वाळक्या काटक्या क्षुल्लक तरी महत्त्वाच्या!


_Vaalakyaa_Kaatakya_1.jpgरा. चि. ढेरे यांनी ‘पुण्यभूषण’ पुरस्कार वितरणाच्या समारंभात त्यांच्या भाषणात ‘वाळक्या काटक्या’चा उल्लेख केला, त्यांनी त्या त्यांच्या आजीला स्वयंपाकासाठी जळण म्हणून आणून दिल्या. तो टिपणाचा विषय म्हणून माझ्या समोर आला, तेव्हा खरेतर मी संभ्रमात पडले, की त्यावर काय लिहावे? मग विचार केला, जर चित्रकाराला वाळक्या काटक्यांत कलाकृती दिसू शकते, तर मला लेखन का सुचू शकणार नाही?

वाळक्या काटक्या म्हणजे झाडाच्या फांदीचा गळून पडलेला निर्जीव भाग. झाडाला जेथे नवी पालवी फुटते, त्या पालवीच्या पुढील फांदी अन्नरसाअभावी नैसर्गिकरीत्या वाळून जाते. झाडाच्या मुळांकडून मिळणारा अन्नरस नव्या पालवीला पुरवला जातो. त्यामुळे कालांतराने जुन्या फांद्या गळून पडतात. त्यांनाच वाळक्या काटक्या असे म्हणतात. कोकणात वाळक्या काटक्यांना बोलीभाषेत ‘कुरपुटे’देखील बोलतात. कोठल्याही झाडाखाली एक फेरफटका मारला तरी मोळीभर काटक्या सहज उपलब्ध होतात. त्याचे व्यावहारिक उपयोग अनेक आहेत. त्यांचा वापर ग्रामीण भागात चुलीच्या सरपणासाठी केला जातो. वाळक्या काटक्या इंधन म्हणून पूर्वीपासून वापरात आहेत. त्या पेट भुरूभुरू घेत असल्यामुळे लवकर जळून जातात. त्यामुळे बरीच उष्णता वाया जाते. विशेषत:, पाणी अंघोळीसाठी गरम करण्यास न्हाणीघरात वाळक्या काटक्यांचा उपयोग होतो. पालापाचोळा वाळक्या काटक्यांबरोबर पेटवून हिवाळ्याच्या दिवसांत थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांची शेकोटी केली जाते. वड, पिंपळ, बेल, उंबर, पळस अशा औषधी वनस्पतींच्या वाळक्या काटक्या अग्निहोत्रासाठी वापरून अग्नी प्रज्वलित करतात. औषधी वनस्पतींच्या तशा ज्वलनातून जी ऊर्जा निर्माण होते, त्यामुळे आजुबाजूचे वातावरण शुद्ध होते असे म्हणतात. वाळक्या काटक्या पेटवून गरीब कुटुंबांमध्ये पूर्वी उजेडाची गरज भागवली जायची.

_Vaalakyaa_Kaatakya_2.jpgविद्यार्थ्यांना टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्यास सध्याच्या प्रायोगिक शिक्षणाच्या काळात शिकवले जाते. त्यात काटक्यांचे उदाहरण म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारातील पाने, फुले, झाडाच्या वाळलेल्या व ओल्या काटक्या यांपासून आकर्षक पुष्पगुच्छ बनवण्यास शिकवले जाते. वाळक्या काटक्यांनी चित्रकारांच्या इन्स्टॉलेशनसारख्या चित्र प्रकारांमध्ये देखील स्थान मिळवले आहे. आधुनिक इण्टेरिअरच्या जमान्यात बांबूच्या काटक्यांना वेगवेगळे आकार देऊन त्यावर वेली वाढवल्या जातात. त्यामुळे घराची शोभा वाढते.

आदिवासी लोकांच्या जीवनात वाळक्या काटक्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ते लोक जंगलातील कंदमुळे, फळे, रानभाज्या यांच्याबरोबर झाडांखालील वाळलेल्या काटक्या वेचून, त्याची मोळी विकून त्यावर आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या झोपडीवरील छतापासून ते तीन दगडांच्या चुलीवरील स्वयंपाकापर्यंत झाडांच्या, गवताच्या वाळक्या काटक्याच त्यांना उपकारक ठरतात.

_Vaalakyaa_Kaatakya_3.jpgपक्ष्यांच्या जीवनात वाळक्या काटक्या महत्त्वाची भूमिका बजावतात. पक्षी त्यांची घरटी बनवण्यासाठी पाने, वाळक्या काटक्या व गवताचा उपयोग करतात. मगराची मादी नदीच्या काठावर खड्डा तयार करते व त्यात अंडी घालते. ती त्या अंड्यांचे संरक्षण व्हावे म्हणून खड्ड्यावर वाळक्या काटक्यांचे आच्छादन करून अंडी लपवते. नागराजाची मादी बांबूची पाने व काटक्या यांचा वापर करून, शंकूसारखे घरटे तयार करून त्यात अंडी घालते. पक्ष्यांच्या घरट्यांसाठी जशा वाळक्या काटक्या सहाय्यभूत ठरतात, तसेच प्राण्यांच्या शिकारीसाठी देखील त्यांचा वापर केला जातो. विशेषत: रानडुकराची शिकार करण्यासाठी सापळा रचला जातो. तो सापळा म्हणजे जेथे रानडुकरांचा वावर आहे, त्या जंगलात खड्डा खणून त्या खड्ड्यावर वाळक्या व ओल्या काटक्यांचे आच्छादन पसरले जाते. त्यानंतर आरोळ्यांनी रान उठवले जाते. त्या आवाजाने जीव वाचवण्यासाठी भीतीने पळणारे सावज अलगद सापळ्यात अडकते. रानडुकराची पारध मांसभक्षणासाठी केली जाते. अशा प्रकारे, वाळक्या काटक्या क्षुल्लक वाटत असल्या तरी त्यांचे भारतात मानवी व पशुपक्ष्यांच्या जीवनातील वेगळेपण अबाधित आहे.

- वृंदा राकेश परब

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.