कोकणातील इरले


_kokanatil_Irale_1.jpgकोकणातील शेतकरी भात लावणीची कामे करताना स्वत:चे संरक्षण पावसापासून व्हावे यासाठी इरली व घोंगडी यांचा वापर करत असत. आधुनिक परिस्थितीत त्या ऐवजी प्लास्टिकचा वापर वाढला आहे. इरली प्लास्टिकपासून बनवलेली देखील आढळतात. जुने  इरले हे वापरण्यास वजनाने जड; त्या तुलनेत प्लास्टिकचा कागद अंगावर वागवण्यास हलका असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल प्लास्टिकच्या कागदाकडे, मेणकापडाकडे झुकला आहे. त्यामुळे इरली हळुहळू कालबाह्य होत गेली आहेत.

इरली बनवण्यासाठी बांबूच्या कामट्यांचा कुंचीच्या आकाराचा सांगाडा तयार करतात. इरल्यावर उंचवटा उंटाच्या पाठीवरील उंचवट्याप्रमाणे असतो. इरल्याच्या कमानीला ताटी असे म्हणतात. इरल्याचा डोक्याकडील आकार निमुळता व खाली पसरट होत जातो. इरले पळसाची पाने, सागाची पाने, कुंभ्याची पाने किंवा केतकीची पाने शिवून त्यांचे आच्छादन या स्वरूपात केले जाते. ते इतके गच्च असते, की पावसाच्या पाण्याचा एक टिपूसदेखील आत शिरणार नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे शेतकामात व हिंडण्या-फिरण्यात पाऊस, थंडीवाऱ्यापासून संरक्षण होई. इरल्याचा पुढचा भाग अर्धगोलाकार असून उघडा असतो, तर डोक्यापासून कमरेच्या खालपर्यंत आच्छादन असते. इरल्याच्या खालचा भाग आतील बाजूस वळवला जातो. कारण इरले वापरणारी व्यक्ती कामासाठी खाली वाकली तरी कमरेच्या खालचा भाग भिजू नये. इरली माडाच्या झावळ्या विणून देखील तयार करत. त्याला खोळ म्हणतात. शेतात काम करताना कितीही जोराचा वारा-पाऊस आला तरी इरले वजनाने जड असल्याने ते उडून जाण्याची भीती नसते. शिवाय, इरले वापरल्यामुळे दोन्ही हात वापरण्यासाठी मोकळे राहतात. इरली ही टिकाऊ आहेत. एकदा तयार केलेले इरले किमान पाच-सहा वर्षें तरी टिके. इरले आकाराने मोठे असते. ते तीन ते पाच फुटांपर्यंत बनवले जायचे. कोकणात मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे भरपावसात तरवा (भाताचे लावणी करण्यायोग्य रोप) काढणी व भात लावणी अशी कामे करावी लागतात. अशा वेळी इरली संरक्षक कवचासारखे काम करतात. इरल्यावरील आच्छादनामुळे पावसाचा गारवा न जाणवता उबदारपणा मिळतो. पूर्वी शेतकरी, महिला व शेतमजूर इरल्यांचा वापर सर्रास करत असत. परंतु आता प्लास्टिकचे कागद, रेनकोट, गमबूट, टोप्या, छत्र्या यांसारख्या वस्तूंच्या ग्रामीण भागातील उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांचे पावसापासून संरक्षण करणारी इरली दुर्मीळ झाली आहेत. त्याचबरोबर, इरली बनवण्याची कामाठी कलादेखील लोप पावत आहे. कोकणात हरिजन समाजातील लोक इरली विणण्याचे काम करायचे. विशेषत:, महिलांचा हातखंडा त्या व्यवसायात होता.

- वृंदा राकेश परब

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.