आदिवासी कातकरी जमातीचे झिंगीनृत्य


_AadivasiKatkariJmatiche_Zinginrutya_1.jpgठाणे जिल्ह्यात 'झिंगीनृत्य' हे 'झिंगी' किंवा 'झिंगीचिकी' या नावाने ओळखले जाते. 'झिंगीनृत्य' हे नाव प्रमाण भाषेत आढळते. कातकरी लोक त्याला 'झिंगीनृत्य' म्हणून क्वचितच ओळखतात. कातकरी त्याला ‘डबा-ढोलकीचा नाच’ म्हणतात. पत्र्याचा डबा व ढोलकीचा ठेका यांवर आरंभी ताल धरला जातो. त्यावरून त्यास 'झिंगीनृत्य' असे नाव आहे. त्याविषयी आणखीही काही बोलवा आहेत. एक मत असे, की “कातकरी लोक दारू पितात. दारू प्यायल्याने त्यांना झिंग येते. त्या झिंगलेल्या अवस्थेत केला जाणारा नाच म्हणजे झिंगीचा नाच!” दुसरे मत असे, की “नृत्य सादर करणारे कलाकार पाय मागेपुढे करत नाचताना जागेवरच जोराने गिरकी घेतात, म्हणून त्या नाचाला ‘झिंगी’ असे म्हटले जाते.” त्या मतांमधून ‘झिंगी’ नृत्याचे स्वरूप उलगडले जाते, हे खरे.

‘झिंग’ या शब्दाचे अर्थ दोन होतात. एक दारू पिऊन माजतात ते ‘माजणे’. दुसरा अर्थ ‘शीण’ किंवा ‘थकवा’. कष्ट करून आलेले कातकरी शीण घालवण्यासाठी जीवनात आनंदाचा सण निर्माण करतात, ते झिंगी नृत्याच्या आधारे. 'झिंगीनृत्य' हा कातकरी माणसांच्या पिढ्यान् पिढ्यांचा वारसा आहे. त्यात व्यक्तिसंख्येचे बंधन नाही, पण नृत्याला रंगत येण्यासाठी कमीत कमी सहा ते आठ व्यक्तींची आवश्यकता असते. सहभागी लोक जास्तीत जास्त कितीही असू शकतात. मात्र त्यासाठी नृत्याची जागा तशी विस्तृत हवी. जागा मोठी असेल तर तीस-चाळीस व्यक्तीसुद्धा एकत्र नृत्य करू शकतात. पंधरा ते सोळा व्यक्ती सादरीकरणास असतात. गौरी-गणपती, दिवाळी-होळी इत्यादी सणांना झिंगीनृत्याचे सादरीकरण आवर्जून होते. झिंगीनृत्याला कालमर्यादा नाही. ते कातक-यांच्या इच्छेनुसार सादर होते. त्याला कोणत्याही ऋतूचे, सणाचे व काळाचे बंधन नाही.

झिंगी नृत्य गोलाकार फेर धरून सादर केले जाते. स्त्री-पुरुष, दोघेही झिंगीनृत्यात सहभागी होतात. तरुण मुले-मुलीही नृत्य सादर करतात. स्त्री-पुरुषांच्या गोलाकार फेरामध्ये डबा व ढोलकी वाजवणारे बसलेले असतात. ढोलकी वाजवणा-याला ‘ढोलक्या’ म्हणतात. ढोलकी आणि डबेवाला मध्यभागी बसून बेधुंद होऊन वाजवतात. ते नृत्यात अधिकाधिक रंग भरण्याचा प्रयत्न करतात. मुख्य नाचणा-यांच्या पायांत घुंगरू बांधलेले असतात. मुख्य गाणारा व नाचणारा वाद्यांच्या तालावर ज्या प्रकारे नृत्य करेल त्याप्रमाणे इतर लोक गाणी गात, नृत्य सादर करतात. मुख्य नाचणा-या पुरुषाला ‘नाच्या’ म्हणतात तर मुख्य नाचणा-या स्त्रीला ‘नाची’ म्हणतात. नाचणारी मंडळी पायांच्या वेगवान हालचाली करत पाय मागेपुढे करत नाचतात. तसेच, गिरकी घेऊन मध्येच बसून तेवढ्याच झटक्यात उठतात. नृत्यात प्रसंगानुसार आणि गाण्याच्या प्रसंगानुसार टाळ्या वाजवल्या जातात. नृत्य सादर करणारे तोंड एकवेळ आत व एकवेळ बाहेर करून नाचतात. बसून नाचणे, डोक्यावर नाचणे असे चालू असताना कातकरी लोकं मध्ये-मध्ये उत्स्फूर्त चित्कार काढतात. चित्कार ही झिंगी-नृत्याची जानच होय.

