गेले लिहायचे राहून - विनायकदादा पाटील यांची अनुभवगाथा


_VinayakdadaPatil_GeleLihaycheRahun_1.jpg‘गेले लिहायचे राहून’ हे विनायकदादा पाटील यांच्या ललित लेखनाचे पुस्तक. ते लेखन प्रसंगाप्रसंगाने झाले. ते संपादकांनी सूत्रबद्ध पद्धतीने मांडल्याने आकर्षक झाले आहे. ‘गेले लिहायचे राहून’ हा स्तंभ ‘महाराष्ट्र टाइम्स’ (नाशिक) मध्ये काही काळ प्रसिद्ध होत होता. विनायकदादा हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व. त्यांच्या व्यक्तिमत्त्वास लोकनेते, प्रयोगशील शेतकरी, उत्तम वक्ते, लोकसंग्राहक, साहित्य-संस्कृतीचा चाहता, गाण्यांच्या मैफली अनुभवलेला रसिक, चित्रशिल्प आदी कलांचा चाहता असे अनेक पैलू आहेत. लोकांनीच त्यांना ‘दादा’ ही उपाधी दिली. ते आजन्म काँग्रेस पक्षात आहेत. पण त्यांच्याजवळ सर्वपक्ष समभावही आहे. ते समाजवाद्यांचे, साम्यवाद्यांचे मित्र आहेत आणि त्यांना संघ-जनसंघ परका नाही. पाटील यांच्या वृक्षाची एक फांदी भाजपच्या राजकारणातही सक्रिय आहे. त्यांचे बंधू सुरेशदादा हे भाजपचे नेते आहेत. विनायकदादा पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांना जवळून अनुभवले आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले नाहीत पण त्यांचा व शरद पवारांचा दोस्तानाही सुटलेला नाही. ते पवारांच्या ‘पुलोद’च्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. विनायकदादा पाटील यांनी नाशिक लोकसभाही लढवली आहे - ते पवारांच्या समाजवादी काँग्रेसचे उमेदवार होते. ते त्यांना तेथे यशाने हुलकावणी दिल्यावर निवडणुकीच्या राजकारणापासून दूर गेले. काँग्रेस पक्षाने त्यांना विधान परिषदेत पाठवले. त्या काळातील घटना, प्रसंग, माणसे यांचे चित्रण ‘गेले लिहायचे राहून’मध्ये वाचण्यास मिळते.

