बेगम बर्वे’ अशी नाटके प्रसिद्ध आहेत, पण आळेकर हे नाटक या सादरीकरणाच्या कलेचे उत्तम शिक्षकही आहेत. या त्यांच्या अनोख्या पैलूंवर मुक्ता बर्वे यांनी प्रकाशझोत टाकला आहे.

मुक्ताने बारावी झाल्यावर पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचा नाट्यविषयक अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे ठरवले. तेव्हा तिच्या भावाने तिला आळेकरांच्या नाटकांची ‘मिकी आणि मेमसाब’, ‘महापूर’ अशी दोन पुस्तके आणून दिली. मुक्ता चिंचवडहून पुणे विद्यापीठाच्या कला केंद्रात आली. तिने त्या वेळेपर्यंत आळेकरांना पाहिलेपण नव्हते. तिने आळेकर भेटतील तेव्हा 'मला तुमची ही दोन नाटके फार आवडतात' असे बोलण्याचे मनोमन ठरवले होते. मुक्ता अकादमीच्या आवारात दाखल झाली तेव्हा एक सद्गृहस्थ विद्यार्थ्यांमध्ये ‘कोणाला पेन हवंय का, आणखी काही मदत हवी आहे का’ असे विचारत फिरत होते. त्यांनीच मुक्ताला सांगितले, ‘महेश एलकुंचवार आतल्या खोलीत आहेत. ते मुलाखत घेतील. त्यांच्या प्रश्नांची शांतपणे उत्तरे दे. घाबरू नकोस.’ तिने एलकुंचवारांचे काहीच वाचलेले नव्हते. तिला आत गेल्यावर इतरांकडून कळले, की बाहेर जे सद्-गृहस्थ तिच्याशी सौजन्याने बोलत होते तेच सतीश आळेकर, ‘ललित कलाकेंद्रा’चे संचालक! ती आठवण सांगून मुक्ता म्हणाली, “आळेकरसर एवढे मोठे असूनही त्यांनी तो मोठेपणा आम्हा विद्यार्थ्यांना कधी जाणवू दिला नाही. ते आमचे मित्र झाले. त्यांनी अनुयायी तयार केले नाहीत. ते आमचे गुरुपौर्णिमेचे गुरू नव्हते.” मुक्ता असे म्हणाली तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. ती म्हणाली, “आम्हाला मनात येईल ते करू देणाऱ्या आळेकरसरांनी आमच्या वाटा आम्हाला शोधू दिल्या.”

तसाच अनुभव अतुल पेठे याने त्याच्या 'नाटकवाल्याचे प्रयोग' या पुस्तकात मांडला आहे. ‘थिएटर अॅकेडमी’ने पुण्यात नसिरुद्दीन शहा यांची अभिनय कार्यशाळा 1988 मध्ये आयोजित केली होती. कार्यशाळा पेरूगेट पोलिस चौकीजवळील भोपटकर वाड्यातील वरच्या मजल्यावरील एका दालनात झाली. अतुलने असे नमूद केले आहे, की “तुमचे प्रसंगाचे सादरीकरण हे प्रेक्षकांसाठी नसून 'स्व'चा 'शोध' अशा स्वरूपाचे असावे. तेथे ‘करून दाखवणे’ यापेक्षा ‘करून पाहणे’ हे महत्त्वाचे असते. ती सूचना नाटकातील प्रसंग करून बघताना त्या घटनेतील क्षण उत्स्फूर्तपणे आत खोलवर भोगण्याचा प्रयत्न करा एवढीच होती. शिकणारा आणि शिकवणारा असा भेदभाव नव्हता.”

