गोडसे @ गांधी डॉट कॉम - गोडसे-गांधींचे न सुटणारे कोडे!


गोडसे गांधी आमनेसामने!

_Godse@Gandhi_DotCom_1.jpg'गोडसे @ गांधी डॉट कॉम' हे असगर वजाहत यांचे नाटक स्वातंत्र्यपूर्व काळावर समकालीन दृष्टिकोनातून अतिशय टोकदार प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करते. गांधीहत्या, स्वराज्य, सुराज्य ते गांधीजींचे जीवनविषयक तत्त्वज्ञान, स्त्री-पुरुष संबंध, लोकशाहीची मूल्ये, हिंदुधर्माच्या व्याख्या, भारत या राष्ट्राची संकल्पना, फाळणीनंतरचा भारत असे सगळे मुद्दे व प्रसंग त्यात उल्लेखले गेले आहेत. त्या निमित्ताने होणाऱ्या चर्चेत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्ष बरखास्त करावा हे सूत्रही पुन्हा ऐरणीवर येते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यात गांधी आणि नथुराम गोडसे यांना समोरासमोर उभे केले आहे! गांधी आणि गोडसे यांच्यात संवाद घडावा यांसाठी ते आग्रहीच नव्हे, तर हटवादी, टोकाची भूमिका घेतात. ते नेहरूंच्या मंत्रिमंडळाच्या विनंतीला न जुमानता उपोषणाची धमकी देतात आणि त्यांची तोळामासा झालेली प्रकृती ध्यानात घेऊन केंद्रिय मंत्रिमंडळात ठराव करून त्यांना ती विशेष परवानगी देण्यात येते.

असगर वजाहत यांनी नाटकाच्या कथानकात काही ऐतिहासिक तथ्यांमध्ये खूप मोठे स्वातंत्र्य घेतले आहे. गांधींवर बिर्ला हाऊसमध्ये नथुराम गोडसे पिस्तुलातून गोळ्या झाडतो आणि प्रार्थना सभेच्या समुदायासमोरच 'हरे राम!' म्हणत गांधी गतप्राण होतात. नथुराम गोडसेवर खटला चालतो. त्याला कारावास होतो व त्याला फाशी दिली जाते. हा इतिहास आहे. गोळ्या घालून गतप्राण झालेले गांधी आणि नथुराम गोडसे समोरासमोर येतात हे एवढे मोठे स्वातंत्र्य लेखकाने घेतले तरी नाटक वाचताना सुज्ञ सुजाण वाचकाला फार मोठा धक्का वगैरे बसत नाही. कारण लेखकाला त्या दोघांना समोरासमोर आणून त्या काळाचा, त्यातील ठळक घटनांचा, तत्त्वज्ञान आणि वास्तव यांचा धांडोळा घ्यायचा आहे. लेखकाचा प्रयत्न त्या धांडोळ्याच्या निमित्ताने त्या काळातील निर्णायक शक्तींना, सत्ताकेंद्रांना आणि प्रशासन यंत्रणेतील दुर्बल सांगाड्यालाही उघडेवाघडे पाडण्याचा आहे.

प्रत्यक्ष घटितातील वास्तवापेक्षा हे कल्पित वास्तव अधिक अर्थवाही, अधिक विश्वसनीय आणि विषयवस्तूच्या तळाचा ठाव घेणारे आहे. ते अधिक सकस आणि दूरगामी प्रभाव निर्माण करणारे वाटते. काळाची सरमिसळ झाली नसती तर तळ गाठण्याचा उद्देश लेखकाला गाठताच आला नसता. शिवाय, ऐतिहासिक स्वातंत्र्य घेताना लेखकाने वास्तवातील पात्रे, वास्तव घटना यांना धक्का पोचवले नाही. पात्रांना एकमेकांच्या समोरासमोर उभे करून त्यांच्या जीवन-साराचा गोळीबंद वापर नाट्यपरिणामासाठी करतात हे विशेष. साररूपाने गोडसे आणि गांधी आमच्या मनावर परस्परविरुद्ध भूमिका घेऊन ठाम उभे असतातच की! स्थळ, काळ आणि कृती यांच्या कसोट्यांवर गोष्टींना तपासून घेत असताना शेवटी कृतीची एकतानताच महत्त्वाची ठरते.