पुस्तकाचे विभाग चार आहेत. ‘स्मरणांकित’ या भागात आठवणी विविध आहेत. त्या आठवणी व्यक्तिगत असल्या तरी त्यांना फार मोठा अवकाश आहे. त्या खुमासदारही आहेत. ‘तिकिट’ आणि ‘पहिले प्रेम’ हे अल्पाक्षरी लेख. बालपणाच्या अनुभवातील निरागसपणा त्या लेखांतून डोकावतो. लेखकाने ‘श्यामची आई’ सिनेमाचे तिकिट हरवल्यावर झालेल्या स्थितीचे वर्णन करताना म्हटले आहे, “त्यानंतर अनेक वेळा विधानसभा, विधानपरिषद, लोकसभेची तिकिटे मिळाली. ती आता आठवतही नाहीत. पण कोणा अनोळखी माणसाने मायेपोटी दिलेले ‘ते’ तिकिट आजही आठवते.” सूचक भाषा हे विनायकदादा पाटील यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य पुस्तक वाचताना लक्षात येते. तसेच गोधडीविषयीचे पहिले प्रेम लेखकाने विनासंकोच मांडले आहे. गोधडी ही मध्यमवर्गाच्या आणि विकसित कृषक समाजाच्या घरातून नाहीशी झाली आहे. ती तिन्ही ऋतूंत ऊब देते. ते तिचे वैशिष्ट्य लेखकाने अधोरेखित केले आहे. ‘स्मरणांकित’मध्ये अठ्ठावीस लेखांचा समावेश आहे. ते बहुतांश अल्पाक्षरी आहेत. ‘धडा’, ‘गुरूजी’, ‘लाडू मेथीचे’, ‘देवाघरची लेकरे’, ‘पैल तोगे काऊ…’ ही लेखांची शीर्षकेच बोलकी आहेत. त्यांतील ‘पंपा सरोवर’ आणि ‘ब्राह्मण’ हे लेख गमतीदार आणि तेवढेच चिंतनशीलही आहेत. विनायकदादा पाटील यांनी पंपा सरोवराची लोककथा थेट स्थानिकांच्या लोकभाषेत सांगितली आहे! ब्रह्मगिरीच्या पश्चिमेला असलेले कुशेगाव हीच वाली व सुग्रीव यांची राजधानी किष्किंधा नगरी अशी आदिवासींची श्रद्धा असल्याचे स्पष्ट करून तेथील पंपा सरोवराची कथा त्या लेखात येते. ‘रामा, आरे तू येवढा मोठा राजा. म्या तुहयावालं काय केलं व्हतं रं? आमचं भावाभावाचं भांडान. तू काही मागंपुढं पाहयाचं, काही इचारपूस करायची त दिला बान ठिऊन. काय तं म्हणे सुग्र्या तुला शितामाईला गवसायला सोबत करणार हाये म्हून.’ विनायकदादा पाटील यांनी रामायणातील वाली वधाची ही कथा लोकरामायणातील असावी तशीच आदिवासी बाबाच्या तोंडून कथन केली आहे. ती वाचण्यास मजा येते आणि रामाला मर्यादा पुरुषोत्तम का म्हटले जाते त्याचेही आकलन वाचकाला होते. लेखकाने गावात ब्राह्मण हवा ही आईची श्रद्धा आणि त्यासाठी काढलेला मार्ग याची हकिगत ‘ब्राह्मण’ या लेखात सांगितली आहे. त्या आठवणींना साहित्यमूल्य लेखनशैलीमुळे मिळाले आहे.

‘राग दरबारी’ या विभागात चोवीस लेख आहेत. त्या सर्व लेखांमध्ये कमीअधिक प्रमाणात राजकीय घटना-प्रसंग-व्यक्तींचे अनुभव आहेत. यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्याबाबतचे लेख व्यक्तिचित्रणात्मक आहेत. त्यांनी शरद पवार हे त्यांचे एक मित्र येथपासून ते पवारांच्या बारामती ते दिल्ली या वाटचालीविषयी जिव्हाळ्याने लिहिले आहे. यशवंतराव चव्हाण यांच्याविषयीच्या अनेक आठवणी ‘साहेब, राहून गेलेली प्रश्नबत्तिशी’ या लेखातून वाचण्यास मिळतात. राजकीय घटना-घडामोडींचा लेखाजोखा मांडणारा थोडा दीर्घ लेखही या विभागात आहे. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनाचा समाचार घेणा-या ‘महाराणी बाग कोठी नं 2’ या लेखांतील रिपोर्टिंग वृत्तांतकथा स्टाईलने आले आहे. व्यक्तिगत दृष्टीने, तरीही तटस्थ पद्धतीने केलेले ते रिपोर्टिंग म्हणजे तत्कालीन राजकीय घडामोडींचा दस्तऐवज होतो. त्यातील गमती गोष्टीवेल्हाळ पद्धतीने कथन केलेल्या आहेत. ‘साहेबांचे हस्ताक्षर’, ‘आहार आणि मन’, ‘6 जनपथ’, ‘विकेशी’, ‘महातो कहीन’, ‘दयालू’, ‘मास्तर’ हे लेख व्यक्तिगत आठवणींबरोबर गमतीजमतींनी रंगतदार झाले आहेत. मंत्र्यांच्या पी.ए.चे हस्ताक्षर आणि मंत्र्यांचे हस्ताक्षर यांतील गंमत आणि मंत्र्याच्या हस्ताक्षरातील चिठ्ठीने झालेली फसगत याचे गमतीशीर उदाहरण यांचे वर्णन यात वाचण्यास मिळते. प्रधानमास्तरांना ते विधान परिषदेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांना दिलेला व्यक्तिगत निरोप आणि चंद्रशेखर यांच्याकडे भेटलेला साधू यांचे बहारदार पण इरसाल वर्णन विनायकदादा पाटील यांनी केले आहे. दिल्लीच्या महाराष्ट्र भवनातील हरकाम्या महातोचे भावविश्व, त्याची जीवनदृष्टी मोजक्या शब्दांत उलगडत जाते. माजी आमदार कुसुम अभ्यंकर (त्यांचा उल्लेख चुकून पटवर्धन असा आला आहे) यांच्या पुस्तक प्रकाशनातील गंमतही मोठी मजेदार आहे. त्या समारंभास उपस्थित मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना वाचण्यास वेळ कसा असणार? प्रधानमास्तरांनी कादंबरी नक्की वाचली असणार म्हणून कार्यक्रमाच्या अध्यक्षांचे पहिले भाषण करून, मग इतरांनी बोलून समारंभ कसा ‘संपन्न’ केला त्याचे रहस्यच ‘विकेशी’च्या प्रकाशन समारंभातून उलगडत जाते! ‘राग दरबारी’तील लेखांवरून एखाद्याला राजकीय कादंबरी लिहिता येईल अशी ‘गल्ली ते दिल्ली व्हाया मुंबई’ गुंतागुंतीच्या पण वास्तव घटनांची मांडणी गमतीदार झाली आहे.