आळेकर यांनी ते ‘ललित कला केंद्रा’चे विभागप्रमुख असताना त्यांच्या बारा वर्षांच्या कारकिर्दीत विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले. 'संहिता ते सादरीकरण' हा दरवर्षी राबवला जाणारा एक उपक्रम. विद्यार्थ्यांनी स्वतः संहिता लिहून ती प्रेक्षकांसमोर सादर करायची असा तो उपक्रम. त्यांनी स्वतः एक उत्तम संहितालेखक असूनही कोणत्याही विद्यार्थ्याला 'असे लिही' असे 'डिक्टेट' केले नाही. ते प्रसंगाचे तीन-चार वेगवेगळे पर्याय सांगायचे, पण त्यांतील कोणता निवडायचा याचा निर्णय विद्यार्थ्याला करावा लागायचा. त्यांचे म्हणणे असे, की मी सांगतोय म्हणून बदल करू नका. स्वतः विचार करा आणि पटले तरच बदल करा. ते विद्यार्थ्यांना, सादरीकरण करताना प्रेक्षकांचा विचार डोक्यात ठेवावा पण त्यांचा अनुनय करू नये हे बजावून सांगायचे. नाटक हे प्रेक्षकांसाठी करायचे असते पण त्यांना ते आवडेलच पाहिजे असा आग्रह धरून चालणार नाही. मात्र प्रेक्षकांना एखादे सादरीकरण का आवडले नाही याची चर्चा हवी. आळेकर यांनी नाटकाचे अर्थकारण विद्यार्थ्यांना समजावे म्हणून ते प्रयोग सादर करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी ते त्यांना आणण्यास, करण्यास लावायचे. पूर्ण नियोजन हे विद्यार्थ्यांनीच करायचे असे. ते त्या प्रयोगांच्या जाहिरातीसुद्धा ते वर्तमानपत्रांमधून करायचे. नाममात्र तिकिट दर ठेवायचे. त्यातून नाट्यनिर्मिती व सादरीकरण यांतील संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजायची. आळेकरसर त्यांना सांगायचे, सादरीकरणातील चांगले काय आणि वाईट काय हे तुम्हीच ठरवा. त्यातील काय घ्यायचे हेही तुम्ही ठरवा. त्यांनी विद्यार्थ्यांना तशा पद्धतीने घडवले. आळेकरसर विद्यार्थ्यांना घडवताना त्यांच्या नकळत एकूण दर्ज्याबद्दल दक्ष असायचे, विद्यार्थ्यांची -विद्यार्थिनींची काळजी घ्यायचे. मुक्ताने त्याचे एक उदाहरण सांगितले. ती म्हणाली, “‘सखाराम बार्इंडर' मध्ये चंपाच्या भूमिकेत एक प्रसंगात मी खिडकीपाशी जाऊन साडी बदलत असे. त्यावेळी आळेकरसर विशिष्ट ठिकाणी माझ्याकडे पाठ करून उभे राहत. तेथून ते सर्वांवर नजर ठेवायचे की कोणी टारगटपणा करत नाही ना! ते माझी साडी बदलून झाली, की तसेच माझ्याकडे न पाहता निघून जायचे.”विशिष्ट प्रसंगी, सर आमचे वडील व्हायचे असे सांगताना मुक्ता सद्गदित झाली.

विद्यार्थी अभ्यासक्रम संपवून अकादमीतून बाहेर पडले तरी आळेकरसर त्यांच्या संपर्कात सतत राहून त्यांची चौकशी करतात.

माजी विद्यार्थी एकमेकांना भेटले, की कोणीतरी म्हणते, 'अगं, काल मला सरांचा फोन आला होता. त्यांनी चित्रपटाचे, मालिकेचे पुढे काय झाले? याची चौकशी केली.' त्यावर गटातील दुसरा मित्र म्हणतो, ‘मलापण सर विचारत होते त्या प्रोजेक्टचे काय झाले?’ मग कोणी तरी म्हणते, 'ए, सरांच्या प्रत्येकाचे कसे लक्षात राहते? सर खरेच ग्रेट आहेत!' असे म्हणत मुक्ता शेवटी सांगते, “नाटक म्हणजे रोज नवे रोल, रोज मजा असे समजून मी ‘ललित कला केंद्रा’त आले होते. पण तेथे तर अभ्यासही खूप होता. त्यातून मी दिसायला फारशी छान नाही, त्यामुळे नटी होण्याची संधी आपल्याला कोठे? मग मी आतल्या आत काहीशी नाराज राहू लागले होते. पण आळेकरसरांनी माझ्यातील क्षमता ओळखल्या. त्यांनी मला महत्त्वाची भूमिका देऊन माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला. मला माझीच मी नव्याने गवसले. ते प्रत्येक वेळी थेट माझ्यासोबत नसले, तरीही प्रेक्षकांतून चमकणारा तो चष्मा आळेकरसरांचा आहे असे सतत जाणवत राहते.”