गांधी, प्यारेलाल, गोडसे, नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना या ज्ञात पात्रांबरोबरच. बीरा ला शिकत असणारी सुषमा, विद्यापीठात शिकवणारा तिचा प्रियकर नवीन आणि सुषमाची आई आणि फणिंद्रनाथ रेणू यांच्या 'मैला आचल' या कादंबरीतील पात्र बावनदास ही आहे. ती सारी पात्रे तोंडावळ्याने नवी वाटत असली तरी ती वृत्तीने गांधींच्या अवतीभवतीच्या पात्रांसारखी त्यांच्या जीवनाशी एकरूप होतात. त्यांच्या त्या एकरूप होण्यात त्यांच्या व्यक्तिगत आकांक्षांची होरपळ होत असली तरी गांधींवरील श्रद्धेमुळे पात्रे बंड करून उठत नाहीत. त्यांना उपकथानक म्हणूनही नाटकाच्या रचनेत विशेष स्थान नाही, पण त्यांच्या आग्रहाचे पडसाद दूरगामी सिद्ध होतात. वाचक-प्रेक्षकाला गांधीना समजून घेण्यास मोठा हातभार लावतात.

_GandhijiChar_AnguleVar_2.pngकाँग्रेस पक्षाचे विसर्जन करावे या गांधींच्या मताला पाठबळ मिळत नाही. परिणामतः गांधी आपोआप काँग्रेस बाहेर पडतात आणि बिहारमध्ये जावून ग्रामीण भागात कार्य सुरू करतात. तेथेच नेहरू आणि गांधी यांच्यामध्ये ठिणगी पडते. नेहरूंच्या सरकारमध्ये राहून आपण जनतेची सेवा करू शकत नाही काय या प्रश्नावर गांधींचे सडेतोड उत्तर आहे, सरकार अधिकार गाजवते. सेवा करत नाही. सरकार सत्तेचे प्रतीक आहे आणि ते केवळ स्वतःची सेवा करते. म्हणून सत्तेपासून जेवढे दूर राहता येईल तेवढे बरे असे गांधी निक्षून सांगतात.

नेहरुंच्या दृष्टीने देशाला वाचवण्यासाठी पॉलिसीज तयार कराव्या लागतील, त्या अमलात आणाव्या लागतील. प्लॅनिंग कमिशन स्थापन करावे लागेल, पंचवार्षिक योजना आखाव्या लागतील, मग देशातली गरिबी आणि विषमता दूर होईल आणि त्यासाठी कमिटेड सरकार असणे जरुरीचे आहे. गांधी नेहरू यांना समजवतात, की तू पानांकडून मुळांकडे जाण्याचा प्रयत्न करतोस. शासनाने नीती आखली म्हणजे लोकांचे कल्याण होईल असे तुला वाटते, माझे मत उलटे आहे. लोकांना सशक्त करा. त्यांना स्वतःसाठी काय योग्य आहे ते चांगले ठाऊक आहे. ते स्वतः त्यांच्या कल्याणाचे मार्ग शोधतील, त्यावर अंमल करतील.

नेहरू काँग्रेस वर्किंग कमिटीपुढे प्रस्ताव ठेवण्याचे मान्य करतात, पण गांधी निक्षून सांगतात, काँग्रेस वर्किंग कमिटीने प्रस्ताव मान्य केला नाही तर त्यांचा काँग्रेसशी काहीही संबंध राहणार नाही. गांधी त्यांचे सहकारी प्यारेलाल यांना विचारतात, की अजून त्यांना त्यांच्या सोबत राहायचे आहे काय?. त्यांचे भविष्य त्या लोकांसोबत आहे, जे त्यांना सोडून गेले आहेत.