शेती हा विनायकदादा पाटील यांचा जिव्हाळ्याचा आणि चिंतनाचा विषय आहे. त्यांना कुसुमाग्रजांनी त्यांच्या वनशेतीच्या प्रयोगावरून सहजपणे वनाधिपती असे संबोधन वापरले होते. शेतीचे विविध भागांत प्रयोग करणारे प्रयोगशील शेतकरी आहेत. विनायकदादा पाटील यांनी त्यांचे काम प्रत्यक्ष ग्राऊंडवर जाऊन पाहिले आहे. तो पस्तीस लेखांचा भाग ‘केली पण शेती’ या समर्पक शीर्षकाने सजला आहे. शेवगा, आवळा, बाभूळ, आंबा, द्राक्ष आणि गांडूळ शेती करणा-या महाराष्ट्रातील प्रयोगशील शेतकऱ्याच्या यशोगाथा त्या विभागात वाचण्यास मिळतात. लेखकाने ‘खडा पारशी’ या लेखाच्या शेवटी एक सुंदर वाक्य योजले आहे- ‘शेती हा व्यवसाय नसून प्रवृत्ती आहे’ ( पृष्ठ 142). विनायकदादा सत्प्रवृत्तीने शेती करणा-या शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहताना दिसतात. इस्त्रायलपासून तर सिन्नर तालुक्यातील शेवग्याची शेती करणा-या एखाद्या बाळासाहेब मराळे यांच्यापर्यंतच्या कृषिकथा वाचकाची जिज्ञासा तृप्त करतात. ‘शेवगा 1998’ या लेखात ‘शेवग्याची शेती करू नये. अशुभ असते’ (पृष्ठ 180) या विषयीचे अनुभव सांगितले आहेत. त्यांच्या आईने ‘शेवगा लावला, तर मी पंढरपूरला निघून जाईन’ असा दमच भरला होता. त्या पार्श्वभूमीवर, त्यांनी दस्तुरखुद्द शरद पवारांनाच आंतरपीक म्हणून शेवग्याचे पीक घेण्याचा सल्ला दिला, तेव्हा सौ. प्रतिभा पवार यांना वहिनी शेवगा तोडा म्हणणारे भेटले!