पहिल्या ‘तन्वीर पुरस्कारा’चे मानकरी अल्काझी यांचासुद्धा उत्तम शिक्षक असाच लौकिक होता. त्यांना रंगभूमीची जाण चांगली होती. त्यांचा भारतीय आणि परदेशी रंगभूमीचा अभ्यास दांडगा होता. त्यांचे साहित्य, राजकारण, संस्कृती यांबद्दलचे वाचन चौफेर होते. त्यांच्या अनेक शिष्यांची कामगिरी उच्च दर्ज्याची आहे. पण ते हेकेखोर होते. अल्काझी त्यांचे एखाद्या विद्यार्थ्याबद्दल काही मत झाले, की ते बदलण्यास तयार नसत. नसिरुद्दीन शहा यांनी 'आणि मग एक दिवस' या त्यांच्या आत्मचरित्रात अल्काझींचा हट्टीपणा नोंदला आहे. अल्काझी यांना 'नसिरुद्दीन चांगला दिग्दर्शक होऊ शकतो’ असे ठामपणाने वाटत असे. त्यांचे मत नसिरुद्दीनने दिग्दर्शनाचा अभ्यासक्रम पूर्ण करावा असे होते. त्यांनी नसिरला दिग्दर्शनाऐवजी अभिनयाचा अभ्यासक्रम करण्यास अनुमती दिली नाही. नसिर शेवटी, एनएसडीला राम राम ठोकून पुण्यात एफटीआयमध्ये दाखल झाला. आळेकर तेथे अतिथी प्राध्यापक म्हणून जात असत. आळेकर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वागण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, पद्मश्री यांसारखे मानाचे किताब व इतर ठिकठिकाणचे गौरव, पुरस्कार प्राप्त करूनही आळेकर विद्यार्थ्यांबरोबर मैत्रीभावाने वावरले. आळेकरांचे विद्यार्थी सांगतात, की त्यांच्या बाबतच्या या वर्णनाची इतरांच्या तुलनेत नोंद घ्यायला हवी. सर कला केंद्राच्या विद्यार्थ्यांसाठी एखादी आर्थिक तरतूद करण्याबद्दलची चर्चा करून वर्गात आले तरी बाहेरच्या ताणतणावांचा त्यांच्या नेहमीच्या बोलण्यावर, शिकवण्यावर काहीही परिणाम व्हायचा नाही'

आळेकर नाटकाची संहिता, त्याचे सादरीकरण, विषयांच्या मांडणीचे विविध पर्याय, प्रयोगाचे अर्थकारण अशी रंगभूमीची समृद्ध जाण असलेले रंगकर्मी निर्माण करणे याच उद्देशाने सतत झटत असलेले दिसतात. अमेरिकेच्या ‘फोर्ड फाउंडेशन’कडून निधी मिळाल्यावर ‘थिएटर अॅकेडमी’ने महाराष्ट्रात ठिकठिकाणी कार्यशाळा भरवल्या. त्यात आळेकरांचा वाटा महत्त्वाचा होता. नागपूर, नाशिक, कोल्हापूर ते पार कोकणातील कणकवली इत्यादी ठिकाणी नाट्यकेंद्रे निर्माण झाली ती त्या कार्यशाळांच्या उपक्रमांमधून. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एकांकिका स्पर्धा होतात. त्याचे बरेचसे श्रेय सतीश आळेकर संस्थापक सदस्य असलेल्या ‘थिएटर अॅकेडमी’ला द्यायला हवे. त्या स्पर्धांमध्ये आळेकरांची ‘मिकी आणि मेमसाब’, ‘महापूर’, ‘बेगम बर्वे’, ‘शनिवार-रविवार’ ही नाटके होतात हे विशेष म्हणायला हवे. आळेकरांचा सहभाग प्रायोगिक नाटके मुंबई-पुण्याच्या पलीकडे पोचवण्यात महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांना तन्वीर पुरस्कार देणाऱ्या 'रुपवेध' प्रतिष्ठानच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलेले आहे.