प्यारेलाल हे एक निष्ठावान अनुयायी असल्याने ते उलट विचारतात, 'बापू, माझा एवढा अपमान तर कधीच केला गेला नव्हता'. ही खरी धगधगती निष्ठा. नाटककार सख्खी नाती, त्यांचे पडसाद नथुरामच्या गोटातही दाखवतो. करकरे नथुरामला वर्तमानपत्रातली बातमी वाचून सांगतो. “बघितलेस नथुराम, गांधीने काँग्रेस सोडली”. भडकलेला नथुराम उखडतो, “अरे, गांधी तर पुरता ढोंगी आहे... अरे तो तर कधी काँग्रेसचा साधा मेम्बरही नव्हता. गांधी कधी खरं बोलला? सतत वल्गना करायचा पाकिस्तान माझ्या तिरडीवर बनेल! पण बघितले ना, काय झाले? पाकिस्तानचा जन्मदाता जिना नाही, गांधी आहे! हिंदूंचे जेवढे अहित औरंगजेबाने केले असेल, त्याच्यापेक्षा काहीपट अधिक गांधीने केले आहे.” गोडसे पुढे म्हणतो, “पण तुमच्या-आमच्या सारखा दिसणारा माणूस एवढा शक्तिशाली आहे की ज्युरी पण तोच आहे आणि जज पण तोच आहे! मूकदमा तोच दाखल करतो, तोच रोखतो आणि फैसला पण तोच दाखवतो! आणि सारा देश त्याचा निर्णय मान्य करतो! हे सारे घडते आमच्या हिंदूंच्या बळावर.” नाट्यसंघर्ष उभा करण्याचे लेखकाचे कौशल्य परिपक्वतेचे आणि माध्यमावरील प्रभुत्वाचे दर्शन घडवणारे आहे.

गांधींनी त्यांचा आश्रय बिहारमधील पुरालिया जवळील सांगी गावात सुरू केला. तेथे पोचायला तेरा किलोमीटर पायी चालत जावे लागायचे.

प्रार्थना सभेनंतर जिल्ह्याचा डेप्युटी कमिशनर रामनाथ गांधी यांना येऊन भेटतो. सोबत जिल्ह्याचे इंजिनीयर, एस.पी. अशा साऱ्या अधिकाऱ्यांचा लवाजमा असतो. त्यांना हँडपम्प वगैरे लावण्याच्या, टेलिफोन लाईन जोडण्याच्या योजना राबवायच्या आहेत. गांधी सांगतात की गावकऱ्यांबरोबर चर्चा करा. अधिका-यांना गावकऱ्यांची भाषा येत नाही. त्यावर गांधी त्यांना विचारतात, “त्यांची भाषा येत नसेल तर त्यांचा विकास कसा करणार तुम्ही लोक”. त्यांना गांधींच्या सुरक्षेसाठी तेथे पोलिस चौकी सुरू करायची आहे. गांधीजी त्यांना सांगतात, की “गाववाल्यांचे आपले प्रशासन आहे आणि त्यांना कोठलीही असुरक्षितता वाटत नाही. तेथे सारे काही सुरळीत आहे. त्यांनी निघावे आता”.

पुढे, बिहारचे मुख्यमंत्री श्री बाबू स्वतः गांधी यांना भेटायला येतात. ग्रामस्थांनी स्वयंम् प्रशासन उत्तम रीतीने चालवले असल्याने त्यांच्या प्रशासनाचा रोल अगदी नगण्य झाला आहे. गांधी तेथील प्रधानमंत्री बावनदास याला बोलावतात. बावनदास विहीर खोदणे, बांध घालणे, रस्ते तयार करणे अशा, लोकसहभागातून उभ्या राहत असलेल्या कामांची यादीच धाडधाड सांगतो. शेवटी गांधी बाबूंना सांगतात, की नेहरूंना जाऊन सांगा की, या चार जिल्ह्यांत सरकार स्थापन झाले आहे. तेथील लोक आपले सरकार सक्षमपणे चालवत आहेत आणि तीच तेथील संस्कृती आहे. शिवाय, दोन सरकारांच्या संघर्षाचा प्रश्न तेथे उदभवणार नाही हेही सांगतात.