_VinayakdadaPatil_GeleLihaycheRahun_2.jpgविनायकदादा हे निलगिरीच्या शेतीसाठी प्रसिद्ध. त्यांनी निलगिरीचा प्रचार आणि प्रसार करण्यात काही काळ व्यतीत केला. निलगिरी जमिनीतील पाणी शोषून घेते, त्यामुळे अन्य पीके धोक्यात येतात, निलगिरीवर पक्षी घरटी करू शकत नाहीत- पक्षी बसत नाहीत असा समज आणि अपसमज पसरत गेला आणि त्या प्रयोगाला प्रतिसाद कमी झाला. त्या संदर्भात ‘पुनरागमनायच’ हा महत्त्वाचा लेख या पुस्तकात वाचण्यास मिळतो. निलगिरीच्या झाडावर पक्षी बसतात, त्यात कावळ्यांची संख्या अधिक असते. विनायकदादा पाटील यांनी निलगिरीची तोड केली आणि निलगिरीच्या सोळा हजार झाडांवर अवलंबून असणा-या कावळ्यांची गैरसोय झाल्याने कावळे इतरत्र स्थलांतरित झाले. त्यांनी त्या कावळ्यांना उद्देशून म्हटले आहे, ‘पुनरागमनायच’. त्या लेखाच्या शेवटी ते म्हणतात, ‘मी चरितार्थासाठी झाडे लावणारा आणि तोडणारा शेतकरी आहे. वृक्षप्रेमी उच्चरवाने वृक्षतोडीला विरोध करत असतात. रहदारीला अडथळा ठरणारे वृक्षही तोडू नयेत हा विचार एकांतिक झाला.’ विनायकदादा पाटील मात्र वृक्ष गरजेनुसार तोडावे आणि वृक्षारोपण करून वृक्षांचे संगोपन करावे हे विचारसूत्र मांडतात. विनायकदादा पाटील हे लोकनेते सुसंस्कृत परंपरेतील आहेत. समाजातील सर्व घटकांत वावरणारे दादा साहित्यिक मित्रांसमवेत अधिक रमतात. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात विधानसभेत जेव्हा गदारोळ होई, कामकाज स्थगित होई तेव्हा ते जहांगिर कला दालनातील चित्र प्रदर्शनात जाऊन ताजेतवाने होऊन येत! सभेचे कामकाज पुन्हा सुरू होईपर्यंत तणाव निवळलेला असे अशी आठवण ते सांगतात.

त्यांना संधी मिळेल तेव्हा साहित्य-संस्कृतीविषयक चर्चा, भेटीगाठी आणि त्यातून मैत्रभाव जोपासण्याची कला साध्य झाली आहे. पवारांनी पुलोदचे मंत्रिमंडळ बनवले तेव्हा बापट-पाडगावकरांनी विनायकदादा पाटील यांना मंत्रिमंडळात घ्या अशी शिफारस केली होती. ‘साहित्य पौर्णिमा’ या विभागातील बारा लेखात असे अनेक अनुभव वाचण्यास मिळतात. पाडगावकर गेल्यानंतरच्या ‘कवितेचा पार रिता’ या शीर्षकाच्या लेखात पाडगावकर यांच्या आठवणी येतात. ते नामदेव ढसाळ यांनी इंग्रजीत कविता लिहिली असती तर तिला नोबेल पारितोषिक मिळाले असते असे सहज भाष्य करतात आणि त्याला ‘दांभिक नसलेला’ नामदेव त्याच्या उलाढालींसह उभा करतात. गदिमा आणि व्यंकटेश माडगुळकर यांच्या आठवणी ‘चाफा, तीळ आणि तांदूळ’ या लेखात वाचण्यास मिळतात. त्यातील आठवणी व्यक्तिगत असल्या तरी त्या भावरूप आणि समष्टीरूप झाल्या आहेत. त्या विभागात सुभाष अवचट आणि माणूसकार श्री. ग. माजगावकर यांची व्यक्तिचित्रे ही अक्षर साहित्य ठरावी अशी आहेत. विनायकदादा पाटील आमदार, मंत्री होते म्हणून पुढारी ठरतात. अन्यथा हे लेख वाचल्यावर तो माणूस कसलेला लेखक आहे असेच दिसून येते. कुसुमाग्रजांच्या आठवणींचे, अनुभवाचे पदर असणारे पुस्तकातील शेवटचे चार लेख तात्यासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वावर वेगळा प्रकाशझोत टाकणारे आहेत. त्यात गंभीरतेबरोबरच मिश्किल अनुभवही कथन केले आहेत. ‘एक मुलाखत, न ठरलेली’ हा लेख पारंपरिक मुलाखत न होता तो अनुभव लेखकाने कथन केला आहे. ‘काजू’ या लेखातील गंमत क्षणभर स्मित निर्माण करते तर ‘कवितेचा जन्म’ या लेखातील आत्मटीका कुसुमाग्रजांचा मानवतेचा विचार सहज सांगून जाते. त्या विभागांतील लेख लेखकाची जडणघडण समजावून घेण्यासाठी उपयोगी ठरतात. ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर झाल्यावर शिवशाहrर बाबासाहेब पुरंदरे यांना अग्निदिव्यातून जावे  लागले हे महाराष्ट्राने अनुभवले, पण बाबासाहेब पुरंदरे यांना समजावून घ्यायचे असेल तर विनायकदादा पाटील यांना वाचले आणि ऐकले पाहिजे असे ‘मनस्विनी’ हा लेख वाचल्यावर वाटत राहते.

