साहित्य संमेलन आणि सुसंस्कृत समाज


_SSS_1.jpgलक्ष्मीकांत देशमुख यांनी बडोदा येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून कणखर भूमिका व्यक्त केली आहे. ते म्हणाले, की “सरकारविरूद्ध तसेच झुंडशाहीविरूद्ध लेखक-कलावंताने नमते घेता कामा नये. खरा जातिवंत लेखक हा राजकीय लेखकच असतो; राजकीय भाष्यकारच असतो. तो त्याला भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे.”

साहित्य व राजकारण हा विषय मराठीमध्ये वारंवार चर्चिला जातो. एकेकाळी तो संमेलनाच्या संयोजनातील मध्यवर्ती मुद्दा असे. त्याचा आरंभ दुर्गा भागवत यांनी कराड येथील साहित्य संमेलनामध्ये घेतलेल्या खणखणीत भूमिकेतून झाला होता. तेव्हा देशात आणीबाणी लागू होती आणि संमेलनाच्या उद्घाटन समारंभात व्यासपीठावर केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण होते. पूर्वाध्यक्ष पु.ल. देशपांडे, वि.स. खांडेकर हेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते. त्या सर्वांची भाषणे झाली होती. दुर्गा भागवत यांनी अध्यक्षीय भाषणात आणीबाणीचा निषेध केला. तेव्हापासून संमेलनाच्या व्यासपीठावर मंत्र्यांना स्थान द्यावे की नाही याबाबत उलटसुलट मते व्यक्त होऊ लागली. साहित्यिकांचा मुख्य प्रवाह राजकारणापासून दूर असणाऱ्यांचा होता. तथापी, तो काळ सामाजिक, राजकीय अस्वस्थतेचा व आंदोलनांचा होता. त्यामुळे सतत कोठे ना कोठे साहित्य व राजकारण अशाच चर्चेचे ध्वनी-प्रतिध्वनी उमटत व जणू असे वाटे, की तो साहित्य रसिकांसमोरील महत्त्वाचा असा प्रश्न आहे! वास्तवात ते तसे कधी जाणवले नाही. या चर्चेला टोक आले ते ए.आर. अंतुले मुख्यमंत्री झाले तेव्हा. त्यांची कार्यपद्धत बेधडक होती. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही होते. अशा माणसास साहित्य संमेलनाच्या आसपास फिरकू देऊ नये असा सर्वसाधारण सूर होता. तरी अंतुले यांनी संमेलनास अनुदान जाहीर केले. सरकार सध्या संमेलनास नियमाने अनुदान देते, तसे त्या काळात देत नसे. संयोजकांना दरवर्षी सरकारकडे अनुदानासाठी विनंती करावी लागे. मग सरकार कृपावंत होऊन रक्कम जाहीर करे. ही प्रक्रिया दीर्घसूत्री असे. त्यामुळे संयोजकांच्या मनात सतत अनिश्चितता राही. अंतुले यांच्या काळात संमेलन मध्यप्रदेशातील रायपूरला झाले. अध्यक्ष म्हणून गंगाधर गाडगीळ निवडून आले होते. गाडगीळ यांची भूमिका निव्वळ कलावादी होती. त्यांना सरकारी देणगीचे सोयरसूतक नसावे. त्यामुळे साहित्यिक वर्तुळातील एक गट चवताळून उठला. त्यांनी समांतर साहित्य संमेलन घेण्याचे ठरवले. हे संमेलन रुपारेल कॉलेजच्या मैदानावर झाले. ते दीड दिवसांचे होते. मालती बेडेकर त्याच्या अध्यक्ष होत्या. बंडखोर साहित्यिकांचा गट माधव गडकरी यांच्या नेतृत्वाखाली एकवटला. त्यांना सुभाष भेडे यांची साथ लाभली होती. संमेलनात साहित्यव्यवहार व कलाव्यवहार सरकारी व राजकारण्यांच्या हस्तक्षेपापासून दूर आणि अलिप्त असला पाहिजे अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली. त्या समांतर साहित्य संमेलनानंतर तसा प्रयत्न पुन्हा मात्र घडून आला नाही.

