हिवरे गाव - समृद्धीकडून स्वयंपूर्णतेकडे!


_HirweGaon_SamrudhikadunSwayampurnatekade_1.pngसरपंच अजित रघुनाथ खताळ यांनी त्यांच्या गावाचे पाणलोट क्षेत्र जलाजल करण्याचा ध्यास घेतला. त्यांच्या त्या प्रवासाचे वर्णन खडतर या शब्दातच होऊ शकेल! त्यांना त्यांनी गायरान जमिनीवर चराईबंदी, कुऱ्हाडबंदी केली म्हणून रोषाला आरंभी सामोरे जावे लागले, कारण त्या बहुसंख्यांचा व्यवसाय मेंढीपालनाचा होता. परंतु गाव जलसंपन्न होत गेले तसे त्यांना ग्रामस्थांचे प्रेमही लाभले. त्यांची जलसंधारणाच्या कामांमुळे वाढलेली लोकप्रियता स्थानिक पुढाऱ्यांच्या वर्षानुवर्षांच्या सत्तावर्चस्वाला सुरुंग लावणार या धास्तीतून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी अजित यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चक्क तुरुंगात धाडले. पण अजित खताळ आणि चमू डगमगले नाहीत. ते त्या संघर्षातून अधिक कणखर झाले.

त्यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली; ग्रामपंचायतीची सत्ता सात विरुद्ध शून्य असा जनादेश घेत हस्तगत केली. त्यांचा अजेंडा होता तो केवळ विकासाचा, गावाच्या समृद्धीचा. जलसंधारणाचे विविध प्रयोग अमलात आणण्यासाठी सत्तेची जोड मिळाली आणि हिवरे गावाचा प्रवास केवळ हिरवाई अथवा टँकरमुक्ती एवढ्यापुरता राहिला नाही, तर समृद्धीकडून स्वयंपूर्णतेकडे सुरू झाला.

हिवरे गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसले आहे. ते सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यात येते. लोकवस्ती एक हजार तीनशेअठ्ठ्याहत्तर. एकूण क्षेत्र आठशेपंच्याहत्तर हेक्टर. पैकी दोनशेअठरा हेक्टर हे वनक्षेत्र. साताऱ्यापासून अंतर तीस किलोमीटर तर कोरेगावपासून पश्चिमेस अवघे अठरा किलोमीटर. आधीच, पर्जन्यछायेचा प्रदेश, त्यात त्या तालुक्याची गेल्या पाच वर्षांतील पावसाची सरासरी केवळ सातशे मिलिमीटर. कोरेगावहून निघाल्यानंतर वाटेत आधी भेटतात कुमठे, भोसे आणि चंचाळी ही गावे. त्यांना मिळणाऱ्या पाण्याइतपत पाणी हिवरे गावास मिळत नाही. हिवरे गावाचा पृष्ठभाग काहीसा उथळ तबकडीसारखा आहे. तो परिसर भीमा नदी खोऱ्यात उंचावर असल्यामुळे पाटचारीचे पाणी त्या गावापर्यंत पोचत नाही. हिवरे गाव जवळ आल्याची खूणच रखरखीत शिवारे आणि उजाड डोंगर ही असे. गावाच्या तीन बाजूंनी डोंगर. डोंगरावर पडणारा पाऊस ओढे, नाले आणि वांगना नदी यांच्या माध्यमातून क्षणार्धात वाहून भीमेस मिळे. नोव्हेंबर/डिसेंबरपासून पाण्यासाठी वणवण. टँकरद्वारे पाणी पुरवठा.