लेखकामध्ये एक खोडकर मूल दडलेले आहे हे ‘गेले लिहायचे राहून’मध्ये जाणवत राहते. लेखक अनेक घटना-प्रसंगांकडे निरागस मुलाच्या मानसिकतेतून पाहत असल्याने लेखन वाचतानाही गंमत येते. निवेदक कोणतीच पोज घेत नाही. तरी लेखनात लालित्य आणि नाट्यही उतरले आहे. भाषा प्रवाही आहे. लहान लहान वाक्यांतील प्रसंग चित्रण वाचकाला गुंतवून ठेवते. नामदेव ढसाळ यांच्याविषयीच्या ‘दांभिक नसलेला’ या लेखात, “मैफलीतील बापट, करंदीकर, शेळके हे आधीच गेले. आता नामदेवही गेला. या सर्वांची आठवण येते. भेटीची ओढ आहे, बघू या केव्हा भेट होते ते” ( पृष्ठ 231) असे ते लिहून जातात आणि वाचक हळवा होतो.

लेखकाने संवादात्मक मजकुरासाठी त्या त्या व्यक्तीच्या बोलीभाषेचा चपखल वापर केला आहे. वाचकाला काही भाग वाचताना चटका बसतो आणि तो अंतर्मुखही होतो. यशवंतराव चव्हाण यांनी ‘मामाच्या गावाला जाऊ या’ या बालगीतातील ओळींमधील कल्पनाविस्ताराला दिलेले उत्तर तसेच अंतर्मुख करणारे आहे.

लघुत्व हे या लेखसंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. या पुस्तकाच्या वाचनासाठी ‘मोठ्या बैठकी’ची आवश्यकता नाही. पुस्तक प्रवासात, झोपण्यापूर्वी आवडीनुसार आणि सवडीनुसार कोणत्याही क्रमाने वाचले तरी वाचनानंदाचा अनुभव घेता येतो.

‘गेले लिहायचे राहून’
लेखक - विनायकदादा पाटील
राजहंस प्रकाशन, पुणे
प्रथमावृत्ती - डिसेंबर 2016
पृ. 252 + 18
किंमत 300 रुपये

- डॉ. शंकर बोऱ्हाडे

लेखी अभिप्राय

पुस्तकातील प्रसंगाची गुंफन अतिशय सुंदर आहेत.

DARADE DATTATR…14/05/2019

पुस्तक अप्रतिम. फार दिवसांनी ओघवत्या भाषेत लिहिलेले वाचायला मिळाले. अनुभवाने समृध्द झालेलं , संवेदनशीलता व्यक्त होणारं लेखन.सगळेच लेख छान. पण राग दरबारी अधिक आवडलं. कदाचित तो माझा अभ्यास विषय आहे, म्हणून असेल. पण त्यातला प्रांजळपणा आणि प्रसंग आवडले.

सौ.मेधा पत्की 15/10/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.