त्याच बेताला, साहित्यिकांनी त्यांच्या स्वत:च्या कुवतीवर साहित्य संमेलन भरवावे यासाठी दुर्गा भागवत यांनी निधी संकलन सुरू केले. ‘मुंबई मराठी साहित्य संघा’च्या अध्यक्ष वसुंधरा पेंडसे-नाईक यांच्याकडे महामंडळाची सूत्रे आली तेव्हा त्यांनी त्या निधीमध्ये आणखी भर घातली जावी यासाठी प्रयत्न केले. परंतु तो निधी पाच-सात लाख रुपयांचा आकडा ओलांडून जाऊ शकला नाही. वाचकांनी दुर्गा भागवत यांच्यावर अपार प्रेम केले. त्यांच्या कणखर भूमिकेचे सतत कौतुकच केले. तथापी, त्यांच्या त्यानुसार आखलेल्या उपक्रमास साहाय्य मात्र केले नाही.

साहित्य संमेलन आणि राजकारण याबाबत जेवढी चर्चा होते त्यानुसार कृती मात्र घडताना दिसत नाही. संमेलने नित्यक्रमाने घडत राहतात. त्यांचे संयोजन बरेवाईट होत असते. साहित्यिकांना मानधन दिले जावे की नाही या मुद्यावरही चहाच्या कपातील वादळे होत असतात, पण तशीच ती विरून जात असतात. संमेलनातील वाचक रसिकांचा सहभाग सतत वाढतच असतो. परंतु रसिकांची संख्या बारा-पंधरा हजाराच्या पुढे कधी जाताना आढळत नाही. संमेलनाच्या जागी पुस्तक प्रदर्शन हमखास असते. तेथे दोन-पाच कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री होते. त्यातील खरे-खोटे प्रकाशकच जाणोत!

संमेलनाच्या या परंपरेत अध्यक्षच नसण्याचा प्रसंग महाबळेश्वर येथे आला. संमेलनाध्यक्ष म्हणून आनंद यादव यांची निवड झाली होती. तथापी, वारकऱ्यांच्या एका गटाने दहशत निर्माण केली, की यादव यांच्या तुकाराम चरित्रावर आधारित कादंबरीने वारकऱ्यांची मने दुखावली. वारकऱ्यांनी त्यातील काही प्रसंगांना आक्षेप घेतला आणि असा अध्यक्ष संमेलनाला नको असे ठणकावून सांगितले. यादव यांनी क्षमा मागितली. ते पुस्तक बाजारपेठेतून काढून घेण्यात आले, तरीसुद्धा वारकऱ्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे यादव यांनी संमेलनातून माघार घेतली व ते संमेलनस्थळी फिरकलेच नाहीत.

साहित्य संमेलन कसे भरवावे? तो उत्सव असावा, की साहित्यविषयक चर्चेचे पीठ? अशा प्रकारचे विचारमंथन मराठी साहित्य जगतात सतत चालू असते. मात्र त्याबाबत सविस्तर विचार करून नवे प्रयोग घडवून आणण्याचा पुढाकार महामंडळापैकी कोणी कधी घेत नाही. नागपूरचे श्रीपाद भालचंद्र जोशी हे ‘पुरोगामी लेखक मंचा’चे कार्यकर्ते महामंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी नागपूरचे संमेलन काही वर्षांपूर्वी कमी खर्चात करून दाखवले. ते संमेलनाला अवाजवी खर्च होऊ नये, साहित्यिकांनी संमेलनास मानधन न घेता – वारकरी म्हणून यावे, अशा तऱ्हेची मते मांडत असतात. वास्तवात संमेलन हे साहित्य रसिकांचा उत्सव अशा स्वरूपात होत असते. लोकांना तीच भूमिका प्रिय आहे असे दिसते.

लक्ष्मीकांत देशमुख यांनी संमेलनात ‘सुसंस्कृत समाजाचा सरकारवरील दबाव’ अशा स्वरूपाचा उल्लेख केल्याचे वाचून समाधान वाटले. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’चे मुखपत्र आहे. ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’चे उद्दिष्ट संस्कृतिकारण हे आहे. ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ व ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या दोन्ही व्यासपीठांवरून आम्ही गेले आठ वर्षें हेच मांडत आलो आहोत, की समाजातील सुशिक्षित व सुसंस्कृत लोकांचे नेटवर्क व्हावे. त्यामधून ‘दबाव गट’ तयार व्हावेत आणि त्यांनी केवळ राजकारणातील नव्हे तर समाजकारण, अर्थकारण या क्षेत्रांतील अनाचारांना व अनिष्ट व्यवहारांना विरोध दर्शवावा. लक्ष्मीकांत देशमुख यांनी त्याच आशयाची भूमिका घेतली आहे. त्यांनी तो मुद्दा घेऊन पुढे जावे ही त्यांच्याकडून अपेक्षा.

- दिनकर गांगल

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.