_HirweGaon_SamrudhikadunSwayampurnatekade_2_0.pngअजित खताळ यांचे बी.एस्सी.(अॅग्री) पर्यंत शिक्षण झाले आहे. संदेश कुळकर्णी हे नोकरीनिमित्त महाराष्ट्रभर हिंडलेले गृहस्थ. सेवानिवृत्तीनंतर स्वतःची शेती कसण्यासाठी गावातच स्थायिक झाले. त्यांनी जलसंधारण कामातून राज्यात काही ठिकाणी झालेले आमूलाग्र बदल पाहिले होते. संदेश कुळकर्णी यांनी स्वतः 2003 ते 2005 या तीन वर्षांच्या कालावधीतील दुष्काळाची झळ सोसली. पिण्यासाठी लागणारे पाणी टँकरद्वारे येत असे. त्यांनी शेतीसाठी पाणी नसल्यामुळे शेती करणे सोडून दिले आणि ते साताऱ्यातील घरी येऊन राहिले. तत्पूर्वी त्यांनी चौदापैकी दोन बैल ठेवले आणि बाकीचे वाटून दिले. त्या कालावधीत त्यांच्या बांधावरील आंब्याची झाडे एकशेपस्तीसपैकी केवळ पस्तीस शिल्लक राहिली. संदेश कुळकर्णी यांच्या अजित खताळ आणि चमू यांच्यासमवेत झालेल्या चर्चेतून परिसरातील डोंगरांचा उपयोग करून पाणलोट क्षेत्र विकासाचे काम हाती घेण्याचा संकल्प सोडण्यात आला. अजित खताळ आणि ग्रामस्थ यांची सहल नगर जिल्ह्यातील हिवरे गावात झालेले परिवर्तन पाहण्यासाठी नेण्यात आली. सहलीत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. त्यानंतर मात्र ग्रामस्थांची मानसिकता बदलली. पाणलोट क्षेत्रात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब मुरवायचाच असे पक्के ठरले.

अजित खताळ यांना जलसंधारणासाठी प्रभावी असलेले डीप सीसीटी आणि सीसीटी - समतल चर तंत्र अवगत होते. त्या अनुषंगाने स्थानिक मजूर; तसेच, उत्साही ग्रामस्थ यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर माथा ते पायथा या तंत्रानुसार डीप सीसीटी, सीसीटी, मातीचे बंधारे, सिमेंट बंधारे आणि जुन्या पाझर तलावांमधून गाळ काढण्याचा धडाका सुरू झाला. हिवरे गावाच्या शिवारात जोरदार मोहीमच राबवली गेली. ती मोहीम राबवण्यापूर्वी ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिरास रंगरंगोटी करण्यात आली. यात्रेनिमित्ताने एकत्र आलेल्या ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले. पाणी साठवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडी तयार करण्यात आली. राज्य शासनाच्या विविध विभागांच्या अनेकविध योजनांच्या माध्यमातून प्राप्त झालेला निधी, लोकसहभाग, ‘किसनवीर सहकारी साखर कारखान्या’चा सहयोग आणि समर्पित भावनेने काम करणारी स्थानिक मंडळी... यांमुळे अल्पावधीत हिवरे गावाचे नाव पाणलोट क्षेत्र विकासाच्या बाबतीत घेण्यात येऊ लागले. हिवरे गावाची निवड ‘वॉटरकप स्पर्धे’तील सहभागींसाठीचे प्रशिक्षण केंद्र म्हणून 2016 मध्ये झाली.

अर्थात तो बहुमान प्राप्त होण्यासाठी काही वर्षें जावी लागली. ग्रामस्थांना जलसंधारणासाठीचे काम नेटाने करावे लागले. जेथे जागा दिसेल तेथे डीप सीसीटी, सीसीटी खोदण्यात आल्या. बांधबंदिस्ती करण्यात आली. ते काम गावाच्या तिन्ही बाजूंस असलेल्या डोंगरावर करण्यात आले. त्या जलसंधारण तंत्राचे एक वैशिष्टय अजित खताळ यांना भावते. माथ्यापासून पायथ्याच्या दिशेने साखळी पद्धतीने स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार डीप सीसीटी अथवा सीसीटी खोदण्यात येतात. त्यामुळे डोंगराच्या माथ्यावर पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब अन् थेंब जागेवर अडवला जातो. पाऊस असतो तोपर्यंत पाणी साठलेले दिसते, नंतर सर्व पाणी मुरते. ते वाहून जात नाही. एका डीप सीसीटीचा आकार साधारण वीस मीटर लांब, एक मीटर खोल आणि एक मीटर रुंद असतो. आरंभीच्या टप्प्यात साडेसतरा हजार मीटर डीप सीसीटीची कामे झाली, सुमारे साडेसतरा किलोमीटरचे चर खोदण्यात आले. पुढे ओढे व नाले यांच्यावर मातीचे व सिमेंटचे बंधारे उभारून बांधबंदिस्ती करण्यात आली. ग्रामस्थांनी त्यांच्या श्रमदानातून त्यांपैकी पिंचिंग करणे, सांडवे काढणे, माती वाहून नेणे, झाडे लावण्यासाठी खड्डे खोदणे; शिवाय, जलसंधारणाची लहानमोठी कामे केली. काही शेततळ्यांची उभारणीदेखील लोकसहभागातून झाली.