'झिंगीनृत्य' सादर होताना ‘कोडे’ टाकले जाते. कातकरी बोलीत त्या कोड्याला ‘जिंकणं’ असे म्हणतात. कोडे हा 'झिंगीनृत्या'चा अविभाज्य घटक आहे. 'झिंगीनृत्य' दोन कारणांनी सादर होते – एक निखळ आनंदासाठी आणि दुसरे स्पर्धेसाठी. आनंदासाठी सादर होत असलेल्या 'झिंगीनृत्या'त ‘कोडी’ टाकली तरी त्याला स्पर्धेचे रूप नसते. स्पर्धा प्राथमिक पातळीवर असते. स्पर्धेत नुकसान कोणाचे होत नाही. वाडीतील सर्व लहानमोठे, तरुण-तरुणी, म्हातारे 'झिंगीनृत्या'त सहभागी होतात.

'झिंगीनृत्या'चा दुसरा प्रकार स्पर्धेचा असतो. स्पर्धा दोन किंवा अनेक नृत्य गटात होते. त्या प्रकारांत झिंगीनृत्यगीतांतून कोडे टाकले जाते. ते कोडे दुस-या पार्टीने उलगडून दाखवायचे असते. कोडे उलगडले तर ठीक, नाहीतर ‘कोडे’ टाकणा-या पार्टीला बक्षीस द्यावे लागते. हे बक्षीस लुगडे, पोलके, टॉवेल आणि क्वचित प्रसंगी पैशांच्या स्वरूपात असायचे. झिंगीनृत्य जसजसे रंगात येते, तसतसे बक्षिसांचे स्वरूप एका भयानक पातळीवर जाऊन पोचते. झिंगीनृत्याच्या डावात बहीण, मुलगी, पत्नी यांनाही लावले जायचे. कोडे घालणारे आव्हान करायचे, की ‘हे कोडे उलगडले तर माझी पत्नी तुला. उलगडू शकला नाहीस तर तुझी पत्नी मला!’ अशा भयानक पातळीवर ही स्पर्धा जाऊन पोचायची आणि या बक्षिसात पत्नीव्यतिरिक्त बहीण, मुलगी यांनासुद्धा लावले जायचे. नाची असणा-या स्त्रीचा पती विरूद्ध पार्टीच्या नाच्याला आव्हान करतो, की माझ्या पत्नीला तू नृत्यात हरवलेस तर माझी पत्नी तुला आणि ‘नाच्या’ असलेल्या पुरुषाने ‘नाची’ स्त्रीला हरवले तर ती ‘नाच्या’ असलेल्या पुरुषाला बक्षीस म्हणून मिळायची. नृत्याविष्कारावर जिंकून आणलेल्या अशा कातकरी स्त्रिया खेड्यापाड्यांत आहेत.

‘झिंगीनृत्या’त पहिल्यांदा नमनगीत किंवा गण गायला जातो. नंतर प्रत्यक्ष नृत्याला सुरुवात होते. उदाहरणादाखल काही

‘झिंगीनृत्यगीते’-
1.
‘या शिव नंदना येरे तू रंगना
नमन माझे वारून वारी ||धृ||
पयला नमन मी नमू कोणाला धरतरी मातेला
या शिव नंदना............. ||१||
दुसरा नमन मी नमू कोणाला
माता की पित्याला
या शिव नंदना.............  ||२||
तिसरा नमन मी नमू कोणाला
गावाच्या गावदेवीला
या शिव नंदना.............  ||३||
चौथा नमन मी नमू कोणाला
चांद का सूर्याला
या शिव नंदना............. ||४||’
(वरील गीत हे नमन गीत आहे)

2.
‘रंगन रंगन रंगन
मी माटीना रंगन रंगन
माटीना रंगन रंगन
त्याला मुरबाना भाजन भाजन
मुरबाना भाजन भाजन
त्याला शेणाना सार्वन सार्वन
येई रंगनात रंगतात
मिनी आज पाय दिना यो दिना’

3.
‘मेघ कडाडून सखे ढोल वाजवतो
ढोल वाजवतो सखे ढोल वाजवतो
आंबियाच्या बनी सखे मोर नाचती गं
मोर नाचती गं सखे मोर नाचती गं
केळणीच्या बनी सखे सरप डुलती गं
सरप डुलती गं सखे सरप डुलती गं
जंगल दरीत सखे वाघोबा डरकाळती गं
वाघोबा डरकाळती गं सखे वाघोबा डरकाळती गं
मेघ कडाडून सखे ढोल वाजवतो
ढोल वाजवतो सखे ढोल वाजवतो’

कातकरी यांची ‘झिंगीनृत्यगीते’ अभ्यासली तर ती त्यांचा जीवनपटच उलगडून देतात. येथे एक लक्षात ठेवायला हवे, की गीते ज्या व्यक्तीने तयार केली असतील तो उत्कृष्ट कवी असणार. कारण ‘झिंगीनृत्यगीते’ उत्कृष्ट प्रतिभावंताने तयार केलेली जाणवतात.

- सुभाष लहू शेलार

लेखी अभिप्राय

Khup Chan lekh....

Anu06/10/2018

Nice..amazing song ..dance
I wanna to involve in them once in my life and wanna enjoy all things.

Priya prakash …06/10/2018

Nice amazing songs dance .
l wanna involve in them once in my life and wanna enjoy all things .
We wants to develop aadhivashi culture.provide them social services ..

Priya prakash …06/10/2018

I am proud of you sir .... tumchyavishayi jevdh kahi bolu tevdh kamich ahe

jatin ghanshya…06/10/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.