जावळविधीचा संस्कार


_JawalVidhi_Saunskar_1.jpgजावळविधी हा हिंदू धर्माच्या सोळा संस्कारांपैकी एक आहे. त्याला मुंडनविधी असेही म्हणतात. बाळ आईच्या गर्भात नऊ महिने राहिल्याने त्याला डोक्यावर जन्मत: असलेले केस अपवित्र मानले जातात. ते वैदिक मंत्रोच्चारासह विधिवत कापून टाकले जातात. केस प्रथमच कापण्याचा विधी जावळ या नावाने ओळखला जातो. धार्मिक संस्कारांच्या दृष्टीने आणि रूढीप्रमाणे बाळ एक वर्षाचे झाल्यावर त्याच्या डोक्यावरील जावळ काढतात.

भारतात जावळविधीची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. जावळ काढण्यामुळे केसांच्या नैसर्गिक रचनेत फारसा बदल होत नाही. केसांचा पोत हा अनुवंशिक असतो. सकस आहाराने मुलांचे केस अधिक मजबूत होऊ शकतात. जावळ काढले जात असताना काही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. नवजात बाळाचे डोके नाजूक असते. त्यामुळे जावळ काढण्याची घाई करू नये. बाळाचे जावळ शक्यतो सकाळच्या वेळात काढावे. त्यावेळी बाळ ताजेतवाने असते. त्यामुळे रडारड करत नाही. बाळाचे जावळ काढण्यासाठी शक्यतो ट्रिमरचा वापर करावा; धारदार कैचीचा किंवा वस्तऱ्याचा बाळाला त्रास होऊ शकतो. जावळ काढताना बाळाचे लक्ष खेळण्यामध्ये गुंतवावे. बाळाचे डोके नीट व घट्ट पकडावे, जेणेकरून बाळ जास्त हालचाल करणार नाही. त्यामुळे जखम होण्याची शक्यता उणावते. बाळाच्या डोक्याला जावळ काढल्यानंतर खाज सुटते. ते टाळण्यासाठी बाळाला डोक्यावरून अंघोळ घालून सौम्य मॉइश्चरायझर लावावे. तसेच, बाळाच्या टाळूवर तेलाने हलका मसाज केल्यास उत्तम.

मुलाचे केस काढले जातात व मुलींचे राखले जातात, त्याचे स्पष्टीकरण हिंदू धर्मपंरपरेनुसार गूढ रीत्या देण्यात येते.

बालकाच्या डोक्यावरील त्वचा संवेदनशील असते. केस काढल्यामुळे त्वचेचा वातावरणाशी सरळ संपर्क येतो. त्यामुळे वातावरणातील सात्त्विक ईश्वरी चैतन्याच्या लहरी सहस्रारचक्राद्वारे मोठ्या प्रमाणात ग्रहण केल्या जातात. त्या लहरींच्या ग्रहणामुळे मन व बुद्धी यांची सात्त्विकता वाढीस लागते. त्यामुळे काळ्या शक्तीचा मन व बुद्धीवर परिणाम होत नाही. याउलट, बालिकांच्या टाळूचा मध्यभाग कोमल असल्यामुळे त्यावर वाईट शक्तीचे आक्रमण होण्याची शक्यता असते. त्या आक्रमणांपासून बालिकेचे संरक्षण करण्यात केसांचा वाटा मोठा असतो. त्यामुळे स्त्रियांचे जावळ केले जात नाही.

जावळ काढण्याच्या रीतिभाती प्रत्येक समाजानुसार बदलतात. बंजारा समाजात घरात दुसरे मूल जन्माला आले, की पहिल्या व दुसऱ्या असे दोघांचे जोडीने जावळ काढण्याची परंपरा आहे. बंजारा लोक त्यांच्या कुलदेवतेच्या मंदिरात बालकांचे जावळ काढतात. काही बंजारा लोक मुलींचे सुद्धा जावळ उतरवतात. मुलाचे जावळ काढताना कुलदेवतेच्या मंदिरावर झेंडा चढवला जातो व देवीला बकरा बळी दिला जातो.

