अत्त दीप भव!


_AtthaDipBhav_1.jpgभारतीय समाजाची मानसिकता गेल्या काही वर्षांत खूप बदलत चालली आहे. समाजाला हक्क कळतात. ते मिळाले नाहीत तर त्यासाठी लढा उभारण्याचे देखील कळते. पण लोकांना त्यांची कर्तव्ये काय आहेत याची जाणीव कित्येकदा नसते.

तुम्ही म्हणाल, की ‘शिक्षक व्यासपीठा’शी या गोष्टीचा संबंध काय? सांगते.

भारतीय समाजाची ही जी मानसिकता आहे तिचे मूळ शिक्षणात आहे. मुलांना काय शिकवले जाते शिक्षणातून? रस्त्यावर पान खाऊन थुंकणे, तेथेच कचरा टाकणे, स्वत:चे घर ते स्वच्छ ठेवत असतील पण बाहेरील परिसराचे काय? त्याची आहे का लोकांना जाणीव?

मी महानगरपालिकेच्या शाळेत ‘रोजनिशी’ उपक्रमासाठी गेले असताना तेथील शिक्षक ट्रेनिंगसाठी बाहेर होते. जास्तीचे शिक्षक तेव्हा नव्हते. मुले-मुली गप्पा मारत बसली होती. मी विचारले, ‘काय झाले?’ तेव्हा ती म्हणाली, ‘शिक्षक नाहीत.’ मी म्हटले, ‘गेल्या आठवड्यात काय काय अभ्यास केला ते सांगा.’ बहुतेकांनी तो केला नव्हता. त्यांची कारणे होती- जागा नाही. वेळ मिळत नाही!

टीव्ही पाहण्यास वेळ होता, गरबा खेळण्यास वेळ होता, गणपतीमध्ये नाचण्यास जाण्याला वेळ होता, पण अभ्यासासाठी वेळ मिळाला नव्हता!

मी म्हटले, ‘आईवडील काम करून तुम्हाला शाळेत पाठवतात. तेथील शिक्षक उत्तम नसतील पण ते त्यांना जमेल तसे शिकवतात. हा पंखा, हा लाइट, ही इमारत... सर्व महापालिकेने तुमच्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. जेवण रोज दिले जाते. त्याची जाणीव आहे ना तुम्हाला? मग फ्री तासाला तुम्ही तुमचा वर्ग लायब्ररीसारखा वापरून अभ्यास का नाही करत? तुम्हीच विचार करा. इतके छान वाचनालय तुम्हाला सहा दिवस रोज सहा तास उपलब्ध आहे. शाळेमध्ये ग्रंथालय आहे. पुस्तके घ्या, वाचा-लिहा.’

माझ्या शिक्षकमित्रांनो, हा उपदेश नाही, ही विनंती आहे. भावी पिढीमध्ये जाणीव असणे फार आवश्यक आहे. त्यांना असा भ्रम होता कामा नये, की मी गरीब आहे तर मला मदत करणे ही समाजाची जबाबदारी आहे. कोणाही व्यक्तीमध्ये आत्मसन्मानाची भावना हवी. तरच त्या व्यक्तीची प्रगती होऊ शकते. ती म्हणजे मी काय आहे? माझ्या क्षमता काय आहेत? माझे कर्तव्य, जबाबदारी काय आहे? याचे भान असले, की माणूस स्वत:ची प्रगती करतोच तो; पण, समाजात वावरतानादेखील, तो कशा प्रकारे वागला असता त्याच्या समाजाची, देशाची प्रगती होईल? याचा विचार करतो. नुसतेच, लोक कोणाला गरीब म्हणून मदत करत गेले तर त्या कोणा व्यक्तीचा आत्मसन्मान कधीच जागृत होणार नाही व ती व्यक्ती खरी प्रगती करू शकणार नाही.