बांधबंदिस्ती सुमारे चारशे हेक्टरच्या आसपास करण्यात आली. त्याआधी गाळ काढण्यात आला. त्यामुळे साठवण क्षमता वाढली. डोंगरउतारावर मुरलेले पाणी ओहोळ, ओढे यांमधून प्रकट झाले ते स्वच्छ व नितळ स्वरूपात. गावाजवळून वाहणाऱ्या नदीत पाणी दिसत नव्हते, मात्र हिवरे गावाजवळ असलेल्या तलावात पाणी होते. ती जलसंधारणाच्या अनोख्या तंत्राची कमाल होती. हिवरे ग्रामस्थांचा कामाचा धडाका पाहून ‘किसनवीर सहकारी साखर कारखान्या’चे अध्यक्ष मदनराव भोसले यांनी कारखान्याचे जेसीबी मशीन हिवरे गावात पाठवून दिले. ते मशीन डोंगरमाथ्यावर अतिशय उंचावर चढवण्यात आले. त्या माध्यमातून डोंगर उंचीवरील सुमारे तीनशे हेक्टर परिसरात डीप सीसीटी व सीसीटी ही कामे करण्यात आली. गावाच्या पूर्वेकडील पाणलोट क्षेत्र विकसित करणे त्या मदतीमुळे शक्य झाले. त्याशिवाय तेरावा वित्त आयोग, पर्यावरणाचा निधी, जलयुक्त शिवार या सरकारी अभियानांतर्गत मिळालेले सहाय्य यामुळे हिवरे गावाच्या शिवारात जलसंधारणाची सर्वाधिक कामे झाली. अशा पद्धतीने डीप सीसीटी, सीसीटी आणि बांधबंदिस्तीचे जाळे हिवरे गावाच्या शिवारात तयार करण्यात आले. तसे काम करण्यासाठी गाव परिसरात एकही जागा शिल्लक राहिली नाही. पुढील पिढीने त्यातील गाळ काढण्याचे काम जरी नियमित केले तरी पाणीटंचाईचे संकट हिवरे गावावर भविष्यात कधी येणार नाही. हिवरे गावास धरणाची गरज नाही असे अजित खताळ ठामपणे सांगतात.

पाणलोट क्षेत्रातील ओढे, नाले आणि चाऱ्या एकमेकांना जोडण्याचा उपक्रम राबवण्यात आला आहे. त्यामुळे गावाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याचे संचलन चौफेर होऊ शकेल, शिवाय ओढे, नाले यांमधून ओव्हरफ्लो होऊन पाणी अन्यत्र वाहून जाणार नाही. ते गावाच्या क्षेत्रात स्थिरावेल. सातारा जिल्ह्याचे कलेक्टर अश्विन मुदगल यांचे सहकार्य हिवरे गावास लाभले. त्यामुळे शासकीय योजनांच्या अमलबजावणीमधील क्लिष्टता टाळण्यास मदत झाली, मुदगल यांनी सातारा जिल्ह्यात राबवलेल्या जलयुक्त अभियानाची दखल राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी घेतली आहे.