_GandhijiChar_AnguleVar_1.pngगांधी चोरून चोरून पत्रव्यवहार करणाऱ्या सुषमा आणि नवीनला लग्नाला परवानगी देतात, पण अखंड ब्रह्मचर्याचे पालन करण्याच्या अटीवर! संयमाशिवाय मनुष्य पशू आहे हेही सांगतात. पुढे, गांधी यांच्यावर देशद्रोहाचे आरोप वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींकडून केले जातात. गांधी त्यांचे खंडन करतात. अचानक कस्तुरबा त्यांच्यासमोर उभ्या ठाकतात आणि विचारतात, जीवनभर न विचारलेला प्रश्न! त्या त्यांच्यासोबत गांधी न्यायाने वागले नाही असा आरोपही करतात. त्यांनी त्यांच्या आदर्शाच्या जात्यात आदर्शाच्या नावांखाली साऱ्या स्त्रियांना त्यांनी भरडून काढले आहे. त्या हेही सुनावतात की प्रत्येक प्रयोगात त्यांचा बळी दिला गेला. आता तरी स्त्रियांना यातना देणे बंद करा. तुम्ही तुम्हाला जे 'ईश्वर' मानतात त्यांची मनोवैज्ञानिक हिंसा करत आलात. थांबवा हे एकदाचे.

गांधी अस्वस्थ होतात आणि स्वतःलाच प्रश्न विचारतात, हे काय होते? कस्तुरबा ही माझीच प्रतिछाया? मला भेडसावणारी?

अशा अनेक तरल संघर्षांची पेरणी लेखकाने प्रत्येक  दृश्यात केली आहे. कस्तुरबा आधीच गेल्या आहेत हे माहीत असूनही त्यांचे हे अवतरण,  गांधी यांना त्यांच्याच समोर पिंजऱ्यात उभे करणे खूप मोठे नाट्य निर्माण करते. गांधी या महामानवाला माणसाच्या पातळीवर समजून घेण्यास मदत करते.

गांधी यांच्यावर देशाविरुद्ध कटकारस्थान केल्याचा खटला चालतो. दोन हजार पानांची बिहार सरकारची फाईल शेकडो कार्यालयांतून फिरून दिल्लीच्या होम मिनिस्ट्रीत पोचते. आणि देशाच्या घटनेचा आणि देशाचा अवमान करणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी यांच्यावर वेगवेगळ्या कलमांखाली खटला चालून गांधीला गिरफ्तार करण्याची शिफारस केली जाते. नेहरू शिक्षा कॅबिनेटच्या अनुमतीने अंमलात आणतात. गांधी यांना कैद केले जाते. आणि त्यांच्या बरोबरच प्यारेलाल, सुषमा, बावनदास, निर्मलादेवी यांनाही कैद केले जाते.

स्वातंत्र्यलढ्याच्या सरसेनानीला, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांचेच सहकारी कैद करतील. घटनेच्या अधीन राहून ग्रामस्वराज्याचा यशस्वी प्रयोग करणा-या विरुद्ध शासनकर्त्यांची कृती ही आत्मकेंद्री वृत्ती की एका निष्काम योग्याच्या नेतृत्वाचे भय?