‘पीआरसी’ (Paraplegic Rehabilitation Center) खडली येथे एक उपक्रम आम्ही आर्थिक रेषेखालील मुलांसाठी ठेवला होता. मला ‘पीआरसी’ येथे अपंग सैनिकांना भेटून खूप काही शिकण्यास मिळाले. ते सैनिक त्यांच्या अपंगत्वाचा बाऊ न करता किंवा केलेल्या देशसेवेची प्रौढी न मिरवता जे कार्य तेथे राहून करत आहेत, त्याला तोड नाही! शाळेतील विद्यार्थ्यांनी आवर्जून अशा ठिकाणांना भेट देण्यास हवी. तर ते त्यांच्या जीवनासाठी आवश्यक कितीतरी गोष्टी शिकतील. मराठी माध्यमातील आर्थिक रेषेखालील काही मुलांना आम्ही ‘भाग्यश्री फाउंडेशन’तर्फे तेथे घेऊन गेलो होतो. त्यावेळी आमच्याबरोबर गीता कपाडिया, हरीश कपाडिया (त्यांचा मुलगा नवांग कपाडिया हा देशासाठी 2000 साली शहीद झाला आहे. हरीष कपाडिया यांची ओळख म्हणजे ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गिर्यारोहक आहेत. त्यांनी गिर्यारोहण या विषयांवर पुस्तके लिहिली आहेत) आणि आमचे सहकारीही आमच्याबरोबर होते.

_AtthaDipBhav_2.jpg‘पीआरसी’तर्फे कर्नल आर. के. मुखर्जी यांनी विद्यार्थ्यांसाठी काही कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मुले त्या दिवशी सैनिकांबरोबर खेळ खेळली. सैनिकांनी त्यांना व्हिलचेअरवर बसून बास्केट बॉलचे प्रात्यक्षिक दाखवले. तेथे एवढे जल्लोषाचे वातावरण होते, की अपंग सैनिक खेळत आहेत या गोष्टीचा मागमूसदेखील नव्हता. जोशात प्रत्येक सैनिकाने प्रत्येक खेळात भाग घेतला. मुले त्यांच्याबरोबर खेळताना स्वत:ला हरवून गेली होती आणि ते सर्व सैनिक मुलांत मूल होऊन गेले होते. ते सैनिकपण मुलांबरोबर टेबलटेनिस, बॅडमिंटन यांसारखे खेळ खेळताना एवढे जोशात आले होते, की त्यांच्या बाजूला पडलेला टेनिस बॉल किंवा शटल कॉक कोणी हातात आणून देण्याआधी ते उत्साहाने व्हिलचेअरवरून जाऊन आणत होते. या बारीक बारीक गोष्टी मुलांच्या अबोध नजरा टिपत होत्या आणि त्यांच्या आयुष्याला आवश्यक असे बरेच काही शिकत होत्या.

माझा आठ वर्षांचा भाचा अर्जुन ढवळे हा सिंगल व्हेंट्रीकल आहे. तोपर्यंत त्याच्या हृदयावर चार शस्त्रक्रिया झालेल्या होत्या. तो छातीवर असलेल्या अनेक व्रणांमुळे स्विमिंग करताना उघडा राहण्यास लाजायचा. मी हे त्या सैनिकांना जेव्हा सांगितले, तेव्हा प्रत्येकाने त्याला जवळ घेऊन त्यांच्या जखमा जोशात दाखवल्या. ते त्याला म्हणाले, ‘जखम ही शौर्याची निशाणी आहे. त्या जखमांनी व्यक्ती अधिक सुंदर दिसते.’ खरेच, ते सर्व सैनिक खूप सुंदर दिसत होते. ते सौंदर्य पाहण्याची नजर विद्यार्थ्यांमध्ये तयार करण्याची गरज आहे. अर्जुनच्या मनातील ‘कॉम्प्लेक्स’ कोठल्या कोठे पळून गेला. इतर कोणामध्ये काही व्यंग दिसले, कमीपणा दिसला, गरिबी दिसली, की सर्वसामान्य माणसाच्या कारुण्यवृत्तीला ऊत येतो. ‘अगं गं!.., अरे रे!.. गरीब बिचारा! असे कसे झाले त्याचे?’ असे शब्द माणसांच्या तोंडातून बाहेर पडत असतात. समोरच्याला काय वाटेल? त्याला काय हवे आहे? याची पर्वा न करता लोक त्यांच्या परोपकार वृत्तीचे नको तितके प्रदर्शन करत असतात.