वीरशैव लिंगायत समाजात मुलगा व मुलगी, दोघांचाही जावळविधी केला जातो. कापलेल्या केसांवर कोणाचाही पाय पडणार नाही याची खबरदारी घेऊन ते विसर्जित केले जातात. जन्मापासून एक वर्षाच्या आत किंवा तीन वर्षापर्यंत केव्हाही सम मासात मुहूर्त पाहून जावळ काढले जाते. बाळाची टाळू भरण्यासाठी डोक्यावर तेल वापरतात. त्या तेलामुळे बाळाच्या डोक्यात खवडा (त्वचा रोग) होण्याची भीती असते. जावळ केल्यामुळे खवड्यापासून संरक्षण मिळते व नवीन येणाऱ्या केसांची वाढ घट्ट व जोमदार होते, असा समज आहे.

मराठा समाजात मामाच्या मांडीवर बाळाला बसवतात व आत्या खोबऱ्याच्या वाटीत किंवा पदरात जावळ झेलते. भाच्याचे जावळ केल्यावर आत्याला सोने देण्याची प्रथा आहे.

वारली जमातीत जावळ चार-पाच महिन्यांच्या मुलाचे काढले जाते. ते मामाने काढायचे असते. पावसाळ्यात जावळ काढले जात नाही.

कुंभारांमध्ये मुलाचे जावळ त्याच्या सव्वा वर्षाच्या आत मामाकडून काढतात, तर मुलीचे जावळ चांगला दिवस पाहून काढतात. मुलाचे जावळ काढताना बोकड कापून त्याच्या मटणाचे जेवण देण्याची प्रथा आहे. काही कुंभार कुटुंबे जावळ प्रसंगी गोड जेवण देतात. उदाहरणार्थ, लिंगायत कुंभार. कुंभार समाजात दोन-तीन महिन्यांनी न्हाव्याकडून मुलाचे जावळ काढून शेजाऱ्यांना काकवी वाटण्याची पद्धत होती. ती पद्धत कालबाह्य झाली आहे. मूल नवसाचे असेल तर बऱ्याचदा देवळात, गावाबाहेरील मंदिरात किंवा कुलदैवताच्या ठिकाणी जाऊन जावळ काढतात. कुंभारांमध्ये बाळाचे जावळ तेराव्या महिन्यात न्हाव्याकडून काढण्याची व लहान मुलांना कडदोरा बांधण्याची पद्धत आढळते.

कोकणी लोकांमध्ये मुलाचे जावळ करताना शेंडी राखण्याची प्रथा आहे. जावळ करताना मुहूर्त सम मासात, उत्तरायणात सकाळच्या वेळी, विशिष्ट नक्षत्रांवर (पुनर्वसू, पुष्य, अश्विनी, रेवती, मृग, श्रवण, धनिष्ठा, शततारका, हस्त, चित्रा, स्वाती), तर सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार या दिवशी आणि पंचमी, षष्ठी, दशमी व त्रयोदशी या तिथींवर साधतात. जावळ केल्यानंतर डोक्यावर दुधाची जाड साय लावतात. काही ठिकाणी डोक्यावर चंदनदेखील लावले जाते. जावळविधीमुळे गार्भिक दोष निघून जातात असे मानले जाते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी महाराणी राजसबाई यांच्या पोटी जन्म घेतलेल्या संभाजी राजे (द्वितीय) यांचे जावळ प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिरात केल्याची नोंद सापडते.

अग्रवाल समाजामध्ये सती मंदिरात मुलाचा जावळ विधी केला जातो. पुण्यात कात्रजजवळ ‘नारायणी धाम’ हे तसे सती मंदिर आहे. सिन्नरच्या सटवाई मंदिरात देखील जावळ काढण्याचा विधी केला जातो. पूजा करण्यासाठी बाळाची आई तिच्या केसांनी सटवाई देवीचा ओटा झाडते. देवीला दंडवत पाच वेळा घालते. जावळ बालजन्मानंतर साधारणत: सव्वा महिन्याने काढले जाते. केस कितीही मोठे झाले तरी त्याआधी ते कापत नाहीत.

जावळ करणाऱ्या न्हाव्याचा सन्मान करण्याची प्रथा सर्व समाजांत आहे. त्या तांदूळ, गहू, उडीद, तीळ, दक्षिणा, नारळ, विडा, सुपारी आणि तूप घातलेला भात, शर्टपीस अशा विविध वस्तू  दान म्हणून दिल्या जातात.

- वृंदा परब

लेखी अभिप्राय

Balache javal kontya mahinyat kadave

Lalit Jadhav03/05/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.