नाटककार सतीश आळेकर यांच्या लेखनशैलीबद्दल ‘रूपवेध’ने म्हटले आहे, की सतीश आळेकर यांच्या नाटकांनी मराठी प्रायोगिक रंगभूमीवर नवीन प्रवाह निर्माण केला. वास्तववादाच्या चौकटीतून बाहेर पडून 'ब्लॅक ह्युमर' आणि 'अॅब्सर्डिटी' यांनी रंगलेल्या त्यांच्या नाटकांनी मराठी मध्यमवर्गीयांचे जगणे रंगमंचावर उभे केले. त्यांच्या नाटकांची इंग्रजीसह अनेक भारतीय भाषांमधून भाषांतरे झाली आहेत. 'तन्वीर सन्मान' प्रदान कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलताना ज्येष्ठ समीक्षक पुष्पा भावे म्हणाल्या, ‘सतीश आळेकर यांची नाटके प्रत्येक वाचनात आणि काही वर्षांच्या अंतराने होणाऱ्या त्यांच्या प्रयोगांमध्ये विविध आशयांसह उलगडतात. ते समोर आलेले जग समजावून घेऊन, त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात.’ नाटककार मकरंद साठे यांनी असे मत नोंदवले, की ‘विजय तेंडुलकर यांनी त्यांच्या नाटकांमधून मराठी मध्यमवर्गाच्या उणिवांवर विनोदाच्या माध्यमातून प्रहार केले. आळेकर यांचे विनोद जास्त तिरकस वाटतात.’ अरुण खोपकर यांनी आळेकर यांच्या नाट्यलेखन शैलीचे नेमके विश्लेषण केले. ते म्हणाले, “आळेकर यांनी लिहिलेले ‘बेगम बर्वे’ हे नाटक मला ‘शारदा’नंतरचे सर्वोत्तम नाटक वाटते. एवढे बांधीव नाटक क्वचितच पाहण्यास मिळते. स्वप्नरंजनातून वास्तवात येतानाची वेदना किती तीव्र असते, हे त्यांच्या लेखनातून कळते. एरवी मराठी रंगभूमीवर बीभत्स, क्रौर्य हे रस दिसत नाहीत. पण राम गणेश गडकरी यांच्यानंतर सतीश आळेकर यांनी ते रसही तेथे धैर्याने आणले. आळेकर यांची विरळ विवेकबुद्धी, कामाची पद्धत, जीवनमूल्यांचा अभ्यास आदी बाबींचा हेवा वाटतो. त्यांनी 'महानिर्वाण' नाटकातून धार्मिक विधीतील श्रद्धा निघून गेल्यास कर्मकांडांचे निर्माल्य होते हा संदेश दिला. त्यांचे नाटक रंगभूमीच्या आदिम प्रेरणेपर्यंत पोचले आहे. त्यांच्या व्यक्तिरेखा मनात कायम थरथरत राहतात.”

कुमार केतकर यांनी 'विसाव्या शतकाचे महानिर्वाण' ही पुस्तिका 1970 च्या दशकात लिहिली. तो एखाद्या नाटकाचे समीक्षणात्मक नव्हे तर सखोल वैचारिक विश्लेषण करण्याचा मराठीतील पहिलाच 'प्रयोग' होता. ‘ग्रंथाली’ने प्रसिद्ध केलेल्या त्या पुस्तकाचा नाट्यवर्तुळात चांगलाच गाजावाजा झाला. केतकरांनी 'महानिर्वाण'मधून मराठी मध्यमवर्गीय मूल्यव्यवस्थेवर कसा भेदक हल्ला चढवला गेला आहे हे दाखवून देताना आळेकर काळाच्या किती पुढे गेले आहेत तेच स्पष्ट केले. त्यांच्या हातून आणखी नाट्यलेखन व्हावे अशी अपेक्षा त्या काळात व्यक्त केली गेली. परंतु आळेकर नाट्यलेखनात जास्त रमले नाहीत. त्याऐवजी त्यांनी प्रगल्भ रंगकर्मी तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यांचे प्राधान्य प्रायोगिकतेला पाठबळ मिळवून देण्यास होते.