... तर माझ्या या सर्व मुलांना सैनिकांना भेटून खूप मोठा अनमोल ठेवा मिळाला. मुलांना त्या सैनिकांकडून कोणालाही न घाबरता, परिस्थितीला दोष न देता समोर येईल ते आयुष्य आनंदाने आणि आत्मविश्वासाने स्वीकारण्याची अमूल्य शक्ती मिळाली. शिक्षक मित्रांनो, कोठल्याही मुलांना शिकवताना प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या. या जगात कोणीही गरीबबिचारा नाही. प्रत्येकजण देवाचा लाडका आहे आणि प्रत्येकाला त्याने काही ना काही संपत्ती दिलेली आहे. लोकांना संपत्ती कळते ती केवळ नाणी किंवा नोटा यांमधील! पण परमेश्वराची संपत्ती त्याहूनही मोठी आहे. तुम्ही ती प्रत्येकाच्या आत दडलेली संपत्ती शोधण्यासाठी मुलांना मदत करा. त्यासाठी ती कोठल्याही परिस्थितीतील असू द्या. त्यांच्याबद्दल कीव मनात आणू नका. तुमचे त्यांच्यासाठीचे कर्तव्य नक्की करा. कोठल्याही चांगल्या व्यक्तीला कोणी तिची कीव केलेली आवडत नाही. मुलांना त्यांचे पडू द्या, ठेचकाळू द्या, पुन्हा उठून चालू द्या. अशानेच त्यांची ताकद वाढेल. मुलगा/गी त्याला/तिला हाताला धरून चालवण्याने तो/ती कधीच वाढणार नाहीत. मला सांगायला अभिमान वाटतो, माझी ती मुले समाजातील कित्येक गोष्टींचा सामना आत्मविश्वासाने करत आहेत. त्यांना काय चांगले- काय वाईट यांमधील फरक कळू लागला आहे. मुले ज्या वस्तीत राहतात, तेथे चांगल्या संगतीपेक्षा वाईट संगत मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्यांनी अशा वेळेला मनावर जो संयम असावा लागतो तो संयम आतून मिळवला आहे. त्यामुळे मला असे म्हणावेसे वाटते, की मुलांना शिकवताना ती कोठल्या परिस्थितीतील आहेत हे महत्त्वाचे नसते. आपण त्यांच्या मनात काय जाणीव निर्माण करतो ते महत्त्वाचे असते. ही जाणीव निर्माण करणे हे पालकांचे व शिक्षकांचे काम आहे. या जाणिवेचा दीप एकदा का विद्यार्थ्यांच्या हृदयात लागला, की ते जगातील कोठल्याही संकटाला घाबरणार नाहीत आणि कोठल्याही यशाने उन्मत्त होणार नाहीत. गौतम बुद्धांनी म्हटले आहे, ‘तुझा दीप तूच हो!’ (‘अत्त दिप भवं’) त्याचप्रमाणे ती मुले स्वत:ला घडवणार आहेत. शिक्षक व हे व्यासपीठ त्यांचे मार्गदर्शक आहेत. त्यांना सहानुभूतीची नव्हे तर मार्ग दाखवण्याची गरज आहे. कुसुमाग्रजांच्या ‘कणा’ या कवितेतील माझ्या आवडत्या ओळी याविषयी समर्पकपणे बोलतात. एक मुलगा त्याचे घर पुरात वाहून गेले म्हणून सरांना भेटण्यास येतो. झालेले नुकसान शांतपणे त्यांना ऐकवतो. पण सरांचा हात जेव्हा खिशाजवळ जातो तेव्हा हसत उठून म्हणतो,

‘पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला –

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा;
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा.’

- शिल्पा खेर

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.