गांधी यांना कारावास होतो. गांधी त्यांची दिनचर्या कारागृहातही शांतपणे चालू ठेवतात. ते त्यांना गोडसे यांच्याच खोलीत ठेवावे असा आग्रह धरतात. त्यांना त्यांच्या बरोबर संवाद साधायचा आहे. जेलर आणि शासकीय यंत्रणा सुरक्षेच्या कारणास्तव त्या गोष्टीला साफ नकार देते. शिवाय, कारागृह हे काही संवादाचे व्यासपीठ नाही हे ठणकावून सांगतात. शेवटी, गांधी अन्न सत्याग्रहाची धमकी देतात. उपोषणामुळे गांधींची प्रकृती खालावते. अनुचित काही घडू नये म्हणून मंत्रिमंडळाच्या बैठकीत गांधींना गोडसे यांच्याशी बोलण्याची समंती दिली जाते.

गोडसे याला गांधीचे हे आणखी एक नाटक वाटते. गांधी गोडसेला विचारतात गोळी घातल्यानंतर लोक तुझा तिरस्कार करायला लागतील असे तुला वाटले नाही! तुझ्यावर या कृत्यासाठी प्रेम करणा-यांच्या संख्येपेक्षा ती संख्या फार मोठी असेल याचे भय तुला वाटले नाही. अजूनही संवादाचा मार्ग निघू शकतो का याबाबत मला तुझ्याशी बोलायचे आहे. गोडसे मान्य करतो आणि सांगतो की हिंदुत्वाच्या, हिंदू जातीच्या, हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आणि हिंदुस्थानला वाचवण्यासाठी मला तुमची हत्या करायची होती. हिंदुस्थान केवळ हिंदूंचे राष्ट्र आहे, हिंदूंचा देश आहे.

गांधी गोडसेला समजावण्याचा प्रयत्न करतात की हिंदुस्थान हा त्याच्या कल्पनेपेक्षा खूप मोठा आहे. परमेश्वराची कृपा आहे या देशावर... शेकडो वर्षांच्या गुलामगिरीला केवळ गांधीच कृपा मानू शकतात या गोडसेच्या निर्भर्त्सनेवर गांधी सांगतात, की स्वातंत्र्य केवळ मनाचे आणि विचारांचे असते. हिंदू मत कधीच पराजित झाले नाही. भारताने वर्षानुवर्षे समन्वयाचे एकतेचे राजकारण केले आहे.

गोडसे गांधी यांच्यावर पुन्हा आगपाखड करतो, त्यांचा विरोध जर पाकिस्तानच्या निर्मितीला होता तर मग त्यांनी पाकिस्तानला पंचावन्न करोड रुपये देण्यासाठी अन्न सत्याग्रह का केला? त्यांनी त्यांच्या सिद्धांतांच्या आडून पाकिस्तानचे तुष्टीकरण केले आहे. गोडसे भिंतीवर टांगलेल्या कॅलेंडरकडे हात करून सांगतो की ‘हा आमच्या अखंड भारताचा नकाशा आहे?’ गांधी उत्तरतात “गोडसे, तुझा अखंड भारत तर सम्राट अशोकाच्या साम्राज्याएवढाही नाही. तू अफगाणिस्थानला सोडले. ते प्रांतही सोडलेस जे आर्यांचे मूळ स्थान होते. अरे, हा नकाशा तर ब्रिटिशांनी तयार केलेला आहे.”

जेलमध्ये गांधी संडास साफ करण्याची मोहीम हाती घेतात. जेलर त्यांना अनुमती देत नाही. गांधी त्याला ऐकवतात, की जेल हा देशाचा आहे आणि देशाला साफ ठेवणे. हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. पण जेलर त्याला कायद्याचे उल्लंघन मानतो. गांधी उलट त्याला विचारतात, की जेल मॅन्युअलमध्ये कैद्यांनी संडास साफ करू नये असे कोठे लिहिले आहे?