हिवरे गावाच्या पश्चिमेस तेहतीस हेक्टर क्षेत्र गायरान आहे. त्या ठिकाणी सीताफळांची साडेपाच हजार झाडे लावण्यात आली आणि ती ठिबक सिंचनाद्वारे पाणी देऊन जगवण्यात आली. त्याशिवाय गावाच्या प्रवेशद्वाराच्या अलिकडे पंधरा हेक्टर गायरान क्षेत्रावरदेखील सीताफळांची लागवड करण्यात आली आहे. अजित खताळ यांचा मानस सीताफळांवर प्रक्रिया करणारा उद्योग उभारण्याचा आहे. त्यासाठी आवश्यक असलेला कच्चा माल गावातून उपलब्ध करण्याची तरतूद त्यानिमित्ताने करण्यात आली आहे. एका झाडापासून शंभर रुपये उत्पन्न गृहीत धरले तरी साडेपाच हजार झाडांपासून साडेपाच लाख रुपये ग्रामपंचायतीस मिळू शकतात.

ग्रामपंचायतीने ग्रामस्थांसाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी आरओ प्लॅण्ट सुरू केला आहे. दहा रुपयांत वीस लिटरचा जार उपलब्ध करून देण्यात येतो. पाणी सहज उपलब्ध झाले म्हणून त्याची उधळपट्टी होऊ नये यासाठी ठिबक आणि तुषार सिंचन या कल्पना राबवण्यात आल्या. त्याकरता शेतकरी अनुकूल व्हावेत यासाठी त्यांचे प्रबोधन करण्यात आले. परिणामस्वरूप चारशे एकरासाठी एकत्रित प्रस्ताव तयार झाला. ठिबक सिंचनामुळे पाण्याची उधळपट्टी थांबली. शिवाय, ऊसाचा दर्जादेखील सुधारला.

राज्यपालांच्या अध्यादेशानुसार हिवरे हे राज्यातील पहिले वनग्राम ठरले आहे. दोनशेअठरा हेक्टर वनक्षेत्राची मालकी गावाकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे साडेपाचशे हेक्टरचे अतिरिक्त क्षेत्र वृक्षलागवडीसाठी उपलब्ध झाले आहे. त्या ठिकाणी बांबू व फळझाडे यांची लागवड करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला आहे. वृक्षलागवडीकडे विशेष लक्ष दिल्यामुळे परिसरात विविध प्राणी व पक्षी यांची रेलचेल वाढली आहे. त्या ठिकाणी वनशेती करण्याचा मानस आहे. तसेच, अजित खताळ यांचा मानस वनपर्यटन आणि कृषिपर्यटन या दोन्ही संकल्पना राबवण्याचादेखील आहे. राज्यातील तो पहिला प्रयोग ठरणार आहे. हिवरे गावच वनग्राम असल्यामुळे वाठार स्टेशनला आठ किलोमीटर पायवाट तयार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे एरव्ही तेथे जाण्यासाठीचे चोवीस किलोमीटर अंतर पार करावे लागणे थांबले.

मात्र हिवरे गावाने ‘वॉटरकप स्पर्धे’पूर्वी काही वर्षें आधीच गावाच्या कानाकोपऱ्यात बहुसंख्य कामे केली होती. स्पर्धेच्या नियमानुसार पंचेचाळीस दिवसांत करण्यासाठी मोठे असे कामच शिल्लक नव्हते! गावाच्या कामाची अशी कीर्ती ‘वॉटरकप टीम’कडे पोचली. सत्यजित भटकळ यांनी गावाची पाहणी केली. त्यामुळे स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांमधील नागरिकांना जलसंधारणाचे मॉडेल पाहण्यास मिळावे म्हणून हिवरे गावातच ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात आले. अविनाश पोळ यांच्या मार्गदर्शनानुसार ट्रेनिंग सेंटरसाठी सोयी सुविधा निर्माण करण्यात आल्या. बीड जिल्ह्यातील स्पर्धक गाव त्या प्रशिक्षण वर्गात सहभागी झाले होते. ती मंडळी ऐन एप्रिलमध्ये तुडुंब भरलेल्या विहिरींमध्ये पोहण्यासाठी सूर मारत!

Website : www.hivaregrmpanchayat.in
सरपंच : अजित रघुनाथ खताळ 7219812118
मु. पो. हिवरे, ता. कोरेगाव, जि. सातारा

(जलसंवाद, जुलै 2017 वरून उद्धृत)
 

- संजय झेंडे

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.