अक्षर चळवळीतील के के


_Akshar_ChalvalitilKK_1_1.jpgहस्ताक्षर ही माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख असते. ज्या व्यक्तीचे हस्ताक्षर सुंदर त्याच्याकडे यश, सन्मान आणि समृद्धी चालत येते अशा दृढ भावनेने लेखक व पत्रकार किशोर कुळकर्णी अक्षर चळवळीत 1995 पासून कार्यरत आहेत. किशोर कुळकर्णी यांना सगळे प्रेमाने केके म्हणतात. त्यांचा ‘घडवा सुंदर हस्ताक्षर’ हा उपक्रम गेली बावीस वर्षें अखंड सुरू आहे. किशोर यांचे काम, लेखनकलेतील त्यांची जागा, संगणक व इंटरनेट यांचे युग आले तरी कोणी घेऊ शकत नाही; किंबहुना, त्या तंत्रज्ञानामुळे हस्ताक्षरास वाव मिळेल या विश्वासाने पत्रकार किशोर कुळकर्णीं यांचे काम सुरू आहे. ते म्हणतात, की ‘गुगल हँण्डरायटिंग अॅप्लिकेशन’मुळे मोबाईल स्क्रिनवर अक्षर गिरवले असता, ते ‘युनिकोड’मध्ये आपोआप टाईप होऊन प्रदर्शित होते. त्यामुळे ते तंत्र हस्ताक्षर लेखनास पूरक ठरत आहे.

_Akshar_ChalvalitilKK_2.jpgकिशोर कुळकर्णी जळगावच्या ‘जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड’मध्ये प्रसिद्धी विभागात संपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा जन्म अमळनेर तालुक्यातील करणखेडा या गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण गावी घेतले. पुढे अमळनेरच्या ‘प्रताप महाविद्यालया’तून शिष्यवृत्ती घेत 1992-93 मध्ये अर्थशास्त्र विषयाची पदवी घेतली. महाविद्यालयात असताना बुद्धिवान आणि संघर्षशील विद्यार्थी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी शिष्यवृत्ती घेत अमळनेरच्या ‘प्रताप महाविद्यालया’तून 1992-93 मध्ये अर्थशास्त्र विषयाची पदवी घेतली. नंतर त्यांनी नाशिक येथील ‘एचपीटी कॉलेज’मधून पत्रकारितेची पदवी घेतली. त्या दरम्यान, त्यांची भेट ‘अक्षर सुधार आंदोलक’ नाना लाभे यांच्याशी झाली. नानांनी कुळकर्णींच्या अक्षरांना सुंदर वळण दिले. कुळकर्णी नाना लाभे यांच्या कार्यामुळे प्रभावित झाले. त्यांनी त्या कामी 1996 पासून लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्यांचा ‘घडवा सुंदर अक्षर’ हा उपक्रम तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी नाशिक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुरू झाला. भवरलाल जैन यांनीही त्यांच्या उपक्रमास प्रोत्साहन दिले.

किशोर कुळकर्णी ‘अक्षर सुधार आंदोलना’त गावा-गावांत जाऊन शाळांमध्ये सहज, सुंदर स्वच्छ आणि सरळ अक्षर कसे काढावे याबाबत प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन करतात, तसेच  व्याख्यानही देतात. शालेय विद्यार्थीच नव्हे तर प्रौढ, उच्चपदस्थ व्यक्तींचेही हस्ताक्षर सुधरवण्यात किशोर कुळकर्णी यांचा हातखंडा आहे. त्यांच्या उपक्रमाने तीन हजारांहून अधिकांचे हस्ताक्षर सुघड झाले आहे.

_Akshar_ChalvalitilKK_3.jpg‘घडवा सुंदर हस्ताक्षर’ या उपक्रमांतर्गत किशोर कुळकर्णी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यावर भर देतात. शालेय विद्यार्थ्यांचे अक्षर सुधारण्यासाठी भर दिला तर ते जास्त परिणामकारक ठरू शकते असे ते म्हणतात. ते विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षराचे धडे शास्त्रोक्त पद्धतीने देतात. हस्ताक्षर सुंदर दिसण्यासाठी, टपोरे वळणदार दिसण्यासाठी काय केले पाहिजे, वर्णातील मुख्य रेषा- ती सरळ काढली जावी, मोठी असावी, अक्षरातील उंची, अक्षरातील दोन वर्णांचे अंतर, जाडी, लेखणी-पेन कोणता असावा, कागदावर पेन कसा चालवावा, पेन चालवण्याची दिशा, लिहिण्याची गती, वळण, कसे व कोठे थांबवावे आदी मुद्यांसह किशोर कुळकर्णी सोदाहरण मार्गदर्शन करतात. जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा; तसेच, महाविद्यालयांमध्ये जाऊन सुंदर अक्षर कसे काढावे ह्यासंबंधी प्रात्याक्षिकांसह व्याख्याने देण्याचा त्यांचा विचार आहे. त्यांनी तळमळीने, चिकाटीने व निरपेक्ष भावनेने केलेल्या या कार्याबद्दल त्यांच्या पाठीवर पुरस्कार, गौरवरूपी शाबासकीची थापदेखील मिळाली आहे. हस्तलेखनाचे भूर्जपत्र ते पत्र असे दुर्मीळ अक्षरांचे सुमारे अडीचशेहून अधिक नमुनेदेखील त्यांच्याकडे आहेत. त्यांचे प्रदर्शन अनेक ठिकाणी झाले आहे.

ज्याचे अक्षर सुंदर, वळणदार ती व्यक्ती प्रसन्न, नीटनेटकी, शिस्तप्रिय असते असे म्हटले जाते. किशोर कुळकर्णी यांनी ‘घडवा सुंदर हस्ताक्षर’ हे बावीस पानी पॉकेट बुक प्रकाशित केले आहे. त्यांच्या ‘पासवर्ड सुंदर अक्षराचा’ या पुस्तकाचे प्रकाशन 8 जानेवारी 2016 रोजी अनिल अवचट यांच्या हस्ते झाले. त्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती 2 सप्टेंबर 2017 रोजी एकनाथ खडसे यांच्या हस्ते प्रकाशित झाली. त्या पुस्तकासह ‘अर्धशतकी लग्नगाठ’, ‘ब्लॉगवाल्या आजीबाई’, ‘घडवा सुंदर हस्ताक्षर’, ‘पासवर्ड सुंदर अक्षराचा’, ‘ज्ञानवाणी’ ही पाच पुस्तके किशोर कुलकर्णी यांच्या नावावर आहेत.

किशोर कुळकर्णी - 9420607059

- आरिफ आसिफ शेख

लेखी अभिप्राय

अक्षर व अक्षरांसाठी वाहून घेतलेले या चळवळीचे कार्यकर्तै किशोर कुलकर्णी यांना खूप शुभेच्छा!!

प्रकाश देशपांडे24/01/2018

सर ,मला सुंदर हस्तक्षर शिकयचे आहे मी धुळे येथे राहतो माझा मोबाईल नंबर 9421991991आहे फोन करा किंवा तुमचा नंबर द्या

Alok Raghuvanshi 24/04/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.