शेवटी, गांधी गोडसेला सांगतात, की जर तू या अठरापगड जातीतल्या लोकांना हिंदू मानत नसशील तर तू हिंदू नाहीस. आधी तर तू देशाला लहान केलेस, नथुराम. आता हिंदुत्वालाही लहान करू नकोस... दुस-यांना उदार बनवण्यासाठी आधी स्वतःला उदार व्हावे लागते. गांधी, शेवटी, सुषमाला लग्नाची परवानगी देतात आणि नवदाम्पत्याला भेट भगवद्गीता देतात. गोडसे सांगतो की गीता हे त्याचे जीवनदर्शन आहे. त्यावर गांधी सांगतात, किती अजब आहे, गोडसे, नाही? गीता तुला माझी हत्या करण्यास प्रेरणा देते आणि मला तुला क्षमा करण्याची प्रेरणा देते. हे कसले रहस्य आहे? गोडसे सांगतो, गांधी, तुमचा वध हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आवश्यक होता. तो देशाच्या हिंदू जनतेचा निर्णय होता.

गांधी सांगतात, ‘गीता शत्रू आणि मित्र यांच्याबद्दल एकच भावना असावी असे सांगते, जर मी शत्रू होतो तरीही तू माझ्याबद्दल शत्रुभाव का ठेवलास? गोडसे अरे, गीता सुख-दुःख, सफलता-विफलता, शत्रू आणि मित्र यांत भेद मानत नाही. समानता, बरोबरीचा भाव गीतेत आहे. सगळ्यांना आपल्या विचारांचे स्वातंत्र्य आहे, पण कोणाची हत्या करण्याचे स्वातंत्र्य कोणालाही नाही. ज्या माणसात त्यागाची भावना आहे तो मनुष्य साऱ्या गुणांचा स्वामी मानला जातो.

दोघांचा हा संवाद होतो पण दोघेही त्यांच्या त्यांच्या निर्णयावर ठाम राहतात. असगर वजाहत यांनी घटनांचा पट मांडून ठेवला आहे. निर्णय सुज्ञ वाचक-प्रेक्षकांवर सोडला आहे.

खरे म्हणजे गांधी, गोडसे; एवढंच काय नेहरू, वल्लभभाई हा सारीच पात्रे आज मिथ झालेली आहेत. मायथॉलॉजी आणि मिथस हे कवी, नाटककार यांचे फार मोठे भांडवल असते. या मिथसना एकमेकांसमोर उभे करून वर्तमानाच्या संदर्भात त्यांचे, त्यांच्या ताणतणावांचे आणि संघर्षाचे अर्थ लावण्याचा प्रयत्न केला गेला आहे. काळाबरोबर स्वातंत्र्य पोएटिक न्यायाच्या दृष्टीने, सत्याचा शोध घेण्याच्या दृष्टीने क्षम्य ठरते. घटित वास्तवापेक्षा हे काव्यगत वास्तव अधिक दूरगामी ठरते!

अनेक पात्रे, अनेक घटना, अनेक घटनास्थळे असूनही 'गोडसे @ गांधी डॉट कॉम' या थोड्या फॅन्सी शीर्षकाच्या नाटकातून सत्ताकारण, लोककल्याण, व्यक्तिगत निष्ठा आणि त्यांचे उदात्तीकरण यांच्यावर नाट्यपूर्ण प्रभावी नाटक लिहिले आणि एका ज्वलंत विषयाच्या तळाचे सत्य शोधण्याला युवा वर्गाला प्रवृत्त केले आहे, अतिशय संयतपणे!

गोडसे @ गांधी डॉट कॉम - असगर वजाहत

प्रकाशक : भारतीय ज्ञानपीठ

भाषा : हिंदी

पृष्ठ संख्या : ७९, मूल्य : १०० रुपये

- प्रा. कमलाकर सोनटक्के

लेखी अभिप्राय

अतिशय चांगला लेख. नाटक पहायला उद्युक्त कारणारा परिणामकारक लेख.

vidyalankar gharpure30/01/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.