पुष्पा भावे म्हणाल्या, “आळेकर यांनी घराणे पद्धत आणि विद्यापीठ पद्धत यांचा सृजनात्मक मेळ घातला. त्यांच्या कारकिर्दीला अनेक आयाम जोडले गेले आहेत. ते रंगमंचावर सतत सचेतन राहिले. त्यांनी निर्माण केलेल्या प्रतिमानांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. ते मराठी रंगभूमीवर आहेत याचा सार्थ अभिमान वाटतो.”

दूरदृष्टी (व्हिजन) असलेला विभागप्रमुख विद्यापीठांची चौकट मोडून साचेबद्धता दूर करतो आणि विभागात नवचैतन्य पसरते! सतीश आळेकर या प्रतिभाशाली नाटककाराने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘ललित कला केंद्रा’त तो चमत्कार केला. वसंतराव गोवारीकर कुलगुरू असताना, त्यांनी अरुण साधू यांना बोलावून घेऊन, वृत्तविद्या विभागाचे प्रमुख केले आणि ‘ललित कला केंद्रा’चे विभागप्रमुख म्हणून सतीश आळेकर यांची नेमणूक 1996 मध्ये केली. आळेकर केंद्राच्या स्थापनेनंतर नऊ वर्षांनी विभागप्रमुख झाले. त्यांनी कामाची सूत्रे हातात घेतल्यावर सर्वप्रथम अभ्यासक्रम बदलासाठी तज्ज्ञ समिती नेमली. त्यांनी समितीसमोर संगीत, नृत्य, नाटक या सादरीकरणाच्या कलांसाठी उत्तम व्यावसायिक कलावंत निर्माण करणे हे त्यांचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले. त्यातून केंद्राच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना केली गेली. नवा अभ्यासक्रम गुरुकुल पद्धत आणि आधुनिक विद्यापीठीय शिक्षणपद्धत यांचा समन्वय साधत तयार झाला. त्यांचा ध्यास प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये जे सर्वोत्तम आहे ते समोरच्या प्रेक्षकांसमोर प्रकट झाले पाहिजे असा होता. आळेकर विद्यार्थ्यांना ‘खाली घसरणे केव्हाही शक्य असते, पण वर पोचण्यासाठी, उच्च दर्जा गाठण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात’ असे बजावत. आळेकरांनी केंद्राच्या चार भिंतींतील ज्ञान सर्वसामान्य रसिकापर्यंत पोचवण्यासाठी वृत्तपत्रांना वेळोवेळी सहभागी करून घेतले. आळेकरांनी संगीत, नृत्य, नाटक अशा कलेच्या क्षेत्रातील जाणकारांची सप्रयोग व्याख्याने केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली. एकदा पंडित हृदयनाथ मंगेशकर, विद्याधर व्यास, संजीव अभ्यंकर या सांगितिक मान्यवरांची सप्रयोग व्याख्याने आयोजित केली असता त्याला वृत्तपत्रांनी मोठी प्रसिद्धी दिली. त्यांनी जुन्या दुर्मीळ वाद्यांचा महोत्सव 2007 साली भरवला. केंद्रातील आळेकरांची आनंद-यात्रा अशी वाजतगाजत पुढे सरकत होती. त्यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासदौर्‍यांचे आयोजन केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशभर केले. आळेकरांनी तुटपुंज्या ‘प्रॉपर्टी’चा वापर करत प्रायोगिक नाटकांची चळवळ करणार्‍या अडचणींचा ‘राग’ आळवत न बसता मैफल सजवली! टीव्हीच्या वाहिनीविश्वात प्रवेश मिळवण्यासाठी अनेक विद्यार्थी विद्यापीठाच्या कला केंद्रावर विसंबून आहेत.

- रमेश दिघे

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.